कार्तिक माहात्म्य - अध्याय ३४

कार्तिक माहात्म्य वाचल्याने गतजन्मातील पापे नष्ट होतात.

शंकर म्हणतातः-- कार्तिकेया ! जो आवळीच्या छायेखालीं बसून पितरांना पिंडदान करील, त्याचे पितर माधवाचे कृपेनें मुक्तीला जातील ॥१॥
जो मस्तकावर, हातांत, मुखांत, बाहूंवर व गळ्यांत आवळे धारण करुन भूषित होईल आवळे भक्षण करील तो मनुष्य नारायण होईल ॥२॥
जो वैष्णव आवळे धारण करितो, तो देवांनाही प्रिय होतो; मग मनुष्यांना प्रिय होईल म्हणून काय सांगावें ? ॥३॥
तुळशीची माळ व आवळ्यांची माळ, ज्याचे कंठांत आहे त्याच्या अंगावर केशव लोळतो असें समजावें ॥४॥
आवळे तुळशी व द्वारकेंतील मृत्तिका ( गोपीचंदन ) हीं तीन ज्याचे घरांत आहेत, त्याचें जन्म सफळ समजावें ॥५॥
जितके दिवस मनुष्य आवळीची माळा धारण करील तितके हजार वर्षे पर्यंत त्याची वस्ती वैकुंठांत होईल ॥६॥
तुळसीची व आवळीची आशा दोन माळा जो आपल्या गळ्यांत घालील, तो मनुष्य कोटी कल्पपर्यंत स्वर्गांत राहील ॥७॥
जो इंद्रियें स्वाधीन ठेवून शालग्रामाची पूजा तुलसीमंजिरींनीं करील, त्याला प्रत्येक तुळसीफुलाला अश्वमेध यज्ञाचें फल मिळतें ॥८॥ देवांमध्यें जसा विष्णु श्रेष्ठ, तशी फुलांमध्यें तुळसी श्रेष्ठ आहे ॥९॥
( जो दररोज तुळसींनीं विष्णूची पूजा करितो, त्याची जन्मापासूनची दुःखें, जरा, रोग हीं नाहींशी होऊन, त्याला मुक्ति मिळते ) ॥१०॥
जो कार्तिकांत तुळसीची माळा करुन तिनें विष्णूची पूजा करितो, त्याच्या पापांच्या अक्षरांची माळा कृष्ण खरोखर तोडून टाकून देतो ॥११॥
श्रीचंदन, कापूर अगरु व केशर यानीं मिश्रित गंध, केवडा, व दीपदान हीं केशवाला नेहमीं प्रिय आहेत ॥१२॥
कलियुगांत कार्तिक महिन्यामध्यें केवडा दिला, व दीपदान केलें तर हे कार्तिकेया ! त्याच्या शंभर कुलांचा उद्धार होतो ॥१३॥
कमळें, तुळसी, केवडा अगस्त्याचें फूल व पांचवें दीपदान हीं कार्तिकांत विष्णूला अर्पण करावीं ॥१४॥
हे वत्सा ! जो मालतीच्या मालांनीं कार्तिकांत केशवाचा मंडप सुशोभित करील, त्याला स्वर्गांत वस्ती प्राप्त होईल ॥१५॥
केवड्याच्या पुष्पांनी जर विष्णूची पूजा केली तर तो त्याला हजार वर्षेपर्यंत सुप्रसन्न होतो ॥१६॥
हे षडानना ! केवड्याच्या फुलांनीं विष्णूची पूजा केली असतां, त्या पुण्यानें तो मंगलकारक वैकुंठाला जातो ॥१७॥
चैत्र वैशाख, आला असतां दवण्यानें विष्णूची पूजा केली तर शंभर गाई दान दिल्याचें पुण्य मिळतें ॥१८॥
अगस्त्याच्या फुलांनीं विष्णूची पूजा केली तर त्याला पाहतांच नरकाग्नि थंड होतो ॥१९॥
अगस्त्याच्या फुलांनीं पूजा केली असतां जसा विष्णु संतुष्ट होऊन फल देतो, तसा तप करुन फल देत नाहीं ॥२०॥
कार्तिकांत सर्व फुलें सोडून अगस्त्यपुष्पांनींच केशवाची पूजा केली तर त्याला अश्वमेधाचें फल मिळतें ॥२१॥
अगस्त्यपुष्पांची माळा करुन जो विष्णूला अर्पण करितो, त्याची इंद्र देखील स्तुति करितो ॥२२॥
हजार गाई दान केल्यानें जें फळ मिळतें तें एक अगस्त्यपुष्प कार्तिकांत विष्णूला अर्पण केल्यानें मिळतें ॥२३॥
हरि जसा कौस्तुभमण्यानें किंवा वनमालेनें संतुष्ट होतो, तसाच कार्तिकांत तुलसीपत्रांनीं संतुष्ट होतो ॥२४॥
सूत म्हणालेः-- वृषध्वज शंकर, आपला पुत्र कार्तिकेय भक्तितत्पर होऊन विनयानें नम्र झाला आहे, असें पाहून पुन्हा बोलूं लागले ॥२५॥
ईश्वर म्हणालेः-- मयूरवाहना षडानना ! कार्तिकांतील दीपाचें माहात्म्य सांगतों; श्रवण कर ॥२६॥
पितर पितृगणांसह इच्छा करितात कीं, आमच्या कुलांत सत्पुत्र पितृभक्त, कार्तिकांत दीपदानानें केशवाला संतुष्ट करणारा असा होईल काय ? ॥२७॥ तुपानें किंवा तेलानें देवापुढें जो दिवे लावितो, त्याला अश्वमेध करुन काय करावयाचें ? ॥२८॥
कार्तिकामध्यें केशवापुढें ज्यानें दीपदान केलें त्यानें सर्व यज्ञ केलें. सर्व तीर्थांत स्नान केल्याप्रमाणें आहे ॥२९॥
विशेषेंकरुन कार्तिक कृष्णपक्षांतील शेवटचे दिवाळीचे पांच दिवस विशेष पुण्यकारक आहेत. त्या पांच दिवशीं जो दीपदान करील त्याला अक्षय्य पुण्य प्राप्त होतें ॥३०॥
दुसर्‍यानें लाविलेला दिवा एका चिचुंद्रीचे पायाने वात सारुन मोठा झाला म्हणून तिला दुर्लभ असा मनुष्यजन्म प्राप्त होऊन ती उत्तम गतीला गेली ॥३१॥
एक पारधी चतुर्दशीला शंकराची पूजा करुन सहज उपाशीं राहिला, म्हणून त्याला उत्तम असा विष्णुलोक प्राप्त झाला ॥३२॥
लीलवती नांवाची चांडालीण दुसर्‍यानें लाविलेल्या दिव्याचें संरक्षण केल्यानें शुद्ध होऊन अक्षय स्वर्गाला गेली ॥३३॥
कोणीं एक गोपानें अमावास्येला विष्णूची पूजा पाहून, जय जय असा वरचेवर शब्द उच्चार केला, म्हणून तो सार्वभौम राजा झाला ॥३४॥
म्हणून सूर्यास्त झाल्यावर कार्तिकांत घरांत, गोठ्यांत व सर्व ठिकाणी दिवे लावावे ॥३५॥
देवळांत, स्मशानांत, सरोवराच्या तीराला, दिपवाळींत पांच दिवस आपल्या कल्याणाकरितां तुपानें अथवा तेलानें दिवे लावावे ॥३६॥
दीपदानापासून पुण्य प्राप्त होऊन, ज्यांच्या श्राद्धादिक क्रिया नष्ट झाल्या आहेत अशा पापी पितरांचा देखील उद्धार होतो ॥६७॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये चतुस्त्रिंशोऽध्यायः ॥३४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP