प्रसादाचें तूझ्या फळ चरण - सेवाच मज दे
असें पूर्वश्लोकीं कमळ भव कृष्णाप्रति वदे
सुधा - गोडी तुच्छा असिहि हरिसेवा ब्रजजना
घडे लाळा घोंटी नवल बहु वाटे विधि - मना ॥६१॥
व्रज - जन - विभवातें या प्रसंगें विधाता
विनविल कड पावे तोंवरी श्री अनंता
स्तन - रस हरि प्याल ज्यांत गो - गोपिकांचा
प्रथम कथिल त्यांचें वैभव ब्रम्हवाचा ॥६२॥
धन्या अहो व्रजवधू व्रजलोक गायी
ज्याच्या स्तनें करुनि तृप्त सुधाब्धिशायी
प्यालासि वत्स सुत होउनियां जयांचीं
दुग्धें नवर्णवति धन्यपणें तयांचीं ॥६३॥
यज्ञादिकें करुनि तृप्ति नव्हे जयाला
येथें क्षणक्षणहि तृप्ति दिसे तथाला
पान्हा स्तनांत उरला परि सर्व पीना
हे बोल बोलति अशा स्तन - युग्म - पीना ॥६४॥
भावें अशा हरिस तृप्त म्हणे विधाता
गो - गोपिका परम धन्य अशा अनंता
मुक्तींस लाभ न असा म्हणऊनि सेवा
श्लोकांत मागत असे पहिल्यांत देवा ॥६५॥
गो - गोपिका - स्तन - रसें हरि तृप्त झाला
त्याचेंच भाग्य कमळासन बोलियेला
आतां व्रजीं वसति त्यां सकळां जनाचें
वर्णूनि भाग्य - समुदाय विरिंचि नाचे ॥६६॥
अहो धन्य गौळी अहो धन्य नंद व्रजीं सर्वही धन्य हो प्राणि - वृंद
अहो भाग्य यांचें अहो भाग्य यांचें सखे सोयरे ब्रम्ह कृष्णारत्न ज्यांचे ॥६७॥
अहो भाग्य हा शब्द उच्चार वाचे विधाता मनीं विस्मयाविष्ट नाचे
असा भाव चित्तामधें वासुदेवं अहो दाविला वर्णिला त्याच देवें ॥६८॥
व्रज - जन - बहु - भाग्यें वर्णितां या प्रकारें
नकळति विधिलाही जीं अतर्क्ये अपारें
म्हणुनि विभव - लेशें त्यांचिया भाग्य जें जे
अनु भविति असे ते वर्णितों देवराजे ॥६९॥
यांचा न भाग्य - महिमा वदवे असो हा
कीं जो अतर्क्य मज नीरद - नीळ - देहा
आम्हीं शिवादि अकराजण धन्य झालीं
यांच्या अचिंत्य - विभवें हरितेंचि बोलों ॥७०॥
बुध्यादि पात्रें अकरा करुनीं तूझ्या पदां भोज - रसें भरुनी
क्षणक्षणा पान करुं मुकुंदा वर्णू किती या व्रज - भाग्य - वृंदा ॥७१॥
व्रजजन अकराही पाद - पद्माऽमृतानें
करिति भरुनि पात्रें जेधवां नित्य पानें
सुरवर अकरा त्या एक एकाचि पात्रें
परम विभव आम्हीं मानिओं संगमात्रें ॥७२॥
बुद्धयादिकी करुनियां व्रज - लोक - वासी
सप्रेम जे भजति चिंतिति माधवासी
बुद्ध्यादि देव अकरा कृतकृत्य तेथें
आम्हीं शिवादिक असेरिति भाव येथें ॥७३॥
व्रजास या रक्षक कृष्ण जेव्हां काळादिकांचें भय काय तेव्हां
हा बुद्धिचा निश्वय त्यांस जेथें ब्रम्हा तिचें दैवत धन्य तेथें ॥७४॥
माझा हरी आणिक मी हरीचा अहंपणीं हे व्रज - लोक वाचा
तेथें महारुद्र कृतार्थ होतो श्रीकृष्ण भाग्यें गिरिजा पती तो ॥७५॥
कामादि संकल्पहि जे मनाचे श्रीकृष्णरुपी व्रजिंच्या जनाचे
तद्वेवता चंद्र कृतार्थ तेथें संकल्प होती हरिरुप जेथें ॥७६॥
येती मुकुंद - चरितें व्रज - लोक - कानीं
दिग्देवता पिति सुधा श्रवणाऽभिमानी
त्वग्देवता पवन ही कृतकृत्य तेव्हां
स्पर्श रमापति - शरीर तयासि जेव्हां ॥७७॥
डोळे भरुनि हरिला जन हे पहाती
तेव्हां दिवाकर सुधाब्धिंत मग्न होती
श्री - बाळकृष्ण - मुख - चुंबन - लाळ - पानें
जिव्हेमधें वरुण धन्य तया रसानें ॥७८॥
जो स्वा भाविक दिव्य गंध हरिचा घेतां सुवासा तया
प्राणीं अश्विनिचे कुमार पदवी घ्राणेंद्रियांची जयां
ते तेथें कृतकृत्य आणि हरिच्या लीळा जयांच्या मुखीं
वाचा - दैवत अग्नि कृष्ण चरितें नामामृतें तो सुखी ॥७९॥
सलगि करुनि लागे चक्रपाणीस पाणी
विभव तदभिमानी मानितां वज्रपाणी
हरि - चरण पहाया चालती लोक जेव्हां
जन - चरण - युगाचा देव तो तुष्ट तेव्हां ॥८०॥
चरण - देव उपेंद्र जरी हरी तरि तयास असे गणना सुरीं
अदितिच्या सुत वामन यागुणें चरण - दैवत वामन आपणें ॥८१॥
सकळ सद्गति ज्या करितां जसी चरणिंची गति त्याकरितां तसी
म्हणउनि गतिदायक जो हरी चरणिं गति त्याकरितां तसी
म्हणउनी गतिदायक जो हरी चरणिं राहुनियां गतिही करी ॥८२॥
इतर - इंद्रिय - देवगण व्रजीं विभव मानिति जेविं तसें निजी
निजचि वैभव वामन मानितां चरण - देव उपेंद्र हरीच तो ॥८३॥
व्रज - जन - विभवातें वर्णितां वामनाचें
व्रजचि त्दृदय झालें भाग्य हें वाडवनाचें
व्रजजनचरणांचा देव तो वामनात्मा
म्हणउनि अणु त्याचा वर्णिला भाग्य वर्त्मा ॥८४॥
उपेंद्र जो वामन शेषशायी तो देव देव व्रज लोक - पायीं
तत्पाद धूळी निज - नाम - धारी जो मी तया अर्पितसे मुरारी ॥८५॥
स्कंधांत एकादश ज्यास संख्या तेथें हरी उद्धव - भक्त - मुख्या
जो बोलिला श्लोक तयास पाहा तो श्लोकही वर्णिल तोचि जो हा ॥८६॥
ज्या भक्ता मजवीण अन्य नलगे निर्वैर शांत स्वयें
जो सर्वत्रहि पाहतो सम मला सर्वात्मता - निश्चयें
त्यामागेंचि सदा अरे फिरतसें त्याच्या पदाच्या धुळी
मी आंगें धरितों पवित्र करितों लोकांस भूमंडळी ॥८७॥
येथें माधव उद्धवास वदला कीं मी अरे आपणा
त्याच्या पादरजें पवित्र करितों या उद्धवाला खुणा
त्याच्या ठाउक कीं पवित्र करणें ज्याला तदात्माचि हा
या भावें वदतो रजांस धरितो सद्भक्त भक्ति - स्पृहा ॥८८॥
आतां पावन भक्त - पाय - धुळीनें सर्वास जेव्हां करी
कां पापी अपवित्र लोक दिसती बोलाल ऐसें जरीं
होतें ठाउक हें रहस्य इतुक्यां जे शुद्धि हे प्रार्थिती
कीं भक्तांऽध्रि - रजें पवित्र करुनी तारी तयां श्रीपती ॥८९॥
ज्याला ठाउक अन्नसत्रचि नसे जो अन्न मागेचिना
सत्रीं भोजन लभ्य होइल वदा कोणेरिती त्याजना
ज्याला ठाउक हें रहस्यचि नसे प्रार्थी न या श्रुद्धिसी
त्यांला श्रुद्धि न त्यारजें हरि हरी शंका मनाची असी ॥९०॥

N/A

References : N/A
Last Updated : July 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP