मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २|
आता मृताशौच सांगतो

धर्मसिंधु - आता मृताशौच सांगतो

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


ज्यास मृताशौच आहे ते स्पर्शास योग्य नाहीत, व त्यास कर्माचाही अधिकार नाही. १० दिवसांनंतर नामकरणापूर्वीच शिशु मरण पावल्यास सपिंडांनी फक्त स्नान करावे. मातापितरांना पुत्र मृत झाल्यास त्रिरात्र व कन्या मृत झाल्यास १ दिवस अशौच. सापत्न मातेस सर्वत्र पित्याप्रमाणे अशौच. नामकरणापूर्वी नित्य खननच, नामकरणानंतर चौलप्रकरणापर्यंत व चौल झाले नसल्यास ३ वर्षे पूर्ण होईपर्यंत दहन व खनन यांचा विकल्प आहे. म्हणजे दहन करावे किंवा खनन करावे. नामकरणानंतर दात येण्यापूर्वी पुत्रमरणी दहन असल्यास सपिंडास १ दिवस अशौच. खनन असेल तर स्नानाने शुद्धि. दहन, खनन या उभयपक्षीही मातापितरास त्रिरात्र. कन्यामरणी तर त्रिपुरुष सपिंडांची उभयपक्षी स्नानाने शुद्धि. कन्यामरणी दात उत्पन्न होईपर्यंत उभयपक्षी मातापितरास १ दिवस अशौच. येथे नामकरण हे बाराव्या दिवसाचे उपलक्षण आहे. दात येणे हे सातव्या मासाचे उपलक्षण आहे. यावरून बाराव्या दिवसापासून ६ महिनेपर्यंत १ दिवस अशौच इत्यादि फलितार्थ निघतो. ७व्या मासापासून चूडाकर्मापर्यंत व चूडाकर्म झाले नसेल तर पुर्ण ३ वर्षे होईपर्यंत दहन किंवा खनन असता सपिंडास १ दिवस अशौच. काही ग्रंथकारांच्यामते खनन असता १ दिवस व दहन असता त्रिरात्र, असे अहे. मातापितरास उभयपक्षी त्रिरात्र, अशौच पुत्रवर्णी जाणावे. कन्यावर्णी ३ वर्षेपर्यंत सपिंड स्नानाने शुद्ध होतात. कन्या मृत असता ७ व्या मासापासून मातापितरांस त्रिरात्र अशौच ११ व्या दिवसापासून उपनयन होईपर्यंत पुत्र मृत असता व विवाहापर्यंत कन्या मृत असता त्रिरात्र, अशौच असे विज्ञानेश्वर याने म्हटले आहे. प्रथम वर्ष इत्यादि काली चूडाकर्म केलेला पुत्र मृत झाल्यास पिता इत्यादि सर्वास निश्चयाने ३ दिवस अशौच व निश्चयाने दहन आहे. तीन वर्षांनंतर चूडाकर्म केलेला किंवा न केलेला पुत्र उपनयनापूर्वी मृत झाल्यास पित्रादि सर्व सपिंडास ३ दिवस अशौच आहे; दहनही अवश्य करावे. उपनयन न झालेला पुत्र व अविवाहित कन्या मृत झाल्यास सोदकांस अशौच नाही. त्यांनी स्नान मात्र करावे. उपनयन न झालेला भ्राता मरण पावल्यास भगिनेस अशौच नाही. ज्यास पूर्ण २ वर्षे झाली नाहीत त्यास खनन मुख्य होय. अनुगमन वैकल्पिक आहे. २ वर्षे पूर्ण झालेल्यास दहन मुख्य होय, व अनुगमन नित्य आहे. याविषयी दहन, तिलांजली, इत्यादि अमंत्रकच करावे. चूडाकर्म केलेला व पूर्ण ३ वर्षांचा यास पिंडदान भूमिवर करावे, दंतोत्पत्तीपर्यंत त्याचे वयाचे असतील त्यांस त्याच्या उद्देशाने दुग्ध दान करावे. ३ वर्षापर्यंत किंवा चौलापर्यंत पायस दान करावे. नंतर उपनयनापर्यंत अशौचनिवृत्तीपर्यंत त्याच्या समान वयाचे जे असतील त्यास त्याच्या उद्देशाने भोजनादिक द्यावे.

स्त्री व शूद्र चूडाकर्म झाले असले तरी त्यास उदकदानादिक वैकल्पिक आहे. शूद्रास ३ वर्षेपर्यंत हे चशौच जाणावे. ह्यास उपनयनस्थानी विवाह आहे. म्हणजे ३ वर्षानंतर किंवा विवाह झाला नसेल तर १६ वर्षेपर्यंत शूद्र मृत झाल्यास ३ दिवस अशौच. १६ वर्षानंतर किंवा विवाहानंतर जात्य शौच जाणावे. ३ वर्षानंतर वाक्दानापूर्वी कन्या मृत झाल्यास त्रिपुरुष सपिंडास १ दिवस व मातापितरास ३ दिवस अशौच. दहन, वगैरे अमंत्रक करावे. वाग्दानानंतर विवाहापूर्वी कन्या मृत झाल्यास पित्याचे सपिंड व भर्त्याचे सपिंड यास ३ दिवस अशौच. याविषयी दोनही कुलामध्ये सप्त पुरुष सापिंड्य आहे. दाहादि अमंत्रकच करावे. जनन व उपनयन न झालेल्याचे मरण याविषयी अतिक्रांताशौच नाही. अपत्य झाल्याचे पित्याने श्रवण केले असता देशांतरी व कालांतरी त्याने अवश्य स्नान करावे. अनुपनीत पुत्र मृत असेल तर अतिक्रांत असताही स्नान करावे, असे स्मृत्यर्थसारात म्हटले. अनुपनीत पुत्र व अविवाहित कन्या यास मातापितर मृत असताच १० दिवस अशौच. अन्य कोणी मृत असेल तर त्यास कोणतेही अशौच नाही. उपनयन झाल्यावर मृत असता सपिंडास १० दिवस, सोदकांस त्रिरात्र व सगोत्रांस १ दिवस किंवा स्नानाने शुद्धि, इत्यादि विशेष पूर्वी सांगितलेला या स्थली जाणावा.

स्त्री व शूद्र विवाहानंतर मृत होतील तर १० दिवस अशौच. शूद्राचा विवाह झाला नसल्यास १६ वर्षांनंतर असे पूर्वी सांगितलेच आहे. विवाह झाल्यावर कन्या पित्याचे घरी मरण पावल्यास मातापितर, सापत्नमाता, सापत्नभ्राता व सोदर (सख्खा) भ्राता यास त्रिरात्र अशौच. पित्याचे घरी राहणारे पितृव्यादिकांस १ दिवस अशौच. पित्याचे घरी राहणार्‍या सपिंडासही १ दिवस अशौच आहे, असे काही ग्रंथकार म्हणतात. दुसर्‍या गावी कन्या मृत झाल्यास मातापितरांस पक्षिणी अशौच असे काही ग्रंथकार म्हणतात. विवाहित कन्या पतिगृही मृत झाल्यास मातापितरांस व सापत्न त्रिरात्र; भ्रात्यास पक्षिणी व पितृव्यादिकांस १ दिवस अशौच असे काही ग्रंथकार म्हणतात.

माता, पिता व सापत्न माता, ही मृत झाल्यास विवाहित कन्येस १० दिवसांपुर्वी त्रिरात्र व दहा दिवसांनंतर अन्यकाली व वर्षातीही पक्षिणी अशौच. उपनयन झालेला भ्राता व विवाहित भगिनी ही परस्परांच्या घरी मृत झाल्यास परस्परांस त्रिरात्र अशौच. दुसर्‍याचे घरी मृत झाल्यास परस्परास पक्षिणी, व दुसर्‍या गावी मृत झाल्यास १ दिवस अशौच. अत्यंत निर्गुणत्व असेल तर एक गावी असताही स्नान करावे. याप्रमाणे सापत्न भगिनी व सापत्न भ्राता याविषयीही असाच निर्णय जाणावा. भगिनी मृत झाली असता भगिनीसही याचप्रमाणे अशौच असावेसे वाटते. पितामह, चुलता इत्यादि मरण पावल्यास विवाहित कन्येने स्नानच करावे. मातुल मृत झाल्यास भाचा व भाची यास पक्षिणी अशौच. उपकारक मातुल मरण पावल्यास व स्वगृही म्हणजे भाच्याचे गृही मातुल मृत झाल्यास त्रिरात्र अशौच, अनुपनीत मातुल मृत झाल्यास व दुसर्‍या गावी मातुल मृत झाल्यास १ रात्र अशौच, याप्रमाणे सापत्न मातुल मृत झाल्यास असाच निर्णय जाणावा. मामी मरण पावल्यास भाचा व भाची यास पक्षिणी अशौच. सापत्न मातुलांनी म्हणजे सावत्र मामी मरण पावल्यास अशौच नाही. उपनयन झालेला भाचा मृत झाल्यास मतुल व मातुल भगिनी म्हणजे मावशी यास त्रिरात्र अशौच. याप्रमाणे सापत्न भाचा मृत असताही असेच जाणावे. अनुपनीत पदाने उपनयन मात्र होण्याचे राहिलेले असून चूडाकर्म झालेला किंवा चूडाकर्माचा अभाव असता ३ वर्षाहून अधिक वयाचा असा अर्थ घ्यावा. असे वाटते. यापुढेही उपनीत पदाचा असाच अर्थ घ्यावा. भाची मृत असेल तर फक्त स्नान करावे असे वाटते. मातामह मरण पावलेल्या स्वकन्येची अपत्ये जी पुत्र व कन्या यास त्रिरात्र अशौच. अन्य ग्रामी असता पक्षिणी. मातामही मरण पावल्यास दौहित्र व दौहित्री यास पक्षिणी. येथे सर्वत्र उपनयन झालेला पुरुष व विवाहित स्त्री यासच मातापितरांचे अशौचावाचून इतर अशौचाविषयी अधिकार आहे, असे संगितले आहे. येथे मातुल, मातुलानी, मातामहादिक मृत झाले असता स्त्रीरुप अपत्यास जे अशौच सांगितले ते त्र्यंबकीस अनुसरून आहे. इतर ग्रंथात इतके स्पष्ट कोठे आढळत नाहीत. उपनयन झालेला दौहित्र मृत झाल्यास मातामह व मातामही यास त्रिरात्र अशौच. अमुपनीत दौहित्र मरण पावल्यास मातामह व मातामही यास पक्षिणी. दौहित्री मृत झाल्यास अशौच नाही, असे वाटते.

सासू व श्वश्रुर मृत असता जामाता सन्निध असेल तर त्रिरात्र; सन्निध नसल्यास पक्षिणी; उपकार करणारे सासू व श्वशुर मृत झाल्यास सन्निध नसताही त्रिरात्रच अशौच. दुसर्‍या गावी असल्यास १ रात्र अशौच. भार्या मृत झाल्याने ज्याचा संबंध सुटला आहे व जे उपकार करणारे नाहीत असे सासू व श्वशुर मृत झाल्यास पक्षिणी किंवा १ दिवस अशौच असे वाटते. जामाता मृत झाल्यास सासू व सासरा यास १ रात्र अशौच किंवा स्नानाने शुद्धि. जामाता आपल्या घरी मृत झाल्यास त्रिरात्र अशौच. उपनीत शालक (पत्नीचा भ्राता) मृत झाल्यास भगिनीचे भर्त्यास १ दिवस अशौच. अनुपनीत शालक मृत झाल्यास स्नान व अन्यग्रामी असताहि स्नानच करावे. भार्या मृत झाल्याने ज्याचा संबंध सुटला आहे असा शालक मृत झाल्यास स्नान करावे असे नागोजीभट्टकृत अशौच ग्रंथात आहे. शालकाचा पुत्र मरण पावल्यास स्नान करावे. शालिका म्हणजे पत्नीची बहीण मृत झाल्यास शालकाप्रमाणेच १ दिवस इत्यादि अशौच आहे. असे एक ग्रंथकार म्हणतो. मातृष्वसा म्हणजे मावशी मृत झाल्यास भगिनीचे अपत्यास कन्या व पुत्र यास पक्षिणी अशौच, याप्रमाणे सापत्न मावशी मृत असताही असाच निर्णय जाणावा. पितृष्वसा म्हणजे आत मृत झाल्यास भ्रात्याच्या अपत्यास कन्या व पुत्र यास पक्षिणी अशौच. पित्याची सापत्न भगिनी मृत झाल्यास फक्त स्नान. भावाचे अपत्य मृत झाल्यास पितृष्वसेस म्हणजे पित्याचे भगिनीस स्नान. आपल्या घरी आत, मावशी ह्या मृत होतील तर ३ दिवस अशौच.

उपनयन झालेले बंधुत्रय मृत झाल्यास पक्षिणी; उपनयन न झालेले किंवा गुणहीन बंधुत्रय मृत झाल्यास १ दिवस आशौच. आपल्या घरी मृत असेल तर त्रिरात्र. येथे बंधुत्रय या पदाने आत्मबंधुत्रय, पितृबंधुत्रय, मातृबंधुत्रय असे ९ बंधुत्रय करावे. ते असे- आपल्या आतेचे पुत्र, आपल्या मावशीचे पुत्र व आपल्या मातुलाचे पुत्र हे आत्मबांधव जाणावे. पित्याच्या आतेचे पुत्र, पित्याच्या मावशीचे पुत्र व पित्याच्या मातुलाचे पुत्र हे पित्रबांधव होत. व मातेच्या आतेचे पुत्र, मातेच्या मावशीचे पुत्र, आणि मातेच्या मातुलाचे पुत्र हे मातृबांधव होत. आत इत्यादिकांच्या विवाहित कन्या मृत झाल्यावर त्यांचा बंधुवर्ग एक दिवसाने शुद्ध. या वचनाच्या बलाने १ दिवस अशौच. अविवाहित मृत झाल्यास स्नान मात्र करावे. असा निर्णयसिण्धूचा अभिप्राय आहे. बंधुत्रयाच्या वाक्यात पुत्रपदाने कन्येचे उपलक्षण आहे, असे नागोजीभट्ट म्हणतात. त्यांच्या मते आत इत्यादिकांच्या विवाहित कन्या मृत झाल्यास पक्षिणी, अविवाहित मरण पावल्यास १ दिवस, इत्यादि बंधुत्रय मृत असता आत इत्यादिकांच्या कन्यांनी स्नान करावे, असे निर्णयसिंधूच्या आशयावरून सिद्ध होते. पुत्रपदाप्रमाणे त्या वाक्यातील आत्मपदाचाही कन्यापरार्थ प्राप्त झाल्यामुळे कन्यानींही बंधुत्रयाचे अशौच धरावे, असे नागोजीभट्टाच्या मताने ठरते. पण त्याविषयी बहुशिष्टाचार निंदा होते म्हणून निर्णयसिंधूचा अभिप्राय योग्य आहे, असे वाटते.

येथे हे तत्व आहे. देवदत्ताच्या ९ बंधूमध्ये आत्मबंधुत्रयाविषयी संबंध सारखा असल्याने परस्पर अशौच आहे. अवशिष्ट बंधुषटकाविषयी तर बंधुषडक मृत झाल्यास देवदत्तास अशौच आहे. पण देवदत्त मृत झाल्यास बंधुषटकास अशौच नाही. कारण संबंधाचा अभाव आहे. याप्रमाणे बुद्धिवंतांनी जाणावे. दत्तक मृत झाल्यास मृत पूर्वापर मातापितरांस त्रिरात्र, सपिंडास १ दिवस अशौच. उपनयन झालेल्या दत्तकाचे मरणादिक झाल्यास पालक पिता इत्यादि सपिंडास १० दिवसादिकच अशौच आहे. असे नीलकंठकृत दत्तकनिर्णयात सांगितले आहे. दत्तकाने पूर्वापर मातापितर मृत झाल्यास त्रिरात्र, व पूर्वापर सपिंड मृत झाल्यास १ दिवस अशौच धरावे. मातापित्याचे और्ध्वदेहिक कर्म करणे असेल तर कर्मसंबंधी १० दिवसच अशौच धरावे. दत्तकाचे पुत्रपौत्र इत्यादिकांचे जनन किंवा मरण असल्यास पूर्वापर सपिंडास १ दिवस अशौच. याप्रमाणे पूर्वापर सपिंडाचे मरणादिक असता दत्तकाचे पुत्रपौत्र इत्यादिकासही १ दिवस अशौच. हा निर्णय सपिंड, समानोदक यापेक्षा निराळा दत्तक घेतला असल्यास त्याविषयीचा आहे, असे जाणावे. सगोत्र, सपिंड व सोदक दत्तक घेतला असल्यास क्रमाने १० दिवस, त्रिरात्र किंवा जसे प्राप्त असेल तसे अशौच आहे.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP