मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय १०

खंड २ - अध्याय १०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल कथा पुढें सांगती । प्रियवता दहा पुत्र होती । ते सर्वही धर्मशील बलयुक्त असती । तेजस्वी तैसे सुप्रसिद्ध ॥१॥
आग्नीधर इध्माजिहव यज्ञबाहू महान । वीर हिरण्यरेता सवन । धृतपृष्ठक मेधातिथि पावन । वीतिहोधात्र कवी पितृसम ॥२॥
कवि सवन वीरांची मति । राज्य करण्या न रमे निश्चिती । सप्तद्वीपेश्वर होती । अन्य सप्त पुत्र त्याचे ॥३॥
आग्नीध्र झाल जंबुद्वीपेश्वर । इध्मजिहव प्लक्षद्वीपेश्वर । यज्ञबाहू शाल्मल द्वीपेश्वर । कुशद्वीपांत हिरण्यरेता ॥४॥
घृतपृष्ठ क्रौंच द्वीपेश्वर । शाकद्वीपीं राज्य करी मेधातिथी उदार । वितिहोत्र पुष्करेश्वर । ऐसे ईश्वर सात द्वीपांचे ॥५॥
नंतर प्रियव्रत राजा जात वनांत । नारदापासून योग शिकत । तपध्यानें गाणपत्य होत । योगसेवारत झाला ॥६॥
अंतीं गणेशरुप झाला । प्रियव्रतासम अन्य न झाला । राजा पूर्वी पुढें जगाला । अद्वितीय तो वाटेल ॥७॥
पुष्करीं वितिहोत्रास दोन सुत । रमण धातकी नामें ख्यात । महावीर ते सुधार्मिक भक्त । वैशिष्टययुत ते दोघे ॥८॥
रमणाच्या नावें वर्ष स्मृत । धातकी नाम खंडासी लाभत । एकोद्रि मानसाख्य त्यांत । वलयाकृति दश उत्सेध ॥९॥
दहा सहस्त्र वर्षांचें जीवनमान । ब्रह्मा पुष्करांत विराजमान । मधुर जळें वेष्टिलें ते द्वीप महान । सुर मानव पूजिती ब्रह्मयासी ॥१०॥
चौसष्ट लक्ष योजनें पसरला । तो अद्‍भूत सागर भला । त्याच्या पलीकडे शोभला । लोकालोक पर्वत ॥११॥
एकीकडे लोकसंवास । एकीकडे लोक वर्जितत्त्व त्यास । लोकालोकापासून प्रकाश । चंद्रसूर्यासी मिळतो ॥१२॥
त्याच्या अतीत दक्षा सर्वत्र । पसरला अंधकार मात्र । म्हणोनी लोकालोकाचल सर्वत्र । मुनी त्यासी नाम देती ॥१३॥
पुष्करीं नद्या पुष्कळ असत । मानसाचल संभूत । स्वादु उदक पूर्ण निर्मळ उदात्त । पुण्यरुप सर्व भावें ॥१४॥
त्यांच्या पाण्याचें पान करितां । दुःखद रोग नष्ट होती तत्वतां । श्रमघामादिकांची वार्ता । तेथ नसे कदापी ॥१५॥
शाकद्वीपेश्वराचे सात सुत । पवमान पुरोजव ख्यात । मनोजव धूमरानीक असत । चित्ररेफ जगद्धर ॥१६॥
त्या द्विपांत सप्त खंड । सात पर्वत प्रचंड । पुराजव नामें संवत्सर ज्ञान उदंड । मनोजव नाव खंडाचें ॥१७॥
पवमानाचें पावमान । धौमरानीकाचें चवथे असून । चैतरेफाचे चैत्ररेफक पावन । बहुरुपाचें बहुरुप ॥१८॥
सातवें खंड वैश्वधार । पाळिती आपुलें खंड ते वीर । दहासहस्त्रवर्षे जीवनमान थोर । त्यांच्या सप्त खंडांत ॥१९॥
दोषहीन सदा यौवनसंपन्न । ऐसे नर तेथ प्रसन्न । दधिमंड उदकें संवृत विस्तार शोभन । द्वीप बत्तीस लक्ष योजनें ॥२०॥
तेथ वायुदेवास नर पूजिती । क्रौंचद्विपाची ऐका स्थिती । सोळा लक्ष योजनें विस्तार जगतीं । त्यांतही असती सात खंडे ॥२१॥
सात पर्वत नद्या सात । अन्य नद्याही क्षुद्र वाहत । धृतपृष्ठाचे सात सुत । सात खंडांचे ईश्वर ॥२२॥
आमोमधुरुह घृतपृष्ठ । सुधात्मक लोहित भराजिष्ठ । वर्ण वनस्पति ऐसे सप्त । अकरा हजार वर्षे जीवनमान ॥२३॥
आपोमया नारायणा पूजिती । तेथले जन भाव भक्ती । क्षीरजळें संवृत असती । त्या द्वीपाचे भूभाग ॥२४॥
श्वेतद्वीपाचा विस्तार । पसरला तेवढाची भूमीवर । हिरण्य रेतसाचे सात सुत ईश्वर । कुशद्वीपाचे प्रख्यात ॥२५॥
वसु वसुदान दृढरुचि ख्यात । सत्यव्रत नाभिगुप्त विविक्त । देवक त्यांच्या नावें ज्ञात। ज्ञात खंडे प्रजापते ॥२६॥
तेथेंच पर्वत सात । मर्यादागिरी ऐसे स्मृत । सात नद्या महावेगा असत । सुजला दुःख विनाशिनी ॥२७॥
दहा हजार वर्षे आयुर्मान । आठ लक्ष योजनें विस्तार पूर्ण । कुशद्वीपाभोवती घृतजल वेष्टन । हव्यवाहा अग्नीस भजती तिथे ॥२८॥
शाल्मली द्वीपाचे ईश्वर । यज्ञबाहूचे सप्त पुत्र । सुरोचन सौमनस्य पारिभद्र । रमण देव वर्षक ॥२९॥
आप्यायन विज्ञात सप्तम । खंडांसी मिळे त्याचें नाम । सात नद्या पर्वत अनुपम । चार लक्ष योजनें विस्तार त्याचा ॥३०॥
सुराउदके आवृत । आठ हजार जीवनमान वसत । प्लक्षद्वीपेश्वर ख्यात । इध्मजिहवाचे सात सुत ॥३१॥
शिव यूवयस क्षांत । क्षेम सुभद्रक अमृत । अभय संज्ञक हे सात । खंडे त्यांच्या नावांची ॥३२॥
सात गिरी नद्या सात । पाच हजार वर्शे जीवनमान असत । दोन लक्ष योजनें आसमंतात । इक्षुरस सागर त्या भोवता ॥३३॥
लक्षद्वीपीं पूजिती । धर्मपरायण सूर्यासि जगतीं । वृष्टिकर देवाची संस्थिती । तेजोरुपाची तेथ ॥३४॥
प्लक्षद्वीप जाणावें प्रथम । शाकद्वीप तें अंतिम । वर्णाश्रम विभागें सर्व जन । स्वधर्मीं तेथ निवास करिती ॥३५॥
पुष्करीं सर्व धर्मज्ञ वसत । एकमार्गी एकवर्णी श्रम समस्त । समशील जन युगमान रहित । युगधर्माच्या स्वभावानें ॥३६॥
तेथ काल सदा समान । स्वधर्मही तैसाचि महान । लोभ नसे मात्सर्यं नसून । परस्पर हितार्थ सर्व झटती ॥३७॥
तेथ पुण्यशील सारे नर । संतुष्ट स्वदाररत थोर । शुभकर्मांचे फळभोग अपार । भोगिती ते भाविक ॥३८॥
देवासम क्रीडेंत रत । आपापाल्या द्वीपांत संस्थित । त्या त्या देवासी भजत । चतुष्टय मिळविती ॥३९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते द्वीपवर्णनं नाम दशमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP