स्कंध ९ वा - अध्याय १५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१०७
आतां ऐका पुढिल वंश । अप्सरेतें पुत्रषट्‍क ॥१॥
आयु, श्रुतायु, सत्यायु, । रय, विजय आणि जयु ॥२॥
वसुमान्‍ श्रुतायूचा । श्रुतंजय सत्यायूचा ॥३॥
रयपुत्रा नाम ‘एक’ । अमित नामें जयपुत्र ॥४॥
पुत्र विजयालागीं भीम । पुत्र भीमाचा कांचन ॥५॥
तया होत्रक, जन्हु तया । गंगाजल चुळका जया ॥६॥
पूरु, बलाक, अजक । अजकासी पुत्र कुश ॥७॥
तया कुशांबु त्या गाधि । विश्वामित्र पुत्र त्यासी ॥८॥
वासुदेव म्हणे वृत्त । ऐका आतां बोधप्रद ॥९॥

१०८
सत्यवती कन्या गाधीची विख्यात । मागे विवाहार्थ ऋचीक तीतें ॥१॥
मान्य तें रायासी न होई यास्तव । वदल तो काय ऐका तदा ॥२॥
सहस्त्र संख्य जो अर्पी शामकर्ण । सत्यवती जाण मुने, तया ॥३॥
आशय रायाचा जाणूनि ऋचीक । प्रार्थी वरूणास अश्वांस्तव ॥४॥
वरुणकृपेनें अश्व ते लाभतां । उपाय गाधीचा नुरला कांहीं ॥५॥
वासुदेव म्हणे कन्या नाइलाजें । अर्पी ऋचीकातें गाधिराज ॥६॥

१०९
पुत्रार्थ पुढती प्रार्थितां ऋचिका । चरु तदा सिद्ध करी ॥१॥
कांतेस्तव ब्रह्मतेजसमन्वित । क्षात्रबलयुक्त तन्मातेसी ॥२॥
मंत्रूनि ते चरु गंगेवरी जातां । विपर्यास त्यांचा करी माता ॥३॥
कन्येचा ते स्वयें, आपुला कन्येसी । अर्पूनि भक्षिती उभय चरु ॥४॥
कळतां तें मुनि बोलला कांतेसी । होईल तुजसी क्रूर पुत्र ॥५॥
तेंवी ब्रह्मवेत्ता शांत त्वन्मातेसी । होई निश्चयेंसी पुत्र कांते ॥६॥
वासुदेव म्हणे सत्यवती खिन्न । जाहली ऐकून पतिवच ॥७॥

११०
प्रार्थितां मुनींसी बोलले ते तिज । पौत्र तव क्रूर होवो तरी ॥१॥
पुत्र जमदग्नि जाहला तियेसी । नदी ती कौशिकी पुढती होई ॥२॥
रेणूची जे कन्या ‘रेणुका’ नामक । कांता जमदग्नीस प्राप्त झाली ॥३॥
वसुमना आदि पुत्र तियेप्रति । कनिष्ठ तो जगीं ख्यात राम ॥४॥
विप्रसंरक्षण धर्म क्षत्रियांचा । विसरले तदा क्षत्रिय तें ॥५॥
छळचि विप्रांचा मांडिला तयांनीं । वासुदेव ध्यानीं घ्यावें म्हणे ॥६॥

१११
ईश्वरांश राम भूमिभार हरी । शासन तो करी क्षत्रियांसी ॥१॥
वृत्तांत तो आतां निवेदिती शुक । अर्जुन विख्यात हैहयकुळीं ॥२॥
ईश्वरांशदत्तकृपेनें तयासी । सहस्त्र बाहूंची प्राप्ति होई ॥३॥
तेणें तो अजिंक्य होई सकलांसी । वैभव संपादी त्रैलोक्याचें ॥४॥
वासुदेव म्हणे ऐसा राव श्रेष्ठ । नर्मदातीरास प्राप्त झाला ॥५॥

११२
जलक्रीडेस्तव पात्रीं उतरुनि । सहस्त्र बाहूंनीं अडवी जळ ॥१॥
त्याच दिनीं तयातीरीं दशकंठ । सेनेसवें प्राप्त झाला होता ॥२॥
नर्मदेच्या तीरीं तळ त्या सैन्याचा । रावणही पूजा करी तेथें ॥३॥
इतुक्यांत जल कोंडिलें जें तेणें । सैन्य दुष्टासवें बुडूनि जाई ॥४॥
अपराधें तया कोपे दशकंठ । करावया युद्ध सिद्ध होई ॥५॥
मर्कटासम त्या बांधूनि अर्जुन । करुनि अपमान मुक्त करी ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसा तो विक्रमी । अर्जुन काननीं सहज फिरे ॥७॥

११३
जमदग्निमुनिआश्रमासन्निध । एकदां सहज येई राव ॥१॥
कामधेनुसाह्यें स्वागत तयाचें । पाहूनियां, कोपे राव मनीं ॥२॥
ऐश्वर्य मुनींचें सहन न तया । पाश तैं बांधिला धेनूलागीं ॥३॥
बलात्कारें तिज चालला घेऊनि । नव्हता आश्रमीं राम तदा ॥४॥
येतांचि तयासी कळले हें वृत्त । होई अति क्रुद्ध तदा राम ॥५॥
परशु, चापही करुनियां सज्ज । गजावरी सिंह तैसा धांवे ॥६॥
वासुदेव म्हणे गांठिले अर्जुना । युद्ध तया स्थाना घोर होई ॥७॥

११४
येईल जें सैन्य वधी तया राम । अक्षौहिणी सैन्य सप्तदश ॥१॥
मांस-रुधिराचा कर्दम त्या ठाईं । क्रोधाकुल होई अर्जुन तैं ॥२॥
पंचशत चापें घेऊनियां करीं । रामावरी करी शरवृष्टि ॥३॥
छेदिले ते बाण सर्वही रामानें । ताडी तैं वृक्षानें अर्जुन त्या ॥४॥
वृक्ष पर्वत ते येतां अंगावरी । नवलचि करी राम तदा ॥५॥
समस्तही वृक्ष तेंवी कंठनाळ । छेदूनियां काळ होई त्याचा ॥६॥
वासुदेव म्हणे पुत्र तदा त्याचे । पलायन साचें करुनि गेले ॥७॥

११५
कामधेनु घेऊनियां येई राम । पित्यासी वंदून अर्पी तया ॥१॥
वर्तमान सर्व तेंवी त्या निवेदी । ऐकूनि पित्यासी खेद वाटे ॥२॥
जमदग्नि म्हणे विक्रमी तूं बाळा । नृपाळ वधिला देवरुपी ॥३॥
योग्यता पातलों क्षमेनेंचि रामा । भूषण ब्राह्मणा क्षमा हेंचि ॥४॥
क्षमेनेंचि ब्रह्मा उच्चपद ल्याला । त्यागूनि क्षमेला वरिलें पाप ॥५॥
केवळ हत्या न, ब्रह्महत्येहूनि । नृपाळ वधूनि पाप लागे ॥६॥
ईशचिंतनें तूं करीं तीर्थाटन । पापाचें क्षालन करीं तव ॥७॥
वासुदेव म्हणे जमदग्नि ऐसें । प्रायश्चित्त सांगे परशुरामा ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP