स्त्रीधन - डोहाळे

लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे , तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे .


आपल्या घरामध्यें नवें बाळ जन्माला येणें ही मोठी भाग्याची गोष्ट आहे असें सर्वत्र मानण्यांत येतें . बाळाचा जन्म म्हणजे दोन्ही घराण्यांचा आनंद . बाळ म्हणजे जणुं कुलदीपक . त्याचें स्वागत करावयाचें ही अभिमानाची गोष्ट . त्यामुळें घरामधील लेकीबाळी अगर सुना गरोदर आहेत अशी कुणकुण जरी कानावर आली , तरी घरच्या वडीलधार्‍या स्त्रियांच्या चेहर्‍यावर आनंद झळकतो . विशेषतः एखाद्या सुनेला अगर लेकीला पहिल्यांदांच जेव्हां दिवस जातात , तेव्हां तर या आनंदाला पारावार रहात नाहीं . या पोरीचें किती कौतुक करूं आणि किती नको याला कांहीं हिशेबच रहात नाहीं . त्यामुळें अशा वेळीं या मुलीवर संस्कारांचा एवढा वर्षाव करण्यांत येतो कीं , ती मुलगी भांबावून जाते ! मात्र हे सारे सोपस्कार वडिलोपार्जित चालत आलेले असल्यानें , मोठया काळजीपूर्वक त्यांची अंमलबजावणी व्हावी या दृष्टीनें ती मुलगी आनंदानें सर्व करून घेते . आणि त्या कारणानें वडील मंडळींनाहि मोठा हुरूप येतो .

साधारणपणें सहा महिने संपले आणि सातवा उजाडला म्हणजे मुलीला चांगला मुहूर्त बघूण माहेरीं आणण्याची चाल आहे . अशा वेळीं सासरची मंडळी मुलगी पाठविण्यापूर्वी 'डोहाळजेवाणा ' चा समारंभ करतात . गणगोतांतील स्त्रिया आणि शेजारच्या आयाबाया बोलावून सवाष्णींच्याकडून समारंभानें मुलीची ओटी भरण्यांत येते . त्याचबरोबर सर्वांना ऐपतीप्रमाणें थाटामाटाचें जेवणहि देण्यांत येतें , म्हणजे य निमित्तानें गर्भार्शीच्या आवडीचे पदार्थ सर्वांच्या सहवासांत तिला जेवूं घालणें आणि तिला उत्तेजन देणें ही या मागची भूमिका असते .

माहेरीं देखील याच प्रकारें 'डोहाळ जेवण ' करण्याचा प्रघात आहे . परंतु त्यांतहि प्रकार असतात . मुलीला बागेंत नेऊन , नावेंत बसवून , झुल्यावरचोपळ्यावर बसवून , मखरांत बसवून आणि फुलांनीं सजवून ज्याच्या त्याच्या राजीखुशीप्रमाणें जेवूं घालण्यांत येतें . हेतु एवढाच कीं , त्या गर्भार्शीचें मानसिक आरोग्य सुधारावें आणि तिला उत्साह वाटावा . अर्थात दोन्ही घरच्या मंडळींना तेवढेंच कौतुक .

परंतु माहेरची भावना फार वेगळी आणि तिथें खेळीमेळीचें प्रमाणहि अधिक दिसून येतें . एरव्हीं जो सोहळा व्हावयाचा त्यांत फरक नसतो . नाहीं म्हणायला खाण्याचे पदार्थ त्या त्या ठिकाणच्या रीतिरिवाजाप्रमाणें वेगळे वेगळे असणें शक्य असतें .

अशा प्रसंगी गर्भार्शीला नवें हिरवें लुगडें नेसावावयाचें , हिरव्या खणाची नारळासह ओटी भरायची , हिरव्या बांगड्या घालावयाच्या अशीं पद्धत आहे , यावेळीं शेजारच्या सवाष्णी व नात्यांतील सवाष्णी मिळून तिला ओवळतात व तिची फळाफुलांनीं ओटी भरतात . हा हौसेचा भाग आहे .

जेवणाचा कार्यक्रम संपला आणि ओटीभरणाची वेळ आली , म्हणजे मग ओटी भरतांना गर्भार्शीला तांदळाच्या अगर गव्हाच्या रांगोळीनें सजलेले आसन बसावयास देतात . आणि ओटीभरण सुरू असलें म्हणजे मग हौशी बायका डोहाळ्याची गीतेंहि म्हणूं लागतात

खेड्यामध्यें गर्भार्शीला जे पदार्थ करावयाचे ते करतांना घरीं सगळ्या बायका मिळून दळतात . त्यावेळीं पुढीलप्रमाणें ओव्या गाईलेल्या ऐकावयास मिळतात -

पैल्यांदां गरभार कांत विचारी आडभिंती

पांची प्रकाराचं ताट रानी म्हईन झाल किती

पैल्यांदा गरभार कांत विचारी गोठ्यायांत

हौशा माज्या कांता घाला अंजीर वट्यायांत

पैल्यांदां गरभार डोळे लागले जिन्नसाचे

माजा ग बाळराज गरे करीतो फणसाचे

पैल्यांदां गरभार डोळे लागले ताकायाचे

माजी ती सूनबाळ हाये लक्षन पुत्रायाचे

पैल्यांदां गरभार डोळे लागले कारल्याचे

माजा ग बाळराज मळे धुंडितो मैतराचे

पैल्यांदां गरभार डोळे लागले कशायाचे

माजा बाळ आणीयीतो आंबे शेंदरी पाडायाचे

पैल्यांदा गरभार तिला सारकी येती घीरी

चांफा चंदन माज्या दारीं बसूं सावलीं त्येच्या नारी

पैल्यांदां गरभार तिला अन्नाची येती घान

हौशा ग भरतार देतो सुपारी कातरून

हिरव्या चोळीला ग बंदा रुपाया सारीयीला

माज्या त्या भैनाईला चोळी गर्भार नारीयीला

पांची प्रकाराचं ताट वर केळाची केळफणी

माज्या त्या भैनाईची वटी भरीती सवाशीनी

या ओवी गीतांमधून गरोदर स्त्रीच्या या वेळच्या अवस्थेत कल्पना देण्याचा प्रयत्‍न केलेला आहे . आपापल्या परीनें होणारी घरच्या माणसांची या वेळची हालचाल अशा रीतीनें इथें व्यक्त झालेली आहे . नवर्‍यानें एकांतांत तिची चौकशी करावयाची , तोंडाला चव यावी म्हणून तिला सुपारी कातरून द्यावयाची , अंजीरासारखीं फळें आणून तिला द्यावयाचीं ; घरच्या मुलीनें तिच्या इच्छेप्रमाणें लोकांचे मळे धुंडाळून कारलीं आणावयाचीं , शेंदरी पाडाचे आंबे आणावयाचे , फणसाचे गरे करून द्यावयाचे ; बहिणीनें बंदा रुपाया खर्चून तिला हिरवी चोळी शिवायची , खणानारळांनीं व फुलाफळांनीं तिची ओटी भरावयाची ; ती ताक वरचेवर पिते तेव्हां पुत्राचें लक्षण दिसतें अशी गोष्ट सासूनें करावयाचे ; मैत्रिणीनें तिला मळमळतें म्हणून अंगणांतील चांफ्या चंदनाच्या सावलींत बसावयास सांगावयाचें इत्यादि या सर्व हालचाली मोठ्या घरगुती रीतीनें इथें व्यक्त झालेल्या आहेत .

पैल्या मासीं रुक्मिनीशीं आली शिसारी अन्नाची

बाग केळी नारळीची त्रिपन केळी बकुळीची

केली ताकीत माळ्याला दिवस सोनीयाचा आला

किष्ण पूसे रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला

दुसर्‍या मासीं भिमकतनया चढलीसे गर्भ छाया

हर्षयुक्त यादवराया पालटली सर्व काया

प्रमु हर्ष मनीं झाला दिवस सोनीयाचा आला

किष्ण पूसे रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला

तिसर्‍या मासीं भिमकबाळी घालितसे चीर चोळी

पाट समया रांगूयीळी भोजनाला गूळपोळी

भोजनाशी उशीर झाला दिवस सोनीयाचा आला

किष्ण पूसे रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला

चवथ्या मासीं उभी द्वारी पुशी द्वारकिच्या नारी

विनोद करी नानापरी लाजे रुक्मिनी सुंदरी

गजरा येनीमंदी घाला दिवस सोनीयाचा आला

किष्ण पूसे रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला

पांचव्या ग महिन्यांत दिला मंडप बागेंत

पांची पक्वान्नांचा थाट पंक्ति बसल्यात आचाट

मधिं बसवा रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला

किष्ण पूस रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला

सहा महिन्यांची सोहाळी किष्ण पूशीतो डोहाळी

आंबे पाडाचे पिवळे रुक्मिनीचें वय कवळें

वारा विंझनांनीं घाला दिवस सोनीयाचा आला

किष्ण पूसे रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला

सातव्या महिन्याच्या परी आंबुळी ग वेळा खिरी

अंगीं चोळी भरजरी पिवळं पातळ केशरी

वारा विंझनाचा घाला दिवस सोनीयाचा आला

किष्ण पूसे रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला

आठव्या महिन्या आठुंगूळ हार गजरे ग गोकूळ

माळ उंबराची घाला दिवस सोनीयाचा आला

किष्ण पुसे रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला

नऊ महिने नऊ दिवस झाली रुक्मिनी प्रसूत

बाळ जन्मलें मदन जैसें सूरव्याचे किरन

चांद लाजूयिनी गेला दिवस सोनीयाचा आला

किष्ण पूसे रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला

गर्भार्शीला चार चौघींच्यामधें बसवून तिचें कौतुक करतेवेळीं हें गाणें म्हणतात . रुक्मिणीच्या निमित्तानें उभ्या दुनियेंतील सगळ्या बायकांच्या होणार्‍या कौतुकाला इथें अशी वाचा फुटली आहे . दिवस गेल्यानंतर ओळीनें नऊ महिने रुक्मिणीमध्यें व तिच्या कोडकौतुकामध्यें कसकसा फरक पडत गेला तो इथें मोठ्या खुबीनें वर्णन केलेला आहे . सोन्याचा दिवस घरामध्यें उजाडला या भावनानें श्रीकृष्णानें रुक्मिणीची पुरविलेली इच्छा गर्भार्शीपुढें ठेवण्यांत आली आहे . हेतु एवढाच कीं , हें सुख सर्वांचे सारखें , राजाच्या राणीसारखें , ही भावना सामान्य मनाला पटावी आणि हुरूप यावा .

रुक्मिणीला दिवस गेले आहेत आणि तिच्या मुखावर गर्भाची छाया पसरली आहे , हें बघून हर्ष झालेल्या यादवरायानें सोन्याचा दिवस आला , असें सांगून माळ्याला ताकीद दिली कीं , केळी नारळीची आणि बकुळीची बाग ताजी ठेव . तिला तिसरा महिना लागल्यानंतर समई , रांगोळी , पाटाचा थाट करून गूळपोळींचे भोजन दिलें व कोरी चोळी शिवली . चवथ्या महिन्यांत ती दरवाजांत उभी राहिली असतां द्वारकेंतील स्त्रिया तिची विनोदानें चेष्टा करतात , केसामध्यें वेणी घालतात आणि रुक्मिणी लाजून चूर होऊन जाते . पांचवा महिना येतांच पांची पक्वान्नांचा थाट उडून बागेंतील मंडपांत उठणार्‍या पंक्तीमध्यें तिला बसवण्यांत येतें . कोवळ्या वयाच्या रुक्मिणीला सहावा महिना लागतांच कृष्ण तिची इच्छा विचारतो व त्याप्रमाणें तिला खाऊ घालतो . सातव्या महिन्यांत भर्जरी चोळी आणि केशरी पातळ तिला नेसवून तिला आंबोळी व नाना प्रकारच्या खिरी देण्याची व्यवस्था करण्यांत येते . आठव्या महिन्याला शास्त्राप्रमाणें शुभ म्हणून उंबराची माळ आणि हारगजरे उभें गोकूळ रुक्मिणीला देतें . आणि शेवटीं नवव्या महिन्यामध्यें पुरे दिवस भरल्यानंतर रुक्मिणी प्रसूत होते . तिला झालेलें बाळ मदनासारखें सुंदर , सूर्य किरणासारखें प्रकाशमान असतें . त्याला बघून चंद्रदेखील लाजतो ! अशी ही या गाण्यामधील भावना ऐकतांना आणि सांगतांना बायका तल्लीन होऊन जातात . आणि खुद्द गरोदर स्त्रीदेखील विलक्षण आनंदून जाते . जणुं हे सारे सोपस्कार आपल्यावरच या घटकेला होत आहेत आणि आपलें बाळहि एवढें देखणें होणार ही कल्पना तिच्या मनाला आनंदानें गुदगुल्या करून विलक्षण मोहिनी घालते .

हा मास प्रथम भिमकीचा नुमजे कुणाला । वदनेंदु सुखला । चालता गज . गति होती श्रम पदकमला । धन्यता होय धरणीला । घामानें तनु डबडबली । तोंडावरि दिसली लाली । गर्भाची छाया पडली । नेसली नवी हिरवी जरतारी । गर्भिणी रुक्मिणी नारी । डोहाळे पुसे श्रीहरी ॥

दुसर्‍यांत समवया सख्या मिळुनी येती । बहुपरीचा विनोद करिती । विंझण घेऊनि हातीं । चवरंगी उपचार सुशोभित करिती । लाविली उटी वाळ्याची । गुंफिली वेणी चांफ्याची । घातिली माळ सुमनांची । घनदाट वास सुगंध सुटला भारी । डोहाळे पुसे श्रीहरी ॥

तिसर्‍यांत बहु डोहाळे होती । सोहाळे द्राक्षाचे मंडप देती । लाविली बाग केळीची वृक्ष पालवले । फलभार तरुवर आले । पुष्पांची बागशाही । शेवंती मोगरा जाई । अंब्यांची घनदाट आंबराई । झोपाळे बांधुनी बसवी त्यावरी । डोहाळे पसे श्रीहरी ॥

चवथ्यांत कळे गोतास आला विश्वास । लागला पांचवा मास । गुंफिली फुलांची जाळी । मेंदी नखास माखिली । पक्वान्नें नानापरीचीं केलीं । कांद्याची भाकरी शिळी । चांदणें रात्र अंधेरी । थंडीत गुलाबी कोवळ्या उन्हाच्या लहरीं । डोहाळे पुसे श्रीहरी ॥

लागला सहावा मास पसरलें तेज । अवतरती मकरध्वज । नेसुनी हिरवा शालु हिरवाच साज । पाहुनिया खूष हो यदुराज । बसुनि पति शेजारीं ओटी भरी । डोहाळे पुसे श्रीहरी ॥

लागला सातवा मास । पोट नारळी महालामधिं केली आरास । नगरीच्या नारी गातीं मंजूळ गाणीं । कुणीं चेष्टा करिती मिळुनी । वाटिती हळदकुंकूं पानसुपारी । डोहाळे पुसे श्रीहरी ॥

आठव्यांत शास्त्र संस्कार अठांगूळ करिती । गोतास आमंत्रण देती । कुणी आणिती चिरकंचुकी आहेर करिती । देवीचे आशीर्वाद घेती । सुस्वर वाद्य वाजंत्री चौघडा भेरी । डोहाळे पुसे श्रीहरी ॥

नऊमास नऊ दिवस । झाली प्रसूत बहु आनंद द्वारकेस । वाटीती नगरी शर्करा भरूनिया रथ । जन्मासि ये रतिकांत । हर्षले मनीं श्रीरंग । भक्तासि करूणा मेघ गंगेस लागला छंद । आवडीनें गातीं गुणगान जमुनीया नारी । डोहाळे पुसे श्रीहरी ॥

डोहाळ जेवणाच्या निमित्तानें जमलेल्या बायका मागच्या गीताप्रमाणेंच हेंहि गीत म्हणतात . गीताचा आशय तोच . पण समाज भिन्न पडतात . पहिलें गीत प्रामुख्यानें बहुजन समाजांतील स्त्रिया गातात . आणि हें गीत पुढारलेल्या वर्गांतील स्त्रिया गातात . त्यामुळें भाषेच्या वापरांतहि फरक दिसून येतो . या फरकापलीकडे पूर्वीच्या गाण्यापेक्षां ह्या गाण्यांत वेगळी कांहीं भावना व्यक्त झालेली दिसत नाहीं . वर्णन मात्र सविस्तर आलेलें आहे . इतकेंच काय तें त्यामुळें भगवान् श्रीकृष्णाच्या वेळचें ऐश्वर्य नजरेंत भरायला अधिक अवसर सांपडतो . तसेंच सामान्य मनालाहि तें कल्पनेंत कां होईना उपभोगण्याची संधि मिळाल्याचा आनंद होतो ! निदान असा आदर्श डोळ्यापुढें रहायला तरी हरकत नाहीं , या खुळ्या समजुतीनें बायका भारून जातात .

श्री वशिष्ट गुरूची आज्ञा वंदुनी आला

तो राजा दशरथ कौसल्येच्या महाला

स्थुल देह ओसरीवरती नृपवर चढला

देह सूक्ष्म माजघरीं संशयांत पडला

याला कारण कोठडींत पाहे नृप तो

महाकारण माडीवरी जाय त्वरीत तो

ही द्वारीं नच राहे उभी म्हणत तो

शोधितां परस्पर परसीं पाहुनि तिजला

म्हणे रुसून बसलि का निर्विकल्प छायेला

डोहाळे दशरथ पुसतो कौसल्येला

हे राजकुमारी काय आवडे तुजला

जे योगिजनांना योग सांधितां न मिळे

तें कौसल्येन पूर्ण ब्रह्म सांठविलें

तिज जवळी बसूनी राजा दशरथ बोले

पुरवीन कामना इच्छित वद या वेळे

ती नीजानंद आनंदीं रंगली

ती द्वैतपणाची बोली विसरली

तिशीं गोष्ट विचारित राजा मागली

आठवतें तुला का वर्‍हाद बुडवूनि गेला

पौलस्त्य तनय तो मत्स्यमुखीं दे तुजला

डोहाळे दशरथ पुसतो कौसल्येला

हे राजकुमारी काय आवडे तुजला

बोलतो कुठें रावण भुज आपटोनी

ती उठली शत्रूचें नाम ऐकतां श्रवणीं

म्हणे चापबाण दे दाहि शिरें उडवोनी

मी क्षणांत टाकिन कुंभकर्ण मारूनी

त्या इंद्रजिताला बाणें जर्जर करुनी

धाडीन यमपूरा बंधूसाह्य घेवोनी

मम भक्त बिभीषण लंके स्थापूनी

बंधमुक्त करीन सूर सारे या क्षणीं

धाडीन स्वर्गीं सन्मानें त्या झणीं

हें कार्य करीन मी पाळुनी ताताज्ञेला

डोहाळे दशरथ पुसतो कौसल्येला

हे राजकुमारी काय आवडे तुजला

घे शशांक वदनें नवरत्‍नांची माळा

मी चाप भंगितां घालिल भूमीबाला

घे अननस आंबे द्राक्षें ह्या वेळा

मीं प्रिया शोधितां देईल शबरी मजला

घे दास दासी रथ घोडे गे सुंदरी

हनुमंत दास तो माझा महिवरी

नौकेंत बैसूनि जलक्रिडा तूं ग करी

प्रियभक्त गुहक मज नेईल परतीराला

ही लाल पैठणी पांघर भरजरी शेला

डोहाळे दशरथ पुसतो कौसल्येला

हे राजकुमारी काय आवडे तुजला

झडपिली भुतांनीं पंचाक्षरीं कुणी आणा

इज नेऊनि दाखवा वैद्य बघुनिया शहाणा

तव उदरीं येईल वैकुंठीचा राणा

आशीर्वाद दिले मज श्रेष्ठीं नमितां चरणा

हे द्वारपाल गुरुजींना सांगित मम गोष्ट प्रियेची

तूं सांग कहाणी करुनि बहु सायास प्रीतीची

मम गोष्ट ऐकुनी दुत तो शीघ्र घेऊनि आला

त्या ब्रह्मसुताच्या वंदित नृप पदकमला

डोहाळे दशरथ पुसतो कौसल्येला

हे राजकुमारी काय आवडे तुजला

पुराणामध्यें सांपडणार्‍या दशरथ आणि कौसल्येच्या विवाहाच्या रोमांचकारी कथेच्या पार्श्वभूमीवर आधारलेलें हें गाणें आहे . इथें दशरथ कौसल्येला तिची आवडनिवड विचारीत आहे . परंतु ती सर्वसामान्य जीवनामधील नाहीं . कौसल्येचा पुत्र राम आपल्या मृत्यूला कारणीभूत होईल हें विधिलिखित खोटें ठरावें , म्हणून पराकोटीचा प्रयत्‍न करणार्‍या रावणाच्या कारस्थानाला हाणून पाडण्याची हिकमत या ठिकाणीं व्यक्त झालेली आहे . कौसल्येच्या उदरांत वाढत असलेल्या रामचंद्राच्या पराक्रमाची जणुं ही तयारी चालली आहे . आणि ती भाग्यवती ठरावी , वैभवशाली व्हावी म्हणूनच कीं काय दशरथ कौसल्येच्या खाण्यापिण्याची व वस्त्रालंकारांचीहि या ठिकाणीं काळजी घेत आहे ! त्यामुळें एकदम ऐकतांक्षणींच समजावयास कठीण वाटणारें हें गाणें रामासारखा पराक्रमी पुत्र व्हावा या भोळ्या आशेनें सामान्य स्त्रिया तोंडपाठ करून मोठ्या आवडीनें म्हणतात . गर्भार्शीच्या कानांवर हें जरूर पडावें म्हणजे तिचें मन प्रसन्न राहील व देवमाणसाला जन्म दिल्याचें पुण्य तिच्या पदरांत पडेल , ही त्यांची भोळी समजूत असते . सर्व सामान्यांच्या कौतुकाच्या कल्पनेबरोबरच असामान्य जीवनांतील कौतुकाचीहि गुंफण या गाण्यांत मोठ्या खुबीनें केलेली दिसून येते . त्यामुळें अगोदरच प्रभु रामचंद्राविषयीं अपार जिव्हाळा मनांत बाळगणार्‍या स्त्रियांना या गाण्याची आणखी गोडी वाटूं लागते . जुना इतिहास नव्यानें घडविण्याची हिंमत बाळगूनच जणूं हें गाणें त्या डोहाळ जेवणाचे वेळीं म्हणतात !

बाई मी पहिल्या माशीं उभी ग अंगणांत

मशी पावला रघुनाथ

बाई मी दुसर्‍या माशीं उभी ग वृंदावनीं

डाव्या कुशीला चक्रपाणी

बाई तिसर्‍या माशीं मुखावर दिसती लाली

भैना कोणत्या महिन्यांत न्हाली

बाई चवथ्या माशीं वर्णांचा येतो वास

माझ्या भैनाला गेले दिवस

बाई पांचव्या माशीं निरीबाई उंच दिस

तिचा भ्रतार एकांतीं पुस

बाई सहाव्या माशीं खाऊशी वाटे बहु

चल अंजनी बागत जाऊं

बाई सातव्या माशीं इच्छा झाली डाळींबाची

मला शिवा चोळी रेशमाची

बाई आठव्या माशीं मुलीनं ग घेतला छंद

मायबापांशीं झाला आनंद

बाई नवव्या माशीं नऊ महिने झाले पूर्ण

पोटीं जन्मलें श्री भगवान

बाई दहाव्या माशीं आणा दाई बोलवून

साडी चोळीची करा ग बोळवन

डोहाळ्याचें हें गीत बहुजन समाजातील या बाबतींतील एक प्रातिनिधिक भावना या दृष्टीनें गोंधळी लोक गातांना दिसून येतात . अगदीं घरगुती जीवनदर्शन घडविणारें हें गाणें क्वचित् प्रसंगी कुठें कुठें स्त्रियाहि चारचौघी बसून , येणार्‍या गाण्यांची गंमतींचें मोजदाद करायला लागल्या म्हणजे , म्हणतांना दिसून येतात . कुठें कुठें कोकेवालेहि हें गाणें म्हणावयास सांगितलें तर आपल्या कोका (तंतुवाद्य ) वाजवून म्हणतांना दिसून येतात .

मराठींतील स्त्रीधन डोहाळे

पुष्कळदां असें होतें कीं , डोहाळे जेवणाचेवेंळीं कांहीं बायका न्हाण आलें असतांना म्हणावयाचें गाणेंहि म्हणत असतात . हें गाणें सर्वत्र आढळतें . तें असें आहे .-

बाई पैल्या दिवशीं रुक्मिनीला न्हान आलं

गोताला बोलावनं केलं

बाई दुसर्‍या दिवशीं रुक्मिनी तोंड धुती

चिमन्या पानी पितीः

बाई तिसर्‍या दिवशीं धाडा सोनाराला चिठ्ठी

मागा चांदीची ताटवाटी

बाई चवथ्या दिवशीं घाली सासू ऊनऊन पानी

हातीं आईच्या तेलफनी

बाई पांचव्या दिवशीं बागेंत गेला माळी

रुक्मिनीच्या मखराला केळी

बाई सहाव्या दिवशीं धाडा सोनाराला पत्र

मागा सोन्याचं फूलपात्र

बाई सहाव्या दिवशीं करा कासाराला बोलवनं

हातीं सोन्याचं कंगवान

बाई सातव्या दिवशीं वान्याला धाडा चिठ्ठी

नारळ घाला विटीं

बाई आठव्या दिवशीं खिडकीत उभी राही

गोताची वाट पाही

बाई नवव्या दिवशीं पुरन पोळीचं जेवायान

गनागोताला बोलवान

बाई दहाव्या दिवशीं हळदीकुंकवाचा केला काला

देव इट्टल शांत झाला

बाई अकराव्या दिवशीं धई भाताचा काला केला

देव इट्टल शांत शाला

बाई बाराव्या दिवशीं वाज चौघडा दारोदारीं

इट्टलरुक्मिनीला केला पोषाक भारी

विठ्ठल रुक्मिणीच्या निमित्तानें सर्वसामान्य घरांत होणारें कौतुक या रीतीनें इथें व्यक्त झालेलें आहे . न्हाण आलें त्यावेळीं झालेलें कौतुक आतांच्या गर्भाशींच्या कौतुकांत अधिक भर घालीत आहे , हें दाखविण्याच्या ईर्षेंनेंच हें गाणें अशावेळीं म्हणत असतात .

डोहाळजेवण हा स्त्रीच्या जीवनांत येणारा सदासर्वकाळाचा , प्रत्येक पिंढींतील , असा एक विंलोभनीय सोहळा आहे . त्यामुळें बदलत्या काळाप्रमाणें त्या सोहळ्या निमित्तानें गाइल्या जाणाच्या गाण्यांना नव्या गाण्यांचीहि जोड लाभत जाते . अशापैकींच जोड देणारें मला सांपडलेलें डोहाळ्याचें एक गीत असें आहे -

श्री भवानी मातेनें वर हा दिधला म्हणूनिया दिवस हा आला

मज वाटतसे आज पासूनी आपुला भाग्योदय खचितचि आला

तव मुखचंद्र प्रिये अशा या समयाला बहु खिन्न कशानें झाला

तव मनीं काय आवडतें , तव चित्त कशावरि जडतें , जरि असें फार अवघडत

पुरवीन तरी सांग मला तव चित्तीं जे सर्व मनोरथ असती

निज कांतेला डोहाळे अति प्रीती सरदार शहाजी पुसती

म्हणे जिजाई आवड स्वातंत्र्याची मज नको बेडी पारतंत्र्याची

हा विप्रछळ मज पहावेना , पारतंत्र्य मला सहवेना , मृत अन्न गोड लागेना

परदास्यानें मिळविलेली संपत्ति मज वाटे केवळ माती

निज कांतेला डोहाळे अति प्रीती सरदार शहाजी पुसती

मज वाटतसे तलवार ढाल घेवोनी निज घोड्यावर बैसोनी

या कामीं मरण जरी येई , तरी मला सुखदचि होई , या खेरीज इच्छा नाहीं

हे डोहाळे ऐकुनि शहाजी म्हणती बाळ हे करील बहु कीर्ति

निज कांतेला डोहाळे अति प्रीती सरदार शहाजी पुसती

महाराष्ट्राला सौभाग्याचे दिवस दाखविणार्‍या छत्रपति शिवाजी महाराजांच्या परमपूज्य मातोश्री जिजाबाई यांचें मनोगत व्यक्त करणारें हें डोहाळे गीत आहे . शिवाजी हा पराक्रमी पुत्र व्हावा म्हणून त्याच्या भाग्यशाली आईनें प्रकट केलेली ही इच्छा मराठी मनाला स्फूर्ति देणारी आहे . मराठ्यांच्या इतिहासाची बैठक या गाण्याच्या निमित्तानें समाजापुढें आलेली आहे . मोंगली अंमलाचा व सत्तेचा कंटाळा आलेल्या व परतंत्र्यांतून स्वराज्य निर्मितीकडे धांवणार्‍या जिजाऊच्या मनांतील ही भावना हृदयाला जाऊन भिडणारी आहे . पराक्रमी मातेची ही भाषा त्यामुळेंच स्त्रियांना आवडीची झाली आहे . माझा मुलगा शिवाजीसारखा पराक्रमी व्हावा असें प्रत्येक स्त्रीला वाटावें , एवढी ईर्षा या गाण्यानें निर्माण होते . त्यामुळेंच या गाण्याची योजना डोहाळेगीतांत जरूर केली जाते व स्त्रिया आवडीनें तें म्हणतातहि .

अशा प्रकारचीं डोहाळे गीतें आणखी पुष्कळ असतील . पण मला जीं मिळालीं आहेत त्यांचें सौंदर्य असें आहे . गर्भार्शीला भरपूर उत्साह देणारीं व भावी मुलाचा आदर्श मनासमोर उभा करण्यास समर्थ असलेलीं हीं गीतें आहेत . त्यांच्यामध्यें पराक्रम आहे , स्फूर्ति आहे , इतिहास आहे , कौतुक आहे , उत्तेजन आहे , सारें कांहीं आहे . त्यामुळें ज्या त्या घराण्याच्या पद्धतीप्रमाणें सजविलेल्या आसनावर अभिमानानें बसणार्‍या गर्भार्शीला त्यांच्या श्रवणानें निश्चित आनंद होतो . मनांतील संकोच नाहींसा करून ती आपल्या भावी मुलाचें चित्र मनासारखें रंगविण्यांत गुंगून जाते . आपल्या आवडीच्या पदार्थांचें सेवन करतांना अशावेळीं या गीतांतील सुंदर आणि मंगल भावनांची पोंच आपल्या पोटांतील बाळाच्या रक्तामध्यें होऊं दे अशी तीव्र इच्छा तिच्याठायीं निर्माण होते ; व त्या आनंदांतच ती सर्वांशीं खुल्या दिल्यानें वागून होणार्‍या कौतुकाचें सहर्ष स्वागत करते .

मराठींतील स्त्रीधन डोहाळे संपूर्ण

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP