श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्‍गुरुवेनम: ।  श्रीरामसमर्थ ।
अधर्म वाढला गहन । बळावले अति दुर्जन । साधूसंताचें छळन । मांडिलें बहुत ॥१॥
कुलस्त्रिया भ्रष्टविती । सध्दर्मासी निंदिती । धेनू कसाया अर्पिती । हायहाय दुर्दिन ॥२॥
कन्याविक्रय कित्येक करिती । परधर्म बहु स्विकारिती । स्वधर्मीही आचार सांडिती । राहिले आडनांवाचे ॥३॥
कांहीं केवळ श्रध्दावान । आदरें करिती स्वधर्माचरण । परी मार्गदर्शक त्यालागून । अनुभव ज्ञानी मिळेना ॥४॥
बाह्यस्थिती विपरित । तेणें चित्त होय विस्खलित । श्रध्दा डळमळोनि येत । साधनी विक्षेप ॥५।
बोलके पंडीत ते किती । धर्म ज्ञानी ह्मणविती । परी आचार आणि नीती । विपरीत दिसे ॥६॥
असो ऐशा समयाला । सद्‍गुरु माहाराज अवतरला । बहुतांसी आश्रया झाला । तेंचि पुढती कथन करूं ॥७॥
हिंसाधर्मी वाढले जन । नित्य करिती पशुहनन । बळेच विरुध्दाचरण। करावया सुख वाटे ॥८॥
ह्र्दयस्थी जनार्दन । हे शास्त्राचें वचन । जीवशिवांचा योग जाण । अति निकट ॥९॥
जीव जितुका जगद वीर । ऐसा शास्त्रांचा विचार । देहममत्व अनिवार । लागेल माया संयोगें ॥१०॥
देहासी करितां दंडण । जीवासी दु:ख होत दारुण । पाहवें प्रत्यक्षप्रमाण । आपुलेपाशीं ॥११॥
यास्तव अहिंसा मुख्यसार । दुखवूं नये कोणाचे अंतर । जीव तितुके परमेश्वर । मानीत जावें ॥१२॥
हाचि असे मुख्य नेम । त्यांतहि भेद असती सूक्ष्म । सत्वप्रधान निरुपद्रवी परम । जीव तरी दुखवूं नये ॥१३॥
श्रीहरीची पूजास्थानें । गाई ब्राह्मण वन्हीजीवनें । अतिथी प्रतिमा स्थानें । वृक्षादी अनेक ॥१४॥
यांतील जी देवगाय । आह्मा भारतीयांची माय । तिचा करोनि विक्रम । घात करिती आपुला ॥१५॥
माय देती कसाबाहातीं । त्यात्या जिण्या पडो माती । तदुपकाराते नेणती । आज्ञानांध जन झाले ॥१६॥
वेद शास्त्रें वर्णिली कीर्ति । तेहतीस कोटी देव वसती । रोमरंध्री ऋषी राहुती । ऐसी धेनू पवित्र ॥१७॥
ब्रह्मा विष्णु महेश । पाठीपोठी मुखास । चंद्रसूर्य नेत्रास । राहोनिया शोभविती ॥१८॥
अष्टदिक्पाळभैरव । आदित्यादी ग्रहसर्व । तेहतीस कोटी राहती देव । उदरामाजीं जियेच्या ॥१९॥
मुत्रस्थानीं गंगा राहे । पय प्रत्यक्ष अमृत पाहे । पुच्छी नाग शोभताहे । धन्य जियेचें दर्शन ॥२०॥
जियेचें जिणें परोपकारी । जी सदा निर्विकारी । पुत्रपौत्रासह चाकरी । मानवाची करितसे ॥२१॥
तेचि मानव निष्ठुरपणें । कृत्य करिती लाजिरवाणें । वत्सपरी पय सेवणें । उपकार फेडिती गळफासें ॥२२॥
पूत्रक्षेत्र सोज्वळ करी । धान्यराशी पडती घरीं । दुष्ट तयासी संहारी । वाहवारें युगधर्म ॥२३॥
जियेचें मलमूत्र आणि पय । अगणित उपकार हेचि ध्येय । शरीर स्वास्थ्याची सोय । निर्मिली देव ॥२४॥
अपस्मारादी धर्मरोग । रक्तदोषी अनंत भोग । जीर्णज्वर पांडूरोग । क्षयादी नाश पावती ॥२६॥
ह्रदयसंबंधी विकार मूत्रकृछें पित्तें विखार । दाहोन्माद श्रमपरिहार । अमृत मर्त्यलोकीचें ॥२७॥
तैसेचि बहुरोगांसी । पथ्यकर वदती भिषगऋषी । बालतरुण वृध्दासी । अनायासे पचतसे ॥२८॥
सर्वासी दे समाधान । रुचिकर मधुर असे जाण । देवा प्रिय सत्वप्रधान । गोदुग्ध जाणावें ॥२९॥
मायदुध दोषी झाले । गोदुग्ध पाजिती भले । दुजीमाय नेणोनी भ्रमले । आश्चर्यवाटे ॥३०॥
तैसाचि गोमुत्रप्रताप । दर्शनें हरतें पाप । प्राशनें निरसे बहुताप । व्याधीजन्य विकार ॥३१॥
सेविता वाढते बुध्दी । औषधामाजीं महौषधी । कफ आणि वात व्याधी । पासोनि करी निर्मुक्त ॥३२॥
कुष्ठ गुल्म आणि उदर । पांडू अर्ष कंडूविकार । नेत्ररोग साथीचे ज्वर । पाठवी दूरदेशीं ॥३३॥
क्षार रक्त शुध्दी करित । नाना जंतू निवारित । अरुची जाउनी अल्हाद देत । मानवासी गोमूत्र ॥३४॥
गोमय तेंही प्रसिध्द । देव महानुभाव सिध्द । सर्वासी प्रिय असे शुध्द । महिमा किती वर्णावा ॥३५॥
हवा शुध्द करावयासी । दुजी वस्तू नसे ऐसी । मत्कुणादि कृमीसी । होऊंच नेदी ॥३६॥
पय प्रधान पित्तनाशीं । मूत्र कफातें निरसी । गोमय वातशुध्दीसी । करतं मानवहितार्थ ॥३७॥
ऐसी ही मायधेनु । साक्षात हीच कामधेनू । उपकृतीवांचूनि आनू । कार्य नसे जियेचें ॥३८॥
जे जे इचा घात करिती । ते आपुला घात योजिती । ऐसें इतिहास सांगती । दृष्टी फिरवा माघारी ॥३९॥
परी या कलीची राहाटी । पुराणेच ह्मणती खोटी । तेथें काय सांगाव्या गोष्टी । दृष्टांतरुपें ॥४०॥
परी प्रत्यक्ष उपयोग होतो । हा तरी प्रत्यय येतो । म्हाणोनि सकळांसी विनवितों । उपेक्षा न करा धेनुची ॥४१॥
असो इतुकें सांगावया काज । गोपालक महारज । गोरक्षण धर्मबीज । असें एक ॥४२॥
प्रसिध्द क्षेत्र म्हसवडासी । हाट भरे प्रति वारासी । धेनू नेती गळफासी । दुष्ट कसाब कितिएक ॥४३॥
सद्‍गुरु तेथें जावोनी । सांगती तें मोल देवोनी । असंख्य धेनू आणती सदनीं । प्रति वारासी ॥४४॥
भव्य गोशाळा बांधोन । आदरें करिती संरक्षण । अभ्यंकर कारकून । नेमिले तयावरी ॥४५॥
वरचेवरी किती येती । गोप्रदानें किती जाती । पाहतां वाटे ही शक्ती । मानवी नव्हे ॥४६॥
सुकाळीं नेती पाळावयासी । दुष्काळीं सोडिती गुरुपाशीं । वेचिती किती धनराशी । देव जाणे ॥४७॥
गंगी नामें गाय लंगडी । सदा गुरुची पाठ न सोडी । दर्शनाची अति गोडी । पशुसही वाटतसे ॥४८॥
गोशाळेंत सद्‍गुरुस्वारी । जाऊनि बैसे वरचेवरी । झाडलोट करिती साजिरी  । स्वहस्तें आनंदे ॥४९॥
गोसेवा करावयासी । लाविले माहारोगीयांसी । मुक्त झाले बहुतांशीं । गोसेवा सुकृतें ॥५०॥
गाईची सेवा करितां । संतुष्ट होती समस्त देवता । गृहीपीडा न बाधे सर्वथा । मनकामना सफल होय ॥५१॥
धेनू माय जयाचे गृहीं । पय:पान करिती पाही । गोमयें सारविती मही । सडे घालिती साजिरे ॥५२॥
क्वचित गोमुत्र सेविती । धेनुसंन्निध वास करिती । तयांची प्रगल्भ होय मती । निरोगी राहती सर्वकाळ ॥५३॥
सत्वगुण नांदे तेथें । संतती ब्ळवान होते । भाग्य नाही शांतीपुरतें । भोगिती तें अनायासें ॥५४॥
वांझ गाईची सेवा करी । तरी पुत्र खेळतील तिचे घरीं । गोप्रदानें यमपुरी । वैतरणीनें पैलपार ॥५५॥
द्विमुख गाईसी प्रदक्षिणा । घालितां त्रिभुवनासी जाणा । प्रदक्षिणेचे फल तयांना । मिळील निश्चयें ॥५६॥
सवत्स धेनू दान करितां । पृथ्वीदान फल ये हातां । दान घे त्यासी समर्थता । असावी मात्र ॥५७॥
गाईसी घालिती चारा । सुख होईल समस्त पितरां । आशिर्वाद देती तया नरा । पुत्र धन समृध्दी ॥५८॥
वासुदेव स्वयें सेवा करित । तेथें मानवाची काय मात । दत्त गोरक्ष समर्थ । ऋषी सिध्द महामुनी ॥५९॥
असो गोसेवी ऐसी । सद्‍गुरु करिती आदरेसी । करविती बोधिती सकलांसी । गोसुश्रुषा करावी ॥६०॥
एकदा ऐसा प्रकार घडला । खाटिक आले गोंदावलीला । संगें घेवोनी धेनूला । वधावयासी चालिले ॥६१॥
मार्गे गोंदावलीस येतां । वार्ता कळली सद्‍गुरुनाथा । पाचारुनी तयां समस्तां । वदती गाई न न्याव्या ॥६२॥
यांचे मोल आम्ही देतों । आदरें सर्व संरक्षितों । तुम्हांसीही ऐसें कथितों । मायवध न करावा ॥६३॥
चिंताग्रस्त झाल्या दिसती । पुढील भविष्य आणोनि चित्ती । दीन वदनें करूणा भाकिती । हाय हाय युगधर्म ॥६४॥
अश्रु ढाळिती नयनांतुनी । गोडा न लागे अन्नपाणी । दिसूं लागली यमजाचणी । प्राणांतसमयाची ॥६५॥
जीव प्रिय सकलांसी । कल्पना करा तुम्हीं मनासी । भेटी झालिया व्याघ्रासी । काय अवस्था होईल ॥६६॥
कसाई वदती निष्ठुर । अज्ञानीं पशू हे साचार । कोठली या ज्ञान विचार । असेल तरी दावावें ॥६७॥
निबंर्धन करुनि चारा । घालितो तुम्हीं हाका मारा । जरी असेल ज्ञान झरा । तरी धांवोन येतील ॥६८॥
धांवोन येता समस्त । सोडून देऊं नेमस्त । ना तरी शीघ्र वधाप्रत । नेऊं सत्य जाणावें ॥६९॥
सद्‍गुरु तया रुकार देती । दुष्ट कसाई तैसें करिती । दूर राहोन पाचारिती । नामें घेवोन गुरुराव ॥७०॥
गंगे यमुने गोदावरी । तुंगे कृष्णे ये सत्वरी । कपिले वारणी आणि मधुरी । दासासमीप धावा गे ॥७१॥
ऐसें वदतां ते अवसरी । धांवोन येती चट स्वारी । कोणी शेंपूट उभारी । कोणी फोडी हंवरडें ॥७२॥
पाद चाटोन क्षालन करिती । कोणी मुखाकडे पाहती । कांही उगाच हुंगिती । सद्‍गुरुराज यांसी ॥७३॥
भोंवती धेनूंचा समुदाव । मध्यें शोभे सद्‍गुरुराव । वाटे दुजा वासुदेव । वृंदावनीं उभा असे ॥७४॥
असो ऐसी घडतां स्थिती । अनुताप पावले दुर्मती । ढळढळा अश्रु ढाळीइती । अति पातकी ह्मणोनि ॥७५॥
सद्‍गुरु केवळ दयामूर्ती । सकळांसी भोजन घालिती । पुनरपी ऐसी नीचवृत्ती । सर्वथ तुह्मी न करावी ॥७६॥
असो मोल देवोनी तयांसी । पाठविलें स्वसदनासी । ऐसी अस्था श्रीगुरुसी । धेनूविषयीं अतिशय ॥७७॥
कृष्णराव गांवकामगार । धनगरी भिकवडीकर । श्रीगुरुपासोन चार । धेनू नेती पाळावया ॥७८॥
परी बहु आनास्था केली । जनावरें मरों घातली । दृष्टांत होय ते काळीं । गाई शीघ्र आणाव्या ॥७९॥
वदती चालण्य़ा शक्ती नाहीं । तरी रामतीर्थ लवलाही । देवोन पोचवी पाही । अनास्था त्वां बहु केली ॥८०॥
गायी येतां गळां पडती । बाई भोगिल्या विपत्ती । येक गाय रामापुढती । मरतां गंगा घातली ॥८१॥
करविती सकलां नामगजर । गुरुक्षेत्र वाटे काशीपूर । अंतकाळी गुरुवर । प्राणियां देती सद्गती ॥८२॥
वामनराव पेंढारकर । मोरगिरी मंदिराचे भक्त थोर । त्यांचे पुत्राचा समाचार । श्रोतेजनीं परिसावा ॥८३॥
बहुतां दिवशीं सुत झाला । परी देहव्याधीनें पीडिला । गुरुदर्शना आणिला । गोंदावले ग्रामीं ॥८४॥
काळवेळ जवळी आली । ती श्रींनीं जाणितली । गंगा घातली मुखकमलीं । तुळशी कर्णरंध्रांत ॥८५॥
पित्याहस्तें गोप्रदान । स्वसंकल्पें देववोन । अज्ञान अर्भका उपदेशोन । वैकुंठासी धाडिती ॥८६॥
रामापुढती ठेवोन । करा ह्मणती सर्वही भजन । दशदानें देववोन । बाल नेलें मोक्षासी ॥८७॥
ब्रह्मानंद स्वहस्तेसी । दहन करिती बालकासी । कर्पूर तुळशी चंदनासी । इंधनीं त्या घालोन ॥८८॥
मायबाप असोन जवळी । अश्रू न ढाळिती ते वेळीं । महदाश्चर्य मानिती सकळे । धन्य गुरुंचें बोधामृत ॥८९॥
लग्नसोहळा मृतसोहळा । गुरुगृहीं एकचि लीला । मायोद्भव विकाराला । पुसे कोण ॥९०॥
आणिक एकदां ऐसें झालें । मंदिरापुढती गाढव पडलें । प्राणांत व्याधीनें ग्रासिलें । दैवें आले संतद्वारीं ॥९१॥
यमपाशी जीन ओढें । लोभें देहीच तड्फडें । शिष्यें कथितां पवाडे । दयासागर ते ठाय़ीं ॥९२॥
गंगा घालोन मुखांत । अंगावरोन फिरविती हात । पवित्र नामगजरांत । सद्गती देती तयासी ॥९३॥
येणें प्रकारें बहुतांसी । अंती नेती सद्गतीसी । समास विस्तार भयासी । धरोन संकेत दाविला ॥९४॥
सकळां भूतीं दया समान । परी आदरें गोसुश्रुषण । करिती काल जाणोन । श्रोते पुढती अवधारा ॥९५॥
दुजें देवपूजास्थान । गरीब सत्पात्र ब्राह्मण । अतिथी मानवी अन्नदान । करिती पुढें परिसावें ॥९६॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते नवमोध्यायांतर्गत द्वितीय समास:। ओवीसंख्या ॥९६॥
॥ श्रीसद्‍गुरुपादुकार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP