११
ज्ञानदेव म्हणे परियेसी विष्णुदासा । तूम सुखसंतोषा पात्र होसी ॥१॥
प्रेमाचा जिव्हाळा तुझ्या ह्रदयीम आला । तूं का वेळोवेळां खंती करिसी ॥२॥
विचारी सावध होवोनि भक्तराजा । सुखानंदु तुझा तुजची जवळी ॥३॥
मी नेणें ज्ञानगती नेणें योगयुक्ति । न देखें विश्रांति एकेविण ॥४॥
सर्वभावें मज तेंचि रुप आवडे । जें पुंडलिकापुढें उभें असे ॥५॥
तो माझा विठठल दावा दृष्टी भरी । आस मी न करी आणिकांची ॥६॥
व्यापकु विठ्ठलु आहे सर्व देशीं । जरी सांडोनियां पाहसी भेदभ्रमु ॥७॥
तो नाहीं ऐसा ठाव उरलासे कवण । सर्वत्र संपूर्ण गगन जैसें ॥८॥
काया वाचा मनें तोचि व्हावा । गीतीं गातां जीवा सुख वाटे ॥९॥
ऐकावा श्रवणीम पाहावा तोचि नयनीं । नवजावा जवळोनी दूर कोठें ॥१०॥
जें अक्षर अव्यक्त देशकाळरहित । ज्ञानी उपासित सोहंभावें ॥११॥
सर्वेद्रियांसहित आवरोनि चित्त । भोगिती अद्वैत नित्य सुख ॥१२॥
सर्व सुख मज आहे त्याच्या पायीं । आणिकांच्या वाहीं न पडे कदां ॥१३॥
तेथें माझें मन रंगलेंसें भावें । सुख येणें जीवें देखिलें डोळां ॥१४॥
सर्वगत संपूर्ण सर्वकाळ असणें । होणें आणि जाणें नाहीं जया ॥१५॥
तें तुज माझारीम तूं तयाभीतरीं । अनुभवी निर्धारी ठेवुनी मन ॥१६॥
मी न मनीं न मनीं लटिकी हे कहाणी । जळधरावांचोनि चातक जैसा ॥१७॥
तैसें माझें मन स्मरे रात्रदिवस । पंढरीनिवास जीवन माझें ॥१८॥
ऐसें ऐकोनि बोलणें म्हणे ज्ञानदेव । धन्य तुझा भाव एकविध ॥१९॥
नामा म्हणे माझ्या सुखाचा विसावा । आवडे या जीवा पंडरीरावो ॥२०॥

१२
ऐसें नित्यानंदभरित क्रमिताती मार्गु । ह्रदयीं तो अनुरागु आवडीचा ॥१॥
प्रेमें वोसंडत करितो स्वहितगोष्टी । द्राविती कसोटी अनुभवाची ॥२॥
बाप तें सुख वृष्टि होतसे अनिवार । ब्रह्मरसें पूर वोसंडत ॥३॥
ज्ञानदेव म्हणे परियेसी नामया । अद्वैत आत्मया प्रेममूर्ती ॥४॥
भक्तिभाग्य तुवां जोडिलें अविनाश । सांग पां सविलास मार्ग त्याचा ॥५॥
कैसा तो साधावा सांग भजनविधि । कैसी नमनबुद्धि सत्वशील ॥६॥
कैसा निर्विकार ध्यानाचा प्रकार । हा सर्व विचार सांगे मज ॥७॥
कैसें तें श्रवण कैसे तें मनन । कैसें निजध्यासन दृढ होय ॥८॥
कवण तें भक्ति कवण तें धृति । कवण तें विश्रांति दावी मज ॥९॥
बहु उत्कंठित या सुखा करणें । तें मज पारणें करवीम आजी ॥१०॥
सांगे हा अनुभवो साधन उपावो । विनवी ज्ञानदेवो नामयासी ॥११॥

१३
परिसुनी ते गोष्टी घाली चरणीं मिठी । दाटलासे कंठीं सद्‌गदित ॥१॥
कृपेचें पोसणें मी पंढरीरायाचें । येवढें भाग्य कैचें मज जाणिवेचें ॥२॥
नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशील । दास मी दुर्बळ वैष्णवांचा ॥३॥
नेणतें नेणतेम कांहींच मी नेणतें । म्हणोनि देवें तुम्हांतें निरविले ॥४॥
येतां माझा हात दिधला तुमच्या करीं । घातलें आभारीं मायबापें ॥५॥
याचेनि कृपावसें येईल वाचेसरिसें । कळेल कांहीं तैसें निवेदीन ॥६॥
परी भानूसी देखणें करिजे अनुतेजें । तैसें ज्ञान माझें स्वामीप्रती ॥७॥
कल्पतरु याचक कृपणाचे द्वारीं । कां दैन्य भाकी थोरी कामधेनु ॥८॥
तैसी तुमची यांच्या मज दीनाप्रती । नकळे काळगति समर्थाची ॥९॥
मातेचिया स्नेहें बाळक बोबडें । खेळे लाडें कोडें नेणे लाजो ॥१०॥
नामा म्हणे तैसें तुम्हीं माझें कवतुक । करुनी सुखें सुख वाढविताम ॥११॥

१४
ज्ञानदेव म्हणे शंका न धरिजे मनीं । दृष्टि दुजेपणीम न ठेवावी ॥१॥
सुखें सुख घ्यावेम अनुभवोनी अनुभवावें । आहे तें आघवें ब्रह्मरुप ॥२॥
तो सुखाचा अनुवाद करी रे सुखरुपा । सुख वस्तुच्या दीपा नामदेवा ॥३॥
सुखाचिये ताटीं सुखची वोगरी । तृप्ती होईल थोरी क्षुधातुरा ॥४॥
पंढरीरायाचा तूं प्रेमभांडारी । आस पूर्ण करी मज याचकाची ॥५॥
विश्रांतीसी पात्रे तूंचि विष्णुदास । हा मज भरंवसा आहे तुझा ॥६॥
म्हणोनी तुझा संग धरिली थोर आस । झणीं होसी उदास भक्तराया ॥७॥
सिंधुहुनी सखोल सुरस तुझे बोल । आनंदाची वोल नित्य नवी ॥८॥
ते मज सादर ऐकव्वी सत्वर । श्रवण क्षुधातुर जाले माझे ॥९॥
जाणीव शहाणीव तरीच शोभे सर्व । जरी होय आविर्भाव वैराग्याचा ॥१०॥
ज्ञानदेवा म्हणे तूं भक्त अंतरंग । नलगे तुज पांग बहुज्ञतेचा ॥११॥

१५
ऐसें ऐकोनियां प्रेमा आला पोटीं । म्हणे बोलावी ते गोष्टी अनुभवाची ॥१॥
येर ते कर्मधर्म सर्वही पाल्हाळ । श्रमुचि केवळ जाणिवेचा ॥२॥
ऐसा संत भेटे विरळा भाग्ययोगें । जो आथिला वैराग्यें सप्रेमळू ॥३॥
सर्वभूतीं दया सर्वभावें करुणा । जेथें मीतूंपणा मावळला ॥४॥
भजन तयां नांव वाटे मज गोड । येर ते काबाड वायांविण ॥५॥
नमन ते नम्रता न देखें गुणदोष । अंअरी प्रकाश आनंदाचा ॥६॥
येर ते दांभिक जाणावे मायावी । विश्वास मी जीवीं न धरी त्यांचा ॥७॥
ध्यान तया नांव निर्विकार निकें । जें विश्वीं माझ्या देखें विठोबासी ॥८॥
अखंड ह्रदयीं तेचि आठवण । साजिरे समचरण विटेवरी ॥९॥
नादीं लुब्ध जैसें आसक्त हरिण । जाय विसरोन देहभाव ॥१०॥
यापरि तल्लीन दृढ राखें मन । या नांवें श्रवण आवडीचेम ॥११॥
व्यवसायीं चित्त ठेवुनी कृपण । लाभाचें चिंतन सर्वकाळ ॥१२॥
यापरि अखंड स्वहित विचारण । करिजे तें मनन सत्वशीळ ॥१३॥
परपुरुषीं जैसी आसक्त व्यभिचारिणी । न लागे तिच्या मनीं कामधाम ॥१४॥
कीटकीं भृंगुटिये जैसें अनुसंधान । निकें निजध्यासन एकविध ॥१५॥
सर्वभावें एक विठठलुचि ध्याये । सर्वांभूतीं पाहे रुप त्याचें ॥१६॥
सर्वांहूइ निराळा रजतमावेगळा । भोगीं प्रेमकळा तेचि भक्ति ॥१७॥
सत्वाचा सुभटु असंग एकटु । वैराग्य उद्‌भटू एकनिष्ठ ॥१८॥
प्रारब्धाचा भोगी नेणें देहस्मृती । अखंड ते धृति निर्विकार ॥१९॥
निर्वासना मन निजलाभें संपूर्ण । नेणें स्वरुपज्ञान विकल्पाचें ॥२०॥
अनुरागेम गोविंद ध्यायिजे एकांतीं । यापरती विश्रांति आणिक नाहीं ॥२१॥
कायावाचामनें हा माझा अनुभव । सांगितला सर्व आवडीचा ॥२२॥
नामा म्हणे हेंहि वोलविलें तेणें । उदार सर्वज्ञें पांडुरंगें ॥२३॥

१६
भक्त भागवत बहुसाल ऐकिले । बहु होऊनि गेले होती पुढें ॥१॥
परि नामयाचें बोलणें नव्हे हें कवित्व । हा रस अद्‌भुत निरुपमु ॥२॥
हे सुखविश्रांति नाहीं हो कल्पांतीं । विचारावें संतीं दूरदृष्टि ॥३॥
होतू शास्त्रवक्त्ते व्युत्पत्तीचे माथे । होतू बहु श्रोते बुद्धिवंत ॥४॥
होतू कर्मनिष्ठ विधीचे उद्‌भट । होतू सर्वश्रेष्ठ पूज्य लोकां ॥५॥
होतू कलावंत कवित्व कुशल । होतू का वाचाळ चतुरतेचे ॥६॥
होतू कां पाठक होतू कां साधक । होतू कां वाचक ग्रंथकार ॥७॥
होतू आत्मज्ञानी होतू निजध्यानीं । होतू कां विरक्तत सर्व संगीं ॥८॥
होतू योगयुक्त होतू जीवन्मुक्त । होतू कां विरक्त सर्व संगीं ॥९॥
ऐसे होतू का सभाग्य संपन्न सर्वज्ञ । परि मी न मनीं तुजविण विष्णुदासा ॥१०॥
हे खूण जाणताम एक पंढरीरावो । रुक्मादेवी नाहो श्रीविठठल ॥११॥

१७
पश्चिमे प्रभास आदि करोनी द्वारका । पाहिल्या सकळिका मोक्षपुर्‍या ॥१॥
पंथीं पावन तीर्थें करुनि सकळिकें । प्रक्षाळलीं पातकें वासनेचीं ॥२॥
परी पंढरीचें प्रेम नामयाचे जीवीं । माउलीं आठवी पांडुरंग ॥३॥
जीवन्मुक्त दोन्हीं भक्त आणि ज्ञानी । परतोनि तेथोनि येते मार्गीं ॥४॥
तृषाकांत वनीं होतसे पीडनी । पडलें चिंतवणीं जीवनालागीं ॥५॥
तंव दृष्टि एक कूप देखिला अवचिता । उदक तेथें पाहतां न लगे अतु ॥६॥
कवणेपरी येथें करुं रिघवणी । प्राण संतर्पणी वांचवावे ॥७॥
मग त्या नाम्याप्रती बोले ज्ञानदेवो । मज एक उपावो साध्य असे ॥८॥
लघिमेचे लाघव करुनि ते अवसरीं । उतरोनि भीतरीं घेतलें उदक ॥९॥
घेऊनि उदक निघाला बाहेरी । मग म्हणे अवधारी नामदेवा ॥१०॥
आणोनि उदक देईन तुझ्या हातीं । न दिसे अनुगति आणिक कांहीं ॥११॥
पडिल्या संकटीं विचारावें मनीं । सांडावी आयनी अभिमानाची ॥१२॥
आत्मा तो विठठल सर्व निरंतरीं । आज्ञा दे झडकरि वेळु जाला ॥१३॥
आत्मा तो विठ्ठलु असताम सर्व देहीं । माझी काय नाहीं चिंता त्यासी ॥१४॥
नामा म्हणे धीर करावा नावेक । दावीन कवतुक स्वामीजवळी ॥१५॥

१८
मग लावूनियां नेत्र निर्धारु पैं केला । ह्र्दयीं आठविला केशीराज ॥१॥
तूं इष्ट मित्र बंधु सोयरा जननी जनकु । नेणें मी आणिकु तुजवांचोनी ॥२॥
येई पंढरीराया मजलागीं धांवतु । झणीं पाहासी अंतू कृपाळुवा ॥३॥
तुझिये भेटीची बहु खंती वाटली । आसुवें दाटलीं नेत्रकमळीं ॥४॥
धीर न धरवे जीवा पोकारितो धांवा । ये माझ्या केशवा मायबापा ॥५॥
कायावाचामनेम विनटलों चरणासी । तो मी शरण आणिकांसी जाऊं कोणा ॥६॥
जन्मोनी पोसणा तुझाची म्हणती । मोकलितां अंतीं लाज कोणा ॥७॥
अनाथा कैवारी नामाची आयणी । वर्णिजे पुराणीं कीर्ति तुझी ॥८॥
तें काय लटकी वाणी करशील आजी । अजुनी तुज माझी करुणा न ये ॥९॥
गजेंद्राकारणें ज्या वेगीं धांवणें । केलें तंव स्मरणें कळवळोनी ॥१०॥
द्रौपदीचे आकांतीं येसी सोडविणें । तें मजकारणें विसरलासी ॥११॥
येतां निरविलें ज्ञानदेवाप्रती । दिधला त्याचे हातीं हात माझा ॥१२॥
तो तूं कैसा मजलागीं करशील उदास । धांव कासावीस थोर जालों ॥१३॥
सर्वभावें तू मजलागीं लोभापर । मी तुझा डिंगर आवडता ॥१४॥
नामा म्हणे हांसे जालें पिसुणाचें । न करी मज दीनाचें अव्हेरण ॥१५॥

१९
तंव निजभुवनीं सुखें पंढरीनाथ । नित्य जीवीं आर्त निजहक्तांचे ॥१॥
कृपेचा वारेसु होता देवापोटीं । तेचि करी गोष्ट रुक्माईसी ॥२॥
क्षेम माझा नामा यावा एक वेळां । मग मी जीवावेगळा जाऊं नेदी ॥३॥
आजि माझा डावा कां लवतो लोचन । करितसे स्फुरण वामबाहू ॥४॥
उद्वेग उपसर्ग वाटती जीवाशीं । कवना जिवलगाशीं कष्ट होती ॥५॥
वाजतां पैं वारा न लागावा राजसा । माझ्या विष्णुदासा भाविकासी ॥६॥
वाटे तानभूक जाली त्या पीडणी । तरीच माझ्या मनीं ऐशी दशा ॥७॥
तंव ती विश्वमाता विचारी नावेक । अवचिता शोक पडिला कानीं ॥८॥
म्हणे तृषाक्रांत नामा करितसे धांवा । वेगीं जाऊनि देवा सांभाळावें ॥९॥
तंव तो आर्तबंधु ऐकोनि वचन । मनाचेनि मनें वेगू केला ॥१०॥
तंव गडगडित कूप उदकें वोसंडला । कल्पांतीं खवळला सिंधु जैसा ॥११॥
ज्ञानदेव म्हणे जालें अभिन्नव । कैसा ऋणिया देव केला येणें ॥१२॥
सावध करोनिया दिलें आलिंगन । जीवें निंबलोण उतरिलें ॥१३॥
तो येरें चरणावरी ठेवियेला माथा । म्हणे माझे आहे चिंता विठोबासी ॥१४॥
नामा म्हणे माझे बहु लळे पुरविले । कैं देखेन पाउलें विटेवरी ॥१५॥

२०
योगी परम ध्यानीं बैसलिया जाणा । कांहीं या रे मना विश्रांति नुपजे ॥१॥
तुजवीण दुसरें कांहींच नाठवे । लागली तुझी सवे विष्णुदासा ॥२॥
कवण कुळीं तूं जन्मलासी नामा । केशव परमात्मा तुज जवळी ॥३॥
धेनु वसे वनीं वत्स असे घरीं । चित्त तयावरी ठेवुनी चरे ॥४॥
ते तया देखोनी संतोषली मनीं । तैसा तुझ्या गुणी वोल्हावलों ॥५।
तीर्थयात्रें जाणे न लगे कांहीं करणें । ऐकोनी तुझें गाणें सुखरुप ॥६॥
वेडावल्या श्रुतिस्मृति आणि पुराणें । योगियांची ध्यानें विसर्जिलीं ॥७॥
तुझें प्रेम सांडावें आणि मनें कोठें जावें । जावोनियां पाहावें काय कोठें ॥८॥
समाधिसोहळा लय लक्ष वैराग्य । आम्हांलागीं भाग्य आणियेलें ॥९॥
ऋषि गणगंधर्व ब्रह्मादिक सर्व । लक्षिताती ठावो अरुपाचा ॥१०॥
तो तुवां आम्हां सन्मुख उभा केला । चरणासी लागला ज्ञानदेव ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP