कथाकल्पतरू - स्तबक ३ - अध्याय २

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥श्रीगणेशाय नम: ॥

मग ह्नणे जन्मेजयो ॥ वैशंपायना तूं मतींचा डोहो ॥ तरी मनींचा एक संदेहो ॥ फेडीं माझा ॥ १ ॥

सर्वगुणी शीलशांत ॥ दाता दयाळु आणि विरक्त ॥ येकपत्नी व्रती पितॄभक्त ॥ न देखों कोणी ॥ २ ॥

तंव ह्नणे मुनेश्र्वर ॥ ऐसा एक असे श्रीरामचंद्र ॥ रायादशरथाचा कुमर ॥ सूर्यवंशी जो ॥ ३ ॥

नव्हतीं राम आणि सीता ॥ तैं वाल्मिकें कथिलें अनांगता ॥ शतकोटी केलें गा भारता ॥ रामायणा ॥ ४ ॥

तंव ह्नणे पारिक्षीती ॥ एवढी तया कैंची शक्ती ॥ आणि बीजें विण उत्पत्ती ॥ न देखो आह्मी ॥ ५ ॥

तया कोण जाहलें प्रसन्न ॥ जें हदयीं सूदलें ज्ञान ॥ हें सांग पां मूळ अवसान ॥ रामकथेचें ॥ ६ ॥

मग मुनी ह्नणे गा भारता ॥ पॄथ्वी पाहिली म्यां भ्रमतां ॥ परि तुजसारिखा श्रोता ॥ न देखें मी ॥ ७ ॥

राया तुझेयि शीलसंगतीं ॥ मजही जोडली हरिभक्ती ॥ व्यजंन वारितां भूपती प्रती ॥ निविजे आपण ॥ ८ ॥

हर्षे ह्नाणे वैशंपायन ॥ राया तूं महा विचक्षण ॥ तरी पुसिले पुसीचा प्रश्न ॥ ऐकें आतां ॥ ९ ॥

कोणे एके सुदिनीं ॥ ब्रह्मा निमग्न होता ध्यानीं ॥ तवं राम देखिला लोचनीं ॥ हदयामाजी ॥ १० ॥

मग तें पुढील अनागत ॥ आत्मारामें दाविलें संमत ॥ तें ब्रह्याने लिहिले समस्त ॥ श्र्लोकीं एके ॥ ११ ॥

॥ श्र्लोक: ॥

आदौ रामतपोवनाधिगमनं हत्वा मॄग कांचनं ॥ वैदेहीहरणं जटायुमरणं जटायुमरणं सुग्नीवसंभाषणं ॥

वालीनिर्दलनं समुद्रतरणं लंकापुरीदाहनं पश्वाद्रावणकुंभकर्णहननं एतद्धी रामायण ॥ १ ॥

मग तो श्र्लोक कौतुकीं ॥ नारदा सांगे चतुर्मुखी ॥ तवं नारदे केलें शतश्र्लोकी ॥ रामायण ॥ १२ ॥

तेंचि आदिमूळावसान ॥ नारदें रचिलें काव्यरत्न ॥ मग सुखी होवोनि आपण ॥ आला शरयूतीरासी ॥ १३ ॥

तेथे वाल्मीक कविराज ॥ सर्वे शिष्य भारद्वाज ॥ तयां भेटला आत्मज ॥ ब्रह्मयाचा ॥ १४ ॥

परस्परें जाहला आदर ॥ क्षेम देवोनि पूजिला सादर ॥ मग पुसता जाहला विचार ॥ वाल्मीक तो ॥ १५ ॥

ह्नाणे ब्रह्मानंदना विचारितों एक ॥ सर्वगुणी पुण्यश्र्लोक ॥ ऐसा महाक्षेत्री धर्मपाळक ॥ कोण असेल पै ॥ १६ ॥

तंव नारदें शतश्र्लोकस्थितीं ॥ वर्णिला तो दाशरथी ॥ जानकीरमण अयोध्यापती ॥ श्रीरामरावो ॥ १७ ॥

तो सर्वज्ञ समरधीर ॥ कॄपावंत आणि गंभीर ॥ वाचशील कीं उदार ॥ रघुनंदन ॥ १८ ॥

तो एकपत्नी नेमस्थ ॥ एकचि बोले वचन सत्य ॥ एकबाणही कदा व्यर्थ ॥ न वंचे ज्याचा ॥ १९ ॥

भक्तजनासि अभयंकर ॥ शरणागतां वज्रपंजर ॥ सर्वव्यापक असोनि साकार ॥ श्रीरामरावो ॥ २० ॥

तो सदैव आणि सूर्यवंशी ॥ परपीडनी अस्पर्शी ॥ रुपें आगळा मन्यथासी ॥ श्रीरामरावो ॥ २१ ॥

तो काळकामासि अजित ॥ विधिमार्गे नीतिवंत ॥ उदार आणि पितॄभक्त ॥ जानकीरमण ॥ २२ ॥

ऐसें पुढील अनागत ॥ आदिअवसान समस्त ॥ वाल्मिका सांगोनि पुरुषार्थ ॥ गेला नारद तो ॥ २३ ॥

मग वाल्मीक आणि भारद्वाज ॥ तिसरा सुमंतु महाद्विज ॥ तिघे आले तेज:पुंज ॥ शरयूस्त्राना ॥ २४ ॥

ॠषींही सारिले स्नानतर्पण ॥ न्यासमंत्रें देवतार्चन ॥ मग येते जाहले मुनिजन ॥ मंदिरासी ॥ २५ ॥

दुष्टीं पाहती वनस्थळी ॥ पत्रीं पुष्पीं दाटली सकळीं ॥ तवं दोन देखिले डाहाळीं ॥ पक्षी सुलक्षण ॥ २६ ॥

एक त्र्कौंच दुजी त्र्कौंची ॥ स्त्रीपुरुषे महाप्रीतीचीं ॥ परि त्र्कौंचा पाडिला पाशीं ॥ निषादें एके ॥ २७ ॥

मग त्या पतीचिया व्यथें ॥ विलाप मांडला पक्षिकांते ॥ तें वॄत्त सांगता शिळेतें ॥ फुटेल फुटी ॥ २८ ॥

राया ऐकूनि तिचा शोक ॥ दु:खी जाहला मनीं वाल्मीक ॥ ह्नाणे पक्षी कां वधिला निरर्थक ॥ व्याधा तुवां ॥ २९ ॥

अघोमुख हाती धरोनि चरण ॥ घेवोनि निघाला पारधी आपण ॥ तवं शाप बोले त्र्कोघें करुन ॥ वाल्मीक त्यासी ॥ ३० ॥

श्र्लोक: ॥

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम:शाश्वती: समा: ॥ यतत्र्कौंचमिथुनादेकमवधी: काममोहितं ॥ १ ॥

टीका ॥

अरे निर्दया व्याधा पापिष्ठा ॥ रौरव भोगिसी महानष्टा ॥ शतवर्षीत ही प्रतिष्ठा ॥ न व्हावी तुज ॥ ३१ ॥

मग ॠषि आला निजभुवनी ॥ घ्यानस्थ बैसला वॄंदावनी ॥ परि तो शोक आठवला मनी ॥ पक्षियांचा ॥ ३२ ॥

उदकें परिमाजीं लोचनी ॥ तवं ब्रह्मा देखिला नयनीं ॥ हाती देवोनि लेखणी । सांगे रामायण ॥ ३४ ॥

ऐसा जाणोनि साक्षात्कार ॥ सुखी जाहला ॠषेश्वर ॥ ह्नणोनि उघडिले जंव नेत्र ॥ तंव देखे ब्रह्मदेवो ॥ ३५ ॥

वर देत चतुर्मुख ॥ तूं घ्यानी देखत होतासि जो शोक ॥ तोचि होईल गा श्लोक ॥ रामकथेचा ॥ ३६ ॥

त्या श्रीरामाचे दिव्य गुण ॥ नारदें केले तुज कथन ॥ त्यांचे शतकोटी रामायण ॥ करिशील तूं ॥ ३७ ॥

तुझिया मुखीची निघती उत्तरें ॥ तीं मी करीन साचारें ॥ जैंसे लेपो कीजे सूत्रधारें ॥ सभारंगी ॥ ३८ ॥

ह्नणोनि त्या रामाचे चरित्र ॥ तूं बोलसी तेची साचार ॥ आदि अवसान समग्न ॥ कथी वहीले ॥ ३९ ॥

ऐसा विधीन देवोनि वर ॥ मग तो गेला विष्णुपुत्र ॥ तवं घ्यानी बैसला ॠषेश्वर ॥ वाल्मीकमुनी ॥ ४० ॥

चार अक्षरें आठवेळी ॥ निघाली ॠषिमुखकमळी ॥ तो श्लोक लिहिला तात्काळी ॥ भारद्वाजें ॥ ४१ ॥

मुनि घ्यानस्थ बैसला पुढती ॥ तों घ्यानी देखे राम मूर्ती ॥ पठ्ठाभिषेकी असे वर्जीती ॥ कैकेयीस्तव ॥ ४२ ॥

कैकेयीने बोधिला दशरथ ॥ की राज्यी बैसवावा भरत ॥ ह्नणोनि वनवासा रघुनाथ ॥ निघाला देखा ॥ ४३ ॥

मग चित्रकूटपर्वता ॥ प्रजा घेवोनियां समस्ता ॥ रामा न्यावया तो मागुता ॥ आला भरत ॥ ४४ ॥

प्रभु ह्नाणे मातापित्यांचे उत्तर ॥ तें मी नुल्लंवी रतिमात्र ॥ राज्य दीखले समग्र ॥ भरता नुज ॥ ४५ ॥

मग त्या रामाच्या पादुका ॥ भरते नेल्या जी देखा ॥ सिंहासनी ठेवोनि शुश्रुषा ॥ करी भरत तो ॥ ४६ ॥

भरतें सांडिली अयोध्या ॥ नंदिग्रामी वर्ते सर्वदा ॥ इकडे राम आला महा पंथा ॥ अगस्तिआश्रमी ॥ ४७ ॥

मागुती घ्यानी लागे वाल्मीक ॥ तो शरभंगआश्रमी रघुकुळटिळकु ॥ तवं जनमुखी आली ऐकू ॥ वारता दशरथाची ॥ ४८ ॥

तेथें ऊर्ध्वगती केली दशरथा ॥ सवें लक्ष्मण आणि सीता ॥ मग राम आला गा भारता ॥ पंचवटीये ॥ ४९ ॥

तेथे विटंबिली शुर्पनखा ॥ मरीचि आलासे मॄगवेषा ॥ तवं सोता हरिली कपटवेषा ॥ रावणे तेथें ॥ ५० ॥

जटायु मारिला रावणे ॥ असो त्रिकंठ वधिला नारायणे ॥ मग हनुमंतादिक शाहणे ॥ मिळाले सेवक ॥ ५१ ॥

पुढे वधिला तो वाळी ॥ सुग्रीव सदा असे जवळी ॥ आणि लंकेची केली होळी ॥ वानरे येके ॥ ५२ ॥

मग समुद्र बांधिला शिळी ॥ नरवानर आले सुवेळाचळी ॥ तवं अंगद गेला दशमौळी ॥ शिष्टाईसी ॥ ५३ ॥

लंकालाग केला वानरी ॥ राक्षस मारिले महाक्षेत्री ॥ अशुद्धे वोपिली धरित्री ॥ त्यालंकेची ॥ ५४ ॥

इंद्रजीत वधिला सुमित्रासुतें ॥ रावणकुंभकर्ण रघुनाथे ॥ लंका देवोनि शरणागताते ॥ आणिली सीता ॥ ५५ ॥

अमॄतपर्जन्य पाडिला ॥ कपिसमुदाय उठविला ॥ देवांच्या बदिशाळा फोडिल्या ॥ तेतीसकोटी ॥ ५६ ॥

दिव्यी उतरली सीतासती ॥ मग आले अयोध्ये प्रती ॥ परि दवडिली मागुनी ॥ वनवासासी ॥ ५७ ॥

ते वाल्मीकाचे मंदिरी ॥ दोन पुत्र प्रसवली सुंदरी ॥ त्यांची लहुकुश ऐसीं ॠषेश्वरी ॥ ठेविली नामें ॥ ५८ ॥

मग पुत्रासहीत सीता ॥ अयोध्ये आणिली गा भारता ॥ ते समयानुसार आकांता ॥ गेली भूमिमाजी ॥ ५९ ॥

पुढें राम वसिष्ठ आणि काळ ॥ एकांती मांडिला चावळ ॥ आतां सरला जी खेळ ॥ रामराज्याचा ॥ ६० ॥

द्वारी बैसविला लक्षुमण ॥ कोणा येवोनेदी केला पण ॥ तवं तो आला ब्राह्मण ॥ दुर्वासदेवो ॥ ६१ ॥

तो प्रवेशला मंदिरी ॥ तया वारीता शंकला क्षेत्री ॥ ह्नणोनि लक्ष्मण गेला अवधारी ॥ पाताळासी ॥ ६२ ॥

मग सरला एकांत ॥ तो वैकुंठी गेला श्रीरघुनाथ ॥ ऐसे देखतसे घ्यानांत ॥ वाल्मीक तो ॥ ६३ ॥

भारद्वाज ह्नणे ॠषी ॥ हें विस्तारे सांगे पॄथकेशी ॥ जेणे मन होय सुखी ॥ श्रोतयांचे ॥ ६४ ॥

मग ते शतकोटी रामायण ॥ भारद्वाजासि केले कथन ॥ तरि त्याचेनि मुखे ज्ञान ॥ जाहले मज ॥ ६५ ॥

जन्मेजय ह्नणे साचार ॥ भारद्वाजासि कथिले रामचरित्र ॥ ते सांग पा सविस्तर ॥ वैशंपायना ॥ ६६ ॥

मुनि ह्नणे गा भारता ॥ तुज दुर्लक्ष श्रीरामकथा ॥ तरी सावध होई आतां ॥ ऐकावया ॥ ६७ ॥

कोसलदेशीचा राजा अज ॥ त्याचा दशरथ नामे आत्मज ॥ तो अयोध्यापती विराज ॥ चकव्रर्ती ॥ ६८ ॥

तया कोसलदेशाभीतरी ॥ अयोध्या नामें महा नगरी ॥ बारायोजन विस्तारी ॥ फेरु जीचा ॥ ६९ ॥

ते शेषा न वर्णवे मुखें ॥ जाणो पाहुं आला लक्ष्मणवेषें ॥ आणि इच्छा केली श्रीनायकें ॥ पहावयाची ॥ ७० ॥

ते पवित्र देखोनि नगरी ॥ मग वैकुंठा सांडी श्रीहरी ॥ तरी ते वर्णावया वैखरी ॥ पांगुळी माझी ॥ ७१ ॥

सांगू नगरीचा विस्तार ॥ तरि तो रामेविण भयंकर ॥ जैसा पतीविण अलंकार ॥ कामिनीचा ॥ ७२ ॥

ह्नणोनि असो हे फळकट ॥ जेवी शालिग्रामाविण संपुष्ट ॥ की गजें सांडिलें कवीठ ॥ नयनरंघ्रें ॥ ७३ ॥

नातरी वसंते विण कोकीळा ॥ की दानाविण पुण्यकळा ॥ तैसी रामविण रजस्वला ॥ अयोध्या ते ॥ ७४ ॥

मग त्या दशरथाचे प्रधान ॥ त्रयंपंच महा सुजाण ॥ चौदाविद्यामाजी प्रवीण ॥ महाशीळ ते ॥ ७५ ॥

राष्टवर्धन आणि सिद्धार्थ ॥ दॄष्टी विजय आणि जयवंत ॥ धर्मपाळ आणि सुमंत ॥ आठवा अकोप तो ॥ ७६ ॥

आणीक उपप्रधान अनेक ॥ देशोदेर्शीचे मांडलीक ॥ पुढे वोळंगले सेवक ॥ समीप उभे ॥ ७७ ॥

सोळासहस्त्र नॄपवरां ॥ दॄष्टी वोळंगती समोरा ॥ अश्व रथ नर कुंजरा ॥ संख्या नाही ॥ ७८ ॥

ऐसा सकळ प्रधानांसहीत ॥ भद्री बैसला दशरथ ॥ सकळ श्रॄंगारे अलंकॄत ॥ शोभला तो ॥ ७९ ॥

तारागणी जैसा चंद्र ॥ की सरिता माजी समुद्र ॥ तैसा रायां माजी नरेंद्र ॥ दशरथ तो ॥ ८० ॥

हाती घेवोनि दर्पण ॥ राव पाहे न्याहाळुन ॥ तो जरेने इंद्रियगुण ॥ वलीपलित पावले ॥ ८१ ॥

मग मानसी विचारी रावो ॥ करावा आतां राज्यआभावो ॥ चित्तालागी पवित्र ठावो ॥ पाहिजे सत्य ॥ ८२ ॥

भोगिता विषयांची गोडी ॥ जरी गेल्या कल्पकोडी ॥ तरी न पाविजे थडी ॥ संसाराची ॥ ॥ ८३ ॥

ह्नणोनि देहु असतां सावचित्त ॥ प्राणियं आचरावें आत्महित ॥ नातरी पावेल अक्स्मात ॥ जवळी काळ ॥ ८४ ॥

ऐसें विचारोनि मानसी ॥ बोलुं आदरिलें प्रधानासी ॥ ह्नणे तुह्नी माझे हितासी ॥ प्रवर्तावे ॥ ८५ ॥

आतां या राज्याचा भार ॥ कोण चालवील वेव्हार ॥ ऐसा दॄढ करोनि विचार ॥ सांगा तुह्नी ॥ ८६ ॥

ते ह्नणती आपण धर्म केले बहुत ॥ परि ते पुत्रेंविण अनाथ ॥ वय पावलें वलीपलित ॥ जे महा भयंकर ॥ ८७ ॥

तरी पुत्रेष्टीकार्यालागी ॥ ॠषि आणावे होमयागी ॥ आणि आणोनियां श्रॄंगी ॥ मांडावे कार्याते ॥ ८८ ॥

रायास ह्नणती प्रधान ॥ तुज आयुष्य हो परिपूर्ण ॥ प्रजेचे करावे पाळणा ॥ तुवाचि राया ॥ ८९ ॥

ऐसे बोलती मनसंबोखणी ॥ परी ते राजा नेघे कणी ॥ ह्नणे विधिलेख नसतां प्राक्तनी ॥ व्यर्थ होय ॥ ९० ॥

मग रायासि ह्नणे सुमत ॥ माझी ऐकावी येक मात ॥ जे म्यां परीसिले वॄत्त ॥ बद्रिकाश्रमी ॥ ९१ ॥

तेथे परस्परे विचार ॥ करित होते ॠषेश्वर ॥ की राया आठवले उत्तर ॥ आजि त्याचे ॥ ॥ ९३ ॥

त्याचिया मुखीची म्यां कथा ॥ ऐसी ऐकिली नॄपनाथा ॥ ती ऐके राया दशरथ ॥ ह्नणे सुमंत ॥ ९४ ॥

राजॠषी रोमचरण ॥ सूर्यवंशी महाप्रवीण ॥ अंगदेशींचा पंचानन ॥ महाराज तो ॥ ९५ ॥

त्याचे देशी अवर्षण ॥ बारावर्षे नाही जीवन ॥ बहु आटले प्रजाजन ॥ अन्नावाचोनी ॥ ९६ ॥

मग विप्रांस ह्नणे रोमचरण ॥ मज पातक काय कारण ॥ की माझे देशावरी घन ॥ कां रुसला हो ॥ ९७ ॥

तरी काही सांगा उपदेश ॥ जेणे वर्षेल पाउस ॥ तो धर्म आचरता आळस ॥ न करी जाणा ॥ ९८ ॥

मग ह्नणती द्विजवर ॥ एक असे जी उपायांतर ॥ ते होय तरी जलधर ॥ सांडील जीवन ॥ ९९ ॥

तरी कश्यपाचा पुत्र विभांडक ॥ त्याचा पुत्र श्रॄंगी बाळक ॥ तो आणितां सुरेनायक ॥ सांडील उदक ॥ १०० ॥

राया तो हरिणीचे उदरी ॥ जन्मला असे ब्रह्मचारी ॥ पित्यावांचोनि दुर्जे नेत्री ॥ नेणे मनुष्य ॥ १ ॥

त्याचे मुखी होता यागविधान ॥ तेणे होईल जी निविघ्न ॥ मग वषीव करील घन ॥ सत्य राया ॥ ॥ २ ॥

तो आणावा नानाप्रयत्नी ॥ अथवा कन्या दान देवोनी ॥ येथे आणिजे महामुनी ॥ रोमचरणा ॥ ३ ॥

आणि तुझा मित्र दशरथ ॥ तयासि देऊ शकेल सुत ॥ ऐसा तो आहे समर्थ ॥ श्रॄंगीॠषी ॥ ४ ॥

ऐसा विप्री रोमपाद ॥ प्रबोधोनि हरिला खेद ॥ तोचि सुमंत करी अनुवाद ॥ दशरथासी ॥ ५ ॥

ह्नणे बोलिला सनत्कुमार ॥ ते म्या ऐकिले सविस्तर ॥ ॠषि अनुवादले पवित्र ॥ बद्रिकाश्रमी ॥ ६ ॥

तेथे मी होतो सहज ॥ ते ऐकिले पूर्वबीज ॥ हे सुमंत सांगे गुज ॥ दशरथासी ॥ ७ ॥

तरी भेटिजे रोमचरणा ॥ अथवा बांहूनि आणावा भुवना ॥ त्यासी बोलता मनकामना ॥ पूर्ण होईल ॥ ८ ॥

तंव जन्मेजय पुसे मंत्र ॥ हरिणीगर्भ ऋषीश्वर ॥ हा सविस्तर सांगा विचार ॥ वैशंपायना ॥ ९ ॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ विभांडक तापसी ब्राह्मण ॥ ध्यान विसजी तंव मैथुन ॥ देखिले मॄगाचे ॥ ११० ॥

ते देखोनियां मैथुन ॥ रेंत द्रवला ब्राह्मण ॥ दर्भासनी विखुरला कण ॥ तया बीजाचा ॥ ११ ॥

मग स्नानासि उठिला मुनी ॥ ते बीज चाटिले हरिणी ॥ ती पाळिली होती स्थानी ॥ सहज तेणे ॥ १२ ॥

हरिणी होती ॠतुवंत ॥ तयेने चाटिले ब्रह्मरेत ॥ तंव गर्भधारण विपरीत ॥ जाहले राया ॥ १३ ॥

मग जाहलिया पूर्णदिनी ॥ ते प्रसवली हरिणी ॥ तिसी जाहला महामुनी ॥ ॠषिश्रॄंग ॥ १४ ॥

तो सकळविद्यावरिष्ठ ॥ पित्याने केला असे सुभट ॥ गुंरुवाचोनि रानवट ॥ नेणे मनुष्यासी ॥ १५ ॥

आतां असो हे भारता ॥ तुवां पुसिली जन्मकथा ॥ तरी ॠषिश्रॄंगी ऐसिये अवस्थां ॥ जन्मला तो ॥ १६ ॥

तंव ह्नणे पारिक्षिती ॥ वैशंपायना तूं ज्ञानमूर्ती ॥ आतां वाल्मीकाची उत्पती ॥ सांगे मज ॥ १७ ॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ कोणी एक व्याघ दुर्जन ॥ अंत्यजाती महा हीन ॥ निषाद तो ॥ १८ ॥

पशु पक्षी आणि ब्राह्मण ॥ तयां वधितां न शंके मन ॥ येणे उद्योगें मेळवी अन्न ॥ कुटुंबासी ॥ १९ ॥

मग कोणेएके स्थानी ॥ बकदाल्म्य बैसले अनुष्ठानी ॥ तंव बाण लाविला गुणी ॥ निषादे तेणे ॥ १२० ॥

जंव करावे संघान ॥ तंव मुनी बोले आपण ॥ माझे ऐकावे गा वचन ॥ धनुर्धरा ॥ २१ ॥

शालिग्राम आणि नरवंटी ॥ तिसरी कौपीन लंगोटी ॥ मज वधिल्या शेवटी ॥ हेचि साध्य ॥ २२ ॥

कण केणे आणि पुस्तक ॥ पशु वस्त्रे धातु कनक ॥ हे हरी तो भोगी नरक ॥ सहस्त्रवरुर्षे ॥ २३ ॥

आणि जो करी जीवहींसा ॥ तो अनंतसंख्या गर्भवासा ॥ बहुयोनीस प्रपंच्या ॥ नि: शेषां करी तॄप्ती ॥ ॥ २४ ॥

मग तो भोगी नानानरक ॥ असिपत्र आणि कुंभीपाक ॥ परि योगविधानिया दोष देख ॥ योजिले नाही ॥ २५ ॥

आतां तूं जा घराप्रती ॥ आपुली प्रार्थी पुत्र युवंती ॥ अर्ध पातक घेतील हाती ॥ तरी ये वहीला ॥ २६ ॥

तूं जंव फिरोनि येथ येसी ॥ तंव मी न जाई परियेसी ॥ ते वाक्य मानवले तयासी ॥ सद्रुरुचें ॥ २७ ॥

मग तो येवोनि निषादु ॥ स्त्रियेसी करी अनुवादु ॥ की जो कथिला संवादु ॥ बकदात्म्यें ॥ २८ ॥

तंव स्त्री ह्नणे रे चांडाळा ॥ हे तूं बोलू नको कुटिळा ॥ आपुला कापोनि मांसगोळा ॥ घाली मज ॥ २९ ॥

माझे येवढे हे शरीर ॥ तुज भोगास दीघले पात्र ॥ तरि पुण्यावाचोनि इतर ॥ नेघे रे मी ॥ १३० ॥

पुत्रकन्यादिकां पुसिले ॥ तिही ऐसेचि सांगितले ॥ तेव्हा तापे मन तापले ॥ त्या निषादाचें ॥ ३१ ॥

आपुलिया विषयांचे चाडे ॥ रचिजेले प्रपंच येवढे ॥ शेवटी अधपाता पडे ॥ मग काढी कवण ॥ ३२ ॥

पुत्र कलंत्र धन संपती ॥ रात्रदिवस वाहे चिती ॥ पापपुण्याची निर्गती ॥ नाठवी मनी ॥ ३३ ॥

दंभ प्रपंचाचे वोझे ॥ माथा घेवोनि नाचे भोजे ॥ ऐसे श्रमे व्यर्थ काजे ॥ आपुले निज नाठवी ॥ ॥ ३४ ॥

स्त्रीपुत्रांची संगती ॥ वाढवीत स्नेहज्योती ॥ तेणे मंद होय दीप्ती ॥ ज्ञानप्रकाशाची ॥ ३५ ॥

माता ह्नणे रे डिंगरा ॥ तूं जाई भलत्या डोंगरा ॥ मेळवोनि आणी चारा ॥ आह्मां पोष्यवर्गासी ॥ ३६ ॥

जे सुष्ट दुष्ट आचरण ॥ ते तुझे तुजचि बंधन ॥ आह्नांसि नाही कारण ॥ सांगावयाचे ॥ ३७ ॥

स्त्रियेवरी संतापोनि कोळी ॥ आला मुनिरायाजवळी ॥ सर्व सांगितली बोली ॥ स्त्रीपुत्रांची ॥ ३८ ॥

सांगे स्त्रियेचा अनुवाद ॥ ज्यांचे त्यास भोगणे निर्बंध ॥ निमित्तावांचोनि संबंध ॥ नाही दुजयासी ॥ ३९ ॥

तरी ऐसा करा जी उपदेश ॥ जेणे तुटे गर्भवास ॥ मी होईन सेवादास ॥ तुमचा स्वामी ॥ १४० ॥

ऐशिया शरणागता जाणोनी ॥ कॄपेने द्रवला तो मुनी ॥ प्रबोधिला उपदेशवचनी ॥ गुरुवर्याने ॥ ४१ ॥

मस्तकी ठेविला श्रीकर ॥ कानी फुंकिला बीजमंत्र ॥ ह्णाणे मी स्त्रान करी तंववरी स्थीर ॥ होइंजे येथे ॥ ४२ ॥

तेणे केले श्रीगुरुचे घ्यान ॥ आणि बीजमंत्राचे उच्चारण ॥ ऐसा घालोनि आसन ॥ राहिला तेथे ॥ ४३ ॥

भोवते करोनि आलंवाल ॥ उपरी रचिले वारुळ ॥ मध्ये राहिला निश्वळ ॥ महायोगे ॥ ४४ ॥

ऐशा संवत्सरी साठी ॥ तेथे आली ॠषींची घरटी ॥ तंव एकाएकी पडिले दॄष्टी ॥ वारुळ त्यांचे ॥ ४५ ॥

मनी आठवला पूर्वील व्याध ॥ की ज्यासी केला म्यां प्रबोध ॥ तंव श्रवणी पडिला शब्द ॥ भूगभीचा ॥ ४६ ॥

मग मिळोनि समस्ती ॥ मॄत्तिका वारिली हाती ॥ तंव देखिला दिव्यकांती ॥ निषाद तो ॥ ४७ ॥

जैसी अळिका होय भिगुंरटी ॥ की कनक उतरे अग्निपुटी ॥ तैसा जाहला वषीसाठी ॥ धनुर्धर तो ॥ ४८ ॥

मग तया करोनि अभिषेक ॥ कथिला गायत्रीवेबचौक ॥ आणि नाम ठेविले वाल्मीक ॥ वारुळास्तव ॥ ४९ ॥

आतां असो हे पुढती ॥ तुवां पुसिले गा भुपती ॥ तरी वाल्मीकाची उत्पत्ती ॥ ऐसी जाण ॥ १५० ॥

पुढे आणिजेल श्रॄंगॠषी ॥ दशरथ करील यागासी ॥ ते कथा ऐका मानसी ॥ ह्नणे कॄष्णयाज्ञवल्की ॥ १५१ ॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ तॄतीयस्तबक मनोहरु ॥ वाल्मीकउत्पतीप्रकारु ॥ द्वितीयोऽध्यार्थी कथियेला ॥ १५२ ॥

श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥ ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP