झिम्म्याची गाणी - संग्रह १

श्रावणात माहेरी आल्यावर माहेरवाशीण झिम्मा घालताना ही गाणी म्हणतात.


झिम्म्याची गाणी

१.

रुणझूण पाखरा जा माझ्या माहिरा ।हू हू॥

तिथ घराचा दरवाजा । चंदनी लाकडाचा

पेशवाई थाटाचा ।त्यावरी बैस जा ॥हू हू॥

माझ्या माहिरा अंगणी ।बघ फुलली निंबोणी

गोडी दारात पुरवणी ।त्यावरी बैस जा ।हू हू॥

माझ्या माहिरीचा ।त्यावरी बैस जा।हू हू॥

माझ्या माहिरीचा ।झोपाळा आल्याड बांधियला

फुलांनी गुंफियला ।त्यावरी बैस जा ।हू हू॥

माझ्या माहिरी मायबाई ।डोळे लावुनी वाट पाही

तिला खुशाली सांगाया जा ।माझ्या माहिरी पाखरा जा ।हू हू॥

२.

कारल्याच बी पेर ग सुने, मग जा आपुल्या माहेरा

कारल्याच बी पेरल सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा

कारल्याच वेल येऊ दे सुने मग जा आपुल्या माहेरा

कारल्याचा वेल आला सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा

कारल्याला कारल येऊ दे सुने मग जा आपुल्या माहेरा

कारल्याला कारल आल सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा

कारल्याची भाजी चीर ग सुने मग जा आपुल्या माहेरा

कारल्याची भाजी चिरली सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा

कारल्याची भाजी केली सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा

कारल्याची भाजी खा ग सुने मग जा आपुल्या माहेरा

कारल्याची भाजी खाल्ली सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा

कारल्याच उष्ट काढ ग सुने मग जा आपुल्या माहेरा

कारल्याची उष्ट काढल सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा

३.

आरीखाली पारी, पारीखाली मळा

असा भाऊ भोळा, भोळा

बायका केल्या सोळा

केल्या तर केल्या पळू पळू गेल्या

पळता पळता मोडला काटा

शंभर रुपयाचा आला तोटा

शंभर रुपये ट्रंकेत ग ट्रंकेत ग

आमच्या फुगडया रंगात ग रंगात ग

पळीबाई पळी पितळेची पळी

माझ्यासंग फुगडी खेळती सोन्याची कळी

आमच्या फुगडया नेटाच्या नेटाच्या

चोळ्या शिवू या बेताच्या बेताच्या

हंडयावर हंडा हंडयावर गंडा

गंडयावर मोर माझ्यासंग फुगडी खेळते चंद्राची कोर

भाजी हाटता हटेना हटेना

म्हातार्‍या माणसाला नटवेना

४.

नदीकिनारी बंगला ग

पाणी झुळ झुळ जाय

माशान मारला डंका ग

पाणी झुळ झुळ जाय

पाटलाची लेक गेली पाण्याला

तिथ फुलली जाय

नेसली पैठण शालू ग पोरी हसतील काय

मुखात रंगला विडा ग पोरी बघतील काय

बसायला बग्गी घोडा ग पोरी बसतील काय

अंगात गजनी चोळी ग पोरी घालतील काय....

५.

तुपातल कारल अजिरल ग सई गोजिरल ग

कुण्या सुगरणीन रांदलय ग सई रांदलय ग

लीला सुगरणीन रांदलय ग सई रांदलय ग

लीलाचा पती रुसलाय ग सई रुसलाय ग

खुंटीवरचा शालू वार्‍यान गेला

समजाव सई समजाव ग

आपल्या पतीला समजाव सई समजाव ग

६.

वेळू बाई वेळू कुपाकनी वेळू

गौर गेली सासरी आता काय खेळू ?

सोंडी बाई सोंडी माजघराची सोंडी

गौर गेली सासरी जागा झाली भोंडी

७.

कारलीच बी पेर ग सूनबाई

मग जा आपल्या माहेरा माहेरा

कारल्याच बी पेरल हो सासूबाई

आता तरी धाडाना, धाडाना

कारल्याला पाणी घाल ग सूनबाई

मग जा आपल्या माहेरा, माहेरा

कारल्याला पाणी घातल हो सासूबाई

आता तरी धाडाना, धाडाना

कारल्याला बूड येऊ देग सूनबाई

मग जा आपल्या माहेरा, माहेरा

कारल्याला बूड आल हो सासूबाई

आता तरी धाडाना, धाडाना

कारल्याला मांडव घाल ग सूनबाई

मग जा आपल्या माहेरा, माहेरा

कारल्याला मांडव घातला हो सासूबाई

आता तरी धाडाना, धाडाना

कारल्याला फूल येऊ दे ग सूनबाई

मग जा आपल्या माहेरा, माहेरा

कारल्याला फूल आल हो सासूबाई

आता तरी धाडाना, धाडाना

कारल्याला कारल लागू दे ग सूनबाई

मग जा आपल्या माहेरा, माहेरा

कारल्याला कारल लागल हो सासूबाई

आता तरी धाडाना, धाडाना

कारल्याची भाजी कर ग सूनबाई

मग जा आपल्या माहेरा, माहेरा

कारल्याची भाजी केली हो सासूबाई

आता तरी धाडाना, धाडाना

कारल्याची भाजी खा ग सूनबाई

मग जा आपल्या माहेरा, माहेरा

कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई

आता तरी धाडाना, धाडाना

भाजीचा गंज घास ग सूनबाई

मग जा आपल्या माहेरा, माहेरा

भाजीचा गंज घासला हो सासूबाई

आता तरी धाडाना, धाडाना

सासूबाई सासूबाई आता तरी धाडाना

मला काय पुसते पूस जा आपल्या सासर्‍याला

मांमाजी मांमाजी आता तरी धाडाना, धाडाना

मला काय पुसतेस पूस जा आपल्या दिराला

भाऊजी भाऊजी आता तरी धाडाना, धाडाना

मला काय पुसतेस पूस जा आपल्या जावेला

जाऊबाई जाऊबाई आता तरी धाडाना, धाडाना

मला काय पुसतेस पूस जा आपल्या नंणदेला

वन्स वन्स आता तरी धाडाना, धाडाना

मला काय पुसतेस पूस जा आपल्या पतीला

पतिराज पतिराज आता तरी धाडाना, धाडाना

घेतळी चोळी लावली पाठी जाऊन बसली नदीच्या काठी

८.

चाफा बाई चाफा तेलंगी चाफा

जाईच लुगड वालाची चोळी

कांकण पोळी पुरणाची

हाती वाटी तुपाची, तुपाची

गडू बाई गडू, तांब्याचा गडू

गडूत होता पैसा

पैशाची घेतली जुडी

जुडी बाई जुडी, सांबाराची जुडी

माहेरचा डोंगा पाहून घेतली उडी

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-11T21:00:52.1470000