अध्याय ५८ वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


राजोवाच - कोऽन्यस्तेऽभ्यधिको नाथ कन्यावर इहेप्सितः । गुणैकधाम्नो यस्यांगे श्रीर्वसत्यनपायिनी ॥४१॥

अचिंत्यगुणांचें एकातयन । लक्षूनि विश्वश्री आपण । आंगीं वसते अपायविहीन । संतोषोनियां सर्वस्वें ॥२७॥
ऐसिया तुजहूनि अधिकतर । भो भो नाथ श्रेष्ठवर । कोण अन्य असे प्रियकर । हें तूं अंतर जाणसी ॥२८॥
इह म्हणिजे या भूमंडळीं । कन्येसि ईप्सित नृपवरमौळी । ऐश्वर्यसंपन्न सद्गुणशाळी । कोण वनमाळी तुजहूनी ॥२९॥
राज्यलक्ष्मीसी भुलती जन । ते लक्ष्मी भुलोनि सेवी चरण । यालागीं तुजहूनि कोण आन । असे संपन्न श्रेष्ठ वर ॥३३०॥
यावरी तूं जरी म्हणसी हरि । कन्या अर्पिजे विवाहगजरीं । यदर्थीं नियमाच्या उत्तरीं । समय मुरारि म्यां केला ॥३१॥
कोण नियम कैसा समय । तो तुज कथितों परिसता होय । जाणती भूमंडळींचे राय । दुर्घट काय तें ऐक ॥३२॥

किं त्वस्माभिः कृतः पूर्वं समयः सात्वतर्षभ । पुंसां वीर्यपरीक्षार्थ कन्यावरपरीप्सया ॥४२॥

तव दर्शना पूर्वीं आम्हीं । प्रतिज्ञासमय केला नियमीं । किमर्थ तो ही सात्वतस्वामी । तां हृत्पद्मीं विवरावा ॥३३॥
आम्हां क्षत्रियांचा हा धर्म । वीर्यशौर्यपरीक्षाकाम । स्वयंवरीं करूनि दुर्घट नियम । कन्याललाम मग द्यावें ॥३४॥
कन्येयोग्य इच्छूनि वर । पुरुषपरीक्षेकारणें घोर । प्रतिज्ञा केली म्यां दुर्धर । ते तूं सादर अवधारीं ॥३३५॥

सप्तैते गोवृषा वीर दुर्दांता दुरवग्रहाः । एतैर्भग्ना सुबह्वो भिन्नगात्रा नृपात्मजाः ॥४३॥

ऐसें म्हणोनि श्रीकृष्ण हातीं । धरूनि उठिला कोसलनृपति । माडियेवरूनि तया प्रति । वृषभशाळा दाखविली ॥३६॥
सातही वृषभ कृतान्तकल्प । अपेट अशिक्षित दुर्दर्प । यांतें दमावया अनाटोप । भंगिले नृप बहु यांहीं ॥३७॥
कारुष कलिंग नेपाळ । तेलंग तिगळ मल्याळ चौळ । टंकण कोंकण वळित मावळ । महाराष्ट्र केरळ मत्स्यादि ॥३८॥
पुन्नाट कर्णाट पुलिंद द्रविड । आंध्र वैदर्भ पांचाळ पाण्ड्य । चैद्य मागध नैषध गौड । मालव प्रचंड विंधादि ॥३९॥
मद्रसैन्धवादि काश्मीर । कच्छ बर्बर गुर्जर अपर । हैहय केकय इत्यादि थोर । नृपकुमार भंगियले ॥३४०॥
विषाणप्रहारीं भेदिलीं गात्रें । थदका मारूनि चूर्ण शरीरें । होऊनि नृपात्मज माघारे । गेले काविरें घेऊनियां ॥४१॥
ऐशा नृपसुतांच्या गति । ऐकोनि कन्यावरणीं पुढती । कोण्ही हांव न धरिती चित्तीं । समय श्रीपति तो ऐसा ॥४२॥
न दमितां हे वृषभ सप्त । कन्या अर्पूं मानूनि आप्त । तरी प्रतिज्ञाभंगदोषें लिप्त । हें गुज गुप्त तुज कथितों ॥४३॥
प्रतिज्ञाभंग न घडे मज । जामाता जोडे गरुडध्वज । कन्यामनोरथ पुरती सहज । तैं नाचेन भोज आनंदें ॥४४॥
मत्कृतसमयभंग न पवे । कन्यामनोरथ सफल व्हावे । भीड सांडूनि ऐसिया भावें । बोलता जाला कृष्णेंसीं ॥३४५॥

यदि मे निगृहीताः स्युस्त्वयैव यदुनंदन । परो भवानभिमतो दुहितुर्मे श्रियःपते ॥४४॥

भो भो यदुकुळनंदना । तूं या वृषांच्या करिसी दमना । तरी मी अर्पीन कन्यारत्ना । जे सोयरा जुना जुनाट ॥४६॥
माझिये कन्येसि अभिमत वर । तूं एक सर्वज्ञ जगदीश्वर । तुझिये परीक्षेचा विचार । न लगे इतरां सम करणें ॥४७॥
जे श्री ईश्वरातें जन्मवी । सर्वज्ञत्वादि लेणें लेववी । पुढती थापटुनियां निजवी । कैवल्यपदवीमाजिवडी ॥४८॥
ते पूर्णश्रियेचा तूं पति । सामान्य श्रिया दास्य करिती । कन्या अर्पितां त्या तुज प्रति । पूर्वज नाचती आनंदें ॥४९॥
माझे पुरवूनि मनोरथ । मत्कन्येचे पुरविजे आर्त । वृषभ दमूनि मम जामात । होऊनि सनाथ मज कीजे ॥३५०॥
ऐसी सप्रेम नृपाची वाणी । ऐकोनि ऊठिला चक्रपाणि । कुरुकंजारप्रबोधतरणि । ते तूं श्रवणीं अवधारीं ॥५१॥

एवं समयमाकण्यं बध्वा परिकरं प्रभुः । आत्मानं कृत्वा न्यगृण्हाल्लीलयैव तान्‍॥४५॥

ऐसा प्रतिज्ञासमयनिगम । श्रवण होतांचि पुरुषोत्तम । कंचुकपल्लवीं परिकरोत्तम । बांधोनि सन्नद्ध जाहला ॥५२॥
कास कासिली मालगांठी । मस्तकीं बांधली वीरगुंठी । माळा खोवूनियां परवंटी । स्वयें जगजेठी उठावला ॥५३॥
सभागारीं वर्तली कथा । अंतःपुरीं हे ऐकोनि वार्ता । नोवरीसहित नृपाच्या कांता । गवाक्षपथें विलोकिती ॥५४॥
सूक्ष्म रंध्रीं जालांतरीं । सादर पाहती नृपाच्या नारी । तंव राजाज्ञेच्या संकेतसूत्रीं । वृषभ किंकरीं चेतविले ॥३५५॥
वृषभशाळेचें कपाट मुक्त । करूनि धुडाविले उन्मत्त । बाहेरी लोटले अकस्मात । जेंवि कृतान्त प्रळयान्तीं ॥५६॥
कौतुक पहावया नागरजनीं । सभा घनवटली उच्चस्थानीं । भवतीं कपाटें पिहित करूनी । वृषभ प्राङ्गणीं शोभविले ॥५७॥
निर्बीज अग्नियंत्राचे कडके । पटह दुंदुभि वाद्यें अनेकें । वीर गर्जना करिती मुखें । सामान्य लोकें संत्रस्त ॥५८॥
व्याघ्राजिनें वंशयष्टि । लंबाळ बांधोनि वृषभा दृष्टि । दावितां बावरे जाले हट्टी । महाफुंफाटीं उठावती ॥५९॥
मही उकरिती पुढिला चरणीं । उलथूं पाहती तीक्ष्ण विषाणीं । व्याघ्रचर्मांची पडतां घाणी । बळें क्षोभोनि फुंपाती ॥३६०॥
क्षणक्षणा मूत्र पुरीष । करिती दुर्दान्त सप्त वृष । तद्दमनार्थ महादावेश । धरूनि परेश उठावला ॥६१॥
नोवरी मानसीं नवस करी । शिव भवानी कुळेश्वरी । मज पावो ये अवसरीं । विजयी हरि हो वृषदमनीं ॥६२॥
अगा सवितया भास्करा । विश्वचक्षु विश्वंभा । धांवें पावें इंदिरावरा । कृष्ण नोवरा मज योजीं ॥६३॥
अनेकजन्मान्तरींचें पुण्य । व्रत तप दानें अनुष्ठान । सफळ हो कां मजलागून । यदुनंदनवरलाभें ॥६४॥
नोवरीचे संकल्प ऐसे । जाणोनि हृदयस्थें परेशें । वृषभदमना परमोल्लासें । उडी घातली सभाङ्गणीं ॥३६५॥
अरिष्ट दमिता जो श्रीपति । आपुल्या करूनि सप्तधा मूर्ति । तैसाचि सप्त वृषभांप्रति । निग्रही निगुती लीलेनें ॥६६॥
धुधुवत विखार काळियाना । प्रळयकाळचि सकळा जना । गारुडी कंठीं घालूनि वसना । समान मिरवी कीं न अहो ॥६७॥
व्याघ्रादि क्रूर श्वापदजाति । साबरमंत्रें अभिमंत्रिती । श्रवणीं धरूनि नाचविती । सर्वांप्रति हें विदित असो ॥६८॥
ऐशा सामान्य मनुजापासीं । कृत्रिम कौशल्यांचिया राशि । हा तों हृदयस्थ हृषीकेशी । चराचरांसि चेतविता ॥६९॥
मशक मेरूहूनि घनवट । मेरु मशकाहूनि फळकट । स्वसत्ता कर्त्ता वैकुंठपीठ । त्या दुर्घट हें काय ॥३७०॥
सर्व जनासि नयनानंद । कर्ता श्रीहरि परमानंद । लीलेकरूनि सप्त बलिवर्द । खेळवी विनोद दावावया ॥७१॥
मसतकीं हाणोनियां थापा । सप्त वृषभां आणी कोपा । सवेंचि धरूनि सातही शेंपा । वोढी वत्सपांसम वत्सां ॥७२॥
गगना विंधतां तीक्ष्ण बाण । वृथा जाय जेंवि संधान । तेंवि वृषांचीं शृंगें तीक्ष्ण । हाणिता कृष्ण गवसेना ॥७३॥
वृषभा हाणितां टिरीवरी । तो परतोनि शृंगें मारी । तंव पुढें ठाकोनियां मुरारि । प्रतापें धरी शृंगाग्रा ॥७४॥
बस्त उन्मत्त मस्त जाले । परी कुंजरें धरितां सुटिका न चले । तेंवि सप्तधा होऊनि सप्त मोकळे । वृष आकळिले घननीळें ॥३७५॥
शृंगीं धरूनि शतधनुष्यें । मागें लोटिलें पुराणपुरुषें । सवेंचि सप्तांचीं धरूनि पुसें । वोढी आवेशें फरफरा ॥७६॥
ऐसें कौतुक सभेच्या जनां । दाविता जाला यादवराणा । विशेष नाग्नजितीच्या मना । संशयनिरसनालागूनी ॥७७॥
हें ऐकोनि श्रोते जन । म्हणती तयेसी संशय कोण । कृष्णीं आसक्त तियेचें मन । जाणोनि वधूगण उपहासी ॥७८॥
कृष्ण कमनीय नोवरा खरा । रुचला तुझिया अभ्यंतरा । परंतु यातें बहुत दारा । तुज शेजारा कैं जोडे ॥७९॥
इत्यादि स्त्रियांच्या उपहासवचनीं । संशयापन नृपनंदिनी । जाणोनि सप्तधा चक्रपाणि । होऊनि दमनीं वृष बांधे ॥३८०॥
बहुधा रूपें धरूनि हरि । असपत्नभावें रमवी नारी । ऐसा संशय करूनि दुरी । स्वयें नोवरी प्रोत्साही ॥८१॥
येर्‍हवीं एकला सातां जणां । समर्थ असतां वृषनिग्रहणा । सप्तधा जाला त्या कारणा । श्रोत्यां सज्जनां सूचविलें ॥८२॥
सभाप्राङ्गणीं मुहूर्त चारी । वृषभां खेळई कैटभारि । त्यानंतरें बांधोनि दोरीं । वोढी श्रीहरि तें ऐका ॥८३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP