मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय २४ वा

स्कंध १० वा - अध्याय २४ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


२९३
निवेदिती शुक त्याचिवेळीं नंद । सिद्धता यज्ञार्थ करी गृहीं ॥१॥
जाणूनिही हरी पित्यालागीं पुशी । त्वरा कासयाची चालली हे ॥२॥
सामग्री हे वाटे मजसी यज्ञाची । वृत्त मजलागीं निवेदावें ॥३॥
हेतु काय ?  कोण देवता यज्ञाची । साधनें एथींची निवेदावीं ॥४॥
समत्व सज्जनालागीं सर्व ठाईं । गुप्तता न कांहीं तयाप्रति ॥५॥
म्हणूम नये साधु जाहलों मी ऐसें । उदासां, शत्रूंतें न कळो कांहीं ॥६॥
निवेदावें आप्त-स्वकीयां रहस्य । ऐसेंचि ज्ञात्यांस तत्व मान्य ॥७॥
वासुदेव म्हणे निवेदूनि ऐसें । सकल यज्ञाचें वृत्त पुशी ॥८॥

२९४
मित्र, स्वकीयांसी निवेदितां गुप्त । कदाही अनहित होत नसे ॥१॥
विचारकृत वा गतानुगतिक । कर्मे हीं द्विविध जगामाजी ॥२॥
विचारकृत तीं पावताती सिद्धि । अन्यांतें न सिद्धि लाभे कदा ॥३॥
स्वजनांत तेणें ऊहापोह इष्ट । सामान्य हा लाभ न मानावा ॥४॥
विचारें हा यज्ञ आरंभिला किंवा । अंधपरंपरा कारण या ॥५॥
वासुदेव म्हणे ऐकूनि तें नंद । बोलला कृष्णास परिसा काय ॥६॥

२९५
कृष्णा, पर्जन्याचा अधिप देवेंद्र । मेघ विभूतीच देवेंद्राच्या ॥१॥
जीवनवर्षाव करिताती मेघ । तेणें तोषो इंद्र नवधान्यें ॥२॥
यास्तव करुनि अज्ञ अवशिष्ट - । धान्यादींचा, भोग इष्ट आम्हां ॥३॥
कृषिकर्मादिकां पर्जन्यचि मूळ । तयावीण सर्व व्यर्थ होई ॥४॥
परंपरा ऐसी असे पुरातन । न होई कल्याण त्यागितां हे ॥५॥
ऐकूनि तें कृष्ण इंद्रक्रोधास्तव । पित्यालागीं काय वदला ऐका ॥६॥
वासुदेव म्हणे श्रीकृष्णवचन । सुधामय ज्ञान, उद्धारक ॥७॥

२९६
उत्पत्तिअ विनाश कर्मानेंचि ताता । कर्मासम जीवां सुख-दु:ख ॥१॥
कर्मचि यास्तव दैवत प्राण्यांचें । इंद्रादिक तेथें करिती काय ॥२॥
केल्याविण लाभ, करुनीही हानि । न करीचि जनीं इंद्र कदा ॥३॥
तात्पर्य, कर्मेचि लाभे इष्टानिष्ट । सर्वत्र सिद्धांत हाचि असे ॥४॥
प्राक्तनानुसारी उच्च, नीच, जन्म । शत्रु, उदासीन, मित्र, कर्मे ॥५॥
आराध्यदैवत यास्तव कर्मचि । अदृष्ट न लोकीं देव कोणी ॥६॥
वासुदेव म्हणे हेतुपूर्णवाक्य । बोलला अच्युत तयावेळीं ॥७॥

२९७
योगक्षेम जेणें घडे तोचि देव । न घडो अन्याय निजहस्तें ॥१॥
एकाचे उपकार अन्याचा सत्कार । होतां लाभणार केंवी सौख्य ॥२॥
अव्हेर पतीचा करुनि जारिणी । जाराच्या भजनीं दंग होई ॥३॥
कल्याण न परी पावे या कर्मे । इंद्राच्या पूजनें तैसें घडे ॥४॥
वेदाभ्यासं विप्रां, क्षत्रियां रक्षणें । वैश्यां कृषिकर्मे, शूद्रां सेवा ॥५॥
उपजीविकेचे मार्ग हे शास्त्रोक्त । व्याजही वैश्यांस निवेदिलें ॥६॥
वासुदेव म्हणे कृष्ण कथी गोपां । संबंध इंद्राचा नसे एथें ॥७॥

२९८
धेनुआरोग्यही नसे इंद्राधीन । होई समागम रजोगुणें ॥१॥
देव-मनुष्यादि जन्मती त्यायोगें । प्रेरणा मेघांतें तोचि देई ॥२॥
तेणें, जल, धान्य, पुढती समृद्धि । इंद्राचें यामाजी स्थान कोठें ॥३॥
रक्षणींही नसे संबंध इंद्राचा । सर्वदा आमुचा वनीं वास ॥४॥
ऐश्वर्य तें काय आमुचें कथावें । नगरें, ग्रामें, गृहें काय आम्हां ॥५॥
वासुदेव म्हणे कृष्ण कथी गोपां । एथ देवेंद्राचा नसे भाग ॥६॥

२९९
संबंध आपुला नित्य असे ज्यांचा । पूजूनि तयांचा मान राखा ॥१॥
धेनु, विप्र तेंवी गिरि गोवर्धन । तोषवावे, यज्ञ करुनि आम्हीं ॥२॥
तयांस्तव यज्ञ करुं या द्रव्यानें । इंद्रसंतोषानें काय लाभ ॥३॥
मुगांचें वरण, क्षीर, लड्डू, शिरा । अनर्से, करंज्या, श्रीखंडादि ॥४॥
सिद्ध करा अन्नें, विप्रद्वारा होम । करुनि, भोजन तयां द्यावें ॥५॥
धेनु, दक्षिणाही अर्पूनि तयांसी । दीन अंध तेही तृप्त हावे ॥६॥
वासुदेव म्हणे चांडाळ पतित । होवोत संतुष्ट कृष्ण म्हणे ॥७॥

३००
यथाधिकार द्या भोजन तयांसी । तोषवा धेनूंसी हरित तृणें ॥१॥
गोवर्धना महानैवेद्य अर्पावा । चंदनादि लावा उटया अंगीं ॥२॥
वस्त्रें अलंकार लेऊनि भोजन । करा संतोषून अत्यानंदें ॥३॥
धेनु - विप्र - गोवर्धना प्रदक्षिणा । करा ऐशा यज्ञा स्वहितास्तव ॥४॥
मान्य ऐसा यज्ञ होई मजप्रति । रुचे तरी हेंचि करा कार्य ॥५॥
वासुदेव म्हणे सकल गोपांसी । बोलला श्रीपति ऐशापरी ॥६॥

३०१
गर्व हरावा इंद्राचा । हाचि हेतु माधवाचा ॥१॥
नंदादिकांसी प्रवृत्त । करी यास्तव अच्युत ॥२॥
कृष्णवचनें गोपाल । सिद्ध जाहले यज्ञार्थ ॥३॥
केलें पुण्याहवाचन । पाचारुनियां ब्राह्मण ॥४॥
मिष्टान्नें ते केले तुष्ट । चारा कोंवळा धेनूंस ॥५॥
लेऊनियां अलंकार । गोपी गाती कृष्णगीत ॥६॥
गोवर्धनप्रदक्षिणा । विप्र आशीर्वाद नाना ॥७॥

३०२
गोवर्धन हेचि देवता मानूनि । देवता स्थापूनि शिखरीं एक ॥१॥
गोवर्धनगिरि मी ऐसें म्हणून । नैवेद्यग्रहण करी देवी ॥२॥
साक्षात्‍ पर्वत हा प्रगटला ऐसें । निवेदी गोपांतें तदा कृष्ण ॥३॥
भक्षिला नैवेद्य अनुग्रह हाचि । व्याघ्रादिक हाचि अवमानितां ॥४॥
धेनुद्वारा व्हावें आपुलें कल्याण । करावें वंदन यास्तव या ॥५॥
गोपांसमवेत कृष्णही त्या वंदी । ऐसी यज्ञसिद्धि करिती गोप ॥६॥
वासुदेव म्हणे कृष्णासमवेत । जाती गोकुळांत पुढती सर्व ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP