मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|
असें केल्याशिवाय जगांत भागत नाही !

दिवाकर - असें केल्याशिवाय जगांत भागत नाही !

नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.


''.... माझें मोठें भाग्य, यांत कांहीं शंका नाहीं ! नाहींतर, आपल्यासारख्या थोर लोकांची कोठून गांठ पडायला ! - अहो कशाचे, कशाचे ! आम्ही कसले कवि ! कोठें एका कोपर्‍यांत लोळत पडलों आहोंत झालें ! नाहीं खरेंच ! परवांची आपली कविता फारच बहारीची होती बोवा ! फारच छान ! एक्सलंट ! अहो आधीं नांव पाहूनच थक्क झालों ! ' माझें आंबट अजीर्ण ! ' वा ! किती सुंदर ! - नाहीं, तें आलें लक्षांत. आहे कविता एकंदर आत्म्यालाच उद्देशून ! पण त्यांतल्या त्यांत या दोन ओळी तर मला फारच आवडल्या ! काय पहा ! - हां बरोबर, - ' अजीर्णामुळें ! जीव कळवळे ! ॥' काय बहार आहे यांत ! शब्द सोपे असून किती खोल, गंभीर अर्थ ! - काय म्हणतां ! इतका खोल अर्थ आहे का ? शाबास ! ' प्रेमभंगामुळें हदय पिळवटून डोळ्यांतून खळखळा वाहिलेल्या अश्रूंचें अजीर्ण ! ' क्च ! काय विलक्षण मिस्टिक कविता आहे हो ! टेरिबल ! फारच प्रतिमा अफाट ! माझें समजा हो ! - कोणती ? - कोणती बरें माझी कविता आपल्याला अतिशय आवडली ? हां, हां ! ती होय ? गेल्या मस्तकमंजनांतील चहादाणीवरील ! अस्सें ! - हो, ती सुद्धां आहे आत्म्यालाच धरुन ! - बरें आतां रस्त्यांत नको - केव्हां ? उद्यां सकाळी येऊं आपल्या घरीं ? - ठीक आहे - हं : ' अहो रुपम् अहो ध्वनिः ' चाललें आहे जगांत ! म्हणे ' आपली चहादाणीवरील कविता अतिशय आवडली ! ' हः हः कमाल आहे बोवा या लोकांची ! इतकी भिकार कविता कीं, मला स्वतःलासुद्धां आवडत नाहीं ! '' माझी चहादाणी ! साखरपाणी ॥ अधण येई सळसळा ! अश्रू येती घळघळा ॥'' हः हः यंवरे कविता ! पण चाललें आहे कीं नाहीं ! भेंडीरमणानें उठावें, बटाटेनंदनाची स्तुति करावी ! बटाटेनंदनानें पुढें यावें, भेंडीरमणाची वाहवा करावी ! मनांत परस्परांना त्यांची कविता मुळींच आवडत नसते ! पण जगांत यानें त्याला शेली म्हणावें, उलट त्यानें याला कीट्स म्हणावें ! चालला आहे सपाटा ! बरें असें केल्याशिवाय जगांत भागत नाहीं ! अहो नाहीं तर, आपली खरीं मतें सांगून जगांत तंटेच करायचे - वैरीच निर्माण करायचे कीं नाही ? रिकामा जिवाला ताप ! जाऊं द्या !.... ''

२२ मे १९१३

N/A

References : N/A
Last Updated : September 17, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP