वत्सलाहरण - कीर्तन पूर्वरंग निरुपणम

कीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.


श्रीमन्महागणाधिपतये नमः ॥

स जयति सिंदुरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणं ॥

वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानाम् ॥१॥

इत्यादि नमनम् ॥

पद-

मना कृष्णपदीं स्थिर राहीं ॥ कृष्णप० ॥ध्रु०॥

स्थिरचर गोचर अगोचर सर्वही ॥

एकचि व्यापक पाहीं ॥ मना कृष्णपदीं० ॥१॥

शांति दया क्षमा अवलंबुनी ॥

दुष्टवचनातें साहीं । मना कृष्णपदीं० ॥२॥

दास कृष्णाचा विनवित साचा । सद्‌गुरु आज्ञा वाही ॥मना कृष्ण० ॥३॥

भजन-

जय गुरु नारायण हरी ।

अभंगं-

देव वसे ज्याचे चित्तीं ॥ त्यासी घडावी संगती ॥१॥

हेंचि आवडतें मना । देवा पुरवांवी वासना ॥२॥

होवो संतजना भेटी । न हो अंगसंगतुटी ॥३॥

तुका म्हणे जिणें । भलें संतसंघटणें ॥४॥२॥

आदौ कीर्तनारंभीं सत्पुरुषांची वाणी तुकोबा महाराज भगवत्पदीं प्राप्त झाले असतां एका समयीं पांडुरंग सुप्रसन्न होत्साते तुकोबाप्रत म्हणतात कीं, बा तुकारामा, संपूर्ण भक्त मजपाशीं वरदान मागतात, परंतु त्वाम कधींही कांहीं मागितलें नाहींस, यास्तव तूं काहीं तरी मागावें आणि मी द्यावें असा माझा हेतु आहे. तो त्वां पूर्ण करावा. तुकोबा म्हणतात हे देवाधिदेवा, आपण या भरीस पडूं नये. मी मागण्यासारिखा आपल्याजवळ पदार्थच नाहीं. अष्टसिद्धि, नवनिधि, चार मुक्ति एवढेंच तुझें भांडवल, यांतून मला कशाचेंच कारण नाहीं. फार काय सांगावें, तुझेंहि कारण मजला नाहीं. मला जें पाहिजे, तें तुजपाशीं नाही. देव म्हणतात, असें दुर्लभ काय ? तें मागितलेंच पाहिजे. तुकोबा म्हणतात, देवा तुझा आग्रहच आहे तर मागतों तें दे.

अभंग-

देव वसे ज्याचे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥१॥

हेंचि आवडतें मना । देवा पुरवावी वासना ॥२॥

याप्रकारें वक्‍त्याचें भाषण ऐकून श्रोते म्हणतींल कीं, तुकोबास मागण्याचें ज्ञान नाहीं. प्रत्यक्ष देवास म्हणतात कीं तुझें कारण नाहीं. देवा तूं ज्याच्या चित्तीं वसत असशील त्याची संगती घडावी, तुझ्याही संगतींचे कारण नाहीं. साधूंची संगती तरी भगवत्प्राप्तीस्तव मागावयाची, त्यापेक्षां देवाची संगती कां मागितली नाहीं ? देवापेक्षां साधू काय अधिक आहेत ? तस्मात् तुकोबाला मागण्याचें ज्ञान नाहीं. चातुर्य नाहीं तर मागणें व्यर्थ होतें. याजवर गोष्ट-कोणी गृहस्थानें देवास प्रसन्न करुन तीन वर मागून घेतले आणि घरीं आला, तो दरिद्री असून त्याची स्त्रि कुरुप होती; यास्तव एका वरेंकरुन रंभेसमान स्त्री व्हावी असें मागतांच तात्काळ तीच स्त्री अति लावण्यरुप यौवनवती झाली. तिच्या रुपाचें तेज झोंपडींत मावेना अशी ती अनुपम्य स्त्री राजाचे दृष्टीस पडली. त्यानें तत्काळ बलात्कारानें तीस घरीं नेऊन खोलींत ठेविली. हें वर्तमान त्या गृहस्थास कळतांच दुसरा वर खर्चून म्हणतो देवा, माझी स्त्री सुंदर झाली आहे ती अस्वल होऊं दे. असें मागतांच ती अस्वल झाली. उपरांत राजा खोलींत त्या स्त्रीकडे म्हणून गेला तों तेथें स्त्री नसून अस्वलीनें त्यास फाडफाडून घेतलें. राजा शंखध्वनी करुं लागला; तेव्हां सेवक धांवत येऊन अस्वलीस पिटून काढली. ती त्या गृहस्थाचे घरांत येऊन शिरली; तेव्हां बायकोही नाहीं आणि अस्वल पीडा करुं लागली. तेव्हां तो गृहस्थ तिसरा वर खर्चून म्हणतो देवा, माझी स्त्री होती तशीच पहिल्या प्रमाणें होऊं दे. असें म्हणतांच पूर्ववत् झाली. एतावता तिन्ही वरदानें अज्ञानपणें व्यर्थ झालीं. तसें तुकोबास मागण्याचें ज्ञान नाहीं, म्हणून देवाची संगती न मागतां साधूंचीच संगती मागितली. अशी शंका कोणी घेईल तर ती व्यर्थ आहे. देवापेक्षां साधू वरिष्ठ होत यांत संशय कशास पाहिजे ? यदर्थीं भागवतकार म्हणतात.

श्लोक-

भजंति ये यथा देवान् देवा अपि तथैक तान्‌ ।

छायेव कर्मसचिवाः साधवो दीनवत्सलाः ॥३॥

अर्थ-

जशी मनुष्याची छाया बसलें असतां बसते, व उठलें असतां उठते, तद्वत्‌ देव जितकें कर्म करावें तितकेंच फल देतात; आणि साधु कसे आहेत, तर दीनवत्सल; कोणाचें कांहींच न घेतां क्षणांत रंकाचा राव करितात. आणि देव कसा आहे ’नादत्तमुपतिष्ठति’ घेतल्यावांचून देत नाहीं. भगवंताचेंच वाक्य असें आहे. गीतेंत श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात

श्लोक-

ये यथा मां प्रपद्यंते तांस्तथैव भजाम्यहं ॥

मम वार्त्मानुवर्तंते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥४॥

जे मजप्रत जसे भजतात त्या प्रकारेंच मीही त्यांस भजतों म्हणजे मानितों. असा देवाचे जवळ द्वैतभाव; आणि साधु कसे आहेत.

श्‍लोक-

समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः ॥

शीतोष्णसुखदुःखेषु समः संगविवर्जितः ॥५॥

अर्थ-

जे निःसंग शीत, उष्ण, सुख, दुःख, मान अपमान समान मानणारे, तसेंच शत्रु आणि मित्र दोहीचे ठायीं समान पाहणारे, निर्द्वंद्व, निष्कपट होत. देवाचे ठायीं द्वंद्व आणि कापटय वसतें. याविषयीं गोष्ट-- राजा दुर्योधनानें एका समयीं साध्वी गांधारी माता तिजप्रत आपली काया अमर होण्याचें साधन विचारलें. तेव्हां तिनें सांगितलें कीं याविषयींची युक्ति किंवा साधन राजा युधिष्ठिर सांगेल तें सत्य मानून त्याचप्रमाणें कर म्हणजे कार्य होईल. अशी आज्ञा ऐकून दुर्योधन धर्मराजाकडे जाऊन काया अमर होण्याचें साधन विचारता झाला. तेव्हां अजातशत्रु धर्मेराजा, हा आपला शत्रू आहे, असें मनांतही न आणतां त्यास सांगता झाला कीं, माता गांधारी महा पतिव्रता आहे. पति अंध यास्तव तिनें सदोदित आपले नेत्रांस पट बांधिले आहेत, ते मुक्त करुन तुझी नग्न काया अवलोकन करील तर तात्काळ तनु अमर होईल. या प्रकारें दुर्योधनानें ऐकून विषाद न मानतां तो घरीं आला आणि त्यानें गांधारीस वृत्तांत सांगितला. तिनें त्याप्रमाणें मान्य करुन तिसरे प्रहरीं त्यास माडीवर येण्यास सांगितलें. त्याप्रमाणें त्या समयीं दुर्योधन, सेवक दूर करुन एकटाच नग्न होत्साता जिनातून माडीवर जात असतां अंतर्साक्षी श्रीकृष्ण घाबरे होऊन म्हणतात कीं, राजा धर्मानें घात केला ! हा दुष्ट अमर झाला असतां आपलें अवतारकृत्यही राहील, असें मनांत आणून हातीं फुलांचा चोळणा घेऊन जिन्यांतच प्रगट होऊन खालीं उतरत येत आहेत असें दाखविलें. तों मध्यंतरीं दुर्योधनाची गांठ पडली. कृष्ण म्हणतात दुर्योधना, हें काय ? भांग तर खाल्ली नाहींस ना ? नग्न कोठें जातोस ? तेव्हां त्यास सत्य सांगणें प्राप्त झालें. कृष्ण म्हणतात तूं परम चतुर आणि दक्ष पतिव्रता, तिजपुढें तूं नागवा धटिंगण उभा राहशील तर पाविव्रत्यतेजानें सहजीं तात्काळ भस्म होशील. अमर काया कशाची होणार ? हें कृत्य तुजला कोणी दुष्टानें सांगितलें असेल तें असो. (जसें कांहीं देवास माहीतच नाहीं.) दुर्योधन म्हणतो देवा, असें करण्याविषयीं धर्मानें सांगितलें. तें अप्रमाण नाहीं. कृष्ण म्हणतात, आतां तर तुला खचितच मूर्ख म्हणण्यास शंका नाहीं. त्याचें नांव धर्म या नांवासच नमस्कार असो. कृत्य नांवासारखेंच समजूं नको. तो मोठा आंतले गांठीचा कपटी असून तुझा प्रत्यक्ष शत्रु की रे ? अनायासें तुझा निःपात व्हावा, अशी त्यानें युक्ति केली यांत संशय नाहीं. प्रत्यक्ष माता आणि पतिव्रता, तिजपुढें नग्न उभें राहणें ! तिचा क्षोभ कसा होणार नाहीं ? हें तूंच मनांत पहा. आह्मास पंडूचे पुत्र आणि धृतराष्ट्राचे पुत्र सारखेच यास्तव तुझा घात न व्हावा असें वाटतें ह्मणून त्वां माघारें फिरावें हें चांगलें. इतक्यावर तुझा नष्टकाळच आला असल्यास उपाय नाहीं असें ऐकून त्याचे चित्तास व्याक्षेप झाला; परंतु गांधारीची आज्ञा होती यास्तव देवाचें वचन साशंकित भासून मागें न फिरतां पुढेंच चालला. तेव्हां कृष्ण म्हणतात तुला ऐकणेंच नसेल तर इतकें तरी कर, हा फुलांचा चोळणा घालून अवयव झांकून जावें. तें त्यानें मान्य करुन फुलांचा चोळणा ढुंगणास गुंडाळून मातेपुढें जाऊन उभा राहिला. तेव्हा तिनें नेत्रपट उघडून नखशिखांत अवलोकन करुन सांगितलें कीं, पुष्पांचे जागेशिवाय संपूर्ण काया अमर झाली. फुलांचें स्थान मृत्यूचें राहिलें. तुजला मार्गांत कोणी बुद्धिवाद सांगितला. हें बहुधा कृष्णावांचून झालें नसावें. अरे देव महाकपटी आहे. धर्मराजा अजातशत्रु महान् साधु होय. तो शत्रु आणि मित्र समान मानणारा, सत्यवादी होय. भक्तांचा प्रतिपाल आणि दुर्जनांचा संहार करावा असा देवाचे ठायीं द्वैतभाव, म्हणून देवाची संगती न मागतां तुकोबांनीं हेंच मागितलें;

अभंग-

देव वसे ज्याचे चित्तीं ॥ त्याची घडावी संगती ॥

देवापेक्षां संतसमागम विशेष होय. देवांत एकेक गुण असतो.

श्लोक-

गंगा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरुस्तथा

पापं तापं च दैन्यं च हंति साधुसमागमः ॥६॥

अर्थ-

गंगा पापातें दूर करते चंद्र जो तो तापातें नाशितो,

कल्पतरु दैन्य हरण करतो; आणि पाप, ताप, दैन्य या तिहीचें शमन साधुसमागमानें होतें.

अभंग-

पाप ताप दैन्य जाय उठाउठीं ॥

जाहलिया भेटी हरिदासाची ॥१॥

ऐसें बळ नाहीं आणिकांचे अंगीं ॥

तप तीर्थ जगीं दान व्रत ॥२॥

साधूवांचून इतर देव कालेंकरुन सायासानें फळ देतात. पंत म्हणतात,

आर्या-

देती फल बहु दिवसां देव शिला काष्ठ मृन्मय प्रणतां ॥

जलमय तीर्थेहि तशीं संतचि फलती नमोस्तु ते म्हणतां ॥७॥

भागवत्कारही असेंच म्हणतात.

श्‍लोक-

न ह्यम्मयानि तीर्थानि न देवा मृच्छिलामयाः ॥

ते पुनंत्युरुकालेन दर्शनादेव साधवः ॥८॥

साधु दर्शनमात्रेंच पुनीत करितात. त्या प्रकारें ’अम्मयानि नहि’ तीर्थादि जलमय देवता पुनीत करीत नाहींत. तसेंच काष्ठ पाषाण मृत्तिकादि देव पुनीत करीत नाहींत. मुळींच नाहीं, असें नव्हे, बहुत दिवसांनीं पुनीत करितात आणि साधु दर्शनमात्रेंकरुन तात्काळ पुनीत करितात. संतमहिमा काय सांगावा ?

पद-

संत दयाळु कसे राजा रंक जयां सरिसे ॥हो राजा० ॥ध्रु०॥

देऊनि भेटी निरसिती माया ॥ नेउनि बसविती निजपद ठायां ॥संत० ॥१॥

श्रवणीं पाजिती अमृतवाणी ॥ नयनीं दाविती चिन्मयखाणी ॥संत द० ॥२॥९॥

देवांस देण्यास जें दुर्लभ अवघड तें साधु देतात. याविषयीं गोष्ट--कोणेका राजास पुत्रसंतान नव्हतें, त्यानें तपस्या करुन महाविष्णु प्रसन्न करुन पुत्र मागितला. देवानें सांगितलें कीं, तुझ्या प्रारब्धीं पुत्रसंतान नाहीं. त्यावरुन राजा परम सखेद होऊन राज्य सोडून वनवास घेता झाला, आणि पाहतो तों राजा सेवा करीत आहे त्यास प्रसन्न होऊन साधु म्हणतात, तुजला पांच पुत्र व एक कन्या होईल. त्वां आपले स्थळास जावें. राजा आनंद पावून घरीं आला. वरदानाप्रमाणें पांच पुत्र आणि एक कन्या झाली. त्या राजाचे घरीं एका समयी नारद आले, त्यास राजानें सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून नारद तात्काल वैकुंठास येऊन विष्णुस म्हणतो देवा तूंही मनुष्यासारकहच असत्य बोलणारा आहेस, असें खचित कळून आलें. कोसल देशींच्या राजाच्या प्राक्तनीं पुत्रसंतान नाहीं असें त्वां सांगितलें असून सांप्रत त्यास पांच पुत्र झाले आहेत, असा तूं असत्यवादी आहेस. हे पुत्र जाखाईनें जोखाईनें दिले काय, तुजवांचून देणारा अन्य श्रेष्ठ कोण आहे ? भगवान् विष्णु म्हणतात, कोणी सत्पुरुषानें दिले असतील तर न कळे. नारद म्हणतात, तुम्हांहून वरिष्ठ असा साधु कोण तो मला दाखवावा. असें ऐकून विष्णु नारदास समागमें घेऊन मृत्युलोकीं ज्या नगरांत तो साधु होता तेथें आले. उपरांत पोट दुखण्याचें मिष करुन विष्णु गडबडां लोळूं लागले. तेव्हां मुनि म्हणतो, देवा सुंठ किंवा डिकेमाली आणून देऊं काय ? विष्णु म्हणतात नारदा, हा परिणामशूल दिसतो. यास एक औषध मिळालें तर आहे. आपलें काळीज कोणी देईल तर हा शूल राहील; नाहीं तर प्राणांत दिसतो. असें ऐकून नारद नगरांत जाऊन लोकांस म्हणतात; माझ्या गुरुजीचें पोट दुखत आहे त्यांस कोणी काळीज देईल तर गुरुचे प्राण वांचून मोठे उपकार होतील. या प्रकारें त्याचें भाषण ऐकून सर्व निर्भत्सना करुन म्हणतात कीं, आपले प्राण देउन तुझे गुरुजीस वांचवावें एवढा परोपकरी कोण आहे ? तुझा गुरुच कां मरेना, अशी निंदा करते झाले. एक पुरुष अत्यंत मरणोन्मुख झाला होता, तोही काळीज न देतां म्हणूं लागला कीं, पळ, घडी आयुष्य असेल तर पाहिजे तें साधन होईल. अशा अलौकिक आयुष्याचा नाश करुन तुला कोण काळीज देतो ? इत्यादि लोकांचें भाषण ऐकून मुनि चिंतातुर होऊन जात असतां रस्त्यांत एक वेडापिसा असा ब्रह्मनिष्ठ साधु ज्यानें राजास पुत्र दिले तो पडला होता. त्याजवळ मुनीनें सहज काळीज मागितलें; तेव्हां तो परोपकारनिरत, त्यास अवश्य असें म्हणून तात्काळ आपले हातें हृदय विदारुन काळीज काढून देता झाला. तें मुनीनें आणून देवाजवळ दिलें. तेव्हां विष्णु म्हणतात. हें काळीज परोपकारास्तव ज्यानें दिलें तो काय देणार नाहीं ? माझें पदही एखाद्यास देईल. तेथें राजास पुत्र देईल यांत संशय कशास पाहिजे ? त्यानेंच पुत्र दिले असें मान. विष्णु म्हणतात नारदा, तुझेजवळ काळीज नव्हतें काय ? पंरतु तुझें धारिष्ट माझे जिवासाठीं झालें नाहीं. असें बोलून त्या साधूजवळ आले. आणि अमृतदृष्टीनें पाहून त्यास सावध केला. तात्पर्य- देवाच्या हातून होणें दुष्कर तें साधु सहज करितात. यास्तव तुकोबाचें मागणें योग्य आहे ॥ देव वसे ज्याचे चित्तीं ॥ त्याची धरावी संगती ॥ सद्भक्त म्हणतात.

पद-

साधुकी संगत पाई हो । ज्याके पुरन कमाई ॥साधु० ॥

साधूकी संगत गुरुजीकी सेवा । बनत बनत बन आईरे ॥ज्या० ॥१॥

शंकराचार्य म्हणतात-सत्संगतीनें साधक जीवन्मुक्त होतो.

श्‍लोक-

चर्पतपंजरी-सत्संगत्वे निःसंगत्वं निःसंगत्वे निर्मोहत्वं ।

निर्मोहत्वे निश्चलतत्वं निश्चलतत्त्वे जीवन्मुक्तः ।

मज गोविंदं भज गोविंदं भज गोपालं मूढमते ।

प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुकृञ् करणे ॥भज गो० ॥१०॥

सत्संगाचे योगानें सहजीं क्रमेंकरुन प्राणी जीवन्मुक्त होतो. सुंदरदास साधु म्हणतात-सर्व कांहीं इच्छिलें प्राप्त होईल, परंतु संतसमागम दुर्लभ होय.

इंदवछंद सवाई-

तात मिले पुनी मात मिले सुत भ्रात मिले युक्ती सुखदाई ।

राज मिले गजबाजी मिले सब साज मिले मन बंछित पाई ।

लोक मिले सुरलोक मिले विधिलोक मिले बैकुंठहि जाई ।

सुंदर और मिले सब साजहि संत समागम दुर्लंभ भाई ॥११॥

सर्व कांहीं मिळेल परंतु साधुसमागम मिळणें दुर्लभ. म्हणून निश्चयेंकरुन तुकोबा हेंच मागणें मागतात. देव वसे ज्याचे चित्तीं । त्याची धरावी संगति । मोरोपंत म्हणतात. आर्या-साधुसमागम निववी भवदवतप्ता तसें न अमृतसर । सुख साधुसंगतीचें मोक्षसुखाचाहि पाडितें विसर ॥१२॥

भव एतल्लक्षण दव म्हणजे दावानल त्यानें तप्त झालेल्या पुरुषास साधुसमागम जसा निववितो त्याप्रकारें त्या पुरुषास अमृताचें सरोवरही निववीत नाहीं. साधुसंगतीचें सुख जें आहे तें मोक्षाच्या सुखाचाही विसर पाडतें. म्हणजे मोक्षसुखाहूनही सत्संगाचें सुख विशेष आहे. सत्समागमाचें माहात्म्य मुक्तेश्वर सांगतात.

ओंवी-

सप्त पाउलें सत्संगती ॥ चालतां अनुग्रह सहजस्थिती ।

सप्तजन्मांचीं सुनिश्चिती । परिहरती दुष्ट कर्में ॥१३॥

कवि म्हणतात.

श्लोक-

सत्संगाद्भवति हि साधुता खलानां, साधूनां न च खलसंगमात्खलत्वं ।

आमोदं कुसुमभवं मृदेव धत्ते, मृद्गंधं नहि कुसुमानि धारयंति ॥१४॥

सत्समागमानें खलातें साधुत्व प्राप्त होतें, परंतु खलाचे समागमेंकरुन साधूतें खलत्व येत नाहीं. यास दृष्टांत--जसें सुवासिक पुष्प मृत्तिकेवर पडलें असतां पुष्पाचा आमोद मृत्तिकेस लागतो, परंतु मृत्तिकेचा गंध पुष्पातें लागत नाहीं. यास्तव अखंड सत्समागमच घडावा, म्हणून तुकोबा म्हणतात. देव वसे ज्याचे चित्तीं । त्याची घडावी संगती । जसा चांगला वाईट समागम घडेल तसे गुणदोष लाभतात. पशुपक्ष्यादिकांसही तसें घडतें, मग मनुष्यास तर सहज लागतील. यावर गोष्ट. कोणी गृहस्थानें उत्तम प्रकारचे सुंदर आणि सुलक्षण असे दोन राघू आणून राजास नजर केले. उपरांत राजानें त्यांतून एक राघू पुराणिकबावा यांचे स्वाधीन केला. आणि दुसरा फकिराचे स्वाधीन केला. उभयतांनीं आपापले घरीं नेऊन त्यांस उत्तम प्रकारें चारा घालून पिंजर्‍यांत ठेवून चांगले बोलके केले. पुराणीकबावांकडील राघू विनययुक्त अशी गीर्वाण वाणी शिकला. तेथें शास्त्री, पंडित, विद्वज्जनांचीं सयुक्तिक भाषणें श्रवणांत आलीं, त्याप्रमाणें तोही बोलूं लागला. फकिराकडील राघूनें यवानी उद्धट भाषणें श्रवण केलीं. तींच तोही बोलूं लागला. एके समयीं राजास स्मरण झाल्यावरुन राघू कसे बोलके झाले आहेत, तें पाहण्याकरितां सडी स्वारी एकटीच निघून प्रथम फकिराकडे आली. त्या समयीं फकीर भिक्षा मागण्यास गेला असून दरग्यांत राघूशिवाय कोणी नव्हतें. राजा दरग्यांत शिरण्याबरोबर राघू म्हणतो, अरे बहांचोद, कौन अद्मी अंदर चला है. असें ऐकून राजा क्रोधाविष्ट होत्साता माघारा फिरुन पुराणीकबावांचे घरीं गेला, तों पुराणीकबावा भोजन करुन वामकुक्षीस्तव अंतर्गृहांत जाऊन निजले होते. ओसरीवर पिंजर्‍यांत राघू मात्र होता. तेथें राजा येतांच तो राघू म्हणतो, महाराज, आगंतव्यं, यावें, यावें, आसनावर लोडाशीं बसावें. पुराणीकबावा निद्रिस्थ आहेत. उदक पाहिजे तर आणवितों, क्षणभर बसावें. लौकरच यजमान उठतील, सत्वर कारन असल्यास त्यांस हांक मारितों. इत्यादि नम्रतेचीं आदरपूर्वक गोड भाषणें ऐकून राजास मोठा आनंद झाला. उपरांत तसाच घरीं येऊन कचेरींत बसला आणि दोन्ही राघू तेथें आणवून प्रधानास म्हणतो कीं, पुराणीकबावांकडील राघू परम चतुर आहे. त्यानें माझा आदरसत्कार चांगला केला. आणि फकिराकडील राघू महा नष्ट आहे. यानें मला शिव्या देऊन अपमानिलें. यास्तव या फकीराकडील राघूचा शिरच्छेद करावा. या प्रकारें राजाचें भाषण ऐकून पुराणिकाकडील राघू म्हणतो, महाराज, आपण सत्यवादी, न्यायेंकरुन वर्तणारे, कृपायुक्त आहां, यास्तव माझें भाषण श्रवण करावें.

श्लोक-

गवाशनानां स शृणोति वाक्यमहंहि राजन् विदुषां वचांसि ॥

न तस्य दोषो न च मुद्गुणो वा संसर्गजा दोषगुणा भवंति ॥१५॥

राघू म्हणतो, राजारे, त्या राघूचा दोष किंवा माझा गुण यांत कांहीं नाहीं. समागमाचें फळ आहे. तो राघू यवनाचे शब्द ऐकून तसेंच बोलणें शिकला. त्याजला नीचाचा समागम घडला आणि मी विद्वज्जनांचे समागमास असल्यामुळें त्यांचीं चातुर्याची विनययुक्त भाषणें श्रवण केलीं, तीं मी शिकता झालों. जसा समागम तसे गुणदोष लागतात. यास्तव त्या राघूचा अपराध नाहीं, म्हणून त्याचा वध करणें योग्य नव्हे. या प्रकारें त्याचें वचन ऐकून तें सत्य मानून राजा आनंद पावला.

तात्पर्य, दुष्टाचे संगानें दोष घडतात आणि सत्संगानें मोक्षादि सुख प्राप्त होतें. मोरोपंत म्हणतात, देवा हेंच वरदान द्यावें. कोणतें तर. केकावलि---सुसंगति सदा घडो सुजनवाक्य कानीं पडो । कलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो । त्वदंघ्रिकमलीं दडो मुरडितां हटानें अडो । वियोग घडतां रडो मन भवच्चरित्रीं जडो ॥१६॥ संगती करणें तर साधूचीच करावी.

श्लोक-

संगः सर्वात्मना त्याज्यः स चेत्यक्तुं न शक्यते ॥

स च सत्सु विधातव्यः संतः संगस्य भेषजं ॥१७॥

’निश्चयेंकरुन सर्व संगाचा त्याग करावा’ असें करण्यास शक्य न होईल तर संग करणेंच तर सत्संग करावा. मानपुरी साधु म्हणतात.

पद-

संगत साधनसों करिये ।

कपटी लोकनसों डरिये ।संगत० ॥ध्रु०॥

क्या नफा दुर्जनके संगत ।

दुसरें दुर रहिये । संगत० ॥१॥

मानपुरी प्रभू अंतर निर्मल ।

श्रवण मननसों धरिये । संगत० ॥२॥१८॥

दुर्जनाचे संगतीनें नफा न होतां यशाची हानी आणि दुःख प्राप्त होतें. पहा त्या शकुनी दुर्बुद्धीचे संगतीनें दुर्योधन राजास मोठें अपयश प्राप्त झालें, एतद्विषयीं कविजन कथा निरुपण करितात.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP