स्त्रीधन - श्रीकृष्णाची गाणीं

लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.

द्वारकेच्या श्रीकृष्णानें बाळपणीं गौळणींशीं केलेल्या बाळलीला आणि राधेशीं केलेल्या रासक्रीडा म्हणजे सामान्य मनाचा मोठा आवडीचा विषय आहे. भगवान् श्रीकृष्णानें अर्जुनाला सांगितलेली गीता आणि त्या निमित्तानें जगापुढें ठेवलेलें तत्त्वज्ञान सामान्य मराठी मनाला नीट आकलन होत नाहीं. परंतु महाभारतांतील विविध कथा ऐकून, कृष्णाबद्दलचीं जुनीं गाणीं ऐकून आणि राधाकृष्णावर आधारलेल्या कपोलकल्पित हकीकत ऐकून, त्यास कृष्णाचा महिमा मोठा वाटते आहे. ह्या कृष्णानेंच उभ्या दुनियेचा उद्धार केला हीच सर्वांची भावना.
यशोदेचा कृष्ण म्हणजे देवाचें बाळरूप. त्याचें कौतुक गावयाचें म्हणजे मनाला शांति मिळावयाची. अगदीं बालवयांत कंसाला कृष्णानें मारलें. गौळणींना सळो कीं पळूं करून सोडलें, यशोदेनें खांबाला बांधला असतां विश्वदर्शन घडविलें इत्यादि चमत्कार भाविक मनाला भुरळ पाडून सोडतात ! आणि त्यामुळें चिमुकल्या कृष्णाची ओढ ह्या मनाला एवढी लागते कीं, त्यापुढें जीवनांतील इतर सुख फिकें पडावें !
भगवान् श्रीकृष्णाच्या बाळलीलांवर आधारलेल्या कथा ऐकून स्त्रियांच्या मनाला एवढी भुरळ पडलेली असते कीं, आपलें मूलच कृष्णाच्या जागी बसवून त्या बाळलीलांचें कौतुक गातांना त्यांना अवर्णनीय आनंद होतो. त्यामुळें कृष्णाचीं गाणीं बहुतेकींच्या तोंडीं असलेलीं सर्वत्र दिसून येतात आणि विशेष म्हणजे कृष्णाष्टमीच्या वेळीचं त्यांचें गायन होतें असें नसून फावल्यावेळींहि तीं ओठांवर घोळत असतात.  अशावेळीं हीं गाणीं गाणार्‍या बाईच्या मनांत एकच भावना तीव्रतेनें वावरत असतें कीं, आपल्या आयुष्याचें बरेंवाईट पाहणारा हा एकच देव आहे ! आणि त्यानें आपलें आयुष्य माणसासारखें घालविलेलें आहे !! त्यामुळें हीं भावना आविष्कृत होते वेळीं तिला एकप्रकारचा विलक्षण जिव्हाळा प्राप्त होतो. ती मोठ्या भक्तिभावानें फुलून वर आलेली असते. कौतुकानें तिचें सर्वांग भारावलेलें असतें.
सूर्व्या आगाशीं येतो गंगनी                बाई उठूनि जेवूं मागीतो चक्रपाणी
        त्याची बोलती अशी जिगुनी ( आई )
आदीं पाण्यावनं येऊं दे काना            मग मी वाडीन तुला साजना
आदीं पाण्याला नको जाऊं आई            मज भुकेची मोठी घाई
किष्ण जेवाया झाली घाई                अजून येळ झाली न्हाई
हातीं धरूनी गोकुळचा हरी                दूर देई  (मारणें ) गालावरी
रागं बोलली चक्रपाणी                गेला भाईरी हरी रुसूनि
अग सयानू कमळावरी                 हरी माझा अवकाळ भारी
नंद धुंडिल्या चारी वाटा                गेला गवळ्याच्या पेठा
नंद धुंडिले यमुना तीरीं                गवळ्याच्या आला घरीं
दरीं उभी राधा सुंदरी                कडीवरि घेउन आली भाईरी
आली अंगनीं यश्वदा नारी                संबाळा आईजी आपुला हरी
            खेळतो बाळ माज्या घरीं
माता करीती लिंबलोन                भुक्याल म्हनती माजं तानं
दळव्या याळूची घे खवा बर्फी            सुंदर देतें बेदाना खरकी
पेढे साबण्या रेवड्या देतें बत्तासू केळं        नारिंगं देतें काना घे जांभूळ
रामफळ पेरू देतें घे सिताफळ            मग मी देतें पुंड्या ऊंस, जेव तूं बाळ
खिरी वेळिल्या भोपरकाळी दूधसाकरीं        मग मी देतें पुरणपोळी वरती सांजूरी
            देतें मी राजा दहीभात जेव तूं निचिंत
            माता कडविलं साजूक लोणी वाटीभरूनी
            दारीं किष्णाची बाळगोपाळ आली इड घेऊनी
हें गाणें 'कृष्णाची न्याहारी' या नांवानें लोकप्रिय आहे. सकाळच्या प्रहरीं उठल्याबरोबर कृष्णानें न्याहारीचा तगादा केला. परंतु 'अजून वेळ झाली नाहीं, उगाच घाई नको करूं' म्हणून यशोदा रागावते व मारते. त्यामुळें कृष्ण रुसून निघून जातो. यशोदा चिंतागत होते. नंद गांवभर शोधायला जातो. शेवटीं राधेच्या घरीं कृष्ण सांपडतांच यशोदेला आनंद होतो. आणि मग ती नानाप्रकार त्याला खाऊं घालते. भुकेल्या बाळाची भूक शांत करते. अशी भावना इथें आलेली आहे. शेवटीं कृष्णाचें खाणें संपतें न संपतें तोंच त्याचें मित्रमंडळ खेळायला जाण्यासाठीं गोळा झाल्याची माहिती आली आहे. त्यामुळें सामान्य स्त्रीला या सगळ्या भावनेचें ' आई ' च्या भूमिकेमधून विशेष कौतुक वाटतें.
हेंच गाणें कुठें कुठें पुढील प्रमाणेंहि ऐकावयास सापडतें-
सूर्व्या उगवुनी आला गंगनीं            किष्ण उठला बोले लहाटकरी
किष्ण मागीतो आईला न्याहारी            आईनं दिली गालावरी
            जिवूं वाडीलें नाई त्येला            
            किष्ण सांगीतो नंदाला
            किष्ण रुसुनी निगून गेला
नंदा धुंडिल्या चारी वाटा                गवळ्याच्या पेठा
किष्ण राधेच्या शेजेवर,                करी क्रिडेचा भार
किष्ण राधेच्या कडेवर,                आली सकी बाहेर
संबाळ आई आपुला हरी                खेळत बसला माज्या घरीं
माता आळिंकी चारी भुजां                आज भुकेला माजा राजा
आनून देतें मी पुंड्या ऊंस                निचिंत जेव तूं राजस
आनून देतें मी धईभात                सावळ्या बाळा जेव निचींत
खारीक खोबरं देतें काना                आनीक घे वरती बेदाना
            भात वाडीतें विस्तारीं
            लिंबाची घे कोशिंबिरी
            देतें रेवड्या साबन्या लाडू
सार्‍या परकारांनीं हरी धाला            इडा घेऊन खेळाया गेला
या गाण्यामध्यें मागच्या गाण्यापेक्षां अगदीं थोडासा फरक आहे. आई त्याला रोजच्या जेवणांतील साध्या गोष्टी वाढते आणि तो दिसतांच त्याला प्रेमानें कवटाळून धरते. एरव्हीं मागच्या गाण्यापेक्षां इथें कांहीं फारसा फरक नाहीं.
पंडी भिवरी पारी काशीला                आग लागूं त्या गईला
द्वाड सव लागली तिला                जाती कुनब्याच्या शेताला
जुंधळा खावूनि बुडविला                तिकून कुनबी धांवत आला
हातीं भेंडाजी त्येनं घेतीला                पळतां पायांत कांटा मोडिला
कुनबी माजा हा सुटला                गाया टाकुनी घरला आला
किष्ण बाळ बोले यश्वदीला                आई मी गोष्ट सांगतों तुला
न्हाई जायाचा मी रानाला                गाया ऐकनात्या ग मला
सारंगी पुतळी पानी पिईना                साळी बाळी कां चरना
राही गुरांत कां मिसळना                मधरीची चीळ कां फुटना
नागीवाल्याला कां ऐकना                तिला घालूं द्या लोडयीना
रुपी बिगी बिगी का चालना            आगाडीची शिकार आटपना
किष्ण बाळ बोले येश्वदीला                आई मी गोष्ट सांगतों तुला
न्हाई मी जायाचा रानाला                गाया ऐकनात्या ग मला
काळी मैतापी गई धाकटी                खाईना झाली करडी काटी
वाडी मालन दुहीची जुती                सुभद्रीला चौकार पिटी
धरी हरनीच्या शेपटी                धनी हिचा जगूजेटी
हातीं सुवरनाची काठी                त्यानं आनला यमुना तटीं
घुंबर घाली वाळवंटीं                    किष्ण बाळ बोले येश्वदीला
न्हाई मी जायाचा रानाला                गाया ऐकनात्या ग मला
सुलतान गई बलीरामाची                तानीं वासरं पाजी ती
हिरकनी मकमल डरकीती                गुलाल पतींगी उदळिती
पंडी अंगाव धावून येती                मंगळी पान्यांत बसून र्‍हाती
किष्ण बाळ बोले येश्वदीला                आई मी गोष्ट सांगतों तुला
न्हाई मी जायाचा रानाला                गाया ऐकनात्या ग मला
संबळ ग आपली तूं गुरं                असे बोलले सारंगधर
हात ठेवलाय कानावर                काडलीं मोत्याची अक्षरं
गाई वलूं मी कुठवर                    आली भवानी मोटवर
दिली लाथ गुडघ्यावर                जगी सुईरी रानावर
रानी गिरजी ठेक्यावर                संबळ ग तूं आपलीं वासरं
किष्ण बाळ बोले येश्वदीला                आई मी गोष्ट सांगतों तुला
मी न्हाई जायाचा रानाला                गाया ऐकेना त्या ग मला
या गाण्यांत कृष्णानें राखलेल्या अनेक गाईंचीं नांवें मोठ्या सुंदर रीतीनें आलेलीं आहेत. कृष्ण हा गुराखी होता आणि रोज गुरें घेऊन रानांत जात असे, अशी जी हकीकत कृष्णचरित्रामध्यें सांगितली जाते, तिचा हा एक आविष्कार आहे. सवंगड्यांच्याबरोबर भरपूर खेळायला मिळावें म्हणून गाई घेऊन शेतावर न जाण्याची कारवाई करीत कृष्णानें सांगितलेलीं हीं कारणें मोठीं मजेदार तशीच ऐकणाराला कौतुक वाटायला लावणारीं आहेत. आणि गाईचा एकेक कळप पुढें करून 'आई तूं माझी गोष्ट ऐक' असें दरवेळीं म्हणत कृष्णानें आईच्या मनावर आपलीं कारणें ठरविण्याचा केलेला हा प्रयत्‍नहि मोठा विलोभनीय आहे. एवढेंच नव्हें तर आपल्या बाळलीलांनीं जगाला वेड लावणार्‍या भगवान् श्रीकृष्णाच्याबद्दल मनांत आधींच वसत आलेला आदर कौतुकाचा मुलामा लावून तो वाढीला लावणारा देखील आहे !
पैलीच गवळग ग                    पैलीच गवळन ग
पैलीच गवळन सारवीत हूती चूल ह्या किष्णानं मागितलं फूल आता मारील ग आतां मारील ग
आतां मारील ग सासूबाई                 ह्या किष्णाला करूं गत काई
ह्या किष्णानं अनवळ केली                दह्यामंदीं माती कालिवली
दुसरीच गवळन ग                    दुसरीच गवळन ग
दुसरीच गवळन टाकीत हूती सडा ह्या किष्णानं मागितला जोडा
आतां मारील ग सासूबाई                ह्या किष्णाला करूं गत काई
ह्या किष्णानं अनवळ केली                दह्यामंदीं माती कालीवली
तिसरीच गवळन ग                    तिसरीच गवळन ग
तिसरीच गवळन घाशीत हूती ताट ह्या किष्णानं मागितला पाट
आतां मारील ग सासूबाई                ह्या किष्णाला करूं गत काई
ह्या किष्णानं अनवळ केली                दह्यामंदीं माती कालीवली
चौथीच गवळन ग                    चौथीच गवळन ग
चौथीच गवळन घाशीत हुती गडू  ह्या किष्णानं मागितला लाडू
आतां मारील ग सासूबाई                ह्या किष्णाला करूं गत काई
ह्या किष्णानं अनवळ केली                दह्यामंदीं माती कालीवली
पांचवीच गवळन ग                    पांचवीच गवळन ग
पांचवीच गवळन रवीत हूती शेगडी ह्या किष्णानं मागितली पगडी
आतां मारील ग सासूबाई                ह्या किष्णाला करूं गत काई
ह्या किष्णानं अनवळ केली                दह्यामंदीं माती कालीवली
या पद्धतीनें हें गाणें निदान नऊ गवळणी भेटेपर्यंत चालतें. यापुढें सहावी गवळण शेण काढीत होती आणि कृष्ण तिला पान मागीत होता, सातवी गवळण पाणी आणीत होती आणि कृष्ण तिची वेणी ओढीत होता, आठवी गवळण न्हाणीमध्यें न्हात होती आणि कृष्ण पाणी लवंडत होता, नववी गवळण तवा घाशीत होती आणि कृष्ण पोवा मागीत होता, अशी हकीकत आलेली आहे.
या गाण्यामध्यें गोकुळांतील गौळणींशीं कृष्णाच्या चाललेल्या खोड्यांचें वर्णन आलेलें आहे. त्या खोड्या सांगत असतांनाच त्या पुरविल्या तर सासू मार देईल आणि न पुरविल्या तर कृष्ण दह्यामध्यें माती कालवून मोकळा होतो आहे, अशा पेचांत सापडलेल्या गौळणींची हकीकतहि इथें आलेली आहे. त्यामुळें प्रत्येक गौळणीशीं होणारी खोडी संपतांच गाण्यांत आलेली पुनरावृत्ति त्रासदायक न वाटतां उलट मनोरंजक वाटते आणि मग ऐकणाराच्या तोंडून 'काय बाई ह्या कृष्णाला म्हणावं तरी ?' असा उद्गार न कळत बाहेर पडतो. त्याचबरोबर गोकुळच्या या कृष्णाच्या बाळलीलांचे कौतुक वाटून हंसायलाहि आल्याखेरीज रहात नाहीं. याचप्रकारचें आणखी एक गाणें सांपडतें तें असें आहे -
पैलीच गवळन ग                     पैलीच गवळन, रंगच लाल
पाहुनि झाली दंग                    माज्या कुंकवाचा रंग
आरशांतलं भिंग                    फुगडी खेळूं किष्णा संगं
जोडव्याचे ठसे                     किष्ण कमळाखालीं बसे
दुसरीच गवळन ग                     दुसरीच गवळन, रंगच पिवळा
पाहुनि झाली दंग                    माज्या हळदीचा रंग
आरशांतलं भिंग                    फुगडी खेळूं किष्णासंगं
जोडव्याचे ठसे                     किष्ण कमळाखालीं बसे
तिसरीच गवळन ग                 तिसरीच गवळन, रंगच काळा
पाहुनि झाली दंग                    माज्या अबीराचा रंग
आरशांतलं भिंग                    फुगडी खेळूं किष्णासंगं
जोडव्याचे ठसे                     किष्ण कमळाखाली बसे
या गाण्यामध्यें कपाळावर हळदकुंकू आणि अबीरबुक्का लावलेला असतांना त्या त्या रंगाशीं जुळणार्‍या रंगाच्या गौळणी कृष्णाबरोबर फुगडी खेळत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पायांतील जोडव्यांचा खेळताना उठणारा ठसा कमळासारख्या उमटल्यानें त्या कमळावर कृष्ण दमून बसत असल्याची सूचक नोंदहि इथें आली आहे. म्हणजे कृष्ण आणि गौळणी यांच्या रास नाचाची मनोहर हकीगत या गाण्यानें सांगितली आहे असें म्हणतां येईल. हेंच गाणें आणखी हव्या असतील तेवढ्या गौळणी आणि रंग गोळा करून याच पद्धतीनें कुठें कुठें म्हटलें जातें परंतु वर दिलें आहे एवढेंच हें गाणें सर्वत्र अधिक रूढ असल्याचें आढळतें.
पहिलीच गवळन ग काय बोलली
बाई मी काढीत होतें दूध                मुरली ऐकून झालें धुंद
रुसीकेसी का मुरली वाजवीसी            नंदापाशीं का वेणूं जाब देशी
दुसरीच गवळन ग काय बोलली
बाई मी विरजीत हुतें साई धई            मुरली ऐकून झाली सई
रुसीकेसी का मुरली वाजवीसी            नंदापाशीं का वेणू जाब देशी
तिसरीच गवळन ग काय बोलली
बाई मी घुसळीत हुतें ताक             मुरली ऐकून झालें थक्क
रुसीकेसी का मुरली वाजवीसी            नंदापाशीं का वेणू जाब देशी
चवथीच गवळन ग काय बोलली
बाई की काढीत हुतें लोणी                मुरली ऐकून झालें शानी
रुसीकेसी का मुरली वाजवीसी            नंदापाशीं का वेणू जाब देशी
पांचवीच गवळन ग काय बोलली
बाई मी कढवीत हुतें तूप                मुरली ऐकून झालें चूप
रुसीकेसी का मुरली वाजवीसी            नंदापाशीं का वेणू जाब देशी
ह्या गाण्यामध्यें गवळ्याच्या धंदा करणार्‍या पांच गौळणींची कृष्णाची मुरली ऐकून उडालेली धांदल गडबड वर्णन केली आहे. या व्यवसायांत येणार्‍या सर्व गोष्टींचा इथें मोठ्या सुंदर रीतीनें उल्लेख आला असून, त्याप्रमाणें गौळणींवर झालेला परिणामहि आकर्षक रीतीनें सांगितलेला आहे. तसेंच शेवटीं 'हा कृष्णच का मुरली वाजवून नंदाला आपल्या ठावठिकाण्याचा जाब देत आहे !' अशी दरवेळी व्यक्त केलेली शंकाहि मोठी ह्रदयंगम आहे.
बाई मी झाडीत हुतें अंगन                किष्ण मागीत हुता कंगन
कुणी धावा ग धावा                    किष्ण मंदिरीं वाजवितो पावा
बाई मी टाकीत हुतें सडा                किष्ण मागीत हुता वडा
कुणी धावा ग धावा                    किष्ण मंदिरीं वाजवितो पावा
बाई मी घालीत हुतें वेनी                किष्ण मागीत हुता फनी
कुणी धावा ग धावा                    किष्ण मंदिरीं वाजवितो पावा
बाई मी वेचीत हुतें फूल                किष्ण मागीत हुता गूळ
कुणी धावा ग धावा                    किष्ण मंदिरीं वाजवितो पावा
बाई मी घालीत हुतें चोळी                किष्ण मागीत हुता पोळी
कुणी धावा ग धावा                    किष्ण मंदिरीं वाजवितो पावा
या गाण्यामध्यें आपल्या रोजच्या जीवनांतील सरावाच्या घरगुती गोष्टी करीत असतांना कृष्णानें आणलेला अडथळा गौळण सांगते आहे. प्रत्येक वेळीं कृष्णानें कांहीं नवीनच मागितल्यानें घरच्या सासुरवासाला भिऊन ही गौळण कुणाला तरी धाऊन येऊन आपल्याला या अडचणींतून सोडविण्याची विनंति करीत आहे; आणि असा हा खोड्या करणारा कृष्ण देवळामध्यें पावा वाजवीत असल्याचें सुचविते आहे. कृष्णाची ही बाळलीलाहि मोठी छानदार आहे, असें हें गाणें म्हणाराला व तें ऐकणारालाहि वाटतें.
राधे कृष्णाला कडेवर घे ग
कडेवर घेती घरांत नेती                परोपरीचा मेवा देती ॥
तरीपण बाळ बघना मेव्याकड ग     ॥ धृ० ॥
मला वाघ दे धरूनी ग                 त्येचा घोडा दे करूनी ग ॥ १ ॥
मला साप दे धरूनी ग                 त्याचा चाबूक दे करूनी ग ॥ २ ॥
मला घार दे धरूनी ग                 तिची वावडी दे करूनी ग ॥ ३ ॥
मला चांदणी दे धरूनी ग                 तिची लाही दे करूनी ग ॥ ४ ॥
या गाण्यामध्यें आपल्या मुखामध्ये विश्वाचें दर्शन घडविणार्‍या कृष्णानें राधेनें दिलेला खाऊ डावलून जी छानदार मागणी केली आहे तिचें वर्णन आलेलें आहे. लहानग्या कृष्णानें राधेजवळ वाघाचा घोडा, सापाचा चाबूक, घारीची वावडी आणि चांदणीची लाही करून दे म्हणावयाचें, म्हणजे साराच मोठा अद्‌भुत चमत्कार आहे. त्यामुळें अद्‌भुतरम्यतेची मनावर पकड असलेल्या मानवी मनाला ह्या गाण्याची गोडी अधिक वाटते. त्याचबरोबर जाणत्या मनाला इथें व्यक्त झालेल्या कल्पकतेंतील नाविन्य जाणवून अचंबाहि वाटतो !
यश्वदा म्हणे श्रीहरी, नको जाऊं तूं भाईरी
गौळणी कुभांड्या करी, घेती तुफान तुझ्यावरी
रात्रीं आला म्हणती हरी, नको जाऊं तूं भाइरीं
तुला मी देतें धईदूध साई, किष्ण बाळा तूं बसून खाई
नको करूं तू कुणाची चोरी, नको जाऊं तू भाईरीं
तुला मी देतें विटी दांडू, आणीक आणतें मोत्यांचा चेंडू
डाव मांड बा यमुनेतीरीं, नको जाऊं तूं भाईरीं
या लहानशा गीतामध्यें यशोदेनें कृष्णाची नानापरीनें समजूत घातल्याची माहिती आली आहे. कृष्णाच्या बाळलीलांमुळे गौळणी नानातर्‍हेचीं कुभांडें रचून तक्रारी आणतात, तेव्हां तसें होऊं नये म्हणून यशोदा त्याला कुठें बाहेर न जाण्याची इथें ताकीद करीत आहे. त्याला लागणारें सर्व प्रकारचें खाणें आणि खेळायचीं साधनें आणून द्यावयाचें वचन देऊन, ती शेवटीं त्याला मुलांच्या संगतींत यमुनेच्या तीरीं मोत्यांचा चेंडू घेऊन डाव मांडण्यास सुचवीत असून, कुठेंहि बाहेर न जाण्याची आज्ञा करीत आहे. ह्या गाण्यामधील आईने मुलाची घातलेली समजूत सामान्य मनाला समाधान देणारी व चटका लावणारी असून आपल्याच मुलाप्रमाणें 'हें पण आहे हं ?' अशी समजूत करून घेतल्यानें होणारा विलोभनीय आनंद मिळवून देणारीहि आहे.
धईदूध लोणी खातो चोरुनी                शिंक्यावरच्या दुड्या फोडुनी
वाकडं दावीतो बाई मजला                मग मी बांदितें त्येला खांबाला
येश्वदा हांक मारी राधेला                ने बाई कान्हा खेळायाला
राधानं किष्णाचा भाव पाहिला            उचलुनी कडीवरी घेतिला
तिनी वो आपुल्या मंदिरीं नेला            कोडकवतुकीं टांगी डोलेरा
नीज नीज म्हणती सारंगधरा            मुकावरती घेऊनि शेला
झोपी गेला चक्रपाणि                कात सुपारी पानजंजरी
इडा करूनी घालीं मुखांत                 पान जंजरी तबकांत
उदास झाली राधा कामीन                 हरीची न् राधाची नव्हती शीन
कुनाशीं कळे चांगुलपन                चार पाराच्या अंमलामंदी
स्वारी आली तिच्या पतीची            जाळी गुंफुनी दिली रत्‍नांची
राधा न् किष्ण पलंगावरी                दारीं भ्रतार हांका मारी
कवाड उघड ग झडकरी                राधा झाली कावरीबावरी
थोराचं न्हान किष्णा व्हावं                रांगत रांगत भाईरीं यावं
थोराच न्हान कोन ग झालं                थोराचं न्हान किष्ण झाल
रांगत रांगत भाईरीं आलं                राधाला चंद्रबळ आलं
पती पुसतो अग अग रानी             बाळ कुनाचं आलं अंगनीं
येश्वदीचा वो चक्रपानी                आला खेळाया आपुल्या अंगनीं
या गीतांत राधा आणि कृष्ण यांच्यामधील स्नेहाची हकीकत आली आहे. दही, दूध आणि लोणी चोरून खातो व त्यासाठीं शिंक्यावरील हंड्या फोडून टाकतो म्हणून यशोदा कृष्णाला रागावते. पण त्यामुळें गप्प न बसतां कृष्ण तिला वेडावणें दाखवतो, म्हणून ती राधेला त्याला घेऊन जा म्हणते; आणि आपणाकडे यावयास कृष्ण उत्सुक आहे हें बघून तीहि त्याला घेऊन जाते. आपल्या घरीं त्याचे लाड पुरविते आणि ती त्याला निजवते. परंतु त्यावेळीं कृष्ण वयानें लहान असल्याचें शल्य बोंचून ती अस्वस्थ होतें. तरीपण घरच्या पानाच्या तबकामधील विडा करून ती कृष्णाला देते. आणि उदास होऊन विचार करते एवढ्यांत मध्यरात्रीला तिचा नवरा येतो. तो बाहेरून हांका मारतो. त्यामुळें आपल्या शेजेवरील कृष्णाला उठवीत घाबरून ती 'लहान होऊन रांगत बाहेर ये आणि नवर्‍याच्या रागांतून मला सोडव' असें म्हणतें. आणि मग कृष्णहि त्याप्रमाणें करतो. तरीहि रांगतें बाळ बघून राधेचा नवरा चौकशी करतोच. शेवटीं यशोदेचें बाळ आपल्याकडे खेळावयास आलें आहे असें सांगून ती वेळ मारून नेते, अशी ही कथा इथें आलेली आहे. राधाकृष्णांबद्दल कुतूहल असलेल्या मनाला या ठिकाणीं त्यांच्यामधील नात्याचा स्पष्टपणें उलगडा करून सांगितल्याचे दिसून येतें. त्याच बरोबर त्या दोघांमधील शुद्ध प्रेमाचाहि इथें मुद्दाम या रीतीनें उल्लेख केला असणें शक्य आहे, अधिक विचार करतां लक्षांत आल्याविना रहात नाहीं.
कोरा कागद काजळाची केली शाई
पत्रिका पाठविती हरीला रखुमाई
सप्तश्लोकी पत्रिका दिली सुदेवाच्या हातीं
उद्यांचं लगीन देवा यावं रातोरातीं
शिशुपाळ नवरा भीमकीच्या नाहीं मना
पत्रिका धाडीली द्वारकीच्या नारायणा
शिशुपाळ नवरा भीमकी नवरी
पत्रिका पाठविली द्वारकेच्या श्रीहरी
भीमकी नवरी ग अंबिकेच्या देऊळां
द्वारकेच्या वाटे रथ देखिला पिवळा
गोकुळीं मदुयीरी हिरव्या पेरूचा पिवळा वान
चंद्रावळीच्या रूपासाठी किष्ण झाल्याती बागवान
गोकुळीं मदुयीरीं येळू रवीला वारधटी
चंद्रावळीच्या रूपासाठीं किष्ण झाल्याती कोलायटी
दुधातुपानं भरला हरा आतां गवळनी कशी जाशी
गोकुळी खेळे किष्ण भरल्या मदुरेच्या येशी
दुधातुपानं भरला हरा गेली गवळन नटयीत
गोकुळीं खेळे किष्ण झेंडा रवीला वाटयींत
रुक्मिणीनें स्वतः पत्र धाडून कृष्णाला विवाहासाठी दिलेलें निमंत्रण, काजळाची शाई करून लिहिलेला मजकूर, शिशुपाळाचा केलेला अव्हेर, द्वारकेच्या श्रीहरीची पाहिलेली वाट, अंबिकेच्या देवळामधून त्याचा दिसणारा पिवळा रथ इत्यादि कल्पनांनीं नटलेल्या रुक्मिणी स्वयंवरानें या ओव्यांचा निम्मा भाग इथें मोठ्या सुंदररींतीनें नटलेला आहे.
आणि उत्तरार्धामध्यें गोकूळच्या गौळणींशीं कृष्णाची होणारी रासक्रीडा व रुक्मिणीसाठीं त्यानें केलेला खटाटोपहि फार बहारीचा झाला आहे.
त्यामुळें सामान्य मनाला या गीतांची विशेष आवड असल्याचें दिसून येतें आणि बायका कृष्णाचें नांव निघालें कीं, या ओव्या हटकून कां गातात याचाहि उलगडा झाल्याविना रहात नाहीं.
नेत्रीचें अंजन                हाताची लेखणी
पत्रिका रुक्मिणी            लिहीतसे
लिहूनी पत्रिका             देऊं कोणा हातीं
यावें रातोरातीं            यादवराया
येऊनी उतरावें            अंबिकेच्या स्थळीं
श्रृंगार पाठवावा            रुक्मिणीसी
माय म्हणे अंबिकें            नको जाऊं भिमकें
नगरांत पारके उतरले        आम्हां काय करिती
नवस आहे अमुचा            अंबिकेसी
अंबिकेच्या गळां            नवरत्‍नांच्या माळा
वर दे ग सावळा            द्वारकेचा
कृष्णाजी सारीखे            वर दे ग अंबिके
मोत्यांचे झुबके            वाहिन तुला
वाजंत्री तनमने            उडती गगन्नें
वर्षती मेघन्ने             वसंतेशी
गौरीहराजवळी            बसली भिमकबाळी
उठा उठा वनमाळी            स्वागतासी
मांडवाची शोभा            फाकलीसे प्रभा
भिमंकी ही पद्‌नाभा            समर्पीली
कोट्यावधि येउनि            देव बसले अंगणीं
श्रीकृष्ण रुक्मिणि            बोहल्यावरी
नागवेली पान                धरूनी मुखांत
समस्त पहात             दोघांकडे
सुपारीची मूठ                धरूनी बळकट
श्रीकृष्ण सोडीत             भिमके हातीं
कृष्णाच्या बहिणी            आल्या तेथ क्षणीं
नांव घ्या हो वहिनी            भ्रताराचें
हळद घेऊनि हातीं            लावीली मुखाशीं
कुंकूं कपाळाशीं            भिमंकीच्या
जाई तूं मोगरा            शेवंतीचा चुरा
श्रीकृष्ण नवरा             भिमंकीचा
मोत्यांचा जरीतुरा            माथ्यावरी खोवी
रुक्मिणी नवरी            श्रीकृष्णाची
कृष्णाचे आहेर            देखुनी कामिनी
ती दोघं हर्षली            मायबाप
माय बाप बंधु            बहिण सर्व गोत
घाला दंडवत                वरमायेसी
वरमाये चरणीं            ठेवीयेला माथा
भिमंकी ही आतां            सांभाळावी
आंदण मागती            तस्त तांब्या वजरी
समयाची जोडी            आंदण दिली
आंदण मागती             पराती घंगाळीं
गाई आणि घोडे            आंदण दिले
आंदण मागती            ऊसमळे पानमळे
आंबराई फुलबागा            आंदण दिल्या
आंदण मागती            चांदवा पासोडी
भिमंकी ही बालडी            आंदण दिली
साडे संपादुनी                मालत्यांनी ओटी भरा
भिमंकी ही जाते            परघरा
साडे संपादुनी                उठली सुंदरी
कंकण बोहल्यावरी            सोडीयलें
साडे संपादुनी                मालत्यांची वाण
भिमंकी ही झाली            शेजारीण
साडे संपादुनी                नेत्रीं आलें पाणीं
भिमंकी ही जाते            आहे तान्ही
पांच वरषांचा                प्रति केला पाळ
तुम्हावरी भार            जलमाचा
आम्हां घरींचा पाळणा        तुम्हां धरीं बांधीला
तुम्ही दोघं राज्य करा        जन्मभरी
श्रीकृष्णाचें लग्न जमल्यापासून तों सर्व प्रकारचा सोहळा करून तें पार पडेपर्यंतचें वर्णन या गाण्यामध्यें आलेलें आहे. जुन्या काळची लग्नपद्धति सगळ्या चालीरीतींसह इथें आलेली आहे. त्यामुळें या घटकेला आपल्या नजरेसमोर सारें घडावें एवढा परिणाम हें गाणें ऐकणाराचे मनावर झाल्याविना रहात नाहीं. कृष्णासारख्या शूर वीराला आणि देव माणसाला वरणार्‍या रुक्मिणीच्या मनाची लग्नाअगोदरची अस्वस्थ स्थिति, प्रत्यक्ष लग्नाचा सोहळा, आंदण मागितलेल्या व दिलेल्या गोष्टींची नोंद, सासरीं पाठवावयाची चालरीत इत्यादि इथें सांगितलेल्या सर्व गोष्टी कृष्णचरित्राला विशेष गोडी आणतात; व त्यामुळें हें गाणें ठेवणींतील पदार्थांप्रमाणें बायकांना मोठें शेलकें, निवडक वाटतें.
कृष्णाचें जीवन सांगणारीं अशीं आणखी कांहीं गाणीं असतील. तसेंच या ना त्या गाण्यांच्या प्रकारामध्येंहि कृष्णाची आणखी कांहीं गाणीं इतरत्र याच पुस्तकांत आढळतील. परंतु कृष्णजन्माच्या निमित्तानें सर्व सामान्य बाईच्या आठवणींत येणारीं जीं लोकप्रिय गाणीं आहेत तीं अशीं आहेत. त्यांचें गायन फावल्या वेळींहि होतें. तरीपण त्यांची गोडी कायम रहाते. अगोदरच कृष्णाबद्दल मनामध्यें अपार भक्ति असल्यानें, ह्या गाण्यांनीं निर्माण होणारें रससौंदर्य आणि विचार सौंदर्य सामान्य मनाला आणखीनच भुरळ पाडतें; आणि गोकुळच्या कृष्णाच्या नादांत स्वतःचेंहि देहभान हरपून टाकतें !
भगवान् श्रीकृष्णाचें जीवन फार मोठें, त्याची कर्तबगारीहि सामान्य मनाच्या अवांक्याबाहेरची. पण सामान्य लोकांच्या मनांत त्याचें वास्तव्य कसें आहे, याचा हीं गाणीं म्हणजे एक सुंदर आदर्श आहे यांत शंका नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP