स्कंध ५ वा - अध्याय १२ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


७२
राव म्हणे मुने, प्रत्यक्ष तूं ज्ञान । देहावरी भान नसे तुझें ॥१॥
वेष हा अपूज्य अनादरकारी । भाषण निवारी सकल ताप ॥२॥
तत्त्वांशी संबंध नसे व्यवहाराचा । वदलासी त्याचा अर्थ कथीं ॥३॥
मुनि म्हणे राया, मृत्तिकेच्या स्कंधीं । विराजली माती पालखी ते ॥४॥
रहुगुणनामें मृत्पिंडचि एक । बैसविला त्यास म्हणती राव ॥५॥
पिंडावरी तया ठेवूनि अभिमान । राव मी म्हणून तुष्ट होसी ॥६॥
वाहकांसी पीडा देऊनि पालक । प्रतिष्ठा हे व्यर्थ धरिसी नृपा ॥७॥
वासुदेव म्हणे नि:स्पृह सर्वज्ञ । मुनींचें भाषण दिव्यांजन ॥८॥

७३
राया, सदय तूं अथवा निर्दय । करुनि विचार ठरवीं मनीं ॥१॥
स्थावर जंगम पार्थिव हें सर्व । पावतें विलय पृथ्वीमाजी ॥२॥
नामरुपाविण अन्य काय असे । केंवी व्यवहारातें सत्य मानूं ॥३॥
पृथ्वी परमाणु सर्वचि हे माया । भ्रमामाजी जीवा पाडीतसे ॥४॥
राया, एक आत्मज्ञान मात्र सत्य । महत्संगें लाभ घडे ज्याचा ॥५॥
पुण्यकथागानीं दंग जे सर्वदा । निवृत्त सद्भक्तां करिती तेचि ॥६॥
वासुदेव म्हणे मुनि नृपाळासी । चरित्र कथिती आपुलेंचि ॥७॥

७४
राया, विषयासक्त मन । भ्रष्ट करील हें जाण ॥१॥
योगीयांसीही आसक्ति । भ्रष्ट करील हे चिंतीं ॥२॥
राया, माझें पूर्ववृत्त । असे विस्मयकारक ॥३॥
धरिली मृगाची आसक्ति । तेणें मृगदेहप्राप्ति ॥४॥
आठवती पूर्वजन्म । कृष्णभक्तीनें ते जाण ॥५॥
तेणें जनसंसर्गाची । नित्य मानीतसें भीति ॥६॥
यास्तवचि ऐसा वेष । नृपश्रेष्ठा, रुचे मज ॥७॥
नित्य साधुसमागम । तेंवी सत्कथाश्रवण ॥८॥
करुनि व्हावें जीवन्मुक्त । वासुदेव ऐके बोध ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP