श्रीशुक उवाच - वचो निशम्य कृपणं गोपानां भगवान् हरिः ।
निमीलयत मा भैष्ट लोचनानीत्यभाषत ॥११॥

षड्गुणैश्वर्य अव्याहत । गोपवेषामाजीं गुप्त । तो श्रीकृष्ण भगवंत । ना भी म्हणत सखयांतें ॥१॥
म्हणे गडी हो भिऊं नका । सोडा दावानळाची शंका । एक विचार सांगतों निका । तो आइका अवघेची ॥२॥
तुम्ही माझिये आज्ञेवरून । दृस्य देखणें झांका नयन । ऐसें बोलतां झाला वचन । श्रीभगवान जगदात्मा ॥३॥

तथेति मीलिताक्षेषु भगवानग्निमुल्बणम् । पीत्वा मुखेन तान् कृच्छ्राद्योगाधीशो व्यमोचयत् ॥१२॥

ऐकोनि कृष्णाची अमृतवाणी । अवघे तोषले अंतःकरणीं । जेंवि मरतया निर्वाणीं । प्राणदानी हरि होय ॥४॥
अंगीकारूनि कृष्णवचन । तिहीं झांकिले असतां नयन । सुखें दावानळ उल्बण । प्राशूनि स्वजन सोडवी ॥१०५॥
श्रीकृष्णाचें वदनकमळ । कोमल जैसें नीलोत्पल । तेणें प्रचंड दावानळ । गिळी गोपाळ केंवि म्हणा ॥६॥
योगमायेचा नियंता । अगाध ज्याची ऐश्वर्यसत्ता । निमेषामाजीं सोडविता । झाला तत्त्वतां श्रीकृष्ण ॥७॥
संसारगह्वरप्रवेश । मार्गामार्गें धावतां क्लेश । क्षुधातृषाक्रांतिदोष । केला मोक्ष तेथूनी ॥८॥
मोहदावाग्नीचें भय । जेथ कां प्रचंड तापत्रय । नेणों तितुके झाले काय । पुसिला ठाय दुःखाचा ॥९॥
योगमायेची विचित्र करणी । पूर्वस्थळीं भांडीरवनीं । कृष्णें ठेविले नेऊनी । अणुमात्र चरणीं न चालतां ॥११०॥
लंकेमाजी राक्षसाहातीं । स्वप्नभ्रमें सांपडे रातीं । त्यासि पूर्व सदनाप्रति । आणी जागृति ज्यापरी ॥११॥
तैसें कृष्णें चमत्कारें । गोपगोधनें गोवरें । भांडीरवना नेलीं त्वरें । अमृतोद्गारें तोषविलीं ॥१२॥

ततःश्च तेऽक्षीण्युन्मील्य पुनर्भांडीरमापिताः । निशाम्य विस्मिता आसन्नात्मानं गाश्च मोचिताः ॥१३॥

तंव ते अवघेचि गोपाळ । श्रवणीं आइकती निहळ । तापत्रयाचा दावानळ । कोणा प्रबळ नतावी ॥१३॥
मग उघडूनि पाहती डोळे । भोंवती गोधनांचे मेळे । म्हणती भांडीरवनाजवळें । कोणे लीलें पातलों ॥१४॥
नाहीं करचरण चालिले । नाहीं वाचें उच्चारिलें । नाहीं मानसें कल्पिलें कैसें ठाकलें हें स्थान ॥११५॥
एक एकातें सांगती । ऐकोनि अवघे विस्मित होती । गोधनासहित आम्हांप्रति । म्हणती श्रीमति रक्षिता ॥१६॥
शेळ्या मेंढ्या गाई महिशी । आम्हां करूनि मानिती संतोष । रक्षिता झाला ऋषीकेशी । दावानळासी प्राशूनी ॥१७॥
ऐसा पूर्ण परामृश । करूनि मानिती संतोष । म्हणती कृष्ण हा आदिपुरुष । गोपवेष अवगला ॥१८॥
श्रीकृष्णाची अतर्क्यलीला । मुखें प्राशिलें दावानळा । आम्हां रक्षिलें गोगोपाळां । प्रलयकाळापासोनी ॥१९॥
नेत्र झांकूनि उघडी नुघडी । तंव आणिलें भांडीरवडीं । माया कृष्णाची केवढी । जो निजगडी पैं आमुचा ॥१२०॥
प्रलंब वधिला संकर्षणें । दावानळ प्राशिला कृष्णें । ऐसें अगाध यांचें करणें । वृथा नटोनि मनुजत्वीं ॥२१॥

कृष्णस्य योगवीर्यं तद्योगमायाऽनुभावितम् । दावाग्नेरात्मनः क्षेमं वीक्ष्य ते मेनिरेऽमरम् ॥१४॥

ऐसें कृष्णाचें महिमान । योगमाया अनुभवून । प्रत्यक्ष म्हणती अवघे जन । ब्रह्म पूर्ण हा होय ॥२२॥
कृष्ण केवळ अमरपति किंवा ईश्वर आदिमूर्ति । घेऊनि गोपवेषाची बुंथी । म्हणवी संतति नंदाची ॥२३॥
अजा अविकें सहित गुरें । आम्हां जाळितां वैश्वानरें । कृष्णें रक्षिलें चमत्कारें । आम्हीं स्वनेत्रें पाहिलें ॥२४॥
तंव ते गोपाळ देवकोटि । म्हणोनि चमत्कारले पोटीं । कृष्णकीर्तीच्या करिती गोठी । योगपरिपाठी परमार्थें ॥१२५॥
एक म्हणती इंद्रजाळ । कृष्णें दाविलें आम्हां सकळ । तापत्रय हा दावानळ । संसार केवळ गह्वर ॥२६॥
गोगोधनापाठीं लागे । दुःखशोकाचीं फिरतां दांगें । क्षुधेतृषेच्या पांगिलों पांगें । विश्रांतिमार्गें सांडवलों ॥२७॥
आम्हांचि माजीं असतां कृष्ण मायामोहें विस्मरण । पडिलें म्हणोनि पावलों शीण । दैवें आठवण दीधली ॥२८॥
कृष्ण चिंतूनि सर्वभावें । शरण रिघतांचि आघवें । येणें लोपोनियां मावे । केलें ठावें निजरूप ॥२९॥
कैंचा दाव दावानळ । आम्ही कृष्णाचे गोपाळ । कृष्णसंगें खेळों खेळ । नित्य निर्मळ निर्दोष ॥१३०॥
महाभयकृद्भयनाशन । तो हा श्रीकृष्ण भगवान । गोधनेशीं आमचे प्राण । रक्षी पिऊनि दावाग्नि ॥३१॥
तो हा अमरां अमरपति । कृष्ण केवळ सद्गुरुमूर्ति । करी मायेची प्रवृत्ति । आणि निर्वृत्तिकर्ता जो ॥३२॥
ऐसे गोपाळ आपुले मनीं । कृष्णमहिमा अनुभवूनी । केला निश्चय अंतःकरणीं । हा चक्रपाणि सुरवर्ये ॥३३॥

गाः संनिवर्त्य सायह्ने सहरामो जनार्दनः । वेणुं विरणयन् गोष्ठमगाद्नुपैरभिष्टुतः ॥१५॥

दोहीं बाहीं गोपथाटी । वेणु वाहती चंगाटी । कृष्ण बलराम जगजेठी । मध्यपीठीं शोभती ॥३४॥
ऐसे गोपाळ करिती तर्क । तंव बळरामेंशीं व्रजपाळक । गाई परतवूनि सम्यक । व्रजासन्मुख मोहरविल्या ॥१३५॥
श्यामराजीवलोचन । हृदयीं श्रीवत्सलांछन । आजानुबाहु सर्वाभरण । पीतवसन परमात्मा ॥३६॥
शशांककांति नीलवसन । कंबुवलय संकर्षण । निर्जर होऊनि गोपगण । परिवारून सेविती ॥३७॥
गोपाळ करिती नानास्तोत्रें । अलौकिकें बालचरित्रें । नित्य नूतनें विचित्रें । घेतां श्रोत्रें मोक्षदें ॥३८॥
ऐसा रामसहित कृष्ण । गोप गोधनें घेऊन । सायंकाळीं व्रजभुवन । स्वानंदघन प्रवेशला ॥३९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP