मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणिसावा|

एकनाथी भागवत - आरंभ

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


॥श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो सद्‍गुरु त्र्यंबका । ब्रह्मगिरिनिवासनायका ।

त्रिगुणत्रिपुरभेदका । कामांतका गिरिजेशा ॥१॥

तुझा अनाहताचा डमरु । सर्व शब्दें करी गजरु ।

वेदानुवादें निरंतरु । त्रिकांडीं थोरु गर्जत ॥२॥

तुझें हातींचें खट्वांग । करी जीवाचा जीवभंग ।

अनंगेंसीं जाळूनि अंग । अंगसंग तैं देशी ॥३॥

त्रिनयना त्र्यंबकलिंगा । तुजपासोनि प्रवाहे चिद्‍गंगा ।

ते पवित्रपणें उद्धरी जगा । प्रकाशगर्भा शंकरा ॥४॥

प्रत्यक्ष दिसती दोन्ही लोचन । तिसरा गुप्त ज्ञाननयन ।

यालागीं तूं त्रिलोचन । नयनेंवीण दीसशी ॥५॥

निजांगें वाहसी बोधचंद्र । यालागीं तूं चंद्रशेखर ।

चंद्रसूर्यादि चराचर । तुझेनि साचार प्रकाशे ॥६॥

` भव ' या नांवाची ख्याती । भवप्रकाशक तुझी चिच्छ्क्ती ।

तूंचि विष्णु प्रजापती । रुद्र तूं अंतीं संहर्ता ॥७॥

मोडूनियां नामरूपमुद्रा । जीव आणिशी एकाकारा ।

अत्यंत प्रळयींच्या प्रळयरुद्रा । चित्समुद्रा शिवरूपा ॥८॥

शिव शिव जी गुरुराया । निजभावें लागतां पायां ।

तंव गुरुशिष्यत्व गेलें लया । दावूनियां निजरूप ॥९॥

तें निजरूप देखतां दृष्टीं । कैंचा जीव कैंची सृष्टी ।

निमाली त्रिगुणेंसीं त्रिपुटी । पडली मिठी स्वानंदीं ॥१०॥

त्या स्वानंदाचे उद्‍गार । सांवरतां नावरती थोर ।

त्या स्वानंदाचें निजसार । सत्य साचार एकादश ॥११॥

त्याहीमाजीं अतिगहन । सुखस्वानंदनिरूपण ।

तो हा एकुणिसावा अध्याय जाण । परमकारण शास्त्रार्थीं ॥१२॥

जें ऐकतां निरूपण । परमानंद उथळे जाण ।

एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥१३॥

सत्रावे अठरावे अध्यायांप्रती । स्वधर्मकर्में ब्रह्मप्राप्ती ।

वर्णाश्रमस्थितिगती । उद्धवाप्रती सांगीतली ॥१४॥

एकुणिसावे अध्यायीं जाण । जेणें ज्ञानें साधिलें निजज्ञान ।

त्या ज्ञानाचें त्यागलक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥१५॥

कर्म-कर्तव्यता-कारण । जीवन्मुक्तासी नाहीं जाण ।

उद्धवाचे यमादि प्रश्न । हेही श्रीकृष्ण सांगेल ॥१६॥

शास्त्रयुक्त पांडित्यज्ञान । प्रपंचाचें मिथ्या निरूपण ।

तें `आनुमानिक' पुस्तकज्ञान । सत्यपण त्या नाहीं ॥१७॥

पूर्वे आहे माझें गमन । हें पूर्वील शुद्ध स्मरण ।

परी दिग्भ्रम पडिल्या जाण । पश्चिमे आपण पूर्व मानी ॥१८॥

तैसें शाब्दिक शास्त्रज्ञान । बोले आन करी आन ।

तेणें नव्हे समाधान । सर्वथा जाण साधकां ॥१९॥

जेवीं कां दिग्भ्रम मोडे । तैं पूर्वेचा चाले पूर्वेकडे ।

तेवीं अपरोक्षज्ञान जैं जोडे । तैं साधक पडे स्वानंदीं ॥२०॥

जें जें ऐके वेदांतश्रवण । तें अंगें होत जाण आपण ।

हें अपरोक्षाचें लक्षण । सत्यत्वें जाण अतिशुद्ध ॥२१॥

ऐसें नव्हतां अपरोक्षज्ञान । सांडूं नये श्रवणमनन ।

अवश्य करावें साधन । प्रत्यगावृत्ती जाण अत्यादरें ॥२२॥

झालिया अपरोक्षज्ञान । प्रपंचाचें मिथ्या भान ।

विषयांसी पडलें शून्य । कल्पना जाण निमाली ॥२३॥

तेणेंचि पुरुषें आपण । त्यागावें गा ज्ञानसाधन ।

हेंचि निरूपणीं निरूपण । देव संपूर्ण सांगत ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP