पद ११ वें
मी सद्गुरुची दासी । झालें उदासी ॥धृ०
बाई मी सांडिला कामधंदा । निशिदिनि लागल्यें त्या छंदा ॥
जन करिती माझी निंदा । झालें पिसी । मी सद्गुरु० ॥१॥
सांडिली लौकिकाची चाड । मन झाले माझे वेडें ॥
कोणी न बोलती धड । आसपासी । मी सद्गुरु० ॥२॥
सोडिलें प्रपंचासी प्राणी आतां माझे नाहीं कोणी ॥
मी एक समर्थ केला धनी । जिवाची नाशी । मी स० ॥३॥
आता कोणी काही बोला । माथा मोकळा मी केला ।
विठ्ठलनाथ नाहीं भ्याला । धरिला कांसी । मी सद्गुरु० ॥४॥

पद १२ वें
मी सद्गुरुची चेली । झाल्यें मतवाली ॥धृ०
गुरुने धरिला माझा हात । नेलें महाकारण वनांत ॥
दाखविली आत्मज्योत । गुरुची किल्ली । मी स० ॥१॥
चौशून्याचे शेजेवरी । सच्चिदानंद निद्रा करी ।
लागली उन्मनी खेचरी । वासना मेली । मी स० ॥२॥
प्रकाश पडलासे घनदाट । अवघा दिसतो लखलखाट ।
वाद्यें वाजती अचाट । पडली भूळी । मी स० ॥३॥
झाला स्वरुपाचा निर्धार । प्रकाशामध्यें मी झाल्यें गार ॥
विठ्ठलनाथ गुरुपदीं स्थीर । बुडी दीधली ॥
मी सद्गुरुची चेली । झाल्यें मतवाली ॥४॥

पद १३ वे
मी सद्गुरुची वेडी । नव्हे घडफाडी ॥धृ०
सुटली प्रपंचाची आस । भेदभानचि उरलें नसे ।
लागले स्वरुपाचे पिसे । टाकिला पदर मोकळे केस ॥
झालें मी उघडी । मी सद्गुरुची वेडी ॥१॥
झाला कर्माचा मातेरा । टाकुनी दिधले भ्रतारा ॥
आग लागली संसारा । सोडुनि दिधले पांच पोरां ॥
केली घरबुडी । मी सद्गुरुची वेडी ॥२॥
उदास झालें बाई मोकळी । आता मला कोण आकळी ॥
तुटली कर्माची सांखळी । हिंडू लागली आळोआळी ॥
झाल्ये जगझोडी । मी सद्गुरुची वेडी ॥३॥
आता कैंचे घरदार । नाही मीपणाचा भार ॥
रुप भरले चराचर । विठ्ठलनाथ गुरुपदीं स्थिर ।
दिधली बुडी । मी सद्गुरुची वेडी ॥४॥

पद १४ वें
मी सद्गुरुची बेटी । सावध मोठी । धृ० ।
चार सहा अठराजणी आणिक बारा सोळाजणी ।
कितीक फिरती रानोरानी । गीरीकपाटीं । मी सद्गुरुची बेटी ॥१॥
बहुती केला माझा लाग । परि मज घडला नाहीं संग ॥
तेथून झाल्यें मी नि:संग । मोठी हट्टी । मी सद्गुरुची बेटी ॥२॥
बाई मी झाल्यें कर्णकुमारी । बाप माझा ब्रह्मचारी ॥
मायबापाची प्यारी नाम सत्रावी सुंदरी । त्रिगुणपोटीं । मी सद्गुरुची बेटी ॥३॥
बाई माझें राहणें एकांत । निर्गुण पुरुष माझा कांत । न कळे माझा कोणा अंत ॥
ध्यानी भरला विठ्ठलनाथ । शामपोटी । मी सद्गुरुची बेटी ॥४॥

पद १५ वें
एक गाय चुकली तान्ही । वरल्या रानीं ॥धृ०
गायीचा गोर्‍हा मनपवन । चार चरत असे अस्मान ॥
वरच्यावरच पिई पाणी । तो अस्मान । एक गाय चुकली ॥१॥
नागिण पद्मीण गायीची वेणी । कपाळी चंद्रसूर्य दोन्ही ।
माळा घातल्या संतांनी । त्या योग्यांनी । एक गाय चुक. ॥२॥
गाय शंभूच्या शिखरीं । तीन ताल शिंगावरी ।
लिंगे फुटली शरीरीं । गाईलागोनी । एक गाय चुकली तान्ही ॥३॥
नाथ म्हणे अहो गावन । एवढी गाय द्यावी सांगून ।
मग करा तुम्ही गायन । सभारंगणी । एक गाय चुकली ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP