स्कंध ६ वा - अध्याय १७ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


७७
राया परीक्षिता, विद्याधररुप । झालें होतें प्राप्त नृपाळासी ॥१॥
वंदूनि शेषासी मेरुवरी जाई । लक्षावधि राही अब्दें तेथें ॥२॥
एकदां कैलासीं गेला विमानांत । बैसूनि, जें प्राप्त विष्णुकृपें ॥३॥
पाही तैं भवानी शिव वाम अंकीं । हस्त एक स्कंधीं होता तिच्या ॥४॥
पाहूनि तें राव खदखदां हांसे । बोले सकलांतें उच्चस्वरें ॥५॥
ज्ञाता म्हणवूनि निर्लज्ज हा ऐसा । सभेमाजी कैसा बसला तरी ॥६॥
सामान्य जनही घेती निज अंकीं । आपुल्या कांतेसी एकांतांत ॥७॥
ऐकूनि हांसले शिवही मोठयानें । कर्म अज्ञानाचें जाणूनियां ॥८॥
तेणेंचि सभ्यही बोलले न कांहीं । परी क्रोध येई सतीलागीं ॥९॥
वासुदेव म्हणे दुष्कर्माचें फळ । लाभे परस्पर दुर्जनांतें ॥१०॥

७८
सती म्हणे आम्हांसम निर्लज्जांसी । शिक्षा, करायासी नेमिलें या ॥१॥
आजवरी कोणी शिवाप्रति दोष । दिधला नाहींच ब्रह्मादिकीं ॥२॥
मूर्खचि ते काय शाहाणा हा एक । घेईल उन्मत्त दैत्यजन्म ॥३॥
ऐकूनि तो शाप सोडूनि विमान । बोलला वचन चित्रकेतु ॥४॥
माते, ईश्वरेच्छा जाणूनि हा शाप । स्वीकारिला अद्य आनंदानें ॥५॥
कर्ता-करविता एक नारायण । कोणाप्रति कोण दु:खदाता ॥६॥
दुरुत्तर जरी वाटतें । क्षमावें मजसी हेचि इच्छा ॥७॥
वासुदेव म्हणे बोलूनियां ऐसें । निर्भय स्वमार्गे निघूनि गेला ॥८॥

७९
चित्रकेतुकर्मे सतीसी विस्मय । पाहूनियां शिव वदले तिज ॥१॥
प्रिये, विष्णुसेवाव्रत जयांप्रति । शापानुग्रहांची चिंता न त्यां ॥२॥
ज्ञानवैराग्यचि सामर्थ्य तयांचें । भेदभाव त्यांतें नसे कांहीं ॥३॥
प्रिये, चित्रकेतु नारायणभक्त । भोगील सानंद कर्मफल ॥४॥
विस्मय सतीचा गेला तें ऐकूनि । प्रति शापवाणी वदला नाहीं ॥५॥
चित्रकेतु भक्त त्वष्टयाचा तो पुत्र । होई वृत्रासुर दैवयोगें ॥६॥
दैत्यही असूनि भक्तो तो यास्तव । ऐकें हें चरित्र पुण्य तया ॥७॥
वासुदेव म्हणे सद्गति तयासी । ऐकें हें प्रभातीं चरित्र त्या ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP