शेतकर्‍याचा असूड - पान ४

शूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्रंथात केले आहे.


पान ४
सरकारी गोरे अधिकारी हे बहुतकरून ऐषआरामांत गुंग असल्यामुळें त्यांना शेतकर्‍यांचे वास्तविक स्थितीबद्दल माहिती करून घेण्यापूरती सवड होत नाहीं व या त्यांच्या गाफीलपणानें एकंदर सर्व सरकारी खात्यांत ब्राह्यण कामगारांचें प्राबल्य असतें. या दोन्ही कारणांमुळे शेतकरी लोक इतके लुटले जातात कीं, त्यांस पोटभर भाकर व अंगभर वस्त्नही मिळत नाही.
एकंदर सर्व हिंदुस्थानांत पूर्वी कांहीं परदेशस्थ व यवनी बादशाहा व कित्येक स्वदेशीय राजेरजवाडे या सर्वांजवळ शूद्र शेतकर्‍यांपैकी लक्षावधि सरदार, मानकरी, शिलेदार, बारगीर, पायदल, गोलंदाज माहूत, ऊंटवाले व अतिशूद्र शेतकर्‍यांपैकी मोतद्दार चाकरीस असल्यामुळे, लक्षावधि शूद्रादि अतिशूद्र शेतकरी लोकांचे कुटुंबास शेतसारा देण्याची फारशी अडचण पडत नसे. कारण बहुतेक शेतकर्‍याच्या कुटुंबांतील निदान एखाद्या मनुष्यास तरी लहानमोठी सरकारी चाकरी असावयाचीच. परंतु हल्लीं सदरचे बादशहा, राजेरजवाडे वगैरे लंपास गेल्यामुळें सुमारें पंचवीस लक्षाचें वर शूद्रादि अतिशूद्र शेतकरी वगैरे लोक बेकार झाल्यामुळे त्या सर्वांचा बोजा शेतकी करणारांवर पडला आहे.
आमच्या जहामर्द इंग्रज सरकारच्या कारस्थानानें एकंदर सर्व हिंदुस्थानांत हमेशा लढायांचे धुमाळयांत मनुष्यप्राण्यांचा वध होण्याचें बंद पडल्यामुळे चहूंकडे शांतता झाली खरी, परंतु या देशांत स्वार्‍या, शिकारी बंद पडल्यामुळें एकंदर सर्व लोकांचें शौर्य व जहामर्दी लयास जाऊन राजेरजवाडे "भागू बाया " सारखे दिवसा सोवळें नेसून देवपूजा करण्याचे नादांत गुंग होऊन रात्नीं निरर्थक उत्पत्ति वाढविण्याचे छंदांत लंपट झाल्यामुळें, येथील चघळ खानेसुमारी मात्न फार वाढली. यामुळें सर्व शेतकर्‍यांमध्यें भाऊहिस्से इतके वाढले कीं, कित्येकांस आठाआठ, दहा दहा पाभारीचे पेर्‍यावर गुजारा करावा लागतो, असा प्रसंग गुजरला आहे. व अशा आठआठ, दहादहा पाभरीचे पेर्‍याकरितां त्यांना एकदोन बैल जवळ बाळगण्याची ऐपत नसल्यामुळें ते आपलीं शेतें शेजार्‍यापाजार्‍यास अर्धेलीनें अथवा खंडानें देऊन, आपलीं मुलेंमाणसे बरोबर घेऊन कोठेंतरी परगांवीं मोलमजुरी करून पोट भरण्यास जातात.
पूर्वी ज्या शेतकर्‍याजवळ फारच थोडीं शेतें असत व ज्याचा आपले शेतीवर निर्वाह होत नसे, ते आसपासचे डोंगरावरील. दर्‍याखोर्‍यांतील जंगलांतून ऊंबर, जांभूळ वगैरे झाडांचीं फळें खाऊन व पळस, मोहा इत्यादी झाडांचीं फुलें, पानें आणि जंगलांतून तोडून आणलेल्या लाकूडफाटयां विकून, पेट्टीपासोडीपुरता पैसा जमा करीत व गांवचे गायरानाचे भिस्तीवर आपल्याजवळ एक दोन दोन गाया व दोनचार शेरडया पाळून त्यांच्यावर जेमतेम गुजारा करून मोठया आनंदानें आपआपल्या गावींच रहात असत. परंतु आमचे मायबाप सरकारचे कारस्थानी युरोपियन कामगारांनीं आपली विलायती अष्टपैलू अक्कल सर्व खर्ची घालून भलें मोठे टोलेजंग जंगलखातें नवीनच उपस्थित करून, त्यामध्यें एकंदर सर्व पर्वत, डोंगर, टेकडया दरींखोरीं व त्याचे भरीस पडित जमिनी व गायरानें घालून फारेस्टखातें शिखरास नेल्यामुळें दीनदुबळया पंगु शेतकर्‍याचे शेरडाकरडांस या पृथ्वीचे पाठीवर रानचा वारासुद्धां खाण्यापुरती जागा उरली नाहीं. त्यांनीं आतां साळी, कोष्टी, सणगर, लोहार, सुतार वगैरे कसबी लोकांच्या कारखान्यांत त्यांचे हाताखालीं किरकोळ कामें करून आपलीं पोटें भरावींत, तर इंग्लंडांतील कारागीर लोकांनीं रुचिरुचीच्या दारु-बाटल्या, पाव, बिस्कुटें, हलवे, लोणचीं, लहानमोठया सुया, दाभण, चाकू, कातर्‍या, शिवणाचीं यंत्ने, भाते, शेगडया, रंगीबेरंगी बिलोरी सामान सूत, दोरे, कापड, शाली, हातमोजे, पायमोजे, टोप्या, काठया छत्न्या, पितळ, तांबें लोखंडी पत्ने, कुलपें, किल्ल्या, डांबरी कोळसे, तर्‍हेतर्‍हेच्या गाडया, हारनिसे, खोगरें, लगाम शेवटीं पायपोस यंत्नद्वारे तेथें तयार करून, येथें आणून स्वस्त विकू लागल्यामुळें, येथील एकंदर सर्व मालास मंदी पडल्या-कारणानें येथील कोष्टी, साळी, जुलयी, मोमीन इतके कंगाल झाले आहेत कीं, त्यांपैकीं कित्येक विणकर लोक अतिशय मंदीचे दिवसांत उपाशी मरूं लागल्यामुळें अब्रूस्तव कधीं कधीं चोरून छपून आपला निर्वाह डाळीच्या चुणीवर, कित्येक तांदळाच्या व गव्हाच्या कोंडयावर व कित्येक अंब्यांच्या कोयांवर करितात. कित्येक पद्यसाळी, घरांतील दातांशीं दांत लावून बसलेल्या बायकापोरांची स्थिति पहावेनाशी झाली म्हणजे, संध्याकाळीं निःसंग होऊन दोनचार पैशांची उधार शिंदी पिऊन बेशुद्ध झाल्याबरोबर, घरांत जाऊन मुर्द्यासारखे पडतात. कित्येक पद्यसाळी गुजरमारवाडयांकडून मजुरीनें वस्त्नें विणावयास आणलेलें रेशीम व कलाबतू येईल त्या किंमतीस विकून आपल्या मुलांबाळांचा गुजारा करूण, गुजरमारवाडयांचे हातीं तुरी देऊन रातोरात परगांवीं पळून आतात. अशा पोटासाठीं लागलेल्या बुभुक्षित कसबी लोकांनीं रिकाम्या शेतकर्‍यांस मदत कशी व कोणती द्यावी ?
दुसरें असें कीं, शूद्रादि अतिशूद्रांवर पुरातनकाळीं आपले वाडवडिलांनीं महत्प्रयासांनी व कपाटांनीं मिळविलेलें वर्चस्व चिरकाळ चालावें व त्यांनीं केवळ घोडा, बैल वगैरे जनावरांसारखे बसून आपणांस सौख्य द्यावें, अथवा निर्जीव शेतें होऊन आपणासाठीं जरूरीचे व ऐषरामाचे पदार्थ त्यांनीं उत्पन्न करावेत, या इराद्यानें आटक नदीचे पलीकडेस हिंदु लोकांपैकीं कोणी जाऊं नये, गेले असतां तो भ्रष्ट होतो अशी बाब ब्राह्यण लोकांनी हिंदु धर्मांत घुसडली. यापासून ब्राह्यण लोकांचा इष्ट हेतू सिद्धिस गेला; परंतु इतर लोकांचें फारच नुकसान झालें. परकीय लोकांच्या चालचलणुकीचा त्यांस पडोसा न मिळाल्यामुळेच ते खरोखर आपणास मानवी प्राणी न समजतां, केवळ जनावरे समजूं लागले आहेत. इतर देशांतील लोकांशीं व्यापारधंदा अगदीं नाहींसा झाल्याने ते कंगाल होऊन बसले; इतकेंच नाहीं परंतु " आपले देशांत सुधारणा करा. आपले देशांत सुधारणा करा, " अशी जी सुधारलेले ब्राह्यण लोक निदान बाह्यत्कारी हल्लीं हकाटी पिटीत आहेत, त्यांस कारण त्यांची ही वर जाणविलेली धर्माची वाव कारण झाली असावी, हें अगदीं निर्विवाद आहे. या कृत्निमी बाबींमुळें साळी, सुतात वगैरे कारागीर कोकांचें तर अतिशय नुकसान झाले. आणि त्यांस ती पुढे किती भयंकर स्थितीस पोहोंचवील, याचा अदमास खर्‍यां देशकल्याणेच्छुखेरीज कोणासही लागणार नाहीं.
आतां कोणी अशी शंका घेतील कीं, गरीब शेतकर्‍यांनीं, ज्या शेतकर्‍यांजवळ भरपूर शेतें असतील, त्याचे हाताखालीं मोलमजुरी करून आपला निर्वाह करावा, तर एकंदर सर्व ठिकाणीं संतति जास्त वाढल्यामुळें कांहीं वर्षे पाळीपाळीनें शेतें पडिक टाकण्यापुरतीं भरपूर शेतें शेतकर्‍यांजवळ उरलीं नाहींत, तेणेंकरून शेतांस विसांवा न मिळतां तीं एकंदर सर्व नापीक झालीं. त्यांत पूर्वीप्रमाणें पिके देण्यापुरतें सत्त्व शिल्लक राहिलें नाहीं. त्यांना आपल्या कुटुंबाचाच निर्वाह करितां नाकीं दम येतात, तेव्हां त्यांनीं आपल्या गरीब शेतकरी बांधवांस मोलमजुरी देऊन पोसावें, असें कसें, होईल बरें ? अशा चोहोंकडून अडचणींत पडलेल्या बहुतेक शेतकर्‍यांस आपली उघडीं नागडीं मुलें शाळेंत पाठविण्याची सवड होत नाहीं व हें सर्व आमच्या दूरदृष्टी सरकारी कामगारांस पक्केपणीं माहीत असून ते सर्व अज्ञानी मुक्या शेतकर्‍यास विद्या देण्याच्या मिषानें सरसकटीनें लाखों रुपये लोकलफंड गोळा करितात व त्यांपैकीं एक तृतियांश रक्कम नांवाला विद्याखातीं खर्ची घालून कोठें कोठें तुरळक तुरळक शाळा घातल्या आहेत. त्या शाळेंत थोडीबहुत शेतकरी आपलीं मुलें पाठवितात. परंतु त्यांचे मुलांस शिकविणारे शिक्षक स्वतः शेतकरी नसल्यानें त्यांस असाबी तशी आस्था असते काय ? जे लोक आपल्या मतलबी धर्माच्या बडिवारामुळें शेतकर्‍यास नीच मानून सर्वकाळ स्नानसंध्या व सोंवळेचाव करणारे, त्यांजपासून शेतकर्‍याचे मुलांस यथाकाळी योग्य शिक्षण न मिळतां, ते जसेचे तसेच ठोंबे रहातात, यात नवल नाहीं. कारण आजपावेतों शेतकर्‍यांपासून वसूल केलेल्या लोकलफंडाचे मानानें शेतकर्‍यांपैकी कांही सरकारी कामगार झाले आहेत काय ? व तसें घडून आलें असल्यास ते कोणकोणत्या खात्यांत कोणकोणत्या हुद्यांचीं कामें करीत आहेत, याविषयीं आमचे वाकबगार शाळाखात्यांतील डिरेक्टरसाहेबांनीं नांवनिशीवार पत्नक तयार करून सरकारी ग्याझिटांत छापून प्रसिद्ध केल्यास, शेतकरी आपले मायबाप सरकारास मोठया उल्हासानें जेव्हां दुवा देतील, तेव्हां सरकारी ग्याझिटियर मायबापांचे डोळे उघडतील. कारण खेडयापाडयांतून जेवढे म्हणून शिक्षक असतात, ते सर्व बहुतकरून ब्राह्यण जातीचेच असतात. त्यांचा पगार आठबारा रुपयांचे वरतीं नसते, असले पोटार्थी अविद्वान ब्राह्यण शिक्षक, आपला मतलबी धर्म व कृत्निमी जात्याभिमान मनांत दृढ धरून, शेतकर्‍यांचे मुलांस शाळेंत शिकवतां शिकवतां उघड रितीनें उपदेश करितात कीं, "तुम्हांला विद्या शिकून कारकुनांच्या जागा न मिळाल्यास आम्हासारखीं पंचांगें हातीं घेऊन घरोघर भिक्षा का मागावयाच्या आहेत ?"
अशा अज्ञानी शेतकर्‍यांच्या शेतांची दर तीस वर्षांनी पैमाष करितांना, आमचे धर्मशील सरकारचे डोळे झाकून प्रार्थना करणारे युरोपीयन कामगार, शेतकर्‍यांचे बोडक्यावर थोडीतरी पट्टी वाढविल्याशिवाय शेवटी ’ आमेन ’ ची आरती म्हणून आपल्या कंबरा सोडीत नाहीत. परंतु सदाचें काम चालू असतां शिकारीचे शोकी युरोपीयन कामगार ऐषआराम व ख्यालीखुशालींत गुंग असल्यामुळें त्यांचे हाताखालेचे धूर्त व्राह्यण कामगार अज्ञानी शेतकर्‍यास थोडे का नागवितात ? व युरोपीयन कामगार त्यांजवर बारीक नजर ठेवितात काय ?
जेव्हां अज्ञांनी व मूढ शेतकर्‍यांत आपसांत शेताच्या बांधाबद्दल किंवा समाईक विहिरीवर असलेल्या भाऊबंदीच्या पाणपाळीसंबंधीं थोडीशी कुरबुर होऊन मारामारीं झालीं कीं, कळीचे नारद भटकुळकरर्णी यांनीं दोन्हीं पक्षांतील शेतकर्‍यांचे आळींनी जाऊन त्यांस निरनिराळे प्रकारचे उपदेश करून, दुसरे दिवशीं त्यापैकीं एक पक्षास भर देऊन त्यांचे नांवाचा अर्ज तयार करून त्यास मामलेदाराकडे पाठवितात. पुढे प्रतिवादी व साक्षीदार हे, समन्स घेऊन आलेल्या पट्टेवाल्यास बरोबर घेऊन आपआपलीं समन्सें रुजू करण्याकरितां कुळकरण्यांचे वाडयांत येतात व त्यांचीं समन्से रुजूं करून शिपायास दरवाज्याबाहेर घालवितांच दोन्ही पक्षकारांस पृथक पृथक एके बाजूला नेऊन सांगावयाचें कीं, " तुम्ही अमक्या व तुम्ही तमक्या वेळीं मला एकांतीं येऊन भेटा, म्हणजे त्याविषयीं एखादी उत्तम तोड काढूं " नंतर नेमलेल्या वेळीं वादी व त्याचे पक्षकार घरीं आल्यावर त्यास असें सांगावयाचें कीं, " तुम्ही फार तर काय परंतु अमुक रकमेपर्यंत मन मोठें कराल, तर मामलेदारसाहेबांचे फडनविसांस सांगून तुमचे प्रतिवादीस कांहींना कांहीं तरी सजा देववितों. कारण ते केवळ फडनविसाचे हातांत आहेत. मी बोलल्याप्रमाणें कांहींच घडून न आणल्यास, मी तुमची रक्कम त्याजपासून परत घेऊन तुम्हास देईन व माझे श्रमांबद्दल बहिरोबा तुम्हास जी बुद्धि देईल तेंच द्या किंवा काहींच दिलें नाहीं तरी चिंता नाहीं. माझी काहीं त्याविषयीं तक्रार नाहीं. तुम्हांला यश आलें म्हणजे आम्ही सर्व मिळविलें." नंतर प्रतिवादीचे पक्षकाराकडून वादीचे दुपटीनें व आपले श्रमांबद्दल कांहीं मिळून रक्कम घेऊन त्याजबरोबर असा करार करावयाचा कीं," मी सांगतों तशी तुम्ही तकरार देऊन त्याबद्दल दोनतीन बनावट साक्षीदार द्या, म्हणजे फडनविसास सांगून तुमच्या केसासही धक्का लागूं देणार नाहीं, कारण त्याचें वजन मामलेदारसाहेबावर कसें काय आहे, हें तुम्हाला ठावुकच आहे. व आतां मीं तुम्हबरोबर करार केल्याप्रमाणें तुमचें काम फत्ते न झाल्यास त्याच दिवशीं तुमची रक्कम त्याजपासून परत आणून तुमची तुम्हांस देईन. परंतु माझे श्रमाबद्दलचे घेतलेल्या रुपयांतून तुम्हांस एक कवडी परत करणार नाहीं, हे मी आतांच सांगतो; नाहींतर अशा खटपटीवांचून माझी कांहीं चूल अडली नाहीं." नंतर मामलेदार कचेरींतील ब्राह्यणकामगार अक्षरशून्य अशा वादीप्रतिवादींच्या व त्यांच्या साक्षीदारांच्या जबान्या घेतेवेळीं, ज्या पक्षकारांकडून त्यांची मूठ गार झाली असेल, त्यांच्या जबान्या घेतेवेळी, त्यांस कांहीं सूचक प्रश्न घालून अनुकूल जबान्या तयांर करितात. परंतु ज्या पक्षकारांकडून त्यांचा हात नीट ओला झाला नसेल, त्यांच्या जबान्या लिंहितेवेळीं त्यामध्यें एकंदर सर्व मुद्दे मागेपुढें करून अशा तयार करितात कीं, यांजपासून वाचणाराच्या किंवा ऐकणार्‍यांच्या मनांत त्या कज्याचें वास्नविक स्वरूप न येतां, त्यांचा समज त्यांविरूद्ध होईल. कित्येक ब्राह्यण कारकून अज्ञान शेतकर्‍यांच्या जबान्या लिहितांना त्यातील कांहीं मुद्यांचीं कलमें अजिबात गाळून टाकितात. कित्येक ब्राह्यणकामगार शेतकर्‍यांच्या जबान्या आपल्या घरीं नेऊन रात्नीं दुसर्‍या जबान्या तयार करून सरकारी दप्तरांत आणून ठेवितात. असें असेल तर एखादा निःपक्षपाती जरी अम्मलदार असला, तरी त्याच्या हातूनही अन्याय होण्याचा संभव आहे. यापुढें खिसे चापसणार्‍या बगलेवकिलांनीं भरीस घातल्यावरून त्यांनीं युरोपियन कलेक्टराकडे अपीलें केल्यावर कलेक्टरांच्या शिरस्तेदारांच्या, ज्या पक्षकाराकडून मुठी गार होतील, त्याप्रमाणें त्यांच्या अर्जीच्या जबानीच्या सुनावण्या कलेक्टरपुढें करितात व त्या वेळीं यांतील बहुतेक मारु मुद्दे वाचतां वाचतां गाळन कलेक्टराचे मुखांतून शुद्ध सोनेरी वाक्यें, " टुमची टकरार टरकटी आहे " बाहेर पडून आपले वतीनें निकाल करून घेण्याचें संधान न साधल्यास, शिरस्तेदार त्यांचे प्रकरणावर आपले मर्जीप्रमाणें गिचमीड मराठी लिहून साहेबबहादूर संध्याकाळीं आपल्या मॅडस साहेबाबरोबर हवा खाण्यास जाण्याचे धांदलींत, अगर मराठी नीट समजणारा एखादा दंडुक्या साहेब असल्यास तो आदले दिवशीं कोठें मेजवानीस जाऊन जागलेला असल्यामुळें दुसरे दिवशीं सुस्त व झोपेच्या गुंगींत असतां, किंवा शिकारीस जाण्याचे गडबडींत तेथें जाऊन, पूर्वी त्यांनीं जसे शेरे सांगितले असतील, त्याप्रमाणें हुबेहूब वाचून दाखवून त्याच्या सह्या त्या प्रकरणावर सहज घेतात.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-01-18T10:53:31.8130000