अंत्येष्टिसंस्कार - प्रस्तावना

हिंदू धर्मामध्ये जन्मापासून अंतापर्यंत, सोळा संस्कार सांगितले आहेत; त्यांतील, हा शेवटचा संस्कार.


अंत्यसंस्कार ! सोळावा संस्कार ! हिंदू धर्मामध्ये जन्मापासून अंतापर्यंत, सोळा संस्कार सांगितले आहेत; त्यांतील, हा शेवटचा संस्कार. त्यांतील, तेरा संस्कारांचा, सध्या लोप झाला असून, व्रतबंध, विवाह व अंत्येष्टि, हे तीन संस्कार, सध्या अस्तित्वात आहेत. परंतु, सदर संस्काराचे पौरोहित्य करणारे ब्राह्मण, सध्या दुर्मिळ झाले आहेत. व्रतबंध व विवाह, आगाऊ ठरवून होत असल्यामुळे, लांबून का होईना, त्याकरिता ब्राह्मण आणता येतो. परंतु अंत्यसंस्कार केव्हा करण्याची वेळ येईल, ते सांगता येत नाही. मोठ्या शहरातून, अंत्यसंस्कार करणारे काही ठरलेले ब्राह्मण आहेत. परंतु, खेड्यात गावच्या पुरोहितालाच, हा संस्कार करावा लागतो. मी एका गावातला वृत्तिवंत पुरोहित आहे. परंतु, या विषयातला विद्वान नाही व शालेय शिक्षणही चौथीपुढे झालेले नाही. पूर्वी विद्वान् ब्राह्मण पुष्कळ होते; त्या वेळी अडचण नव्हती. परंतु, आता कोणीच नसल्यामुळे, माझ्यापुढे मोठीच अडचण उभी राहिली व मनात विचार आला, की, अंत्येष्टीची साग्र पोथी तयार करावी. जुन्या हस्तलिखित पोथ्या पाहिल्या. परंतु, त्या पोथ्यांवरुन, सामान्य माणसाला, चालविता येणार नाही याची खात्री झाली. कारण त्या त्रोटक लिहिलेल्या असतात. ब्रह्मकर्म, नारायणभट्टी यातही त्रोटकच लिहिले असून, तेही संस्कृतमध्ये. त्यामुळे त्याचाही काही उपयोग नाही. याकरिता, मराठीमध्ये, साग्र अंत्येष्टि-संस्कार लिहावा असे ठरविले व ब्रह्मकर्म, नारायणभट्टी यांचा अभ्यास करुन व काही हस्तलिखित पोथ्या पाहून, लिहावयास सुरुवात केली. परंतु संस्कृतच्या सखोल ज्ञानाअभावी अडचणी आल्या. परंतु, त्यातूनही मार्ग काढून, हस्तलिखित एक वर्षात पुरे केले व माझे मित्र, श्री. केशवराव जोशी यांना दाखविले. तेव्हा ते म्हणाले की, ही अडचण सर्वच खेडेगावात आहे, करिता, आपण प्रसिध्द करु. पहिल्याने मी, आपणाकरताच हस्तलिखित केले होते. परंतु त्यांनी प्रसिध्द करावयाचे ठरविल्यामुळे सर्वसामान्य माणसालाही, प्रयोग चालविता यावा, याकरता, त्यात आणखी सुधारणा करुन, नवीन प्रत तयार केली.
सर्वसामान्य माणसाला याचा उपयोग व्हावा हा हेतू असल्यामुळे ‘करिष्ये’ असे ज्या ठिकाणी आले त्या ठिकाणी, कंसात, ‘उदक सोडावे,’, वेलेपनार्थे चंदनं आले त्या ठिकाणी कंसात गंध लावावे, ‘क्षण: क्रियतां’ आले त्या ठिकाणी दर्भ द्यावा; असे लिहिले आहे. इतके लिहावयास नको होते. त्यामुळे पुस्तकाची पाने निष्कारण वाढली, असे काही लोकांना वाटेल. परंतु हल्लीच्या काळात, आचमन कसे करवे ? आचमन म्हणजे काय ? हे सुध्दा पुष्कळ लोकांना समजत नाही. त्यांनी काय करावे याचा विचार करुन, कृती लांबलचक लिहिली आहे. पाथेय श्राध्दाचे वेळी मात्र, सपिंडीमधील संदर्भ दिले आहेत. तसेच, निधन शांतीचे वेळी संदर्भ दिले आहेत. नाही तर सबंध पुण्याहवाचन व सर्व सूक्ते लिहावयास पाहिजे होती. परंतु, त्यामुळे पृष्ठसंख्या फारच वाढली असती. पाथेय श्राध्दाचे संदर्भ देताना, पृष्ठ क्रमांक दिले आहेत. सर्वसामान्य माणसाला चालविता यावे, हा मुख्य हेतू असल्यामुळे, इतके, तपशीलवार लिहावे लागले. परंतु, इतके सोपे, तपशीलवार लिहिले, तरीसुध्दा, सर्वसामान्य ज्ञानाची आवश्यकता आहेच. आयत्या वेळी पुस्तक घेऊन चालविता येणार नाही. दहा, पंधरा वेळ मननपूर्वक वाचून व वेदमंत्रांची संथा घेऊन, तयारी केल्यासच, व्यवस्थित चालविता येईल. अजिबात काही न करण्यापेक्षा, या पुस्तकावरुन वेळ निभावून नेता येईल, असे मला वाटते. या पुस्तकामध्ये, नित्य लागणारे विषयच दिले आलेत. वृषोत्सर्ग, ब्रह्मचारी मरण विधी, सूतिका मरणविधी, रजस्वला मरण विधी, पालाशविधी, वगैरे प्रासंगिक विधी दिले नाहीत. ते ब्रह्मकर्म नारायणभट्टी वगैरे मधून, प्रसंग पडल्यास घ्यावे. आमच्याकडे, प्रेत स्मशानात नेण्यापूर्वी, पाथेय श्राध्द करण्याची पध्दत आहे. नारायणभट्टीमध्ये अस्थीसंचयन झाल्यानंतर करावे, असे सांगितले आहे. तरी ते प्रथेप्रमाणे करावे. तसेच नग्नप्रच्छादन श्राध्द, पहिल्या दिवशी करावे, असे सांगितले आहे. परंतु, प्रथा दहावे दिवशीचा, अवयव पिंड दिल्यानंतर करण्याची आहे. करिता, दहावे दिवशी लिहिले आहे, परंतु, गावचे प्रथेप्रमाणे करावे.
हल्ली सर्वसाधारणपणे, कोणीही, पहिल्या दिवसापासून, क्रियाविधी करीत नाहीत. सात, नऊ, दहा दिवसांपासून करतात. मी सर्वसामान्य नवव्या दिवशी सुरवात करावयाची या हिशेबाने, अवयव पिंड व विषम श्राध्दे एकत्र संकल्प करुन, सहतंत्रेण लिहिली आहेत. पाचवे किंवा सातवे दिवसापासून करावयाची असल्यास, त्याप्रमाणे संकल्पात फरक करुन करावीत.
दशदाने, गोप्रदाने, उपदाने वगैरे प्रत्यक्ष वसू देऊन, हल्ली कोणी करीत नाहीत व करणेही शक्य आहे. करिता सर्व संकल्प, द्रव्यद्वारा करण्याचे, लिहिले आहेत. रुद्रगण, वसुगण श्राध्दे, अकरा व आठ चट मांडण्याऐवजी, एकच चट मांडून करावी, असे लिहिले आहे. शेवटी, रोजच्या कृत्याला लागणारी सामानाची यादी दिली आहे, त्याप्रमाणे, तयारी करुन घ्यावी.
मृत मनुष्य विधुर अगर विधवा असेल, तर पहिले स्थंडीलकरण करुन गृह्याग्नि सिध्द करण्याची जरुरी नाही. त्याचप्रमाणे, प्रायश्चित्ताची उदके सोडण्याची आवश्यकता नाही. एकदम फलप्राप्त्यर्थ-गोत्रस्य-प्रेतस्य प्रेतत्व विमोक्षार्थ और्ध्वदेहिकं करिष्ये इथपासून सुरुवात करावी. परिशिष्ट एकमध्ये, पंचकादि दाहविधी, त्रिपादविधी, त्रिपुष्करविधी दिले आहेत. परिशिष्ट दोनमध्ये मुलाचे व भावाचे वेळी करावयाचा फरक, सुनेच्या व बायकोच्या वेळी करावयाचा फरक दिला आहे. त्याप्रमाणे उच्चार करावा. परिशिष्ट तीनमध्ये लागणार्‍या सामानाची यादी दिली आहे. त्याप्रमाणे सामान तयार करुन घ्यावे व सुरुवात करावी.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP