मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|अवतार वाणी|

अवतारवाणी - भजन संग्रह ३४

संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.


एक तूं ही निरंकार (३३१)

जगात राहून सर्व जगाशी बेशक सारे व्यवहर करा ।

सुतदारा अन सगे सोयरे यांच्या संगे प्रेम करा ।

परि आम्हां अपुल्या गांवाचा विसर कदापी ना व्हावा ।

चार दिवस राहून जगी या जाणे आहे ज्या गांवा ।

अंगसंग व्यापून प्रभु हा सदैव याचे ध्यान करा ।

'अवतार' म्हणे की गुरुभक्तांनो संतांचा सन्मान करा ।

*

एक तूं ही निरंकार (३३२)

लोक बोलती जगात राहुन देव भेटणे कठीन अती ।

स्त्रिया पुत्र समवेत राहूनी भक्त म्हणविणे कठीण अती ।

विना समाधी विना तपस्या योगी होणे कठीण अती ।

सदैव राहुनी मायेमाजी हरि तोषविणे कठीण अती ।

पूर्ण शरण मी त्या सदगुरुला ज्याने मज हे जाणविले ।

'अवतार' म्हणे या राहुन जगती ज्ञान प्रभुचे मिळवियले ।

*

एक तूं ही निरंकार (३३३)

कोणी सुंदर काया दिधली कोणी जगता रचियले ।

रवि चद्राचा कोन घडविता कुणी आकाश निर्मियले ।

सकल वस्तू ज्याने पुरविल्या तया कधी तू आठविला ।

कुणी दिले बुद्धी चातुर्य असे कुणाची ही लीला ।

कवण्या कारण आला जगती अंती कुठे आहे जाणे ।

'अवतार' म्हणे हे दैवी रहस्य गुरुकरवी जाणूनी घेणे ।

*

एक तूं ही निरंकार (३३४)

ज्याचे आम्ही सकल पुत्र हे दावी मज कोण तो पिता ।

ज्याने रचिली सृष्टी सारी दावी तया कोण तो स्वतः ।

लाख करोडो नांवे ज्याची दावी कोण तो मज नामी ।

नाम जयाचे जगात चाले दावी कोण तो मज स्वामी ।

रंग रूपाहुनी न्यारा स्वामी वेद ग्रंथ ऐसे वदती ।

विरळे कुणी 'अवतार' जगी ते रहस्य याचे अनुभवीती ।

*

एक तूं ही निरंकार (३३५)

प्रसन्न होई ना हरि कदापी संयम पूजा पाठाने ।

प्रसन्न होई ना हरि कदापी तीर्थ स्नाने करन्याने ।

प्रसन्न होई ना हरि कदापी सुस्वर भजने गाण्याने ।

प्रसन्न होई ना हरि कदापी पुण्यदान करविण्याने ।

चरण धरीतां पूर्ण गुरुचे तरीच ईश्‍वर वश होई ।

म्हणे 'अवतार' कुणी नर विरळा दैवी भेद जाणुन घेई ।

*

एक तूं ही निरंकार (३३६)

जात पात अन् चालीरिती प्रभु निर्मिती काही नाही ।

हिन्दु मुस्लिम शीख ईसाई हरिने बनविले नाही ।

जन्माताच धर्माची चिह्ने संगे कुणी ना आणियली ।

आहार राहणीमान बंधने प्रभुने कुणा न लावियली ।

मानवतेचा धर्म आपुला पुर्ण होय हरी प्राप्तीने ।

'अवतार' हे सारे मिटती झगडे शरण गुरुला येण्याने ।

*

एक तूं ही निरंकार (३३७)

गर्व कुणाला असे स्वतःचा गर्व कुणा संपत्तीचा ।

गर्व कुणाला अधिकाराचा गर्व कुणाला शक्तीचा ।

गर्व कुणाला कुळ वंशाचा गर्व कुणा धन दौलतीचा ।

गर्व कुणाला सतवचनाचा गर्व कुणा साधुत्वाचा ।

गर्व कुणाला असे कलेचा असे कुणा कर्तृत्वाचा ।

'अवतार' भक्त तो जगतमाजी गर्व धरी आपुल्या गुरुचा ।

*

एक तूं ही निरंकार (३३८)

लोक बोलती मन शुद्धीवीण प्रभु भेटणे शक्य नसे ।

जोवर मन हे शच्छ न होई राम अंतरी कधी न वसे ।

मलीन अती कपड्यांना जैसे धोबी धूरुनी स्वच्छ करी ।

तैशापरी हा पूर्ण सदगुरु सारे अवगुण माफ करी ।

गुरु कॄपेने दुःख आपदा नष्ट क्षणामाजी होती ।

'अवतार' जीव गुरुचरण धरीतां सदैव काळ सुखी होती ।

*

एक तूं ही निरंकार (३३९)

लोक बोलती घर त्यागुनी जाय बनी तोची संत ।

सुंदर सुंदर त्यागुनी वस्त्रे भगवे घाली तो संत ।

संत असे जो लावी समाधी भस्म लावी तोची संत ।

लोक बोलती प्राणायाने ध्यान धरी तोची संत ।

गृहस्थी राहून प्रभु मिळविणे संतांची ही परम्परा ।

'अवतार' सदगुरु मिळता पूरा देव पहिला आज खरा ।

*

एक तूं ही निरंकार (३४०)

वैज्ञानिक अन विद्वानांनी शक्तीशाली बाँम्ब बनविले ।

विनाश होईल दुनिया सारी ऐसे बाँम्ब जगी आले ।

प्रयोग करण्या महासागरी बाँम्ब स्फोट किती केले ।

जीव विनाशासाठी बाँम्ब हे ठायी ठायी चालविले ।

संजीवनी सदगुरुने जगती औषध ऐसे बनवियले ।

'अवतार' म्हणे मी मरता मरता जीवन मज याने दिधले ।

N/A

References : N/A
Last Updated : July 22, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP