स्कंध ११ वा - अध्याय ३१ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥३५८॥
श्रीकृष्णनिर्याणसमयीं विरंचि । उमा-ईश्वरादि इंद्रासह ॥१॥
मुनि, सिध्द, यक्ष, चारण, गंधर्व । किन्नर, पितर अप्सरादि ॥२॥
गुणगात तेथें पातलें आनंदे । कोंदलें नभ तें विमानांनी ॥३॥
वारंवार पुष्पवर्षाव करीत । श्रीकृष्णचरित्र गाती सर्व ॥४॥
पाहूनि तयांसी झांकी नयनांबुज । गेला स्वधामास योगबळें ॥५॥
देहही अदृश्य जाहला हरीचा । नाद दूंदभीचा स्वर्गी होई ॥६॥
पुष्पवृष्टीही ते होई पृथ्वीवरी । सत्य, धर्म, कीर्ति, धृति, श्रीही ॥७॥
वासुदेव म्हणे श्रीकृष्णामागूनि । भूतल त्यागूनि स्वर्गी जाती ॥८॥

॥३५९॥
गमनागमन विजेचें अज्ञासी । न कळे तेचि गति हरिची जातां ॥१॥
ब्रह्मदेवादीहि होऊनि चकित । जाती स्वस्थळास स्तवित कृष्णा ॥२॥
राजा, हरिलीला मायेचा विलास । रंगवी नाटक नटापरी ॥३॥
स्वस्थरुपस्थिति परी न भंगेचि । जादुगिरी ऐसी मायामय ॥४॥
वासुदेव म्हणे भासचि सकळ । ब्रह्म निर्विकार अधिष्ठान ॥५॥

॥३६०॥
राया, गुरुपुत्रां दिधलें जीवन । केलें निवारण ब्रह्मास्त्राचें ॥१॥
बाणासुरयुध्दीं जिंकिलें शिवासी । वधका व्याधासी स्वर्गी नेलें ॥२॥
स्वदेहरक्षण नव्हतें त्या अशक्य । सामर्थ्य अतर्क्य लीलामय ॥३॥
राजा, यद्यपि तो सर्व शक्तिमंत । अनंत ब्रह्मांड रचिता, हर्ता ॥४॥
परी मर्त्य देह ठेविला न येथें । शापवचन तें पाळावया ॥५॥
मर्त्यदेह व्यर्थ मोह न तयाचा । करणें, इष्ट ऐसा सहज बोध ॥६॥
प्रात:काळीं नित्यकर्म आटोपूनि । सप्रेम गायनीं, कथनीं किंवा ॥७॥
रंगेल या पुण्यकथेंत तयासी । वैकुंठाची प्राप्ति निश्चयानें ॥८॥
वासुदेव म्हणे हरिकथाचिंतन । धारणा तें ध्यान समाधीही ॥९॥

॥३६१॥
कृष्णविरहानें विव्हल दारुक । कथी सर्व वृत्त यादवांसी ॥१॥
ऐकूनियां शोकमूर्च्छित ते होती । प्रभासीं धांवती शुध्दि येतां ॥२॥
राम-कृष्ण कोठें न दिसती म्हणून । धाय मोकलून रडे माता ॥३॥
वसुदेवासवें अग्नीत प्रवेश । करुनि, प्राणांस त्यागिताती ॥४॥
प्रद्युम्न -बळिरामपत्न्या सती जाती । अष्टनायिकाही रुक्मिण्यादि ॥५॥
वासुदेव म्हणे संपतां नाटक । रंगभूमी ओस तैसें घडे ॥६॥

॥३६२॥
विरहाग्निदग्ध पार्थ, कृष्णबोधें । सांत्वन चिंत्ताचें करुनि घेई ॥१॥
यथाअधिकारे करवी अंत्यकर्म । मंदिर राखून बुडली पुरी ॥२॥
हरिमंदिराचें स्मरण मंगल । यास्तव सागर रक्षी तया ॥३॥
वासुदेव म्हणे द्वारावती पुरी । बुडाली सागरी प्रभुइच्छेनें ॥४॥

॥३६३॥
स्त्रिया, बाल, वृध्द, आनाथ सकळ । इंद्रप्रस्थी पार्थ आणितसे ॥१॥
स्थापूनियां ’वज्र ’ यादवा त्या स्थानी । अभिषेक करुनि विधियुक्त ॥२॥
पुढती हस्तिनापुरीं कथी वृत्त । परीक्षिते, तुज करुनि राजा ॥३॥
महाप्रयाणासी पांडव निघाले । कर्तव्य संपलें जाणूनियां ॥४॥
उत्तर पंथें ते निघूनियां जाती । कथा ही जे गाती, मुक्ति तयां ॥५॥
ग्रंथ-ग्रंथांतरी कथा जे हरीची । सप्रेम ऐकती, गाती मोदें ॥६॥
परमहंसपदीं पराभक्ति तयां । सहज उपजूनियां मुक्ति लाभे ॥७॥
एकादश स्कंध ज्ञान-पाणपोई । अज्ञान -तृषेसी शमवी पूर्ण ॥८॥
नाथ, श्रीधरादि ज्ञात्यांसी पुसोनि । शुकांसी स्मरूनि मराठीत ॥९॥
कलिमलदोषहरणार्थ प्रेमें । पातली, गंगा हे सगरांवरी ॥१०॥
वासुदेव म्हणे एकादश स्कंध । गातां हा, अभंगकृष्णभक्ति ॥११॥

इतिश्री वासुदेवकृत अभंग-भागवताचा ११ वा स्कंध समाप्त.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP