श्रीगोविंदसद्गुरवे नमः ।
जयजयसद्गुरु गोविंदराया । अनन्यभावें शरण पायां । मनें वाचासहित काया । कुरवंडूनि सांडणें ॥१॥
नाथिलें नाशूनि केला जय । म्हणोनि विप्सार्थीं जयजय । तुझा सर्वत्र ऊर्जित विजय । वरी अपजय तव विमुखां ॥२॥
सन्मात्र न देखती रवीचे नयन । सन्मात्र कल्पूं न शके मन । सन्मात्र बोलावया वदन । सरस्वतीचें कुंठित ॥३॥
तया सन्मात्रा प्रकाशक । तुझा प्रकटे जैं बोधार्क । तैं शास्त्रज्ञखद्योतक । तर्कप्रमुख लोपती ॥४॥
सर्वां असाध्य जें नानाश्रमें । तें सुगम साध्य ज्याचेनि नामें । म्हणोनि कोणी न पवती सीमे । गुरुत्वगरिमे जयाचे ॥५॥
यालागीं सद्गुरु म्हणणें घडे । येर गुरुत्वें तितुकीं जडें । ब्रह्मादिकांचेनि पाडें । पडे पालडें प्रलयांतीं ॥६॥
स्वप्रभेच्या तीव्रकिरणीं । सूर्यकांतीं प्रकटूनि वह्नि । दहनपचनादि अलिप्तपणीं । तुझी करणी रवि शिकला ॥७॥
इंद्रियद्वारा निजात्मज्ञानें । प्रकाशलेनि विषयभानें । भवसंभवादि पापपुण्यें । अलिप्तपणें प्रकटिसी ॥८॥
तेणें भवस्वर्गादि परिभ्रमण । द्यूतक्रीडा हे दुजेवीण । क्रीडसी हें तव विंदानें । अभिन्नभिन्न तुज साजे ॥९॥
गोविंद म्हणणें याचिसाठीं । इंद्रियां विषयां देऊनि गांठी । स्वयें प्रकटूनि ते राहटी । तूं शेवटीं अलिप्त ॥१०॥
सकळसाधनीं साध्य जें धन । तयासी राय हें अभिधान । मोक्षा वरुतें जें निधान । तें चरणसेवत पैं तुझें ॥११॥
विजातीय जें असन्मात्र । तें अनन्यतेचें नोहे पात्र । निरसूनि विपरीतभ्रघचि मात्र । अनन्य एकत्र कवळिसी ॥१२॥
परंतु सप्रेमसंभ्रमाचें उचित । कृपावरें वोपी बहुत । जरी तूं करिसी भ्रमातीत । दास्यसुखामृत मग कैचें ॥१३॥
दास्यें विशुद्ध मनोदर्पण । लाहे बोधार्काचें सन्मुखपण । तैं प्रत्यगात्मत्वें सूर्य आपण । होतां कोण अवघड ॥१४॥
काठिण्य निरसे विजातीय । मग उभय बिंबा ऐक्य होय । तें म्हणों तरी भेदभय । होतें काय सत्कुलें ॥१५॥
चित्तमिडगणें इतुकें करणें । दास्यें बोधार्का सन्मुख होणें । स्वात्मपत्ययप्रभाकिरणें । मग मागणें किमर्थ ॥१६॥
प्रेमसंभ्रमीं अनन्यभाव । उपजे एवढें लाहिजे दैव । याही वरौता अप्राप्य ठाव । म्हणणें माव अवघी हो ॥१७॥
शरण म्हणिजे प्राप्तिस्थान । तें तंव स्वामीचे श्रीचरण । त्या वेगळें भासे आन । तोचि भजनव्यभिचार ॥१८॥
काया वाचा आणि मन । ये त्रिपुटीचें जन्मस्थान । केवळ जें कां विपरीतज्ञान । कुरवंडून सांडणें ॥१९॥
तया सांडणया पोटीं । इहामुत्रादि अवघी सृष्टि । गेली ओंवाळणिच साठीं । ब्रह्मांडकोटीं समवेत ॥२०॥
आतां अभेद किंवा भेद । ज्ञान विज्ञान किंवा बोध । भजनानंद दशेचा शोध । कीजे विशद डोळसीं ॥२१॥
असो ऐसेनि सप्रेमभजनें । श्रीगुरुपादप्रसादांजनें । मनीषानयनीं प्रमेयधनें । गोप्यें तितुकीं प्रकटती ॥२२॥
क्षेत्र पंचक्रोशात्मक । वाराणसी अवघी एक । त्यामाजीं मणिकर्णिका मुख्य । क्षेत्रनायक विशेष ॥२३॥
तैसें चिन्मात्रैक सद्गुरुरूपडें । परी शिष्यें पाहावें चरणांकडे । हेंचि कथिलें चंद्रचूडें । जें पूजामूलं गुरोः पदं ॥२४॥
ध्यानमूल श्रीगुरुमूर्ति । मंत्रमूल श्रीगुरु उक्ति । गुरुकृपेवीण सायुज्यमुक्ति । प्रशंसिती ते मूर्ख ॥२५॥
यालागीं आमुचें पूजास्थळ । तें स्वामीचें श्रीपादकमळ । जेथींचें अनुमात्र लाहतां जळ । सिद्धि सफळ वोळगती ॥२६॥
इतुकेंचि भांडवल आमुचे गांठीं । एरव्हीं न सरों तृणासाठीं । येणें बळें पृथक सृष्टि । करणें गोष्टी केतुली ॥२७॥
तंव सद्गुरु कृपामूर्ति । आनंदोनि आत्मस्थिती । मौळ स्पर्शोनि अमृतहस्तीं । आज्ञापिती कृपेनें ॥२८॥
ग्रंथव्याख्यान असे फार । न कीजे स्तुतीचा विस्तार । न वाढवूनि अलंकार । कथा सत्वर वाखाणीं ॥२९॥
स्वामीचें हें अनुशासन । करूनि परमादरें मान्य । चंद्रा उजु चकोरनयन । तैसे चरण लक्षिले ॥३०॥
दंडप्राय करूनि नमन । नमिले श्रोते कृपाघन । अवधानजीवनें सिंचून । जे वक्तृत्ववन वर्धविते ॥३१॥
मागां शकट तृणावर्त । सप्तमाध्यायें पावले अंत । नामकरण परम गुप्त । नंद करवीत गर्गाज्ञा ॥३२॥
तया रसाचें भोजन । करावया हें निमंत्रण । ज्यांशी परीक्षिती समान मान । सप्रेमश्रवणपंक्तीसी ॥३३॥
नलगे चातुर्य काव्यव्युत्पत्ति । न लगे अनेक शास्त्रीं गति । एक पाहिजे सप्रेमभक्ति । जे करी श्रीपति स्वाधीन ॥३४॥
आठवा सप्रेमें आठवा । नकरूनि प्रपंच आठवा । अध्याय परियेसा आठवा । जेणें ठावा हरि होय ॥३५॥
जांभईमाजि विश्वरूप वदनीं । देखोनि सचिंत यशोदा जननी । शंका ऐकतां नंदामनीं । नामकरणीं ते निरसे ॥३६॥
आणि बालक्रीडामिसें जाण । हरि करील मृद्भक्षण । धर्षण करितां पसरूनि वदन । दावील पुन्हा विश्वरूप ॥३७॥
अष्टमाध्यायीं इतुकी कथा । शुकें निरूपिली जगतीनाथा । श्रवणें सकळ खंडूनि व्यथा । वरपुरुषार्थ स्वीकरणें ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP