चिद्बोधरामायण - द्वितीय सर्ग

बालकांड
निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


(रामहृदयकथन)
शिखरिणी.

नमी पादांभोजा तुहिनगिरिकन्या सुमनसे
अनाथाच्या नाथा त्रिजगपतिला हें गुज पुसें ।
कधीं झाला ? कैसा ? रघुपति महीजा हनुमता
कथावा जीं स्वामी अति विमल संवाद पुरता ॥१॥

स्त्रग्धरा.
बोले कैलासराणा परिस भगवती राम चिद्बोधराशी
आला लंकाधिपातें वधुनि निजपुरा पूर्ण - कामी विलासीं ।
शोभे सिंहासनी जो भरत-हनुमता लक्ष्मणद्या समेतें
वामांकी राजकन्या सुरतरुसि जशी कल्पवल्ली विभूतें ॥२॥

भुजंगप्रयात
नमी मारुती सादरें पादपद्मा रमावल्लभा राघवा सौख्यसद्मा ।
महत्कार्यकारी निराकांक्षबुद्धी मनीं सर्वदा इच्छितो मोक्षसिद्धि ॥३॥
रघूनायकें भक्तचूडामणीतें विलोकूनियां बोलिजे जानकीतें ।
नसे भृत्य ऐसा जगी अन्य कोणी वदे याजला तत्व विज्ञानखाणी ॥४॥

वसंत तिलका.
साधु प्रसन्न कृतकार्य गुणाढ्य धीर वैराग्यपूर्ण गुरुभक्त महा उदार ।
ऐशांसि गुह्य कथिजे अति सार जें कीं जें कां प्रकाश करि साधुजनासि लोकीं ॥५॥

स्वागता.
रामचंद्र सकृपें हनुमंता तत्व सांग म्हणतां मग सीता
तोषयुक्त वदली जगदंबा चित्कळा अमितसौख्य कदंबा ॥६॥

भुजंगप्रयात.
सीता - परब्रह्म हा सच्चिदानंदरासी असें जाण या मारुती राघवासी ।
गुणातींत सर्वा उपाधी निराळा कदा नाढळे वृत्ति वाणी मनाला ॥७॥

वसंततिलका.
आनंद निर्मल निरंजन निर्विकारी सर्वाद्य सर्वगत चिन्मय सौख्यकारी ।
नित्यप्रकाश निजबोध सुखस्वरुप योगींद्रमानसमहालयरत्नदीप ॥८॥

शार्दूलविक्रीडित.
मी मूळप्रकृती जगतत्रिजननी इच्छा रची सर्वही
पाळी अंत करी क्षणांत सहसा तत्सन्निधानें मिही ।
तत्सत्ते करणें मला, अबुध ते आरोपिती चिद्‍घनीं
माझें कृत्य, परंतु राघव विभू साक्षी धरी हे मनीं ॥९॥
साकेता नगरीं प्रभू अवतरे श्रीसूर्यवंशांतरीं,
झाला साह्य मुनीस यज्ञकरणीं, संहारिले संगरी ।
मारिचादि, मुनींद्रागौतमसती उद्धारिली ते शिळा,
भंगी चाप, मला वरी, भृगुपती निवीर्य तो धाडिला ॥१०॥
किंचित्काळ वसोनिया निजपुरीं जाणें घडे दंडका,
तेथें दुष्ट विराध राघव वधी सद्‍ब्राह्मणाद्वेषका ।
मायावीमृग -नाश, मद्धरण, तैं शुद्धीस हिंडे तदा
झालें सुग्रिव-सख्य, आणि वधिलें वाळीभटा दुर्मदा ॥११॥
सीतामार्गण सिंधुबंधन महायुद्धीं दुरात्मा बळी
निर्दाळी दशकंठ पुत्रसह तो सामात्यसेनावळी
लंका-राज्य बिभीषणासि दिधलें चंद्रार्क जों मेदिनी
आला या शरयूतटासि भरता भेटोनि तोषे मनीं ॥१२॥

शिखरिणी.
अशीं कृत्यें सारीं करुनि जगिं दावी गुणमयी
मला नेणोनीयां अबुध गणती राम विषयी ।
अखंडानंदी जो अगुण अविकारी विलसतो,
असा योगें माझ्या तरि सगुण साकार दिसतो ॥१३॥

स्त्रग्धरा.
जाईना राम कोंठें, न बसणें एक ठायीं जयाला
आहे व्यापूनि सारा अविकृतवपु त्या शोक बाधी कशाला ? ।
नाकांक्षी जो न टाकी न करि किमपिही सच्चिदानंदरुपी
मायावी हीन-मायी अचळावैभव जो सर्वसाक्षी अरुपी ॥१४॥

भुजंगप्रयात.
स्वयें बोलिला राम वातात्मजाला पुढें बद्धपाणी उभ्या सेवकाला ।
म्हणें ऐक बा, गुह्य या तत्व गोष्टी सदा चिंतितां चित्त आत्मा अधिष्ठी ॥१५॥
नभा देखिजे त्रिप्रकारें जसें तें महाकाश तें व्यापिलें सर्व वर्ते ।
दुजें तें जळस्थानदेशीं विराजे बिंबलें तीसरें तेंचि साजे ॥१६॥
असें बुद्धयवछिन्न चैतन्य एक दुजें पूर्ण चैतन्य जाणें विवेक
तिजें बिंबले तेंचि आभास ऐसें त्रिधा जाणिजे तेंचि आकाश तैंसे ॥१७॥
अगा ब्रह्मचैतन्य सर्वत्र आहे महाकाश दृष्टांत हा त्यासि साहे ।
दुजा जाण कूटस्थ आत्मा शरीरीं जळस्थान आकाश साम्यें विचारीं ॥१८॥
तिजें बुद्धवच्छिन्न चैतन्य जाणें जळीं बिंबलेल्या नभाच्या प्रमाणें ।
असे मूळ चैतन्य तीहीं प्रकारें बरें आणि चित्तांत ऐसें विचारें ॥१९॥
असे बुद्धवच्छिन्न जो भासरुपी तया बोलिजे जीव या नांव रुपी ।
अविद्या अहंकारयोगें करी ते निराहंकृतीसाक्षिला मानिती ते ॥२०॥
अकर्त्यासि कर्त्ता असें लोक मानी सख्या, या जगीं तेचि कीं थोर हानी ।
असें बुद्धवच्छिन्न आभासरुपी शरीरद्वया चाळवीता अरुपी ॥२१॥
नव्हे बुद्ध मी सर्वदा बुद्धिसाक्षी विकारी नव्हे पूर्ण ऐसेंचि लक्षीं ।
बळें भ्रांत जीवित्व आरोपिताती मृषाभासरुपी मला मानिताती ॥२२॥
अविछिन्न तें ब्रह्म, विच्छिन्न जीव कळे तत्वमस्यादि वाक्यें स्वभावें,
असा भक्त सद्रूप जाणोनि मातें भजे तो सुखें, व्यापका श्रीविभूतें ॥२३॥
तदा तो महादु:खसागर-सिंधू सुखें पार तो पाव तो मुक्तबंधू ।
असें गुह्य तूं ऐक बा भक्तराया न बाधी तुला सन्मती मोह-माया ॥२४॥
मनीं सर्वदा भावना हेंचि आणीं जगीं वर्ततां भ्रांति पावे न कोणी ।
करी सर्वही लोकचर्यानुसारें तरी त्या न बाधीच अज्ञानवारें ॥२५॥

शार्दूलविक्रीडित.
विज्ञानामृतसार हें कपिवरा म्यां बोधिलें तत्व जें
चित्तीं ध्यान धरोनि नित्य बसतां चिद्रूपता पाविजे ।
या वाचूंनि दूजे नसेचि सहसा विज्ञान वातात्मजा
ऐसें जाण यथार्थ तूं, निजमनीं तो भाव नाणी दुजा ॥२६॥
ऐकोनी जनकात्मजारघुवरें चित्तत्व जें बोधिलें
धाला तो कपिराज तुष्टमनसें सर्वार्थं त्या साधले ।
आत्मारामचि रामचंद्र विलसे सीता जगत्कारिणी
माया भिन्न असे गुणाकृतिमयी आत्मा बुझें निर्गुणी ॥२७॥

रुग्धरा
साक्षात्‍ राजेंद्रवर्ये रविकुलतिलकें आदिनाथें विभूनें
केला जो बोध भक्ताप्रति विमलमनें घेतला मारुतीनें ।
जे कोणी चित्तसद्मीं धरितिल नर या ज्ञानदीपासि भावें
ते ह्या मायातमातें त्यजुनि निरखिती वस्तुनेत्रीं स्वभावें ॥२८॥

शार्दूलविक्रीडित.
नाशी पातकपर्वतासि सहसा, शोषी अविद्यामया
पंकातें त्रिपळांत, मोहकलुषा वारी भवाच्या भया ।
हा विद्बोध यथार्थ जैं परिसिजे आणी चतुर्धा धरी
मुक्ती, यास्तव आत्मगुह्य बरवें हें ध्याईजे अंतरी ॥२९॥

स्त्रग्धरा.
जातिभ्रष्टातिपापी परधनपरदारस्पृहा नित्य ज्यातें ।
स्तेयी ब्रह्मघ्न मातापितृश्वरत जो दु:ख दे योगियातें
तोंही पूजोनि रामा, हृदय जरि पढे भक्ति जीवीं धरोनी
जें योगींद्रा अलभ्य स्थळ सहज लभे पूजिला निर्जरांनीं ॥३०॥

वसंततिलका.
हें तत्व रामहृदयाख्य महा प्रसिद्ध जे सेविती परमहंस मुनींद्र सिद्ध
ते सर्वदां वसति आत्मरुपीं सुखानें । हें ऐक वो भगवती अतिगुह्य जाणें ॥३१॥

भुजंगप्रयात.
न देईं अभक्ता शठा कामिकाला महापापधी दुर्जना निंदकाला ।
गुरुद्वेषिया कर्महीना जडाला अदात्यासि चिद्‍गुह्य तूं एक वेळां ॥३२॥
सदा सर्वदां भक्ति ज्या देवकाजीं गुरुप्रेम ज्याचे मनीं त्या नियोजी ।
बरा ध्यास योगी सुवैराग्य चित्तीं तया बोधिजे तत्व हें ज्ञानवंती ॥३३॥

अनुष्टुप्‍
योगी निरंजन रची, विज्ञानामृतसार हें । चिद्बोधरामायण हें अजरामर पुष्टि दे ॥३४॥
॥ इति बालकांडे द्वितीय: सर्ग: ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP