वामन पंडित - वेणुसुधा - प्रसंग १

कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.

मधुर - वेणु - रवें मन मोहरी
मधु - वनीं मधु - शत्रु नमो हरी
करुनि वंदन तत्पद - सारसा
कथिन वेणु - सुधा - रस सारसा ॥१॥
वनीं वाजवी वेणु जेव्हां मुरारी
व्रजीं चित्त कामें स्त्रियांचे थरारी
तया वर्णिती प्राण ठेवूनि कंठीं
वधू - वृंद तो संकटें दीन कंठी ॥२॥
अंगवक्र अधरीं धरि पांवा
गोप - वेष हरि तोचि जपावा
वाम - बाहुवरि गालहि डावा
तो ठसा स्व त्दृदयांत पडावा ॥३॥
वेणु जेविं अधरीं स्वर - रंध्रीं
अंगुली स्मरति गोप - पुरंध्री
कोमळा सु - चपळा अतिलंबा
सप्तही स्वर - रसा अविलंबा ॥४॥
ऐसिये हरिचिये मुरलीनें
काम - तत्पर मनें स्मरलीनें
मोहिलीं सह - वधु त्रिदशांचीं
आमुचीं न नवलें सुदशांचीं ॥५॥
गायनीं अमर जे अभिमानी
आणि देव - ललना स्व - विमानीं
त्या स्त्रियां - सहित दैत्य - जनाऽरी
मोहिले ह्नणति या व्रज - नारी ॥६॥
वेणु - ध्वनी तो सुर - गायकांनीं
त्यांच्या विमानांतहि बायकांनीं
आश्चर्य कानीं पडतांचि केलें
न तृप्त ज्यांचें मन हें भुकेलें ॥७॥
स्मर - शळें विकळा सुर - कामिनी
गलित नीविहि नेणति भामिनी
हरिस देखुनि त्या अधराऽमृता
त्वरित इच्छिति त्याविण ज्या मृता ॥८॥
किती की अशा बोलती गोप - दारा
दुज्या गोपिका वर्णिती त्या उदारा
महा थोर आश्चर्य हें आयका या
असें प्रार्थिती आणिखी बायका या ॥९॥
आयका नवल हें अबला हो
कीं स्थिरा घनिं विजा प्रबळा हो
हार येरिती मुकुंद उरीं वो
देखतां न उरतीच उरी वो ॥१०॥
वास ज्यांतचि रमा - रमणीचा
श्याम ऊर वरि हार मणीचा
वेणु - गान समयांत हरी तो
डोलतां जनमनास हरी तो ॥११॥
अधरिं - वेणु धरी जई तो हरी
विरहिणी - जन - चित्तहि मोहरी
व्रज - वधूंसि खुणा व्रज - राज तो
मुरलिमाजि वदोनि विराजतो ॥१२॥
करुनी वियोगें मुखा दीनवाणी
वसे तों विनोदें रमा - कांत वाणी
अकस्मात त्या वेणुनें कर्ण - रंध्रीं
निघे सौख्य तात्काळ पावे पुरंध्रीं ॥१३॥
क्षण असें सुख पावति मागती
त्वरित तें अधराऽमृत मागती
जस जसा ध्वनि गोड गमे मना
तसि तसी उपजे स्मर - कामना ॥१४॥
मोहती व्रज पशू मृग - गाई
आमुचें नवल काय अगाई
स्तब्ध होति लिखितें जसि चित्रें
वेणुच्या ध्वनि - रुसेंचि विचित्रें ॥१५॥
ज्यांसि न स्मरण त्दृत्सदनांत
ग्रास वो न गिळिती वदनांत
निद्रितेंचि अथवा लिहिलीं हो
चित्रिचीं न गमती पहिली हो ॥१६॥
मातृ - स्तनींचा रस आननांद
तों होय वेणु - ध्वनि काननांत
गळे गिळेना पय वासुरांतें
आश्चर्य वाटे गगनीं सुरांतें ॥१७॥
उचलुनि श्रवण श्रवणाऽमृता
पशु पिती रस जीवन जो मृता
जवळि दूरहि वृंद असा असे
मधु - वनी हरि जेथ उभा असे ॥१८॥
चरित्रें करी आणिखी ही हरी तो
स्वलीला - रसें जो अविद्या हरी तो
स्त्रिया वर्णिती आणिखी एक लीला
तिला आयका नाशिते जे कलीला ॥१९॥
मल्लवेष रचिला अभिराम
श्री - धर - प्रभु - सवें बलराम
मोर - पत्र मुकुटीं तरु - पत्रें ॥२०॥
सये असा म्यां हरि देखिला गे
पाचारितो वेणु - खेंचि गाई
आश्चर्य तेव्हां करितों अगाई ॥२१॥
गोधनीं बहु पुढें नव जावें
ठाव एकचि धरुनि थिजावें
वाजवी ह्नणुनि जो निज पांवा
कृष्ण तोचि त्दृदयांत जपावा ॥२२॥
पशु जसे ध्वनिनें स्थिर राहती
तशि जळें न नद्यांतिल वाहती
व्रज - वधू सम होती न या सये
सुकृत अल्प विकल्प न यांस ये ॥२३॥
केलीं सु - पुण्यें जरि गोपि कांहीं
झालीं अपूर्णेचि तथापि कांहीं
कां धन्य आह्मीं व्रज - अंगनांहीं
तर्‍ही सदा श्री - हरि - संग नाहीं ॥२४॥
भुजा कांपती नित्य आलिंगनांतें
न फावे तरी सर्वदा अंगनांतें
जनांचा मनीं धाक वाटे जळाला
अवस्था दिसे हे नद्यांच्या जळाला ॥२५॥
हरि - प्रेम आह्मां जसें अंतरंगीं
नद्यांचें तसें दीसते वो तरंगीं
भुजा कांपती त्याचि आलिंगनांतें
व्रजीं होय आह्मां जसें अंगनांतें ॥२६॥
आह्मांत ही देखुनि कृष्ण जीतें
प्रेमें जळें लोचतिं येति जीतें
भये जनाच्या वरिच्या वरी ते
नेत्रींच नेत्रोदक आवरीते ॥२७॥
नद्यांतही स्तब्ध असेच पाणी
आह्मां तयांही सम चक्र - पाणी
स्वल्पें सुखें आमुचिया अदृष्टीं
तैशाचि याही दिसताति दृष्टी ॥२८॥
होऊनि शीतळ सुगंध समीर जातो
कृष्णाकडे तरि पदांऽबुजिंच्या रजां तो
आणू ह्नणूनि उचलूनि भुजा तरंगा
ज्या प्रार्थिता पवन दाउनि अंतरंगा ॥२९॥
कथिति येरिति ज्या व्रजनायका
वदति त्यांस दुज्या व्रज नायका
ह्नणति हें परिसा नवल क्षण
त्रिभुवनेश्वर मानव - लक्षण ॥३०॥
सुर सरस हरीच्या वर्णिती विक्रमातें
अनु - चर चरणाचे गाति कीर्तिक्रमातें
परम - पुरुष विष्णु श्रीश हा वाटला गे
स्मरत चरित त्याला मुक्तिची वाट लागे ॥३१॥
वनीं हा असे पर्वतीं सर्व गाई
तंई देखिलीं कौतुकें वो अगाई
दुरुनी करुनी कृपा चारितो वो
स्ववंशी - खें त्यांसि पाचारितो वो ॥३२॥
फळें मोक्ष काम्यें सुखें पुष्प - जाती
असें वेद वेदांत वर्णूनि जाती
फळें दोनि हीं विष्णु देणार साचा
तया दाखवी नाद वंशीरसाचा ॥३३॥
फळें दोनि हीं जे स्थळीं देव दावी
तनू तेचि साकार त्याची वदावी
असा विष्णु वृक्षांलतां - माजि पांवा
अहो दाखवी तो गुरुत्वें जपावा ॥३४॥
स्व शब्देंचि व्यापकालागिं दावी
स्वयें विष्णुची मूर्ति ते ही वदावी
फुलांची फळांची पडे वृष्टि भारी
लता - वृक्षरुपें दिसे कैठ भारी ॥३५॥
लतामाजि काटे तरु माजि पानें
उभे रोम ते वेणु - पीयूष - पानें
फळीं आणि पुष्पीं तयीं वृक्ष भारी
सुखें त्यां दिसे त्यांत तो कैठ भारी ॥३६॥
वृक्षां लतांसहि घडे गुरुभाव लोकीं
कीं विष्णु दाविति जनास कृपाऽवलोकीं
प्रेमें सुखें करिति विष्णु निरुपणातें
श्रेष्ठत्व साधिति लतात्व तरुपणातें ॥३७॥
मुखें वर्षती विष्णु - नामाऽमृतातें
सुधा पाजिती मृत्युलोकीं मृतातें
रसस्त्राव ऐशापरी गोड भारी
जसा संत शब्दा मधें कैठ भारी ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : July 04, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP