मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सतरावा|
श्लोक २० वा

एकनाथी भागवत - श्लोक २० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


अशौचमनृतं स्तेयं नास्तिक्यं शुष्कविग्रहः ।

कामः क्रोधश्च तर्षश्च स्वभावोऽन्तवसायिनाम् ॥२०॥

ये श्लोकींचे अष्ट गुण । त्यागावया न मनी ज्याचें मन ।

तोही अंत्यजासमान । हें प्रकृतिलक्षण अतिनिंद्य ॥२००॥

ज्यासी स्नानसंध्या शौचाचार । स्वकर्म नावडे साचार ।

अंतरीं विकल्प अपार । जैसा विखार काळिया ॥१॥

`कनकफळ' हें नाम गोमटें । आंत माजिरें बाहेर कांटे ।

तैसें सबाह्य वोखटें । `अशौच' मोठें त्या नांव ॥२॥

शरीरीं श्वेत कुष्ठ निर्नासिक । तोंडाळ वोढाळ पतिनिंदक ।

ते स्त्रियेच्या ऐसें देख । अशौचक सबाह्य ॥३॥

यापरी गा `अशौचता' । ज्याचे अंगीं स्वभावतां ।

तो जाण पां तत्त्वतां । गुण प्रथमता अंत्यजाचा ॥४॥

`असत्यता' जे प्रकृतीपाशीं । अखंड बैसे अहर्निशीं ।

मातापितादि गुरूंसी । झकवणें त्यांसी मिथ्यात्वें ॥५॥

जेवीं कां शिमग्याच्या सणीं । `रामकृष्ण' न म्हणे कोणीं ।

उपस्थनामें गर्जे वाणी । संतोषोनी स्वानंदें ॥६॥

तेवीं जागृति-स्वप्न-सुषुप्तीं । `असत्य' आवडे ज्याच्या चित्तीं ।

तो जाण पां निश्चितीं । अंत्यजप्रकृति स्वभावें ॥७॥

पडिलिया दृष्टी बुडीं । मायबापांचें ठेवणें काढी ।

नाना विश्वासपरवडी । बुडवी गांठोडी गुरूची ॥८॥

सधन सांपडल्या हाता । नाना युक्तीं अतिक्षुद्रता ।

नातरी बलात्कारें तत्त्वता । घ्यावें सर्वथा सर्वस्व ॥९॥

यापरी गा अधर्मतां । परद्रव्य यावया हाता ।

आसक्ति ज्याचिया चित्ता । जाण तत्त्वतां ते `चोरी' ॥२१०॥

स्वधर्मकर्मी स्वभावतां । विश्वास नाहीं ज्याच्या चित्ता ।

वेदशास्त्रपुराणार्थ । मिथ्या सर्वथा जो मानी ॥११॥

उद्धवा जाण तत्त्वतां । या नांव गा `नास्तिकता' ।

आस्तिक्यभावो स्वभावतां । अनुमात्रतां जेथ नाहीं ॥१२॥

गांठीं असतां लक्षकोडी । सदा नास्तिकता ज्याचे तोंडीं ।

घरींच्यासी आपदा लावी गाढी । ते प्रकृति रोकडी अंत्यजाची ॥१३॥

कार्येवीण कोरडी कळी । संबंधेंवीण वृथा सळी ।

अखंड करी दांतकसाळी । ते अंत्यजाची बळी निजवृत्ती ॥१४॥

ज्यासी सदा विरोध पोटीं । वरीवरी गोड मैंद गोठी ।

भीतरीं द्वेषाचा भडका उठी । जो क्रूरदृष्टि सर्वदा ॥१५॥

जन्मवरी केल्या उपकारकोटी । त्यासी एकाचि उत्तरासाठीं ।

अपकारु करावया पोटीं । छिद्रदृष्टी सदा ठेवी ॥१६॥

उपकार्‍या अपकारस्थिती । अंत्यजही न करी प्राणांतीं ।

ऐशिया विरोधातें जे वाहती । `शुष्कविग्रहगती' त्या नांव ॥१७॥

जो सुहृदांमाजीं पाडी वैर । अपायीं घाली थोर थोर ।

अशौच नास्तिक्य घोर । जाणावा नर `अतिविग्रही' ॥१८॥

स्वार्थेंवीण परकार्य नाशी । `शुष्कविग्रही' म्हणिपे त्यासी ।

उद्धवा ऐशी प्रकृति ज्यासी । अंत्यजही त्यासी पैं भीती ॥१९॥

ऐक कामाची कथा । कनक आणि कांता ।

येविषयीं अतिलोभता । उपरमु चित्ता असेना ॥२२०॥

स्त्रीकामाचेनि नांवें । लिंगमात्रचि असावें ।

मग सेव्यासेव्य भावें । विचारूं जीवें स्मरेना ॥२१॥

तैसाचि जाण द्रव्यार्था । भलतैसें यावें हाता ।

न विचारी विहिता अविहिता । अतिकामता अर्थार्थीं ॥२२॥

अविहित कामस्थिती । हा स्वभाव ज्याचे वृत्ती ।

ते अंत्यजादि प्रकृती । जाण निश्चितीं उद्धवा ॥२३॥

पाहे पां कामिकांच्या पोटीं । सदा क्रोधाची आगटी ।

काम‍अप्राप्ती ऐकतां गोष्ठी । भडका उठी प्रळयान्त ॥२४॥

ज्याचिये शरीरस्थिती । उसंतु नाही क्रोधाहातीं ।

सदा धुपधुपीत वृत्ती । ते जाण प्रकृती अतिनीच ॥२५॥

प्राप्तभोगें तृष्णा न बाणे । ऐकिल्याही भोगाकारणें ।

अखंड मनाचें बैसे धरणें । ते प्रकृति जाणे अतिनीच ॥२६॥

म्यां सांगितले जे आठही गुण । हे ज्याचे प्रकृतीस लक्षण ।

तो हो कां भलता वर्ण । परी अंत्यजपण त्यामाजीं ॥२७॥

अवगुण सांगितले समस्त । एक एक नरकदानीं विख्यात ।

मा आठही मिळाले जेथ । उगंड तेथ मग कैंचा ॥२८॥

त्यगावया निजस्थिती । या आठ अवगुणांची व्युत्पत्ती ।

म्यां सांगितली तुजप्रती । जाण निश्चितीं उद्धवा ॥२९॥

या गुणांतें अंगीकारिती । ते नरकगामी गा निश्चितीं ।

या गुणांतें जे त्यागिती । ते पावती पद माझें ॥२३०॥

जेणें माझ्या पदाची प्राप्ती । सर्वां वर्णां उत्तम गती ।

ऐशिया गुणांची व्युत्पत्ती । सांगेन तुजप्रती उद्धवा ॥३१॥

सकल लक्षणांचें निजसार । जें गुह्यगुणांचें भांडार ।

जेणें पाविजे संसारपार । ऐक साचार उद्धवा ॥३२॥

जो सर्व वर्णांचा सहज धर्म । जेणें पाविजे परब्रह्म ।

जे नाशिती चित्तभ्रम । ते गुण उत्तम अवधारीं ॥३३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP