कलीचा महिमा - ६२२१ ते ६२३५

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६२२१॥
कलिधर्म मागें सांगितलें संतीं । आचार सांडिती द्विजलोक ॥१॥
ते चि कळों आतां येतसे प्रचिती । अधर्मा टेंकती धर्म नव्हे ॥२॥
तप व्रत करितां लागती सायास । पाळितां पिंडास गोड वाटे ॥३॥
देव म्हणऊनि न येती देऊळा । संसारा वेगळा तरी कां नव्हे ॥४॥
तुका म्हणे मज धरितां गुमान । ऐसे कोणी जन नरका जाती ॥५॥

॥६२२२॥
कलयुगामाजी थोर झालें बंड । नष्ट लोक लंड झाले फार ॥१॥
न धरिती सोय न पुसती कोणा । येतें जैसें मना तैसें चाले ॥२॥
सज्जनाचा वारा टेकों नेदी द्वार । ऐसिया पामरा तारी कोण ॥३॥
विश्वास तयाचा बैसेना कोठेही । स्तुती निंदा पाहीं जीवीं धरी ॥४॥
तुका ह्मणे कैसें केलें नारायणें । जाणावें हें कोणें तयाविण ॥५॥

॥६२२३॥
बायलेचा बोल मनासी लागला । त्याणें तो त्यागिला मायबाप ॥१॥
बहीण ते भाऊ सर्वही त्यागिले । सुखी केलें बायलेचें ॥२॥
बायलेच्या गोता आवडीनें पोशी । आदर तयासी पाहुणेर ॥३॥
एक भाव मन सन्मुख तिष्टत । तेणें मी पतीत आज्ञा करा ॥४॥
तुका ह्मणे ऐसा आहे कलीधर्म । परी नेणे वर्म गाढवाचा ॥५॥

॥६२२४॥
ऐका कलीचें हें फळ । पुढें होईल ब्रह्मगोळ ॥१॥
चारी वर्ण अठरा याती । भोजन करिती एके पंक्ती ॥२॥
पूजिती असुरां रांडा । मद्य प्राशितील पेंढा ॥३॥
वामकवळमार्जन । जन जाईल अध:पतन ॥४॥
तुका हरिभक्ति करी । शक्ति पाणी वाहे घरीं ॥५॥

॥६२२५॥
गुरुमार्गामुळें भ्रष्ट सर्वकाळ । ह्मणती याती कुळ नाहीं ब्रह्मीं ॥१॥
पवित्राला ह्मणती नको हा कंटक । मानिती आत्मिक अनामिका ॥२॥
डोहोर होलार दासी बलुती बारा । उपदेशिती फारा रांडापोरां ॥३॥
कांहीं टाण्या टोण्या विप्र शिष्य होती । उघडी फजिती स्वधर्माची ॥४॥
नसता करुनी होम खाती एके ठायीं । ह्मणती पाप नाहीं मोक्ष येणें ॥५॥
इंद्रियांचे पेठे भला कौल देती । मर्यादा जकाती माफ केली ॥६॥
नाहीं शास्त्राधार पात्रापात्र नेणे । उपदेशून घेणें द्रव्य कांहीं ॥७॥
तुका ह्मणे ऐसे गुरु शिष्य पूर्ण । विठोबाची आण नरका जाती ॥८॥

॥६२२६॥
तुह्मां सांगतों कलयुगा फळ । पुढें होईल ब्रह्मगोळ ॥१॥
आह्मां ह्मणतील कंटक । ऐसा पाडिती दंडक ॥२॥
स्त्रिया पूजुनि सर देती । भलते स्त्रियेसि भलते जाती ॥३॥
श्रेष्ठ वर्ण वेदविद्वांस । अंगीकारी मद्यमांस ॥४॥
चारी वर्ण अठरा याती । कवळ करिती एक पंक्ती ॥५॥
ह्मणती अंबेचा क्रीडाकल्लोळ । शिवरुप प्राणी सकळ ॥६॥
ऐसें होईल शकुन देतों । अगोदर सांगुन जातों ॥७॥
तुका सद्गुरुदास्य करी । सिद्धि पाणी वाहे घरीं ॥८॥

॥६२२७॥
त्या हरिदासांची भेटी घेतां । नर्का उभयताही जातां ॥१॥
माते परीस थोरी कथा । भाड घेतां न लाजे ॥२॥
देतां घेतां नरकवासी । उभयतांसी रवरव ॥३॥
तुका ह्मणे नरकगांवा । जाती हांवा भरोनि ॥४॥

॥६२२८॥
पापाचिया मुळें । झालें सत्याचें वाटोळें ॥१॥
दोष झाले बळिवंत । नाहीं ऐसी झाली नीत ॥२॥
मेघ पडों भीती । पिकें सांडियेली क्षिती ॥३॥
तुका ह्मणे कांहीं । वेदां वीर्य शक्ति नाहीं ॥४॥

॥६२२९॥
सांगितले संतीं कलीधर्म मागे । ते आले प्रसंगें आजि कळों ॥
आचार ते भ्रष्ट होती जन लोक । आले सकळीक प्रचितीसी ॥२॥
अधर्मा टेंकले श्रेष्ठाश्रेष्ठ वर्ण । धर्म नव्हे मान राहे कैसा ॥३॥
तुका ह्मणे आन पाती ह्मणूं काय । श्रेष्ठ जनीं होय सांडियली ॥४॥

॥६२३०॥
ऐशी कलीची राहाटी । पडे असत्यासी मिठी ॥१॥
तेणें नामामृता कोणी ॥ वाम मार्गी शिरोमणी ॥२॥
मान दंभ संवसाटी । वर्म चुकली करटी ॥३॥
व्रत सांडुनियां नेम । वाड झाले ते अधम ॥४॥
धनलोभी मन ॥ केलें पाहिजे प्रयत्नें ॥५॥
तुका ह्मणे रांड पुत्र । नेणे सांगती जें शास्त्र ॥६॥

॥६२३१॥
ऐका कलीचा आचार । रिझे असत्यासी नर ॥१॥
शुचिर्भूत संध्यास्नान । दावी वरी वरी जन ॥२॥
जप मंत्र नित्य नेम । दावी लोकांसी संभ्रम ॥३॥
मुखें बोले फार । तैसें न करी साचार ॥४॥
सर्व बाह्य रंग । तेथें कैंचा पांडुरंग ॥५॥
तुका म्हणे तेथ । कैसा राहे दिनानाथ ॥६॥

॥६२३२॥
हिंदु तुरकासी तुझें दास्यपण । काय उंच जाण मिरवितां ॥१॥
निर्दया खाटिकी अविद्या महारी । हे तुम्हाअंतरीं नांदताहे ॥२॥
काम तो चाम्हार क्रोध तोचि मांग । कैसी यानें चांग उंच तुम्हां ॥३॥
दासीवेश्येघरीं तुमचें मैथून । म्हणतां ब्राम्हण लाज नये ॥४॥
बीज समाऊनी मांस ही भक्षिती । काय ते फजिती सांगों आतां ॥५॥
इतुकें बोलणें कासया लागतें । सोंवळें नसतें तुम्हा कोणा ॥६॥
बाबाजीसद्गुरुदास तुका म्हणे । परिसा ब्राम्हण कलियुगीं ॥७॥

॥६२३३॥
ऐसें कलिमहिमान । वर्ते अनिवार जन ॥१॥
नवनीता न पुसती । सर्वकाळ सुरापती ॥२॥
आगी लागो त्याच्या तोंडा । काय शिवणें त्या लंडा ॥३॥
तुका म्हणे घडीपळ । तेथें कैंचा तो गोपाळ ॥४॥

॥६२३४॥
बाईलेच्य गोता । पोसी तिच्या मनोगता ॥१॥
मायबाप दुसर्‍याचे द्वारीं । दोघें म्हातारा म्हातारी ॥२॥
ऐसें कलीचें महिमान रक्षी बाइलेचें मन ॥३॥
तये घरीं कैसी उरी । सुना डांखिणीच्या परी ॥४॥
तुका म्हणे दोघी सीमा । तेथें बोलण्या झाली सिमा ॥५॥

॥६२३५॥
ऐका कलीचें महिमान । असत्यासी रिझले जन ॥
पहा पहा देती अनुमोदन । हेळणा करिती संतांची ॥१॥
गीता लोपली गायत्री । चमत्कार सांडिला मंत्रीं ॥
अश्वासहित त्या कुंवारी । विक्रा करिती ब्राह्मण ॥२॥
अहो पुत्र पित्यापाशीं । सेवा घेती सेवकां ऐसी ॥
भार्या भ्रतारासी । रंका समान मानिती ॥३॥
मधु पाण्याची शिराणी । नवनीतासी न पुसे कोणी ॥
पतिव्रता दैन्यवाणी । जारिणी खेळती ॥४॥
अपिक पिके बहुत वस । गाई ह्मैसी सांडिला रस ॥
नगर दिसतसे उदास । बहुत पाखांड पिकलें ॥५॥
अहो पंढरीनायका । काय पाहतोसी कवतुका ॥
कळीनें गांजितलें लोकां । हाकामारी तुका ह्मणे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP