अध्याय ५१ वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


प्रेक्षणीय नुलोकस्य सानुरागस्मितेक्षणम् । अपीच्यवयसं मत्तमृगेंद्रोदारविक्रमम् ॥२६॥

मनुष्यलोकीं पहावया योग्य । ज्याचें लावण्य अमोघ । हास्य ईक्षण सानुराग । शोभे श्रीरंग सौंदर्यें ॥८६॥
अपीच्य म्हणिजे कमनीय वयसा । प्रतापी मत्त मृगेंद्र जैसा । उदारविक्रम भासे तैसा । आकृतिठसा अद्भुत तो ॥८७॥

पर्यपृच्छन्महाबुद्धिस्तेजसा तस्य धर्षितः ।
शंकितः शनकै राजा दुर्धर्षमिव तेजसा ॥२७॥

राजा मुचुकुंद महाबुद्धि । तयाच्या तेजें भयभीतधी । शंकित होत्साता ते संधीं । वेंठें संवादीं हळूहळू ॥८८॥
दुर्धर्ष तेजेंकरून त्यातें । चकितापरी शंकितचित्तें । पुसता झाला वृत्तान्तातें । तें कुरुनाथें परिसावें ॥८९॥

मुचुकुंद उवाच - को भवानिह संप्राप्तो विपिने विरिगह्वरे ।
पद्भ्यां पद्मपलाशाभ्यां विचरस्युरुकंटके ॥२८॥

मुचुकुंद म्हणे कोण तूं येथ । गिरिगह्वरे अकस्मात । अरण्यामाजि जालासि प्राप्त । इत्थंभूत मज सांगें ॥१९०॥
कठोर कंटक कीटक दुष्ट । खडकें अश्माग्र तिखट । घोर विपिन वर्जित वाट । किमर्थ प्रविष्ट ये ठायीं ॥९१॥
पद्मगर्भींचीं कोमळ दळें । त्याहूनि सुकुमारें पदतळें । तिहीं करूनि ऐसीं स्थळें । कां ये वेळे विचरसी ॥९२॥
अमरलोकीं सुरदर्शनें । जालीं तेथींच्या परिज्ञानें । अनुमानितां यथावयुनें । निर्धार स्वमनें मज नोहे ॥९३॥

किंस्वित्तेजस्विनां तेजो भगवान्वा विभावसुः ।
सूर्यः सोमो महेंद्रो वा लोकपालोऽपरोऽपि वा ॥२९॥

जे जे वरिष्ठ तेजःपुंज । त्यांच्या ठायीं ज्याचें तेज । तो भगवान मेषध्वज । विभावसु किंवा तूं ॥९४॥
किंवा सूर्य तमापहरण । कीं तूं सोम अमृतकिरण । किंवा होसी संक्रंदन । निरृति वरुण कीं दंडी ॥१९५॥
वायु ईशान कीं कुबेर । लोकपाळ कीं अमर अपर । तर्कें न करवे निर्धार । तुळितां सुरवर उपमानें ॥९६॥

मन्ये त्वां देवदेवानां त्रयाणां पुरुषर्शभम् । यद्बाधसे गुहाध्वांतं प्रदीपः प्रभया यथा ॥३०॥

देवत्रयाचा जो देव । आदिपुरुष जो स्वमेव । मी मानितों तूं सावेव । आविर्भवलासि ये ठायीं ॥९७॥
ज्या कारणास्तव गुहाध्वान्त । तुझेनि तेजें पावलें अंत । गगनदीपें जेंवि दिगंत । होय विभ्रांत वितिमिर ॥९८॥
आतां असो हा अनुमान । पूर्वोक्त प्रश्न तुजपासून । ऐकों इच्छी माझें मन । करीं तूं कथन नरश्रेष्ठा ॥९९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP