मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय १८ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय १८ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
श्रीकृष्णराया चक्रवर्ती ॥ तुज नमो जी पुढतांपुढती ॥ संसारी श्रमल्या विश्रांती ॥ कृपामूर्ति तूं देसी ॥१॥
तुझे कृपेचा अगाध महिमा ॥ मुख न बोलावे पुरुषोत्तमा ॥ कुब्जेची कुरुप प्रतिमा ॥ रमातुल्य त्वां केली ॥२॥
गौळियांची मुलें अज्ञान ॥ सर्वदा करिती गुराखीपणा ॥ त्यांसी सनकादिकां
समान ॥ करिसी सन्मान आवडीं ॥३॥
सुधा अर्पिती विबुध तूतें ॥ तिचा स्पर्श न करिसी जिव्हेतें ॥ गौळणींच्या तक्रें तृप्तीतें ॥ पावसी तूं जगदात्मा ॥४॥
अमृतापरीसी तक्राची गोडी ॥ मानिशी भक्तीन आवडी ॥ कौरवांचीं मिष्टान्नें परवडी ॥ तुच्छ मानिसी श्रीकृष्णा ॥५॥
विदुराच्या घरींची कांजी ॥ तीसवें खासी शिळी भाजी ॥ म्हणसी पोट भरले आजी ॥ येवढी श्रध्दा तुजपासी ॥६॥
सुदाम्याचे पोहे मूठभरी ॥ फाके मारिसी मुरारीं ॥ द्रौपदीनें शाकपत्रं ठेवितां करीं ॥ घालों म्हणसी मुखानें ॥७॥
ऐसिया तुज भक्तप्रेमळा ॥ शरण आलों जी गोपाळा ॥ तैसाचि माझा पाळणे लळा ॥ संसार करी पायांपासी ॥८॥
तुझे पाय चंद्र पूर्ण ॥ तेथें मन माझें चकोर होऊन ॥ लुब्ध असो जी निशिदिन ॥ हेचि इच्छा मानसीं ॥९॥
तुम्हा म्हणवितों गोविंदा ॥ नको लाऊं दुजियाच्या संबंधा ॥ हाचि शुध्द भाव माझा ॥ राहो मुकुंदा तुजपासी ॥१०॥
बहुत जन्मांतरी श्रीहरी ॥ कष्ट भोगिलें संसारीं ॥ तयाचा परिहार करी ॥ शरण मुरारी तुज आलों ॥११॥
ऐसी विनंती देवासी ॥ करुन आरंभिलें प्रसंगासी ॥ पुढील कथाभिप्रायासी ॥ श्रोते ऐका सादर ॥१२॥
मागील अध्यायीं निरुपण ॥ महीभट्टें पुसिले चारी प्रश्न ॥ त्यांत एका प्रश्नाचें विवरण ॥ करिता जाहला जगदीश ॥१३॥
मही भट्टाचा पहिला प्रश्न ॥ किती देवांचा विस्तार गहन ॥ त्यांत कर्मभूमिकेपासून ॥ स्वर्गापर्यंत सांगितलें ॥१४॥
तेरा कोटी कर्मभूमीच्या ॥ तेरा कोटी अष्टमंडळीच्या ॥ तेरा कोटी अंतराळींच्या ॥ गणित जाहलें जाणिजे ॥१६॥
कर्मभूमीहून स्वर्गापर्यंत ॥ बाहात्तर कोटी देव समस्त ॥ एवं सांगीतलें तुज गणित ॥१७॥
ऐसें जगदीश्वरांचे वचन ॥ परिसोनि संतोषला ब्राह्मण ॥ मग म्हणे देवालागून ॥ आजि नवल देखिलें ॥१८॥
अवघे देव तेहतीस कोटी ॥ यांची ऐको नित्य रहाटी ॥ तुम्ही सांगितलें बहात्तरकोटी ॥ गणित करुनि स्वामिया ॥१९॥
अहो बाहात्तर कोटी देव ॥ इतुकाच याचा अनुभव ॥ किंवा आणिक असती देव ॥ याहून वरिष्ठ पूढतीं ॥२०॥
याविषयीं माझी आशंका ॥ फेडावी जी त्रैलोक्यनायका ॥ तुजसारिखा आमुतें सखा ॥ जोडिला असे दैवानें ॥२१॥
तूं न येसी ब्रह्मयाचे ध्यानीं ॥ तो म्यां देखिला प्रत्यक्ष नयनीं ॥ एवढी भाग्याची करणी ॥ जे शिवादिकां दुर्लभ ॥२२॥
परिसोनि भट्टाची वाणी ॥ जगदीश बोले आल्हादवचनीं ॥ म्हणे तुज आशंका जे मनीं ॥ ते परिहरु साक्षेपें ॥२३॥
स्वर्गलोकाभीतरीं ॥ सांगितली इंद्राची विशेष भारी ॥ तयावरी सप्तलोक अवधारीं ॥ तेथील स्वामी चतुरानन ॥२४॥
तो इंद्रापरीस पांचगुण ॥ प्रतापी अधिक दैवसंपन्न ॥ तीन कोटी देवांचें सैन्य ॥ त्याच सेवेस तिष्ठती ॥२५॥
सत्यवादी क्रियाशीळ ॥ स्वधर्मनिष्ठ प्रांजळ ॥ असत्यभाषणाचा मळ ॥ सत्यलोकीं असेना ॥२६॥
स्वर्गलोकांभीतरीं ॥ इंद्राची चाले सत्ता भारी ॥ परी सप्तलोकांमाझारी ॥ कोणी त्यासी पुसेना ॥२७॥
उत्पात होतां इंद्रासी ॥ शरण जावें ब्रह्मयासी ॥ म्हणून स्वामित्व विधीसी ॥ असे इंद्रादिकांचें ॥२८॥
इंद्रापरीस ब्रह्मा थोर ॥ सत्यलोक तो ईश्वर ॥ पांचाठायीं सविस्तर ॥ सत्ता चाले तयाची ॥२९॥
कर्मभूमीच्या अष्टदेवकोनीं ॥ अंतराळीं आणि स्वर्गभुवनीं ॥ सत्यलोक आदिकरुनि ॥ इतुकें सामर्थ्य विधीचें ॥३०॥
म्हणोनि तो सत्यलोकनाथ ॥ ब्रह्मा होय हा सत्य ॥ तेथील स्थान कोणास प्राप्त ॥ तेंहीं तूंतें सांगतों ॥३१॥
जे पितृआज्ञा नुल्लंघिती ॥ मातृसेवेसी सादर असती ॥ तयांस सत्यलोकीं वस्ती ॥ घडे विश्रांति राहावया ॥३२॥
जे सर्वदा शुचि असती ॥ नित्य नेमें स्वधर्मे वर्तती ॥ तयांस सत्यलोकीं वस्ती ॥ होय प्राप्ति अनायासें ॥३३॥
जे विधिनिषेधातें पाळिती ॥ वेदमर्यादा नुल्लंविती ॥ तयांसी सत्यलोकीं वस्ती ॥ होय निश्चितीं निर्धारें ॥३४॥
जे कर्मनिष्ठेचे ठायीं ॥ कधीं भ्रष्ट जाहले नाहीं ॥ तयांसी सत्यलोकीं पाहा ॥ वस्ती निश्चयें नेमिली ॥३५॥
जया घडे वेदपठण ॥ शास्त्रपुराणी अतिनिपुण ॥ तया सत्यलोकभुवन ॥ होय संपूर्ण नांदावया ॥३६॥
जे महापंडित ज्योतिषी ॥ षट्‍कर्मा नित्य अभ्यासिती ॥ तयांसी सत्यलोकीं वस्ती ॥ नेमिली असे विधीनें ॥३७॥
जे त्रिकाळ गायत्री जपती ॥ स्नानसंध्येंत निपुण असती ॥ सदा सोंवळे सुशीळवृत्ती ॥ तयां प्राप्ति सत्यलोकीं ॥३८॥
जें मस्तकीं कर्वत घेती ॥ द्विशकलें देहाची करिती ॥ प्राण गेलिया सत्य न सोडिती ॥ तयां प्राप्ति सत्यलोकीं ॥३९॥
बहुत करिती तीर्थाटणें ॥ अनेक व्रतांची उपोषणें ॥ हिमाचळीं जाती गळोन ॥ तयां प्राप्ति सत्यलोकीं ॥४०॥
जयां इतुकें सुकृताचें फळ ॥ तयां सत्यलोक प्रांजळ ॥ ब्रह्मयासम सुख सोज्वळ ॥ भोगिती प्रबळ भाग्याचे ॥४१॥
ऐसिया पुण्याचें सुकृत ॥ तयां सत्यलोक प्राप्त ॥ परी मोक्षाचा लेश किंचित ॥ घडे निश्चित त्यांलागीं ॥४२॥
जरी ब्रह्मा ईश्वर असता ॥ तरी तयांस मोक्ष देता ॥ तयाहूनि श्रेष्ठ विष्णु वरता ॥ वैकुंठीचा अधिकारी ॥४३॥
ब्रह्मयास बहुत कचाट ॥ घडलें अनेक दु:खाचें संकट ॥ विष्णूनें निवारिलेंसे प्रगट ॥ म्हणोनि श्रेष्ठ तो सहजची ॥४४॥
सत्यलोकावरुती विशाळ ॥ वैकुंठपुरी महाप्रबळ ॥ तीन कोटी देवता सबळ ॥ विष्णूपासी असती ॥४५॥
तो आपुल्या परिवारेंसी ॥ ईश्वरत्व मिरवी वैकुंठासी ॥ ब्रह्मयापरीस षडगुण त्यासी ॥ सामर्थ्य असे अधिक ॥४६॥
ब्रह्मयास सत्यलोकीं थोरपण ॥ वैकुंठीं तो भृत्यासमान ॥ सर्वदा तो विष्णूसी शरण ॥ अनन्यभावें विधाता ॥४७॥
कर्मभूमीपासूनि वैकुंठपर्यंत ॥ विष्णूचें सामर्थ्य चाले यथार्थ ॥ म्हणोनि ब्रह्मादिक समस्त ॥ सर्वदा वंदिती विष्णूसी ॥४८॥
ब्रह्मादिकांचा स्वामी ॥ होय विष्णू पराक्रमी ॥ यास्तव मनुष्य कर्मभूमीं ॥ उपासिती निजनिष्ठें ॥४९॥
नासिकापासोनि भाळपर्यंत ॥ उभे गंधतिलक लावित ॥ आडवें स्पर्शितां किंचित ॥ प्रायश्चित्त द्यावया ऊठती ॥५०॥
असे जे आग्रहवादि ॥ मध्वाचार्य द्वैतबुध्दी ॥ वैष्णवधर्मीच्या गर्वसंबंधीं ॥ म्हणती श्रेष्ठत्व आमुचें ॥५१॥
करिती शालिग्रामपूजन ॥ तुळसीमाळा घालून ॥ विष्णुसहस्त्रनाम जपून ॥ पिंड देती गयेसी ॥५२॥
तें वैष्णव वैकुंठलोकां ॥ प्राप्त होती द्विजतिलकां ॥ जयां विष्णुभक्तीचा आवांका ॥ प्रेम चढे अंतरीं ॥५३॥
विष्णुवांचून इतर देवांचें ॥ स्वप्नीं नाम न घेतीं वाचें ॥ तया सोहळे वैकुंठपुरीचें ॥ प्राप्त होती साक्षेपें ॥५४॥
करिती एकादशीव्रत ॥ कथाकीर्तनीं उल्लास बहुत ॥ वीणा मृदंग टाळसहित ॥ नाचती गाती आवडीं ॥५५॥
सत्य विष्णु परमेश्वर ॥ ऐसा जयांचा निर्धार ॥ तयां वैकुंठपुर नगर ॥ होय साचारें सुखवस्ती ॥५६॥
करिती विष्णूची भक्ति ॥ तयां वैकुंठलोकप्राप्ती ॥ परी निजमोक्षाची गती ॥ त्यांसी न घडे ब्राह्मणा ॥५७॥
मुळीं विष्णुचि जाईल क्षयाप्रत ॥ मग वैकुंठाचे काय शाश्वत ॥ म्हणोनि मोक्षाचा पदार्थ ॥ केवीं घडे तयांसी ॥५८॥
जरी विष्णु परमात्मा असता ॥ तरी मोक्ष द्यावया समर्थ होता ॥ तयापरीस श्रेष्ठ वरुता ॥ कैलासवासी शंकर ॥५९॥
विष्णूहूनी गुप्तपणें ॥ सामर्थ्य शिवाचें जाणणें ॥ म्हणोन वैकुंठस्थान उणें ॥ कैलासाहूनी जाणिजे ॥६०॥
वैकुंठलोका भीतरीं ॥ चाले विशेषें विष्णूची थोरी ॥ त्याहूनी वरतें कैलासशिखरीं ॥ सत्ता नसे विष्णुची ॥६१॥
यालागीं शिव समर्थ ॥ विष्णु त्याचा मुद्रांकित ॥ तीनकोटी देवांचें कटक ॥ शिवसेवेशी तिष्ठती ॥६२॥
तीन कोटी देवांचे कटक ॥ विष्णुपरीस बळ अधिक ॥ होऊनि शिवाचे सेवक ॥ कैलासीं वास करिताती ॥६३॥
विष्णूशीं साहाठायीं सत्ता ॥ शिवाशीं सप्तपदी स्वामित्वता ॥ यालागीं सुरमाथा ॥ खालाविती शिवापासी ॥६४॥
विष्णुहूनि पराक्रम अधिक ॥ आपणांस म्हणवी पंचसुख ॥ म्हणोनि मानवी जन लोक ॥ भजती त्यासी आवडीं ॥६५॥
नित्य करिती लिंगाचें पूजन ॥ ओं नम: शिवाय मंत्र जपोन ॥ विभूतीचा पट्टा भाळीं वोढून ॥ जंगम लोक भजताती ॥६६॥
रुद्राक्षमाळा मस्तकीं जटा ॥ वाजविती त्रिकाल दीर्घघंटा ॥ नित्यनेमें एकनिष्ठा ॥ नीलकंठा उपासिती ॥६७॥
जे करिती सोमवारव्रत ॥ बेलपत्रांची लाखोली वाहात ॥ शिवरात्रीं हर्षयुक्त ॥ करिती उल्लासें जागरण ॥६८॥
रामेश्वरा कावडी नेती ॥ वाराणसी मृत्यु पावती ॥ तयां कैलासलोकीं वस्ती ॥ होय प्राप्ति अनयासें ॥६९॥
शिव निर्गुण शिव सगुण ॥ शिव ईश्वर असे पूर्ण ॥ ऐसा ज्यांचा निश्चय गहन ॥ तयां वास कैलासीं ॥७०॥
हृदयीं शिवाचें नित्य ध्यान ॥ वाचे शिव शिव नामस्मरण ॥ वारंवार शंखस्फुरण ॥ करितां वास कैलासी ॥७१॥
ऐसे शिवाचे भक्त ॥ तयां कैलासलोक प्राप्त ॥ परी मोक्षाचा एकांत ॥ नव्हे निश्चित त्यांलागीं ॥७२॥
मुळीं शिवचि तमोगुणी ॥ करीत शय्या श्मशानीं ॥ मुख्य स्वरुपालागोनी ॥ निरंतर ध्यात असे ॥७३॥
शिवची परमेश्वर असता ॥ तरी रुंडमाळा कां वागविता ॥ जटा मुगुट कौपीन नेसता ॥ कोण्या अर्थाकारणें ॥७४॥
शिव करी ज्याचें ध्यान ॥ तो शेषशायी नारायण ॥ महाविष्णु पुरातन ॥ क्षीराब्धींचा अधिकारी ॥७५॥
शिव आपुल्या भक्तांसी ॥ कैलास प्राप्त करी निश्चयेंसी ॥ परी महाविष्णूच्या पदासी ॥ द्यावया सामर्थ्य असेना ॥७६॥
जो शिवभजनीं उपासक ॥ तया प्राप्त कैलास लोक ॥ परंतु मोक्षाचें निजसुख ॥ केवीं घडे तयासी ॥७७॥
जेथें शिवासी नाहीं शाश्वत ॥ कैलास तो सहज नाशिवंत ॥ तेथील वस्ती ज्यास प्राप्त ॥ तो निर्मुक्त कशानें ॥७८॥
हेंचि आश्चर्य वाटे ब्राह्मणा ॥ थोर जनांत वाढली भ्रमणा ॥ कैलासी वैकुंठीं मोक्षाची गणना ॥ करी स्वर्गासमवेत ॥७९॥
स्वर्गास गेल्या मोक्ष बोलती ॥ शेखीं त्यासी नाशवंत म्हणती ॥ ऐसी जनासी विपरीत स्थिती ॥ नये निश्चितीं निवडितां ॥८०॥
ब्रह्मादिक हरिहर ॥ ज्या देवाचे आज्ञाधार ॥ तो क्षीराब्धींचा ईश्वर ॥ महाविष्णु जाण पां ॥८१॥
शिवापरीस शतगुण ॥ विशेष प्रतापी नारायण ॥ म्हणोनि शिवादिक शरण ॥ असती महाविष्णूसी ॥८२॥
कैलासपरिस ढिसाळ ॥ विशाळ क्षीराब्धिमंडळ ॥ सवालक्ष कोटी प्रबळ ॥ असती सबळ विष्णुपासी ॥८३॥
सवालक्ष देव ज्याच्या प्रजा ॥ त्यांचा स्वामी विष्णुराजा ॥ ज्याची लागली क्षीराब्धीं ध्वजा ॥ लक्ष्मी भाजा जयाची ॥८४॥
चोज ऐक द्विजवर्या ॥ लक्ष्मी महाविष्णूची भार्या ॥ तेचि वैकुंठविष्णूची जाया ॥ म्हणती हाची नवलाव ॥८५॥
वैकुंठीच्या विष्णूची ॥ कमला वनिता असे त्याची ॥ आणिक क्षीराब्धींच्या विष्णूची ॥ असे लक्ष्मी निजभार्या ॥८६॥
लक्ष्मी कमला एक म्हणती ॥ दोन्ही विष्णु एकच मानिती ॥ ऐसी भ्रांतीची जाती ॥ ऋषिमतें वाढली ॥८७॥
जो शेषशायी नारायण ॥ तो महाविष्णु समर्थ जाण ॥ सर्वांवरिष्ठ लक्ष्मीरमण ॥ क्षीराब्धींचा ईश्वर ॥८८॥
वैकुंठविष्णूची लक्ष्मी भाजा ॥ महाविष्णूची कमलजा ॥ उभयतांत अंतर द्विजा ॥ दिसे पृथ्वीनभाचें ॥८९॥
हें नेणोनिया अज्ञान ॥ एकचि म्हणती मानवी जन ॥ महा ऋषीश्वरांचें ज्ञान ॥ तेंही तेथें गुंडाळलें ॥९०॥
तें मजवांचूनि आणिका ॥ प्रगट नाहीं द्विजतिलका ॥ तुझ्या भाग्याची विशेष रेखा म्हणोनि प्राप्त जाहलासी ॥९१॥
आतां शेषशायी नारायण ॥ तेथें लक्ष्मीचें निवासस्थान ॥ सवालक्ष कोटी देवांचें सैन्य ॥ लक्ष्मी जवळ सदा वसे ॥९२॥
सवालक्ष कोटी देव ॥ मुख्य लक्ष्मीचें वैभव ॥ इतुक्यांचा मिळोन समुदाव ॥ महाविष्णु जवळ असती ॥९३॥
तो महाविष्णू ईश्वर ॥ पराक्रमें अतिदुर्धर ॥ देव दैत्य राक्षसांवर ॥ सत्ता चाले तयाची ॥९४॥
या कर्मभूमीपासून ॥ क्षीराब्धिमंडळ आदिकरुन ॥ इतक्यांत स्वामित्व गहन ॥ चाले महाविष्णूचें ॥९५॥
आतां ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांसी ॥ शूद्रांसमवेत चौंवर्णांसी ॥ याचा परिपाठ वैकुंठकैलासीं ॥ गेल्या मोक्ष बोलती ॥९६॥
जितुका दिसे महाराष्ट्रधर्म ॥ यां हरिहरांपासी प्रेम ॥ वैकुंठींचा विष्णु ब्रह्म ॥ हेचि भावना तयांची ॥९७॥
परी क्षीराब्धीम्चा महाविष्णू ॥ त्याचा नेणती महिमा गहनू ॥ जो पराक्रमी अतिदारुणू ॥ सत्ता सामर्थ्ये आगळा ॥९८॥
सवालक्ष कोटी देवांचा परिवार ॥ ज्याचे सेवे सदा सादर ॥ तो महाविष्णु लक्ष्मीवर ॥ शेषशायी विराज ॥९९॥
तयापासूनि पीर पैगंबर ॥ उतरते जाहले महीवर ॥ तेथूनि यवनयातीचा विस्तार ॥ प्रगट जाहला भूलोकीं ॥१००॥
सवालक्ष कोटी आंत ॥ ऐसीं सहस्त्र निवडिलें दैवत ॥ ते पैगंबर होऊनि बुध्दिमंत ॥ म्लेंच्छधर्म स्थापिती ॥१॥
जो शेषशायी नारायण ॥ चार शास्त्रें तेणें केलीं निर्माण ॥ यवन म्हणती त्यास कुराण ॥ हाजुर सदन अल्लाची ॥२॥
तें नारायणमुखीचें कुराण ॥ मृत्युलोकी वाचिती यवन ॥ पैगंबरावर विश्वास धरुन ॥ उपासिती शेषशायी ॥३॥
शेषशायी नारायणाला ॥ यवन म्हणती थोर अल्ला ॥ हरिहर त्यातळीं राहिला ॥ म्हणोनि द्वेषित देवांसी ॥४॥
आतां शिवादिकांहून वरिष्ठ ॥ महाविष्णु असे श्रेष्ठ ॥ म्हणोनि अविंधलोका स्पष्ट ॥ एकनिष्ठें उपासिती ॥५॥
महाविष्णूनें केलें कुराण ॥ त्वां मांडिलें यथार्थवचन ॥ मजपरिस श्रेष्ठ नसे आन ॥ हेंचि प्रमाण लिहिलेसे ॥६॥ हरिहर ब्रह्मादिक ॥ मीच निर्मिता यासि देख ॥ ऐसें कुराणांतील वाक्य ॥ लिहिलें असे विष्णूनें ॥७॥
मीच सृष्टीचा आदिकर्ता विश्वामध्यें माझी सत्ता ॥ तारिता आणि मारिता ॥ मजवांचूनी असेना ॥८॥
सकळदेवांचा करुन त्याग ॥ मातेंच भजावें अभंग ॥ मोक्ष द्यावयाचा लांग ॥ मजविण दुजा नसे कीं ॥९॥
ऐसा निश्चयें करुन ॥ केलें कुराण किताब निर्माण ॥ भाषा निर्मिली अर्वस्थानें ॥ म्लेंच्छधर्म वाढविला ॥११०॥
म्हणोनि म्लेंच्छाचें देखण ॥ क्षीराब्धिपर्यंत जाण ॥ कैलासापरीस उंच स्थान ॥ महाविष्णूचें असें कीं ॥११॥
दिवसामध्यें पांच वेळा ॥ निमाज करिती शुध्द प्रांजळा ॥ एक भजनीं नेम आढळला ॥ तया प्राप्ति क्षीराब्धि ॥१२॥
क्षीराब्धि बहु रम्यस्त ॥ त्यासी यवन म्हणती भिस्त ॥ जे कुराणाप्रमाणें वर्तत ॥ तयां प्राप्ति क्षीराब्धि ॥१३॥
जया महाराष्ट्रधर्माचें आचरण ॥ तेंचि निंद्य यवनालागून ॥ यालागीं मार्ग त्यांचा भिन्न ॥ सहज दिसों येतसें ॥१४॥
आतां महाराष्ट्रलोकांची राहटी ॥ अविंध मानिती उफराटे ॥ यवन लोकांची चावटी ॥ विपरीत वाटे यालोकीं ॥१५॥
अविंध म्हणती महाराष्ट्र खोटें ॥ महाराष्ट्र म्हणती अविंध उफराटें ॥ यावरी दोहींत पडलें फांटे ॥ कोणता श्रेष्ठ कळेना ॥१६॥
कोणी म्हणती दोनी मार्ग एक ॥ अल्ला तोचि ईश्वर देख ॥ परी ते नेणती याचा विवेक ॥ अल्पबुध्दि म्हणोनि ॥१७॥
आतां असोत हे बोल ॥ पुढें ऐका निरुपण प्रांजळ ॥ तुझी मातें बहुत तळमळ ॥ म्हणोनि उघड सांगतसें ॥१८॥
ऐसें बोलतां जगदीश ॥ ब्राह्मणहृदयीं भरला हर्ष ॥ प्रेमेंकरुन श्रीचरणास ॥ वारंवार वंदीतसे ॥१९॥
करुन जगदीशासी नमन ॥ ब्राह्मण पुसेल पुढती प्रश्न ॥ तेंहि अद्भुत निरुपण ॥ सांगेन हर्षे श्रोतयां ॥१२०॥
जरी करितां होय ईश्वर ॥ तरी काय एक नव्हे साचार ॥ जें नसोनि कांही आधार ॥ उभें केलें गगनासी ॥२१॥
चंद्र सूर्य तारागण ॥ आकाशमार्गी करिती भ्रमण ॥ वोहटे समुद्र भरे दुणावून ॥ हेही कळा स्वामींची ॥२२॥
तैसा मी मानवी ॥ नेणें शास्त्रांची गाथागोवी ॥ किंवा ब्रह्मांडींचा उकळू दावी ॥ ऐसी कृपा देवाची ॥२३॥
बहुतमतांचा अनुभव ॥ उघडोनी दावी श्रीगुरुराव ॥ पुढें संशयाचा ठाव ॥ नुरे तरीच पुरुषार्थ ॥२४॥
हा पुरुषार्थ श्रीगुरुचा ॥ सिध्दांतबोध ग्रंथाचा ॥ इतर ग्रंथीं नसे अन्वय ज्याचा ॥ तोची तेथें मांडितसे ॥२५॥
कोण्या जन्मींचे सुकृत ॥ उभें राहिलें आजि येथ ॥ जें करावया ग्रंथ ॥ बुध्दि प्रेरी सद्गुरु ॥२६॥
मी तंव जन्माचा भिकारी ॥ कोणी फुकटही न पाचारी ॥ भिक्षा मागोनि लोकांघरीं ॥ पोट भरीं आपुलें ॥२७॥
नसे कंथा टोपी मेखला ॥ माळा मुद्रा ना जटा डोईला ॥ वस्त्रें भगवीं ना विभूती टिळा ॥ नाहीं सोवळें मजपासीं ॥२८॥
जैशी लोकांची वर्तणूक ॥ तैसा मीही वर्ते एक ॥ परी न कळे देवाचें कौतुक ॥ काय करितो कळेना ॥२९॥
तैसी शहामुनीची वार्ता ॥ निवेदिली साधुसंतां ॥ तुमचे आशीर्वादें आतां ग्रंथ जावो सिध्दीतें ॥१३०॥ इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे तत्त्वसारनिरुपणे अष्टादशोऽध्याय: ॥१८॥ अध्याय ॥१८॥ ॥ ओव्या ॥१३०॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP