शेख महंमद चरित्र - भाग ३३

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


‘‘गलित कुष्‍ट मी जालों’’ वगैरे पूर्वजन्माच्या कथा ‘‘वाचितां चरित्र सद्‌गुरु स्‍वामीचे’’ इत्‍यादि उल्‍लेख आलेले आहेत. त्‍यावरून हें एकनाथांच्या वरील दोन अभंगांसारखेच एक हरदासी आख्यान आहे यांत शंका राहत नाही. हे सर्व अभंग महिपतीनंतरचेच असले पाहिजेत. कदाचित्‌ हे उल्‍लेख त्‍याच ‘नृसिंहक्षेत्री’च्या ‘गीतारहस्‍य’ लिहिणार्‍या अठराव्या शतकाचे अखेरीस होऊन गेलेल्‍या जनार्दनाचे किंवा त्‍यास अनुलक्षून लिहिलेले असावेत.

येथपर्यंत चांद बोधल्‍यांच्या परंपरेची चर्चा झाली. ‘सिजर्‍या’ प्रमाणें हे राजे महंमदाचे शिष्‍य होते की नाहीं हा स्‍वतंत्र संशोधनाचा विषय आहे. चांद बोधल्‍यांचे आणखीहि शिष्‍य असतील. परंतु आपणांस ज्‍या दोन शाखा उपलब्‍ध झाल्‍या आहेत त्‍या तीनचार पिढ्यांपर्यंत तरी चांगल्‍या तेजस्‍वी राहिल्‍या यांत शंका नाही. जनार्दन-एकनाथ-मुकुंदराज-रामनाथ व केशव हे चांगले लेखकहि होते व यांनी संस्‍कृत ग्रंथांतील तत्त्वज्ञान मराठींत उपलब्‍ध करून दिल्‍यानें मराठी भाषिकांची पराविद्याभ्‍यासाची पुष्‍कळच सोय लावून दिली. दुसर्‍या शाखेंत शेख महंमदांच्या काव्याचा उल्‍लेख वर आलाच आहे. परंतु दावलजी-हाकीम-बालाबावा हे सर्व लेखक होतेच व यांची पदें, कविता वगैरे मठांतील बाडांत पुष्‍कळ सापडते. या मंडळीशिवाय आणखीहि शाखा-उपशाखा, शिष्‍य-प्रशिष्‍य होऊन किर्ति करून गेले आहेत. त्‍या सर्वांचा येथे तपशीलवार विचार करणें शक्‍य नाही. चांद बोधल्‍यांचीहि तीन पदें उपलब्‍ध आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP