मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय १२

बृहत्संहिता - अध्याय १२

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


॥ अथअगस्त्यचार: ॥

सूर्याच्या मार्गाचा अवरोध करण्याकरिता वाढली आहेत शिखरे ज्याची असा जो विंध्यपर्वत तो ज्याने पूर्ववत केला असा व ऋषींच्या पोटांत शिरून पोटे फोडणारा, देवांचा शत्रू, जो वातापिनामक दैत्य तोही ज्याने पोटात जिरवला असा व समुद्र ज्याने प्राशन केला असा, तपाचा केवळ समुद्रच असा व ज्याने दक्षिणदिशा सुशोभित केला असा व उदके स्वच्छ करणारा, असा जो अगस्तऋषि त्याचा चार सांगतो ॥१॥

ज्या अगस्त्यमुनीने उदकाच्या नाशेकरून मकर (सुसर) यांची जी नखे त्यांहीकरून उकरली आहेत शिखरे ज्यांची असे जे इंद्रभयाने आत रहाणारे मैनाकादिक पर्वत त्यांहीकरून समुद्र तत्काल अत्यंत सुंदर केला. त्या ऋषीचा उदय श्रवण करा असा सहाव्या श्लोकी संबंध आहे. जे श्रेष्ठमणि, रत्ने व उदकसमुदाय त्यांहीकरून, परिमित आहेत मुकुटसंबंधी रत्ने ज्यांची अशा देवांप्रत सांगावयाकारणेच काय जाता झाला ॥१॥

ज्या मुनीने उदक हरण केले असताही वृक्षरहित पर्वताहीकरून व मणि, रत्ने, पोवळी याही सहित पंक्तिश: बाहेर निघालेले जे पर्वतांतील सर्प त्यांहीकरून समुद्र फारच शोभू लागला ॥२॥

ज्या मुनीने प्याले आहे उदक ज्याचे असा व विपत्तीप्रत पावलेला असाही जो समुद्र त्यास देवांची लक्ष्मी (शोभा) दिली. तो समुद्र कसा. हालणारे मत्स्य, जलहस्ति व सर्प हे ज्यात आहेत असा व पसरल आहे रत्नसमुदाय ज्यामध्ये असा. देवलक्ष्मी (शोभा) कशी. तेजस्वी मत्स्य, जल, गज, कुटिल यांही गमन करणारे. कोणी मत्स्यग, जलग (नारायण,) गजन (इंद्र,) कुटिलगति (भौमादिग्रह,) यांनीयुक्त व क्षिप्त (पसरले) आहेत रत्नसमुदाय जीमध्ये अशी देवांची लक्ष्मी तिची शोभा समुद्रास आणिली ॥३॥

चलन पावणारे मत्स्य, शिंपांतले जीव व शंख याही व्याप्त असा समुद्र ऋषीने उदक हरण केले असताही तरंगांनी सहित जी श्वेतकमले, व हंस याते धारण करणार्‍या सरोवराच्या शरद्दतूंतील शोभेते धारण करिता झाला ॥४॥

जो मुनि समुद्रच आकाश करिता झाला. तो समुद्र व आकाश कसे तर मत्स्य हीच श्वेतमेघ, मणि हिच नक्षत्रे, स्फटिक हेच चंद्र, उदकाभाव हीच शरद्दतूची कांति, सर्पांच्या फणांतील मण्याचे किरण हेच केतुग्रह अशाप्रकारचे केले ॥५॥

सूर्याच्या रथाचा मार्ग बंद करण्याकरिता उद्युक्त झाले आहे चंचल शिखर ज्याचे असा, घाबरलेल्या विद्याधरांच्या (देवयोनि) बाहूंच्याठाईं संलग्न झालेल्या ज्या स्त्रिया त्यांहीकरून घाबरून मांडीवर बसवलेल्या देहांवरची वस्त्रे तीच उंच व कंपित जे ध्वज त्यांनी करून शोभायमान असा, हत्तींच्या गंडस्थळांतील जो मद त्याने मिश्र जे रक्त त्याचे जे चाटणे त्याच्या सुगंधाचे अनुसरण करणारे जे भ्रमर त्यांनी आश्रयली आहेत मस्तके ज्यांची असे व निळ्या कोरांटयांच्या पुष्पांनी केलेलीच काय जी शिरोभूषणे ती धारण करणारे असे जे सिंह त्यांनी युक्त आहेत गुहेतले पाझर ज्याचे असा, हत्तींनी ओढलेले जे फुललेले वृक्ष त्यांनी त्रासलेले व भ्रमिस्त झालेले व उन्मत्त जे भ्रमर त्यांच्या  समुदायाच्या गाण्याचा आहे सुंदर शब्द ज्यांच्याठाई अशी, तरस, आस्वल, व्याघ्र, वानर यांनी अधिष्ठित (हे ज्यांवर आहेत) अशी व वाढलेली जी पर्वतांची शिखरे त्यांनीकरून आकाशतलाप्रतलाप्रत रेघा काढतोच काय असा, एकांतस्थली कामासक्त जी नर्मदानदी तिणे स्त्रीचेपरीच काय आलिंगित असा, देवांनी आश्रित आहेत बागा ज्याच्या असा व उदक भक्षण करणारे, अन्न न खाणारे, मूले व वायु यांना भक्षण करणारे असे जे ब्राम्हण (ऋषि) यांनी युक्त असा जो विंध्याचल त्याला जो स्तंभन करिता झाला त्या अगस्त्यऋषीचा उदय श्रवण करावा ॥६॥

अगस्त्यनामक ऋषीचा उदय झाला असता (दर्शन झाले असता) भूमीच्या योगाने झालेला जो मळ त्याने दूषित (गढूळ) अशी जी उदके ती पुन: स्वभावानेच स्वच्छ होतात. कोणासारखी तर दुष्टांच्या योगाने जे पाप त्याने दूषित झालेली चित्ते ती साधूंच्या दर्शनाने जशी निष्पाप होतात तशी उदके स्वच्छ होतात ॥७॥

दोहोबाजूंस बसले आहेत चक्रवाकपक्षी जिच्या अशी जी शब्द करणारी हंसांची पंक्ति तिला धारण करणारी अशी हास्ययुक्त नदी, तांबूलाने आरक्त झालेले व वर निघालेले आहेत दंत जिचे अशी जी स्त्री तिचेपरी शोभती झाली ॥८॥

नीलकमले ज्यांजवळ आहेत अशी जी शुभ्र कमले त्यांनीयुक्त व फिरणारी जी भ्रमरांची पंक्ति तिने सुशोभित अशी नदी, भिवया फिरवून वक्रद्दष्टीने पहाणारी जी कामयुक्त प्रौढ स्त्री तिचेपरी शोभती झाली ॥९॥

तरग हेच आहेत वलये (हस्तभूषणे) जिल अशी वापी (रुंद विहीर) मेघांच्या गमनाने प्राप्त झालेली अशी चंद्राची शोभा पहावया कारणे रात्रीस भ्रमर ज्यांमध्ये लीन झाले अशी आहेत पत्रे ज्याची असे, व सुंदर आहे पत्र ज्याचे असे, व काळे आहेत नेत्रांतील बुब्बुळ ज्याचे असे जे कुमुद (चंद्रविकासी कमल) त्याते नेत्रांसारखेच काय उघडिती झाली (अगस्त्युदय झाला म्हणजे कुमुदे फुलतात) ॥१०॥

नानाप्रकारच्या अनेक रंगांची जी कमले व हंस,  चक्रवाक, कारंडव हे पक्षी आणि उदकपूर्ण तळी हेच आहेत हस्त जिचे अशी भूमी, बहुत पुष्पे व फले हीच रत्ने यांनीकरून अगस्त्यनामक ऋषीकारणे अर्घ्य देते अशीच काय शोभती झाली ॥११॥

मेघांनी वेष्टित आहेत शरीरे ज्यांची असे जे सर्प, त्यांनी इंद्राच्या आज्ञेने टाकलेले असे व सर्पांपासून उत्पन्न झाले जे विष तोच अग्नि त्याने दूषित असे जे उदक ते अगस्त्यऋषीच्या दर्शनाने शुभ कल्याणकारक (म्ह० स्वच्छ) होते ॥१२॥

ज्या अगस्त्यऋषीच्या स्मरणानेही पाप जाते मग स्तुतीने जाईल यात काय सांगावयाचे. या ऋषीचा अर्घविधि जसा ऋषींनी सांगितला तसाच राजानांही हितकारक असा सांगतो ॥१३॥

ज्योति: शास्त्र जाणणारा पंडित गणिताने या अगस्त्यऋषीच उदय देशाचेशाच्याठाई जाणून सांगो (ज्योतिष्याने सांगावा) तो असा की, उज्जयनीमध्ये स्पष्टसूर्य कन्याराशीस जाण्यास सात अंश कमी असता (सिंहसंक्रांतीचे २३ अंश झाले अ०) अगस्तीचा उदय होतो ॥१४॥

अरुणाच्या किरणांनी रात्रीसंबंधी अंधकार काही कमी झाला असता व ज्योतिष्याने दिग्विभाग दाखविला असता दक्षिणदिशेस भूमीवर राजाने नम्र होऊन अर्घ्य द्यावे ॥१५॥

त्याकाली उत्पन्न झालेली व सुगंधि अशी पुष्पे, फले, समुद्रात झालेली रत्ने, सुवर्ण, वस्त्रे, गाई, वृषभ, क्षीरयुक्त अन्ने, दधि, अक्षता, सुगंध धूप व गंधे यांनीकरून अगस्तीची पूजा करावी ॥१६॥

राजा, श्रद्धायुक्त होत्साता अर्घ म्हणजे पूजा करील तर रोग व दोष यांनी रहित व शत्रू जिंकणारा असा होईल आणि जर या विधीने हे अर्घ अविच्छिन्न सात वर्षे करील तर तो समुद्रवलयांकित पृथ्वीचा (सार्वभौम) राजा होईल ॥१७॥

ब्राम्हाण, जसे पदार्थ मिळतील त्यांनीच जर पूजा करील तर वेद, स्त्रिया, पुत्र यांते प्राप्त होईल. वैश्य गाईंते व शूद्र बहुत धनाते प्राप्त होतो. ब्राम्हाणादि चारही वर्ण रोगनाश व धर्मफल यांते प्राप्त होतात ॥१८॥

तो अगस्त्यनामाऋषि रूक्ष असेल तर रोग करितो. त्याचा पिंघटवर्ण असेल तर अवृष्टि होईल. धूम्रवर्ण असेल तर गाईस अशुभ करील. चंचल असेल तर भय करितो. मांजिष्ठ (तांबडा) वर्ण असेल तर दुर्भिक्ष व युद्ध करील. फार बारीक असेल तर नगरास वेष्टन करील ॥१९॥

अगस्त्यऋषीचा रुप्यासारखा व स्फटिकासारखा वर्ण दिसेल व किरणसमुदायांनी पृथ्वीते पुष्ट करतो काय असा ऋषि जर दिसेल तर बहुत अन्न होईल व निर्भय आणि निरोगी असे लोक होतील ॥२०॥

उल्का (आकाशातून पडणारा अग्निरूप तारा) व धूमकेतु याही स्पष्ट अगस्त्यऋषि, दुर्भिक्ष व महामारी यांते करितो. तो ऋषि हस्तनक्षत्री सूर्य असता दिसतो (उदय होतो) आणि रोहिणीनक्षत्री सूर्य असता अस्ताप्रत पावतो ॥२१॥

याचे उदयास्त सर्वठिकाणी एकाच वेळी होतात असे नाही. स्थलास्थलाचे उदयास्त निरनिराळे आहेत. हे उदयास्त उज्जनीचे आहेत. ग्रहलाघव अस्तोदयाधिकार श्लोक ॥२२॥


॥ इतिबृहत्संहितायांअगस्त्यचारोद्वादशोध्याय: ॥


Last Updated : February 18, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP