मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
देवापेक्षां संत श्रेष्ठ कां ?

वेदांत काव्यलहरी - देवापेक्षां संत श्रेष्ठ कां ?

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


देव म्हणे वर मागे तुकया, देईन मागशी जें तूं ॥
तुकया म्हणे नसे तुजपाशी, मज पाहिजे अशी वस्तू ॥१॥
ऐश्वर्य ऐहिक, चारी मुक्ती, यावीण काय तव हातीं ॥
तेही फुकट न देशिल, आधीं घेशील, ही तुझी रीती ॥२॥
जितुकें घेशिल तितुकें जोखुन देशील, तूं खरा बनिया ॥
सतत तराजू हातीं तुझिया, ही गोष्ट विसरते दुनिया ॥३॥
दमडी देउनि तुजला, म्हणती “घेई सुवर्णपुष्प” मुखें ॥
परि तूं जशास तैसा, “भाव तसा देव” तत्त्व हें न चुके ॥४॥
वसुदेवाच्या उदरीं जरि तूं प्रत्यक्ष, तो न तुज जाणे ॥
कारण पुजिलें त्यानें, “उदरीं यावेस” याच भावानें ॥५॥
दमडीच्या मोबदला, कीर्ती धनधान्य सर्व दे म्हणती ॥
परि तूं ठका महाठक, कैसे हे जाणती न मंदमती ॥६॥
यास्तव देव जयांच्या ह्रदयीं, त्यांचा घडो मला संग ॥
इतुकीच वासना मम, होवों मच्चित्त त्यातची रंग ॥७॥
देव म्हणे मजसाठीं धडपडती संत, मी तुला प्राप्त ॥
सहज; तरी मग कां रे ? मजहुनि तुज श्रेष्ठ वाटती संत ॥८॥
संत तुझ्यासम नसती व्यापारी, नेणती तराजुला ॥
केवळ “नमोस्तु” म्हणता, निजपदवी दान करिति शरणाला ॥९॥
करशील कृपा देवा, तैसी तूं अवकृपाहि करशील ॥
केवळ कृपाच करणें, हें संतांचें असे सदा शील ॥१०॥
यास्तव नको तुझा मज संग, नको आणखी तुझें कांहीं ॥
देतां येइल तरि दे सत्संगति, मागणें दुजें नाहीं ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : April 17, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP