मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय सहावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय सहावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला

॥ ॐ श्री: ॥
श्रीगणेशायनम: ॥ श्रीगुरु रामचंद्राय नम: ॥ ॐ नमो सद्गुरु रामचंद्रा । तुझी देखोनियां श्रीमुद्रा । भरतें येते बोधसमुद्रा । अति उल्हासें करुनी ॥१॥
शुद्ध सत्त्वाचिये आसनीं । सद्‍बुद्धि अंकीं जनकनंदिनी । घेवोनी शोभसी कोदण्डपाणी । भक्तवरदानी रघुवीरा ॥२॥
सद्विवेक लक्ष्मण बंधु । षडरींचा करोनि वधु । मन पवनाचा प्रबंधु । करोनि व्यजन वारीत ॥३॥
बोध प्रबोध शत्रुघ्न-भरत । इडा पिंगला चामरें वारीत । ॐकार मारुति सन्मुख तिष्ठत । ध्यानीं ध्यात तव पद ॥४॥
ऐसें तुझें पंचायतन । जे हृदयीं ध्याती रात्रंदिन । ते परपारी पावले तूर्ण । माया-मोह-नदीच्या ॥५॥
आरंभिलें सिद्धचरित्र । हें तूं पाववी परपार । एरवीं मी मतिहीन साचार । नाहीं आधार आन कोणी ॥६॥
हृदिस्थ रामा श्रीगुरुमूर्ति अतर्क्य तर्केना तुझी कीर्ति । श्रोते बैसले श्रवणार्थी । याची कीर्ति पुरविसी तूं ॥७॥
मच्छेन्द्रनाथें ते स्त्रियेसी । भस्म देऊनि वदले तिजसी । सेवन केलिया पुत्र पावसी । ऐसें सांगोनि पैं गेले ॥८॥
इतुकें असे मागील कथन । पुढें झालें जें वर्तमान । तेचि परिसोत श्रोतेजन । अति भाविक, रसाळ जें ॥९॥
स्त्रियांची जाति अविश्वासी । महामलिना अति आळशी । कुश्चल कुबुद्धीच्या राशी । महातापसी अपवित्रा ॥१०॥
अनृत साहसादि स्त्रीलक्षण । अनेक ग्रंथीं वर्णिलें जाण । यास्तव या ग्रंथीं विस्तीर्ण । नाहीं निरुपण पैं केलें ॥११॥
असो, नाथ जातांचि ते क्षणीं । भस्म निजकरीं घेऊनी । शेजारणीच्या गृहीं जाऊनी । बुद्धि तीस विचारी ॥१२॥
स्वबुद्धीनें हित घडे । परबुद्धि विनाश जोडे । हें विप्रस्त्री नेणोनि कुडें । स्वसखीसी पुसतसे ॥१३॥
म्हणे सखये आजिचे दिनीं । योगीन्द्र आला आमुचे सदनीं । त्याची ध्यान मुद्रा पाहुनी । आनंद मनीं जाहला ॥१४॥
मस्तकीं जटांचा भार । कर्णी कुंडलें सुंदर । गळां शैली शृंगी विचित्र । भस्में शरीर चर्चिलें ॥१५॥
`आदेश गुरुजी' म्हणोन । क्षुधार्ताचें ऐकिलें वचन । यथानुशक्ति जळ अन्न । त्यातें देऊन तोषविलें ॥१६॥
स्वामी अनपत्य मी दु:खार्ता । म्हणोनि सिद्धासी प्रार्थितां । भस्म देऊनि म्हणे, तत्त्वतां । सेवितां, अपत्या पावसी वो ॥१७॥
तरी सखये यासी आतां । कैसें करुं ? तें माझिया हिता । मनीं विवरोनि सांगे तत्त्वतां । त्यागात्यागार्था जननीये ॥१८॥
ऐकोनि विप्रस्त्रियेचे वचन । सखी बोलली हास्यवदन । बरवें पुशिलें मजलागून । अनकळ विंदान कपटयाचें ॥१९॥
कैचे सिद्ध कैचे साधु । कानफाटे मेले भोंदू । भस्म देऊनि स्त्रियांसी नादु । आपुलाचि लाविती ॥२०॥
भस्म सेवितां स्वभावें । श्वान करुनि नेती सवे । विजनीं स्त्री करुनि बरवे । काम भोगातें पुरविती ॥२१॥
तुम्हां स्त्री पुरुषा आयुष्मंत । करो बाई श्रीभगवंत । अंगारा टाकी गर्तेत । मागुती दृष्टीं न पडेसा ॥२२॥
ऐसें ऐकोनि वचन । विप्रस्त्रीचें दचकले मन । म्हणे घात झाला होता पूर्ण । परी सखीनें रक्षिलें ॥२३॥
ऐसा विचार आणोनि मनांत । भस्म नेऊनि टाकिलें अग्नींत । ऐसा विप्रस्त्रीचा घात । कुसंगतीनें जाहला ॥२४॥
कुसंगतीचें महिमान । वर्णावें तितुके असे न्यून । (१)पूर्णावतारा कैकेयी विपिन । करवी सेवन मंथरा ॥२५॥
दुर्योधनाच्या संगेंकरुन । भीष्मद्रोणासी आलें मरण । (२)दुर्वासामागें सुदर्शन । कुसंगानें लागले ॥२६॥
ऐका श्रोते हो प्रेमळ । सुखें घेतां बरवें हालाहल । परी कुसंग एक क्षण पळ । कामा नयेल सर्वथा ॥२७॥
न घडावे ते घडोत आघात । परी न घडावा कुसांगात । विप्रस्त्रीचा झाला घात । कुसंग त्यागवी सत्फला ॥२८॥
कुसंगतीची केवढी बाधा । निधनवेळीं जोडवी सुधा । तिनें गरळ जाणुनी वामपादा । उलंडूनि, आपदा सेविली ॥२९॥
कामधेनु आलिया घरीं । गर्दभी म्हणोनि घातली बाहेरी । कीं तृषार्थी येऊनि जाह्नवी तीरीं । तिये वोहळसरी त्यागिली ॥३०॥
भाग्यें लाधला चिंतामणि । तयातें पाषाणसरें मानुनी । बाह्य प्रदेशीं दिधला फेंकुनी । तैसीच जाहली करणी इयेतें ॥३१॥
असो; अग्नि विझालियावरी । नेऊन टाकिला गर्तेभीतरीं । प्रसादभस्मही ते अवसरी । गर्तेमाझारीं पडियेले ॥३२॥
परी कृपेचा प्रभाव अद्भुत । तो कैसा होईल व्यर्थ । गर्तेमाजीं पुत्र मंडित । भानु प्रकटत ज्यापरी ॥३३॥
तेवीं हा योगाचळीं भानु जाण । गर्तेमाजीं गुणनिधान । पुत्र जन्मला ज्ञानघन । मच्छेन्द्रदानी निजसखा ॥३४॥
अहो नवल ! घटीं अद्भुत । रेत स्थापित जन्मे अगस्त्य । तैसें पुत्र-प्रसव भस्म निश्चित । कुमर गर्तेत जन्मला ॥३५॥
जो चंद्रचूड आदिशंकर । त्याचे करकंजोद्भव मच्छिंद्र । त्याचें वचन अणुमात्र । मिथ्या नोहे कल्पान्तीं ॥३६॥
बाळ राहे अंतराळीं । अंगा किमपि न लागे धुळी । (३)हस्त परिभित भोंवताली । राहती जाहली शुद्ध भू ॥३७॥
अहो जलावरी धरणी । शुद्ध तारांगणें गगनीं । पंचभूतांचा मेळावा करुनी । सृष्टि जेणें चालविली ॥३८॥
तयातें बाळासी रक्षण । करावया काय असाधारण ? कामदुहा ते स्थळीं प्रकटोन । नित्य स्तनपान करवीतसे ॥३९॥
असो, ऐसी वर्षे बारा । लोटली; तंव श्रीनाथफेरा । तेचि ग्रामीं इयेचे द्वारा । येऊनि पुढारां ठाकला ॥४०॥
आदेश पुकारिता वदनीं । विप्र - स्त्री ये गृहांतुनी । तियेतें नाथें देखोनि नयनीं । क्षेम की आननी पूसिले ॥४१॥
आमुचा बंडया आहे कोठें ? म्हणोनी हरुषें पुसती नेटें । तें ऐकतांचि हृदय फाटे । बाईसी न सांठे गंहिवरु ॥४२॥
आपुलें दत्त-भस्मेकरुनी । पुत्र होणार हा निश्चय मनीं । यालागीं पुसिलें मजलागोनी । कोठें म्हणूनि कुमरातें ॥४३॥
आतां सांगावें वर्तमान । तरी होईल क्रोधायमान । शापें भस्म करील त्रिभुवन । तेथें मी कवण कायसी ॥४४॥
म्यां मूर्खे हें काय केलें ? अकल्पित अमृत जोडलें । तें टाकूनि, बळेंचि घेतलें । दुर्धर विष ज्यापरी ॥४५॥
आतां हा शापानुग्रही समर्थ । मज घालील रौरवांत । स्वपाराधा आठवूनि बहुत । बाई आक्रंदत आक्रोशें ॥४६॥
ऐसा तियेचा वृतान्त । पाहूनि, नाथ मनीं विस्मित । म्हणती कोठें न दिसे सुत । गृहामाजीं इयेच्या ॥४७॥
मी तंव पूर्णायु दिधला सुत । तेथें घडलिया विपरीत । दंडें दंडीन वैवस्वत । श्रीआदिनाथकृपेनें ॥४८॥
ऐसें विचारुनि मानसीं । मग पुसती गति कैसी । जाहली; ते वृत्तान्तासी । सांगे मजसी जननीये ॥४९॥
श्रीआदिनाथ कृपेंकरुन । जन्मला तो तव नंदन । तयातें पूर्ण आशीर्वचन । देऊनि, गमन करुं पुढां ॥५०॥
ऐसें ऐकोनियां वचन । दीर्घश्वासें खिन्न वदन । अंगारा लाभला नाहीं म्हणवून । आद्यन्त निवेदन केलें त्या ॥५१॥
बाईचें वचन ऐकतां । परमहास्य आलें नाथा । म्हणती अंगारा तत्त्वता । कवणे ठायीं टाकिला ? ॥५२॥
बाई परम म्लान वदन । द्वारासमीप गर्ता पूर्ण । दाविली नाथातें नेवोन । अभागी आपण म्हणोनियां ॥५३॥
नाथें उकिरडा पाहून । (४)१``आईये लरके कितनिये दिन । हुवां बैठिये ?'' म्हणोन । बाहिलें पूर्ण कृपेनें ॥५४॥
तंव तेजस्वी सगुण सुंदर । द्वादश वर्षीय मनोहर । नाथें देखोनि आत्मकुमर । हरिखें निर्भर ओसंडे ॥५५॥
परम तेजस्वी देदीप्यमानु । जैसा भस्मामाजील कृशानु । कानीं कुंडलें स्व्होभायमानु । पद्मकर जोडूनि ठाकला ॥५६॥
मस्तक अवघ्राणूनि ते वेळीं । आलिंगिलें हृदयकमळीं । नेत्र उचंबळले प्रेमजळीं । आनंदकल्लोळीं निमग्न ॥५७॥
कंठ जाहला सद्‍गदित । नेत्रीं अश्रुधारा वाहत । ऐसा पाहूनि अवस्थाभरित । बाळ पुसत श्रीनाथा ॥५८॥
कां जी एवढे कष्ट वांया । हृदयीं वाहिले स्वामिया । नाथ म्हणती पुत्रराया । शिणविलें वांया तूंतें मीं ॥५९॥
वरवेळीं मी विवेकशून्य । या मुर्खेतें विभूतिदान । दिधल्याचें आदि अवसान । आलें घडोन यापरी ॥६०॥
तंव लडिवाळ जोडल्या करीं । म्हणे जी नाथा जठरकुहरीं । येणें चुकविलें योनिद्वारीं । गर्भागारीं अतिकष्ट ॥६१॥
तव कृपेनें बरवी बुद्धि । जाहली तियेतें; करुनानिधि । म्हणवोनि अंगारा उदरामधीं - । न घेऊनि, बिंदीं सांडिला ॥६२॥
पूय पंकादि असमसहास । अहा चुकविले कुश्चलवास । रिगमू नाहीं श्वासोच्छ्वास । (५)विरहें सदभ्यास तव नामीं ॥६३॥
यापरी तो वरदवपु । नाथपंथींचा ज्ञानदीपु । कीं हे योगाचल अकंपु । उड्डगणीं उडुप ज्यापरी ॥६४॥
तेवीं तो नाथापुढां बाळ । ठाकला, राजीवाक्ष कोमल । कराब्जीं योगदंड, जपमाळ । निरखी अढळ गुरुपदा ॥६५॥
ठाणमाण गुणलक्षण । अढळवृत्ति अचलस्मरण । नाथासी म्हणे हास्यवदन । पावना पावन कनवाळा ॥६६॥
अगा सद्गुरु कैवल्यदानी । म्हणोनि न धरत पडला, लोळणीं । घेतांचि नाथें आलिंगनीं । तनु सांवरुनि उचलिला ॥६७॥
त्या समयींचा ब्रह्मानंद । काय वानूं मी मतिमंद ? । गुरुपुत्रें जाणिजे स्वाद । येरां विशद न करवे ॥६८॥
असो, यापरी नाथ आपण । पुत्रालागीं नामकरण । पंचभूतात्मक देहासी जाण । संज्ञार्थ खूण पाहिजे ॥६९॥
परि हें मुख्यत्वें स्त्रियांचें । कर्तृत्व येथें बोलिले साचें । कौतुकें म्हणती जननिये वाचें । नाम ठायाचें निरोपी ॥७०॥
ये स्थलीं सांडितां काय कीर ? येरी म्हणे रक्षा गोवर । तेंचि नामोत्साहें थोर । बाही कीं कुमरा गोरक्ष ॥७१॥
बाहूनि म्हणती गोरक्षातें । वत्सा चलावे मज सांगातें । भूमंडळीं असंख्यातें । देवता, तीर्थे, सिद्ध साधू ॥७२॥
ऐकोनि उल्हासलें मन । धन्य म्हणे आजिचा दिन । जे पथीं सद्गुरु सज्जन । त्या मज काय न्यून परलाभा ? ॥७३॥
म्हणोनि नाथा अभिवंदिती । पदरजासी उभय हातीं । माथां वाहोनियां पुढती । आक्रमिती क्षिती आनंदें ॥७४॥
तंव ते अंतरीं वेल्हाळ । खेदें जाहली अत्यंत विकळ । म्हणे मी ऐकोनि पराचे बोल । निजहिता फोल पैं केलें ॥७५॥
हा हा कपाळा आपुले हातीं । परिसा सांडूनि घेतली माती । विपरीत अदृष्टाची गति । कवणाप्रति निवेदूं ?॥७६॥
अहो मज अभाग्यालागुनी । सिद्धें दीधला चिंतामणि । परि ह्या दुरत्यया प्राक्तनीं । मज हातूनि सांडविला ॥७७॥
परातें कासया देऊं दूषण ? दुर्दैव आड ठेलें येऊन । कर्मगति विचित्र गहन । निजक्रिये पूर्ण नागविलें ॥७८॥
यापरी ती विप्र-गृहिणी । स्वापराधें संतप्त मनीं । झाली, ते पुन्हा मागुतेनि । नाथचरणा आठवी ॥७९॥
म्हणे हा तात हा तात । मातें सांडोनि दु:खाब्धींत । गेलासी; परि मी न राहे येथ । म्हणोनि पंथ धरियेला ॥८०॥
उभय नि:संगी जये मार्गे । स्वसुखें स्वच्छंदें अचल योगी । महीं विचरती अनुद्वेगी । सती ये लागवेगीं त्यांमागें ॥८१॥
सरिसे दोघे हातीं हात । धरुनि चालती आनंदभरित । तंव गोरक्षकें विनविला नाथ । ब्रह्मीं उद्भवत केवीं माथा ? ॥८२॥
ब्रह्म तरि निराकार । तेथें कैसें चराचर - । जाहलें ? हा आद्यन्त विवर । मज साचार निरोपी ॥८३॥
ऐकोनि, नाथें म्हणितलें बाळा । आद्यन्त मध्या सांडोनि सकळा । जिहीं धांडोळिलें निजमूळा । ते या मृगजळा न मानिती ॥८४॥
निर्विकारा अहं स्फुरण । तेचि हे वत्सा माया जाण । तिनेंचि एकत्वा आणिलें पूर्ण । एकीं एकपण प्रकटिलें ॥८५॥
तदुपरी खेळ विलक्षण । मांडोनि, नाथिलें त्रिभुवन - । उभविलें; गुणत्रय भिन्नभिन्न । चराचर संपूर्ण मग व्याली ॥८६।
तंव तो आणिक स्वामिया । म्हणे जी विनंति तुझिये पाया । अतीन्द्रिय ज्ञानियां दृश्य माया । दिसते ? कीं वांया आघवेंचि ? ॥८७॥
ऐकोनि म्हणती बा रे पाडसा । दिसते; परि मिथ्याभासा । जाणोनि, वर्तवी विदेहदशा । प्रारब्धरेषा समसाम्यें ॥८८॥
ऐसिया परी एकसरें । निज आवडीचेनि पडिभरें । येरयेरां प्रश्नोत्तरें । करितां माघारे न देखती ॥८९॥
शिराळेहूनि उत्तरे सम्यक । `कामेरी' नामें ग्राम एक । तेथें न्यग्रोधातळवटीं देख । उभय ज्ञानार्क बैसले ॥९०॥
तंव ती तेथें विप्रदारा । सन्निध येवोनि, नमस्कारा - । करोनि, म्हणतसे दातारा । मज अपुत्रा ठेविलें ॥९१॥
ऐसें बोलोनि चरणीं मिठी । घालोनि, ऊर्ध्वश्वासें गोरटी । स्फुंदस्फुंदोनि निढळा पिटी । दु:ख पोटीं न समाये ॥९२॥
तंव तियेतें सदयें नाथें । म्हणितले जननी आक्रोशातें - । कां वो मांडिलें ? उभय पुत्रातें । पावसी निरुतें; जाय मागां ॥९३॥
ती म्हणे योगिराया दोष । मजपासाव असमसहास । झाले; ते मी सुतलाभास । पात्र ऐसियास कै सांगा ॥९४॥
नाथ म्हणती मागील आतां । नाठवी, ना शिणे वो सर्वथा । आमुचे वचनीं विश्वासतां । पुत्र तत्त्वतां पावशी ॥९५॥
ऐसी संबोखून येरी । परतविती निजघरा माघारीं । म्हणती एक संवत्सरीं । देऊं ग्रामान्तरीं तुज भेटी ॥९६॥
यापरि पावोनि आश्वासन । नाथ-पद रजीं लोटांगण । घालोनि, म्हणे धन्य धन्य । आपुलें वचन साच करी ॥९७॥
तेवींच मागुती आणिक ताता । विनवणी माझी सद्गुरुनाथा । शेष आयुष्य भजनस्वार्था । वेंची तत्त्वतां तव चरणीं ॥९८॥
इतुकें प्रार्थोनि सिद्धांप्रती । निजग्रामा मुरडली सती । सदैव भगवच्चिंतनीं वृत्ति । झाली गर्भवती तत्कृपें ॥९९॥
दिवसामासां पळें पळां । चंद्रबिंबीं वाढती कळा । पूर्ण जालिया नव-मास बाळा । प्रसवे वेल्हाळा पुत्रयुग्मा ॥१००॥
अत्यंत तेजस्वी बाळक । जाणों, अवनिये उतरले अर्क । तैं उभय दंपतीचें सुख । न करवे लेख वक्तयातें ॥१०१॥
धन, गोधनीं वस्त्राभरणीं । दानें गौरविल्या विप्र-श्रेणी । गेह शृंगारी गुढिया तोरणीं । ध्याती अनिदिनीं नाथपदां ॥१०२॥
आताण ते नाथवरद बाळा । शिराळे ग्रामीं वंशमाळा । जन अद्यापि देखती डोळां । सिद्ध सोहळा अगम्य ॥१०३॥
ऐसिया परी सिद्ध संतान । कथिलें गोरक्षाचें जनन । अयोनिसंभव ज्ञानसंपन्न । रिघेल शरण सद्गुरुसी ॥१०४॥
सज्जना जी हे गोड कथा । प्रीति पाववो सद्गुरुनाथा । ग्रंथरुपेंही तत्त्वतां । तोचि तो वक्ता मम मुखीं ॥१०५॥
स्वस्ति श्रीसिद्धचरित्रभाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्गुरु रामराव । त्याने उपाव रचिला हा ॥१०६॥
श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत्‍ सोऽहं हंस; ॥
॥ अध्याय सहावा संपूर्ण ॥
==
टीपा - (१) पूर्णावतारा कैकेयी विपिन - ओवी २५ :- या ओवीचरणांतील पदांचा अन्वय `कैकेयी-मंथरा (कुसंगतीनें) पूर्णावतारा विपिन सेवन करवी' असा आहे. म्हणजेच कैकेयीनें मंथरेच्या कुसंगतीनें पूर्णब्रह्म श्रीरामास अरण्यवास घडविला असा अर्थ.

(२) दुर्वासामागें सुदर्शन - ओवी २६ :- येथें अनिष्ट संगतीचा विषय सुरुं आहे. दुर्वासारख्या ऋतिवर्यास कोणती कुसंगति घडली ? तर तप:सामर्थ्याचा दुरभिमान ! त्या कुसंगानेंच दुर्वासानें अंबरीष राजाला शाप दिला व देवाचें सुदर्शन चक्र पाठीशीं लावून घेतलें.

(३) हस्तपरिमित भोंवताली - ओवी ३७ :- राख टाकण्याच्या खांचेंत, गोरक्षाभोंवती एक हात अंतराइतकी चौफेर जागा मोकळी राहिली.

(४) आइये लरके ..... हुंवा बैठिये - ओवी ५४:- नाथपंथी महात्मे विशिष्ट लकबीची हिंदी भाषा बोलतात. ``ये बाळा, किती दिवस (आंत) बसला आहेस ?'' असा ह्या हिंदी; वाक्याचा अर्थ आहे.

(५) विरहें सदभ्यास - ओवी ६३:- गोरक्ष मच्छिंद्रांना म्हणतात : बारा वर्षे तुमचा विरह-वियोग घडला पण तुमच्या नामस्मरणाचा किंवा आत्मचिंतनाचा उत्तम अभ्यास झाला.

कठिण शब्दाचें अर्थ :- व्यजन = पंखा (३) चामरें वारीत - चंवर्‍या ढाळतात (४) तूर्ण = त्वरित, ताबडतोब (५) अनपत्य = मूल नसलेली (१७) गर्ता = खड्डा किंवा खांच (३२) कामदुहा = कामधेनु (३९) दत्तभस्में = दिलेल्या भस्मानें (४३) वैवस्वत = विवस्वानाचा पुत्र - यमधर्म (४८) कृशानु = अग्नि (५६) दुरत्यय प्राक्तन = उल्लंघन करण्यास अशक्य असें प्रारब्ध (७७) न्यग्रोध = वडाचें झाड (९०)

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP