गवळण - २१ ते २५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२१.
लांचावलें ब्रह्म भक्तीचेनि सुखें । गोकुळीं गोपाळवेशें गाई राखे ॥१॥
त्रिभुवनीं न समाये ब्रम्हादिकां लक्षा नये । तो दास्यत्व करिताह गौळीयांचें ॥२॥
नवलाव गे माये देखियला । साजिरा । परब्रम्हा जालेंसे पिसें गे माये ॥४॥
निगमा निर्धारितां अमरा दर्शनाची आस । मुनिजनां ध्यानीं आभास तोही नाहीं ॥५॥
तें हें नित्य पूर्ण लाडेंकोडें खेळविती  गौळणी । मा मुख चुंबन देउनी गौळणी ह्रदयीं आलिंगिती ॥६॥
क्षीरसागरींचें सुख सांडुनी अशेष । रुक्मिणी सेजेचे विलास तेहि नावडती ॥७॥
तें हें गोधना गोठणीं लोळे शुद्ध चैतन्य सांवळें । तें सुखही न कळे साचें चतुरानना ॥८॥
भक्ती प्रेम भाव देखे आहे जेथें । हरि वोरसला जाये तेथें कैचें नैश्वरत्व ॥९॥
न विचारी जातीकूळ शुची अथवा चांडाळ । ह्रदय देखुनि निर्मळ प्रीति धरी तेथें ॥१०॥
ऐसें त्रिभुवन सुखाचें सार कीं अनाथाचें माहेर । अव्यक्त परि साकार जालें असे तें ॥११॥
भक्ताचेनि वियोगें श्रमलें म्हणोनि गोकुळासी आलें । तेणें प्रेम सुख दिधलें नामयासी ॥१२॥
२२.
बाळ सगुण गुणाचें तान्हें गे । बाळ दिसतें गोजिरवाणें गे । काय सांगतां गार्‍हाणें गे । गोकुळींच्या नारी ॥१॥
श्रीरंग माझा वेडा गे । याला नाहीं दुसरा जोडा गे ।
तुम्ही याची संगत सोडा गे । गोकुळींच्या नारी ॥२॥
पांच वर्षाचें माम्हेंफ़ बाळ गे । अंगणीं माझ्या खेळे गे ।
कां लटकाच घेतां आळ गे । गोकुळीच्या नारी ॥३॥
सांवळागे चिमणा माझा । गवळणींत खेळे राजा ।
तुम्ही मोठया ढालगजा गे । गोकुळींच्या नारी ॥४॥
तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा । आळ घेतां या गोपाळा गे ।
तुम्ही ठाईंच्या वोढाळागे । गोकुळींच्या नारी ॥५॥
तुम्हीं लपवुनी याची गोटी गे । लागतां गे याचे पाठीं गे ।
ही एकढीच रीत खोटीगे । गोकुळींच्या नारी ॥६॥
तुम्ही लपवून याचा भवरा गे । धरूं पाहतां सारंगधरा ।
तुम्ही बारा घरच्या बारागे । गोकुळींच्या नारी ॥७॥
हा ब्रम्हाविधीचा जनीता गे । तुम्हीं याला धरूं पाहतांगे ।
हा कैसा येईल हातां गे । गोकुळींच्या नारी ॥८॥
नामा म्हणे यशोदेसी गे । हा तुझा ह्रषिकेशी गे ।
किती छळितो आम्हासी गे । गोकुळींच्या नारी ॥९॥
२३.
वारीं वो दशवंती आपुला तूं बाळ । विकटू हा खेळ खेळतसे ॥१॥
धाकुटिया मुलां घेतो हा चिमोरे । काय करुं धुरे भीत असों ॥२॥
घरींचा म्हातारा हाणितला येणें । काय सांगूं उणें तुजपाशीं ॥३॥
मी वो लटिकी तरी नामयासी पुसा । तुझा बाळू कैसा आसंदत ॥४॥
२४.
कान्हां तूं आजि कां झालासि बैमान ॥ध्रु०॥
तूं तो आमुची गडी । म्हणोनि मी केली खोडी । घालूं हुंबर यमुनेची मोडूं मान ॥१॥
होसी तूं आमुचा बळी । म्हणोनि म्यां केली कळी । तेथें कशाचा काय गुमान ॥२॥
जरी तूं होसी सखा । होऊंदे जाला वाखा । चल रूपवती घरीं घेऊं मान ॥३॥
समजूनियां देव । येक नामा नामदेव । जाले ते हरपले या द्वैत भान ॥४॥
२५.
हरी तुझी ऐसी कैसी हे खोड ॥ध्रु०॥
घेउनी चिमुटे मुळसी पळसी । गोपी तुज म्हणती हा दोड ॥१॥
सोडूनी वांसरें गाईसी पाजिसी । यांत तुज काय मिळती जोड ॥२॥
आडवा होउनी गोपीसी धरिसी । चुंबितां वदन मज म्हणसी सोड ॥३॥
अशा ह्या चेष्टा नाम्यासी करिसी । हरी तुझी ऐसी कैशी हे खोड ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP