करूणापर पदे - भाग ७

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे


१३०१
( राग-भैरव; ताल-धुमाळी )
दासासी पावावें संकटीं । अज्ञानें भावासी तुटी । परि जीव लागला विषय़ीं बोरंगला ।
उत्कंठा भेटीची मोठी रे रामा ॥ध्रु०॥
लटिकी माया सुटेना कीं । अभिमानें गुंतलों लोकीं । कुळाभिमान येतो मज लाजवितो ।
कोणी नव्हेती सेखीं रे रामा ॥१॥
दीनानाथ नाम तुज । इतुकाचि आधार मज । दीन आपंगावें नाथ कृपाळूवें ।
तुजवीण कोण काज रे रामा ॥२॥
शरीर लटिकें केवळ । ऐसें बोलती सकळ । शब्दीं मिथ्या केलें परी येणें गोंविलें ।
आधारें लागला भोग । लालुची हे मोठी परी जाणावी खोटी । तुझा नको वियोग रे रामा ॥४॥
मायबापा तुजविन । आम्हांलागीं सोडवी कोण । लालुचेची आस सांडुनी उदास ।
रामदास शरण रे रामा ॥५॥

१३०२
( राग-जयजयवंती; ताल धुमाळी )
पाळिलें पोसिलें मज । काय रे म्यां द्यावें तुज । चालविलें हितगुज । कृपाळुपणें सहज ॥ध्रु०॥
धन्य तूं गा रघोत्तमा । काय द्यावी रे उपमा । सुखाचिया सुखधामा । मज न कळे महिमा ॥१॥
आठवितां कंठ दाटे । ह्रदय उतटे फुटे । नयनीं पाझर सुटे । बोलतां वचन खुंटे ॥२॥
सोडविले ब्रह्यादिक । तूं रे त्रैलोक्यनायक । दास म्हणे तुझा रंक । सांभाळीं आपुले लोक ॥३॥

१३०३
( राग-सोरठ; ताल-धुमाळी )
रामा हो जय रामा हो । पतितपावन पूर्णकामा हो ॥ध्रु०॥
नाथा हो दिनानाथा हो । तुमचे चरणीं राहो माथा हो ॥१॥
बंधु हो दीनबंधु हो । रामदास म्हणे दयासिंधु हो ॥२॥

१३०४
( राग-पहाडी; ताल दादरा; चाल-देखोवेखीं गुरु० )
सुंदर पंकजनयना । पुण्यपावना । चुकवी संसारयातना । जन्मपतना ॥१॥
तुजविण शणि होतसे । वय जातसे । काळ सकळ खातसे । जन भीतसे ॥२॥
दास म्हणे तुझा आधार । पाववी पार । करीं दीनाचा उद्धार । जगदोद्धार ॥३॥

१३०५
( राग-मारु; ताल-धुमाळी )
वियोग नको रे रामा वियोग नको रे । संसारसागरीं दुःख दुःखावरी ॥ध्रु०॥
तुजविण हें सुख वाटे परम दुःख । वि० । लागली मज आस चंचळ मानस ॥वि०॥ ॥१॥
दीन मी अनाथ पाहें तुझा पंथ । वि० । दिवस लेखीं बोटीं प्राण ठेवूनि कंठीं ॥वि०॥ ॥२॥
तुजलागीं उदास कठिण जाय दिवस । वि० । प्रपंच गुंतली दास मुक्त केला । वि० ॥३॥
 
१३०६
( राग-सिंधकाफी; ताल-धुमाळी )
तूं माझी माता । राघवा । तूं माझा पिता ॥ध्रु०॥
मारुतीचे स्कंधमागीं । बैसुनीयां येईं वेगीं । धांव  त्वरित आतां ॥१॥
दीनबंधू नाम तूझें  । मजविपयीं कां लाजे । जानकीच्या कांता ॥२॥
पतित मी देवराया । शुद्ध करावी हे काया । कर ठेउनि माथां ॥३॥
हस्त जोडुनि वारंवार । दास करी नमस्कार । चरणीं ठेऊनि माथा ॥४॥

१३०७
( राग-जैमिनी कल्याण; ताल-धुमाळी )
अपराधीयाचा मी शिरोमणी । जालों पापाचा दानी ॥ काळाची दासी मी आंदणी ।
किंवा निरयाची खाणी ॥ध्रु०॥
विसरुनियां तुज राघवा । दुःखा वरपडा जालों ॥ देहबुद्धीच्या पांगीं पांगलों । निजसुखा अंतरलों ॥
गोउनीयां मन विषयीं । दारोदारीं हिंडलों ॥ तृप्तता न पवोंचि किमपि । धनकण सांचिलों ॥१॥
नाहीं नाहीं तें कर्में केलीं । म्यां परिवारसंमघें । चोरी जारी अद्‌‍भुत स्वयें केली मदांघें ॥
आचार विचार सांडिला । विषयाच्या लुब्धें । भले धर्मवंता नोकुनी । दिधला वादुनी खेद ॥२॥
उदंड मेळविला विषयांचा कळप दहाजण खाणारे । कामा येतील म्हणुनि ऐसा मानिला विर्धार ॥
मी एक यांचा वडील हा माझा परिवार । अभिमानें गोउनि अंतरी मांडियला घरचार ॥३॥
शितें तेव्हां भुतें मिळालीं नाहीं तेव्हां पळालीं । वार्धक्यता मज घातली निजशक्ती गळाली ॥
एकला एकट राहीलीं कोणी नाहीं जवळी । अवघीं सुखाचीं सोयरीं त्यांची तोंडें जळालीं ॥४॥
दास म्हणे पुरे जन्म हा सीण जाला मोठा । त्नाहे त्नाहे रघुनाथा किती सोसूं चपेटा ॥
दीनबंधू तुज स्मरतां अविटाच्या अवीटा । सर्वही संसार क्षणिक तोडीं संसारखेटा ॥५॥

१३०८
( राग-मांड; ताल-दादरा )
तूं ये रे राम । काय वर्णुं महिमा ॥ध्रु०॥
सोडविले देव तेतीस कोटी । तेवीं सोडवी आम्हां ॥१॥
राम लक्षुमण भरत शत्रुघन । पुढें उमा हनुमान ॥२॥
दास म्हणे भवबंध निवारीं । रामा गुणधामा ॥३॥

१३०९
( राग-भैरव; ताल-धुमाळी )
व्यापक रामा रे रे । बाह्या पसरुनि येशिल केव्हां ॥ध्रु०॥
अणुरणीया व्यापक होसी । श्रुति वदति साक्ष ऐसी । तो तूं नेणसि काय मजसी ॥१॥
अद्दश्यें तुज पाहतां ॥ अत्येंद्रियें न येसी हातां । सगुणत्वे भेटी देईं आतां ॥२॥
तुजविण सुख न वटे चित्तीं । अति विव्हाळ इंद्रियवृत्ति । तनुप्राणें अतिशय वाटे खंती ॥३॥
न मगे तुज कांहीं पाहीं । भेटीविण नलगे कांहीं । दासाचे अंतरसाक्ष तूं हि ॥४॥

१३१०
( राग-जिल्हा; ताल-धुमाळी )
आम्ही आपुल्या गुणें । भोगितों दुःख दुणें । तुज काय शब्द ठेवणें । लाताडपणें ॥१॥
सुख भोगि्तां सदा । नाठवे देव कदा । तेव्हां भुललें  मदा । भोगूं आपदा ॥२॥
जाणत जाणत चि । बुद्धि करुनी काची । धांवती संसाराची । सेवटीं चीची ॥३॥
प्रस्तावा घडला । सर्व कळों आला । आतां सांगावें कोणाला । चुका पडिल ॥४॥
दास म्हणे रे देवा । चुकलों तुझी सेवा । माझा केतुला केवा । रे महादेवा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 16, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP