मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ११

खंड २ - अध्याय ११

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । जंबुद्धिपेश्वरा नव पुत्र झाले । नाभि किंपुरुष हरि इलावृत्त भले । हिरण्मय कुरु रम्य तैसे शोभले । भद्राश्व केतु मालक ॥१॥
जनक त्या त्या नामक खंडें देत । ऐसे हे सात प्रियव्रताचे सुत । मुद्‌गल सांगती वनांत जात । तप करुनी गाणपत्य झाले ॥२॥
अंतीं गाणेश्वर धामाप्रत । गेले पुनरावृत्ति शून्य पुनीत । योगाने अभेद पावत । ब्रह्मवादी ते सारे ॥३॥
जंबुद्धीपाचा विस्तार । एकलक्ष योजनें उदार । दक्षा लवणोदकें परिसर । वेढिला असे तयाचा ॥४॥
त्यांत मध्ये महाशैल । मेरुहेमपय तो अचल । नानाधातुयुक्त औषधींनी विपुल । शुभकारक विपुलजळ ॥५॥
उत्तम पाण्याचा नद्या वाहती । गुहांत अनेक प्राणी राहती । लक्ष योजनें उत्सेध जगतीं । विस्तार योजनें साठ हजार ॥६॥
बत्तीस सहस्त्र योजनें अधःस्थित । आठ हजार योजनें आसमंतात । ऊर्ध्व विभेदानें संस्थित । तो कनकाचल भूमींत ॥७॥
पद्माकार रुपानें स्थित । पद्मपत्र आकारें व्यवस्थित । त्याच्या भोगतीं पर्वत । नाना धातुमय असती ॥८॥
त्यावरती देवांचीं । गुहयकांची पक्ष्यांची । योगी सिद्धमहात्म्यांची । राक्षसाचीं निवासस्थानें ॥९॥
नागेंद्रांचीं मुनींद्राची । गंधर्वांचीं पिशाचांची । भूतांची अद्‌भूत निवासें साचीं । प्रजापते तेथ शोभली ॥१०॥
उद्यानें चित्रविचित्र । देवक्रीडा गृहे सुपात्र । वार्धक्य शोकहर पवित्र । उदकें सर्वत्र खरोखर ॥११॥
कैलासादी आठ पर्वत । त्याच्या सभोवतालीं स्थित । त्यांत रुद्रादिदेवेंद्र वसत । दिशाधिपति तैसेची ॥१२॥
मध्यमागीं महाअरण्य स्थान । ब्रह्मदेवाचें पावन । ऐश्या परीं सर्व देवांसी सुखस्थान । पर्वत तो शोभला ॥१३॥
त्याच्या दक्षिण भागात । तीन द्वीपखंड असत । उत्तरभगीं खंडत्रय विराजत । पूर्वपश्चिम भागीं वर्षद्वय ॥१४॥
मध्यांत समंत प्रदेशांत । एक वर्ष त्याचे असत । ऐशापरी नऊ खंड ख्यात । मध्यमद्वीपात त्या कालीं ॥१५॥
हिमाचलादी तयांत । मर्यादागिरी स्मृत । दोन हजार योजनें रुंद असत । आठ योजन विस्तारें ॥१६॥
योजन सहस्त्र विस्तार । प्रति खंडांत अपार । त्यांत मित्रभाव धर । लोक निवास करतात ॥१७॥
वर्षांत पर्वत नानाविध । नद्या तैशाचि बहुविध । दक्षा तेथ सर्व लोक सावध । सुखे भोगितो अनंत ॥१८॥
अजना भविहीन ख्यात । आठखंडे प्रकीतर्ति । त्यात सिद्धि स्वाभाविकी असत । स्थिर भावानें संस्थित ॥१९॥
सदा यौवनयुक्त नर । सुरुप नाहीही समग्र । देवांसम सुखांचे भोक्ते उदार । साधुगूणयुक्त जे ॥२०॥
परस्परांशी संसक्त । समकाळ भोगरत । वर्णाश्रमरत धर्मयुक्त । दयान्वित ते सारे ॥२१॥
तेथ सामान्य जनांचे युगधर्म नसती । शीतोष्णादि भवें दुःखें नसती । त्या खंडांत सर्व जन राहती । विशेषयुक्त मानदा ॥२२॥
अकराशें सहस्त्र जगती । द्वादश वा त्रयोदशशत आयु भोगिती । पंचशत वा दशशतवधि जगती । शत पंचवर्षे मानव ॥२३॥
हिमाचलासमीप अजनाभ ख्यात । नाभीचा खंड प्रख्यात । कर्मात्मक सर्वमान्य असत । तेथ कर्मे करोनी ॥२४॥
नर अन्य द्वीपांत जाती । खंडांत अथवा पातालांत वसती । भोग प्राप्तीस्तव गति । स्वर्गांत ते साधिती ॥२५॥
तेथ कर्मफळ भोगून । पुनरपि येथ येती परतून । अथवा पापकर्मे करुन । नरकांत जाऊन परतती ॥२६॥
नर तैसे नारीजन । येथ परतती कर्मार्थ उन्मन । येथ योगसाधनें महान । योगींद्र होतात निःसंशय ॥२७॥
गाणपत्य स्वरुप लाभती । त्याची भक्ति सदैव करिती । म्हणोनी श्रेष्ठतपा म्हणती । हिमालय हा वर्ष जगीं ॥२८॥
सर्वदातृत्वयुक्त । मान्य तयासी होत । भोगांत स्वल्परुप असत । बुधजन ऐसें सांगती ॥२९॥
शीतोष्णदींनीयुक्त । नाना रोगसमन्वित । तेथ चार वर्ण निवसत । व्यभिचार त्यांचा होऊनी ॥३०॥
नानाविध वर्ण उत्पन्न । त्यांचे धर्म विभिन्न । त्या युगधर्माचें मान। प्रकृति भिन्न नर असती ॥३१॥
स्वार्थादींनी समन्वित । ऐसे जन तेथ राहत । विंध्य सह्याद्रि आदी असत । पुढती पर्वत बहुत तेथ ॥३२॥
त्यांतून ज्यांचा झाला उगम । ऐशया पुष्कळ सरिता उत्तम । सर्वत्र वाहती पुण्यदा अनुपम । मिष्टा जाला महामते ॥३३॥
त्यांत स्नान करिता पुण्य लाभत । नर त्रिविधाचार संयुत । कर्मकर भक्तिभावयुत । सर्व देवांची तीर्थे तिथे ॥३४॥
ब्राह्मणांचीं स्थानें असती । त्या सेवकजनांची वसती । ऐसे गुणयुक्त जन राहती । हया वर्षांत शुभमय ॥३५॥
कर्मांच्या भरणें भारत । सुज्ञजन यासी म्हणत । ऐसें हें भूमंडल समस्त । कथिलें तुला संक्षेपे ॥३६॥
हें भूगोल वर्णन । वाचितां ऐकतां पापहारक महान । सूर्यमंडळाचें वर्णन । पुढिले अध्यायीं केलें असे ॥३७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते भूगोलवर्णन नामैकादशोऽध्याय समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP