माधवदासस्तव

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( गीतिवृत्त )

क्षेत्र जगन्नाथाचें, उत्कळदेशीं, प्रसिद्ध जें आहे;
भक्त जगन्नाथाचा श्रीमाधवदास ते स्थळीं राहे. ॥१॥
देव जगन्नाथ म्हणे, ‘ पावाल मला रमानिवासा रे !
जन हो ! माधवदासा गा, साधुयशीं रमा, निवा सारे. ’ ॥२॥
बहु शांति, क्षांति, दया, पाहुनि, षड्रिपु करीत होते रें.
त्या माधवदासातें स्त्री हाणी, करुनि कोप पोतेरें. ॥३॥
तद्वर्ति करुनि, दीप प्रभुपाशीं तच्छिवार्थ तो लावी.
कोणाच्या शांतीसीं हे माधवसादशांति तोलावी ? ॥४॥
सकलात जगन्नाथप्रभुमूर्ति, वरूनि आपुल्या, काढी;
घाली माधवदासीं, त्याची शीताति समजतां गाढी. ॥५॥
करुणाचि जगन्नाथस्वामीची, न सकलाद, यावरि ती.
प्रिय आत्म्याहुनि नसता, तरि यातें न सकला दया वरिती. ॥६॥
व्याकुळ केवळ होतां श्रीमाधवदास साधु अतिसारें;
सेवकशिष्यसुताहुनि अधिक करी दास्य भक्तगति सारें. ॥७॥
सरल्यावरि कष्टदशा, दर्शन देतां, रुसे, म्हणे, ‘ देवा !
अति निष्टुर ’ कीं तेणें जी केली प्रभुवरें स्वयें सेवा. ॥८॥
हंसुनि जगन्नाथ म्हणे, ‘ तुज कष्टदशेंत कोण बा ! जपला ?
अनुदिन सेवेंत तुज्या, कंटाळा लेश न करितां, खपला ? ’ ॥९॥
प्रभुच्या अनुग्रहें तो, मति होती भ्रमयुता, परि समजला.
नमुनि, गहिवरोनि, म्हणे, ‘ जपलासि बहुत सुतापरिस मजला. ॥१०॥
भोगचि कां न उडविला ? प्रभुसि उचित दास्यभाव कां गमला ?
हें, संशय वाराया, विश्वगुरो ! तूं, द्रवोनि, सांग मला. ’ ॥११॥
त्यासि जगन्नाथ म्हणे, ‘ जन्म, मरण, सर्व कर्म, वारावें;
तारावें तुज, भोगुनि एक प्रारब्धमात्र सारावें. ’ ॥१२॥
देशांतरांत माधवदास बरा विष्णुभत्कमठ पाहे;
वाहे गोमय, आगें, गुप्त शुभा वळित, अळि - तसा, राहे. ॥१३॥
झाला होता, क्षेत्रीं, माधवदासांघ्रिसारसीं, अळि तो;
तेथें येउनि पाहे तों प्रभुचा भक्तवर शुभा वळितो ! ॥१४॥
‘ भक्त जगन्नाथाचा पूज्य जगन्नाथसाचि जो लोकीं.
तोकीं तात, तसा ज्या माधवदासीं मुकुंद हा तो कीं. ’ ॥१५॥
ऐसें, मठांत सहसा, तो परिचित हरिजना सकळ कळवी.
तेथील महंताच्या सदतिक्रम बहु मनास कळवळवी. ॥१६॥
जैसा चोर उमगला व्याकुळ होतो, तसाचि सज्जन हा.
श्रीमाधवदास म्हणे, बहु संकोचीं करूनि मज्जन, ‘ हा ! ’ ॥१७॥
इत्यादि यशें ज्याच्या गातां वैकुंठपुरग कवि केला.
भक्त मयूर धरि मुखीं सत्कीर्तिसि जेंवि तुरग कविकेला. ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP