श्रीकृष्णलीला - अभंग ६ ते १०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


६.
पूर्वीं तूं अनुज झालासी कनिष्ठ । सोशियेले कष्ट मज-सवें ॥१॥
आतां तूं वडील होईंगा सर्वज्ञा । पाळीन मी आज्ञा तुझी बारे ॥२॥
देवकीउदरीं राहावें जावोनी । मायेसी मागूनि पाठवितों ॥३॥
योगमाया तुज काढील तेथून । घालील नेऊन गोकुळासी ॥४॥
लक्ष्मीशीं सांगे तेव्हां ह्लषिकेशी । कौंडण्यपुराशी जावें तुह्मीं ॥५॥
नामा म्हणे ऐसा करूनि विचार । घ्यावया अवतार सिद्ध असे ॥६॥

७.
गौळियाचे घरीं रहिवास गोकुळीं । तेथें तुह्मी सकळीं वास कीजे ॥१॥
वसुदेव देवकी उदरीं जन्मेन । क्मसभयें राहीन गोकुळीं हो ॥२॥
तेथें आहे काज कळेल सकळां । आनंद सोहळा पुरवीन ॥३॥
नामा ह्मणे ऐसें देव बोलियेले । आपण ते गेले निजधामा ॥४॥

८.
तयेकाळीं देव गोकुळीं भरले । अगोचर रूप झाले ठायीं ठायीं ॥१॥
सकळ संपत्ति भरूनि उरल्या । दिगंतरीं गेल्या विपत्ति त्या ॥२॥
नामदेवा तेव्हां आनंद तो झाला । गोकुळीं भरला पांडुरंग ॥३॥

९.
शेषयायी हरी उठोनि लवकरी । ह्मने सख्या धरीं मनुष्यरूप ॥१॥
तुजविण मज न गमे घटिका । म्हणोनि नेटका रूप धरीं ॥२॥
देवकी उदरा जाऊनि रिघावें । अंतरीं वसावें रोहिणीच्या ॥३॥
तुझियेचि सेवें येतों मी माघारा । नामया दातारा कळों आलें ॥४॥

१०.
देवकी कवण वसुदेव कवण । सांगवी हे खूण नाग-वळा ॥१॥
ऐकोनी उत्तर देव मनीं पाही । बोलतो लवलाही चित्त देईं ॥२॥
सुतपा प्रती ते अनुष्ठानी दोघे । करूनियां तपें वर मागे ॥३॥
तया दिल्हा वर पुत्र मी होईन । यालागीं कारण आहे तेथें ॥४॥
तींचि दोघें झाली वसुदेव देवकी । ह्मणोनी यादवीं जन्म घेणें ॥५॥
तयाचा वृत्तांत आतां कोठें आहे । सांगेन लवलाहें नामा म्हणे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP