मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ४३

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

अफाट वारा नभाचे ठायीं । तोही कोंडवेल एके समयीं ।

परी श्रीहरीच्या चरित्रांस पाहीं । अंत पार नाहीं सर्वथा ॥१॥

किती घागरी समुद्राचे पाणी । त्याचीही संख्या करील कोणी ।

परी भक्तचरित्रांचि मांडणी । साकल्य होउनी नयेची ॥२॥

नातारी पृथ्वी वरील तृणांकुर । यांची ही टोप घेववेल सत्वर ।

परी संत चरित्रांचा न कळेचि पार । साक्ष अंतर देतसे ॥३॥

मागल्या कवींच्या आधारें जाण । मी मूढमती करितों वल्गना ।

आत्मबुध्दीची नसे धारणा । साक्ष निजमना येतसे ॥४॥

जैसा डोळसाचा सांचोळ ऎकोनि । आंधळा चाले चांचपडोनी ।

तैसी या ग्रंथाची मांडणी । सभाग्य सज्जनीं परिसिजे ॥५॥

श्रीभीमातीरवासी विठ्ठलवर । तयासि आवडती संत चरित्रें ।

मज पुढें करोनि निमित्त मात्र । तो राजीवनेत्र स्वयें वदे ॥६॥

त्याणीं नखीं धरोनि गोवर्धन । गोपाळांसी दीधलें थोरपण ।

तैसेंच या ग्रंथांचें कारण । चतुर सर्वज्ञ जाणती ॥७॥

मागील अध्यायीं कथा गहन । श्रीकृष्ण बांधिला यशोदेनें ।

मग प्रेमाबायीने सोडिले प्राण । रूप सगुण आठवूनी ॥८॥

आणि शिळाबायी पिलाबायी । प्रेमळ बहुत रमाबायी ।

यांचा निश्चय देखोनि जीवीं । शेषशायी पावला ॥९॥

सीता नेली ऎकोनि रोकडी । रामरायें समुद्रीं घातली उडी ।

दशरथाच्या सोंगास्तव तांतडी । सांडिली कुडी नरहरीनें ॥१०॥

आतां बोगरासा वाणी एक । होता सज्ञान परम भाविक ।

भजन करीत सप्रेम सुख । गुण तात्विक तयाचा ॥११॥

कांताही परम पतिव्रता । जाणे पतीच्या मनोगता ।

सद्भावें भजतां साधुसंता । माया ममता टाकूनी ॥१२॥

सर्वांभूतीं आत्मा एक । ऎसा तयाचा निश्चय देख ।

आत्मवत विश्व सकळिक । ऎसा विवेक तयाचा ॥१३॥

श्री रामकृष्ण हरिगोविंदा । नामस्मरण करिती सदा ।

अन्नवस्त्रांची घरीं आपदा । परी सत्व कदा न सांडिती ॥१४॥

दुर्बळ संसार बहुता रीतीं । परी नित्य दाहा मनुष्यांसि अन्न घालिती ।

धरोनियां सात्विक वृत्ती । सुकृत संपत्ती जोडली ॥१५॥

त्याचें सत्व पाहावया निश्चित । घरासि आलें वैकुंठनाथ ।

साधु रूपें येऊनि अंगणांत । घरस्वामिणीसि पुसत निजमुखें ॥१६॥

म्हणे कोठें गेला असे वोगरा । आम्हीं भेटीसि आलों घरा ।

ऎसें पुसतां जगदुध्दार । ते म्हणे बाजारा गेला असे ॥१७॥

मग बैसावयासि देऊनि सत्वर । सद्भावें केला नमस्कार ।

म्हणे उदयीक येईल निज भ्रतार । तुम्हीं स्वस्थ अंतर असों द्यावें ॥१८॥

तिचें ऎकोनि उत्तर । काय बोलती सारंगधर ।

आम्हांसि क्षुधा लागली फार । आलों सत्वर म्हणोनि ॥१९॥

तुमची ऎकली सत्कीर्ति । क्षुधितासि अन्न देतसां प्रीतीं ।

आतां करोनियां पाक निष्पत्ती । करावी तृप्ती जननिये ॥२०॥

ऎसें बोलतां चक्रपाणी । अवश्य म्हणे घरस्वामिनी ।

धनधान्य तों नव्हतें सदनीं । मग विचार मनीं करीतसे ॥२१॥

म्हणे उपवासी ठेवितां याजकारण । तरी निजसत्वासि होई लहान ।

मग नाकिंची नथ वालभर सोनें । बाजारांत घेऊन ते गेली ॥२२॥

ते सराफापासीं देऊनि पाहीं । सामग्री आणोनि लवलाहीं ।

स्वयंपाक गृहीं करीतसे ॥२३॥

पाकसिध्दि झालिया निश्चितीं । पात्रीं अन्न वाढीतसे सती ।

मग पाचारूनि वैष्णव अतिथी । भोजन त्याप्रती घातलें ॥२४॥

महर्षियाग करितां जाण । तेथें न घेच जो अवदान ।

तो वैष्णव वेष धरोनि सगुण । करितसे भोजन जगदात्मा ॥२५॥

म्हणे बहुत दिवस क्षुधित उदरीं । म्हणोनि आलों तुमचें घरीं ।

आजि अन्न मिळालें पोटभरी । ऎसें श्रीहरी म्हणतसे ॥२६॥

जितकी झाली पाक निष्पत्ती । तितुकेही जेविले रुक्मिणीपती ।

ढेंकर देऊनि यथास्थिती । करशुध्दि घेती मग तेव्हां ॥२७॥

घरस्वामीण संतोष मनें । मुखशुध्दि देतसे तुळसीपानें ।

आपुल्या उरलें नाहीं अन्न । परी समाधान चित्तासी ॥२८॥

जाणोनि तियेचें मनोगत । मग प्रसन्न झाले लक्ष्मीकांत ।

जावोनि तिच्या माजघरांत । मडके रोवित स्वहस्तें ॥२९॥

म्हणती या माजी द्रव्य बहुतसी पाही । लागेल तें नित्य घेत जायी ।

साधुसंत आलिया गृहीं । खर्चीत जायी सर्वदा ॥३०॥

ऎसें बोलोनि श्रीहरी । अदृश्य झालें त्या अवसरीं ।

वोगरासा आलिया घरीं । वर्तमान सत्वरीं सांगितलें ॥३१॥

म्हणे तुम्ही गेलिया बाजारा । एक साधु पातला घरा ।

मग नथ विकूनी त्या अवसरा । भोजन सत्वरा घातलें ॥३२॥

जातें समयीं त्या वैष्णवानें । घरांत मडकें रोविलें जाण ।

म्हणे द्रव्य लागेल तुम्हांकारणें । तें यांतून घेणें नित्यकाळीं ॥३३॥

ऎसें बोलोनि मजप्रती । आपण गेला सत्वरगती ।

वोगरासा ऎकोनि वचनोक्ती । विस्मित चित्तीं होतसे ॥३४॥

विष्णुभक्त निरपेक्ष मनीं । मडक्यांत न पाहेच ते क्षणीं ।

तंव एके दिनीं वैष्णव मुनी । पातलें सदनीं बहु फार ॥३५॥

घरीं खर्चास नव्हतें कांहीं । संकट पडलें ते समयीं ।

मडकें रोविलें मज गृहीं । त्यात लवलाहीं पाहतसे ॥३६॥

घरस्वामीण कर घालितां । तों मोहरा होन लागले हाता ।

परम आश्चर्य वाटलें चित्तां । मग साधुसंता तृप्त केले ॥३७॥

वोगरासा म्हणे कांतेप्रती । वैष्णव नव्हे तो वैकुंठपती ।

तुजला कशी पडली भ्रांती । नाहीं श्रीपती पूजिला ॥३८॥

मज आधींच तुजकारणें । श्रीहरीनें दीधलें दर्शन ।

आतां व्यर्थ न ठेवीं जिणें । म्हणून रुदन करीतसे ॥३९॥

मग सद्गदित होऊनियां चित्तीं । सप्रेम भावें मांडिली स्तुती ।

जयजयाजी वैकुंठपती । व्यापक त्रिजगतीं तूं एक ॥४०॥

निज भक्ताच्या कैवारे । घेतले नाना अवतार ।

मजही भेट त्याच प्रकारें । क्षुधातुर लोचन हे ॥४१॥

निज भक्ताची देखोनि प्रीती । तत्काळ प्रगटले वैकुंठपती ।

चतुर्भुज सांवळी मूर्ती । शंख चक्रें हातीं मंडित ॥४२॥

कांसेसि दिव्य पीतांबर । कानी कुंडलें मकराकार ।

गळा तुळसी मंजुरियांचे हार । श्रीमुख मनोहर शोभत ॥४३॥

ऎसें रूप देखोनि सुंदर । वोगारास करीतसे नमस्कार ।

पूजोनि भावाच्या उपचारें । रुक्मिणीवर जेवविला ॥४४॥

निज भक्ताच्या हृदयमंदिरीं । अंतर्धान पावले श्रीहरी ।

वैष्णव जेविती नित्य मंदिरीं । सहस्त्रवरी तयाच्या ॥४५॥

आणि चरित्र रसाळ गहन । एक हरि आनंद वैष्णवजन ।

रामानंद संप्रदायी पूर्ण । श्रीहरि भजन करीतसे ॥४६॥

चराचर जें जें दिसे नयनीं । तें आत्मरूप अवघेचि मानी ।

द्वैतभाव नसेचि स्वप्नी । सप्रेम मनीं सर्वदा ॥४७॥

त्याचा अनुग्रह घेतां निश्चिती । बहुतां जनासि लागली भक्ती ।

अर्चन पूजा यथास्थिती । सप्रेम गती करीतसे ॥४८॥

अनुग्रह देऊनि एकासी । नगरांत पाठविती भिक्षेसी ।

शेरभर पीठ येतसे त्यासी । तें सद्गुरुपासीं ठेवितसे ॥४९॥

ईश्वरी कृपेकरोनि जाण । तितुक्यांत जेविती शत ब्राह्मण ।

ऎसें लोटतां बहुत दिन । वृत्ति संपूर्ण मुराल्या ॥५०॥

तो कोणे एके दिवसी । रामानंद स्वामी संन्यासी ।

घेऊनि सकळ संप्रदायांसी । तया नगरासि पातले ॥५१॥

हरि आनंदाचा शिष्य जाण । नगरांत करी भिक्षाटण ।

रामानंदाच्या बिर्‍हाडास येऊन । सद्भावे नमन करी तया ॥५२॥

देखोनि म्हणे यतीश्वर । हा हरि आनंदाचा शिष्य थोर ।

सद्गुरु भक्तीसी असे तत्पर । परी आल्पायुषी साचार जाहला ॥५३॥

उदयीक तृतीय प्रहरी जाण । निश्चित असे याचें मरण ।

ऎकोनि रामानंदाचें वचन । चिंता मनीं उद्भवलीं ॥५४॥

मग सद्गुरुपाशीं जाऊनी । वर्तमान सांगे तये क्षणीं ।

म्हणे रामानंद उतरले ये ठिकाणीं । तयांसि नमस्कार जाऊनी म्यां केला ॥५५॥

मग त्यांणि पाहूनि सामुद्रिक लक्षण । स्वमुखें बोलिले लोकांकारणें ।

उदयीक तृतीय प्रहरीं जाण । पावले मरण निश्चित ॥५६॥

म्हणवोनि चिंता उपजली मानसीं । मी तों अभागी अल्पायुषीं ।

सेवा घडली नाहीं मजसीं । ऎसियासि काय करावें ॥५७॥

सेवेची आस्था बहुत मनीं । अश्रुपात वाहती नयनीं ।

ऎसी अवस्था पाहोनि त्यांणीं । अभय पाणी दे गुरु ॥५८॥

म्हणे श्रीहरी कृपेनें निश्चित । चुकेल काळाचा आघात ।

कासया होसी चिंताक्रांत । ऎसें बोलत त्यालागीं ॥५९॥

एक रात्र लोटतांचि जाण । तो उदयासि पातला दिन ।

मग हरि आनंदें करोनि स्नान । नित्य नेम तेणें सारिला ॥६०॥

सच्छिष्य बैसवोनि आपुले पाठीं । मग ध्यानांत आणिला जगजेठी ।

सगुण मुर्ति हृदयसंपुटीं । तो गोचर दृष्टीं पाहतसे ॥६१॥

सांवळा सुकुमार राजीवनेत्र । कांसेसि दिव्य पीतांबर ।

चतुर्भुज वैकुंठविहार । देखतांचि विरे देहभान ॥६२॥

दिव्य कुंडलें वैजयंती । शंख चक्र आयुधें हातीं ।

कौस्तुभाची झळके दीप्ती । जैसा गभस्ती उगवला ॥६३॥

हदयीं श्रीवत्सलांछन । आजानुबाहु लक्ष्मीरमण ।

समचरणीं उभा जगज्जीवन । सुकुमार ठाण साजिरें ॥६४॥

हरि आनंदें सप्रेम युक्ती । ध्यानांत आठविला वैकुंठपती ।

तैसीच बाहेर प्रकटली मुर्ती । सबाह्य स्थिती सारिखी ॥६५॥

सगुण स्वरूपीं जडलें चित्त । देहभान नसे किंचित ।

तों शिष्यांसि न्यावया काळदूत । आले अकस्मात तें ठायीं ॥६६॥

जेथें देवभक्तांची ऎक्यता । तेथें काळासि रीघ नव्हे सर्वथा ।

सुदर्शन घरटी घालितां । परी सर्वथा श्रम होयची ॥६७॥

एक प्रहरपर्यंत । काळ तयासि न्यावया पाहत ।

परी सर्वथा रीघ न होयचि तेथ । मग परतोनि दूत ते गेले ॥६८॥

मग शिष्य म्हणतसे करोनि विनंती । मरणाची वेळ चुकली निश्चिती ।

अस्तमानासि चालिला गभस्ती । आतां होईजे चित्तीं सावध ॥६९॥

हरि आनंदाचें एकाग्र मन । सर्वथा नसेचि देहभान ।

मग सगुणमूर्ती हृदयीं साठवून । नेत्र तेणें उघडिलें ॥७०॥

सावध होतांचि तयेक्षणीं । शिष्य सद्भावें लागला चरणीं ।

मग झोळी घेऊनि दुसरें दिनीं । भिक्षेलागुनी तो गेला ॥७१॥

त्यासि रामानंद देखतांचि दृष्टी । परम विस्मय वाटला पोटीं ।

म्हणती कैसा वाचला ये संकटीं । साकल्य गोष्टी सांगीतली ॥७२॥

मग हरि आनंदाच्या आश्रमासी । पातला रामानंद संन्यासी ।

नमस्कार करोनि सद्भावेंसी । निजप्रीतीसीं भेटले ॥७३॥

म्हणती योगधारणेंचेनि बळें । आम्हीं चुकवूं आपुला काळ ।

परी दुसरियासि वांचवावया येवेळ । सामर्थ्य प्रबळ मज नाहीं ॥७४॥

तेव्हां हरि आनंदें धरोनि प्रेमा । म्हणे हा स्वामीच्या कृपेचा महिमा ।

मग रामानंद गेलिया आश्रमा । श्रीपुरुषोत्तमा भजतसे ॥७५॥

योगी यापरी साचार । सगुण भक्तीचा महिमा थोर ।

भावाचा भुकेला रुक्मिणीवर । उणें अणुमात्र पडो नेदी ॥७६॥

आणिक भक्त चरित्र अपूर्व । सादर ऎका भाविक सर्व ।

तापीच्या तटीं अमळाळ गांव । तेथें भक्तवैष्णव एक झाला ॥७७॥

रामचंद्र भट नाम त्यास । श्रीहरि भजन करितसे ।

वेदशास्त्रीं निपुण नसे । परी निरपेक्षता असे मानसीं ॥७८॥

सोनें आणि दगड मातीं । ज्याच्या दृष्टीसि सारिखीं दिसती ।

हिरे रत्नें खडे भासती । दुराशा चित्तीं उपजेना ॥७९॥

घरीं अग्निहोत्र देवतार्चन । भिक्षा मागोनि सेवितसें अन्न ।

रायाचा उपाध्याय असे जाण । परी न पाहेचि सदन तयाचें ॥८०॥

राजकांतेचा हेत उपजला जीवीं । म्हणे यासि द्र्व्य अर्पावें कांहीं ।

मग रामचंद्र भटाच्या स्त्रियेसि गृहीं । बोलावूनी पाही ते नेत ॥८१॥

आपुले रत्नजडित अलंकार । तिजला अर्पण केले समग्र ।

मग सद्भावें करित नमस्कार । म्हणे याचा अव्हेर न करावा ॥८२॥

रामचंद्र भटाची पत्नी । घरासि आली भूषणें लेउनी ।

ते भ्रतारानें देखोनि नयनीं । निर्भत्सुनि काय बोले ॥८३॥

कांतेसि म्हणे ते अवसरीं । कासया उपाधि आणिली घरीं ।

याची आशा धरिलीयावरी । तरी श्रीहरी अंतरेल ॥८४॥

भ्रतार वचन ऎकोनि त्वरित । भूषणें काढिली रत्नजडित ।

अग्नीचें कुंड प्रदीप्त होतें । तया आंत टाकिलीं ॥८५॥

उपाधि रहित होतां पत्नी । रामचंद्र भटासि संतोष मनीं ।

अघटित झाली असे करणी । ते रायासी कोणी सांगती ॥८६॥

ऎसें ऎकोनि नृपनाथ । कुळगुरूच्या गृहासि येत ।

म्हणे अलंकार जे दीधले तुम्हांते । ते परतोनि त्वरित द्या स्वामी ॥८७॥

मग परमसंकट जाणोनि थोर । यज्ञ नारायण स्तविला फार ।

मग रत्न जडित अलंकार । त्यांतून समग्र निघाले ॥८८॥

रत्नकीळा मुक्ताफळें । पहिल्यापरीस देती ढाळ ।

हें कौतुक देखोनि तयेवेळ । चरणीं भूपाळ लागला ॥८९॥

यावरी कुळगुरु बोले वचन । हे अलंकार घेई संपूर्ण ।

राजा म्हणे दीधलें दान । न घें परतोन सर्वथा ॥९०॥

चमत्कार पहावयासि देख । स्वामींसि छळिलें नावेक ।

मग रामचंद्र भटें मेळवुनि याचक । मग ते सकळिक वांटिले ॥९१॥

धरोनि निरपेक्षता शांति विरक्ती । श्रीहरि भजन करितसे प्रीती ।

ऎशी संताची अनुपम स्थिती । वर्णितां मती कुंठित ॥९२॥

आतां अमदाबादेमाजी चोखडा । सुहागशाहा भक्त निधडा ।

तो तरी जातीचा असे हिजडा । परी हरिरूपीं चोखडा मीनला तो ॥९३॥

स्त्री पुरुष नपुसंक । चौथा तो स्त्रेण आणिक ।

तो पुरुष रत्न पाहुनि देख । मग विषयसुख भोगीतसे ॥९४॥

सुहागशाहाची स्त्रेण राहाटी । परी आणिक पुरुष न पाहे दृष्टी ।

ध्यानांत आणोनि जगजेठी । हृदयसंपुटीं धरितसे ॥९५॥

चतुर्भुज पितांबर धारी । शंखचक्र मंडित करीं ।

श्रीमुख साजिरें नेत्रद्वारीं । पाहतांचि अंतरीं निवतसे ॥९६॥

जो सकळ जीवांचा विश्राम । जगद्गुरु आत्माराम ।

त्याचें मुखीं स्मरतांचि नाम । तत्काळ भवश्रम निरसे ॥९७॥

जे स्त्रीपुरुष नपुसंक । चौथा तो स्त्रेण आणिक ।

या सर्वांचे अंतरीं असे एक । वैकुंठनायक जगद्गुरु ॥९८॥

जो व्यापक असोनि सर्व देहीं । कोणाच्या कर्मासि लिप्त नाहीं ।

तो लक्ष्मीकांत शेषशायी । सुहागशा जीवीं ध्यातसे ॥९९॥

स्वयाती नगरांत घालिती फेरी । परी न जाय तयांच्या बरोबरी ।

सर्वदा राहे आपुलें घरीं । स्मरण अंतरीं श्रीहरीचें ॥१००॥

म्हणे बाहेर हिंडतां साचार । दृष्टीसि पुरुष पडतील फार ।

मग चित्त धांवेल तयांवर । कामातुर होऊनियां ॥१०१॥

म्हणवोनि एकाग्र होवोनि मनें । सर्वदा करी नामस्मरण ।

काम कल्पनें करोनि जाण । श्रीविष्णुचें ध्यान आठवी ॥२॥

कामें अथवा वैराकारें । चित्तीं निदिध्यास लागतसे फार ।

जाणोनि तयाचा सद्भाव थोर । मग साक्षात्कार जाहला ॥३॥

सगुणरूपें जगजेठी । तयासि सर्वदा देतसे भेटी ।

ध्यान सांठवोनि हृदहसंपुटी । सप्रेम पोटीं निवाला ॥४॥

तंव कोणे एके दिवसीं जाण । तद्देशी पडिलें अवर्षण ।

प्राणी पावती मृत्युसदन । न मिळेचि अन्न म्हणोनियां ॥५॥

कधीं होईल मेघवृष्टी । सकळ जीवांची वरतीच दृष्टी ।

चातकासि तृषा लागतांची मोठी । आर्त पोटीं जेविं वाटे ॥६॥

तंव तया नगरींचा नृपनाथ । पर्जन्यासाठीं अनुष्ठान करित ।

तयासि उपवास घडले सात । मग दृष्टांतीं सांगत जगदात्मा ॥७॥

जो देवाधिदेव लक्ष्मीरमण । अधिकारियासि दाखवीत स्वप्न ।

ब्राह्मणाच्या रूपें जगज्जीवन । निद्रेंत येऊन सांगती ॥८॥

म्हणे सुहागशा भक्त निर्धारीं । राहिला असे हिजडियांचे घरी ।

त्याणें भक्तिभाव धरोनि निर्धारीं । वैकुंठविहारी वश्य केला ॥९॥

तरी तुवा सांडोनि थोरपण । निरभिमान होईजे मनें ।

सुहागशहासि जावोनि शरण । साष्टांग नमन करावे ॥११०॥

जो का विश्वाचा प्रतिपाळ करी । तो संतुष्ट होऊनि श्रीहरी ।

पर्जन्य पाडील पृथ्वीवरी । निश्चय अंतरीं असोंदे ॥११॥

कांहीं अहंता धरिशीस जर । तरी मेघ न वर्षे अणुमात्र ।

ऎसा दृष्टांत देखोनि थोर । मग जागृतीसि सत्वर तो आला ॥१२॥

स्वप्नींचा अभिप्राय करोनि निका । स्वमुखें सांगतसे लोकां ।

आम्हीं अनुष्ठान करितां देखा । हें वैकुंठनायका जाणवलें ॥१३॥

विप्रवेषें येऊनि श्रीहरी । स्वमुखें सांगे स्वप्नांतरी ।

सुहागशा हिजडा नगरांतरी । नमस्कार करीं त्याजला ॥१४॥

कांहीं अनमान धरितां पोटीं । सर्वथा न होय मेघवृष्टी ।

ऎसें स्वप्न देखिलें दृष्टी । कैसी गोष्टी करावी ॥१५॥

ऎसें पुसतां सुभेदार । लोक बोलती थोर थोर ।

अवर्षणें विश्व गांजिलें फार । तरी करावा नमस्कार तयासी ॥१६॥

मग सहपरिवारें अधिकारी । पातले हिजडियाचे घरीं ।

सुहागशासि म्हणे ते अवसरीं । आम्हीं स्वप्न रात्रीं देखिलें ॥१७॥

कीं तुझ्या आज्ञेनें उठाउठी । तत्काळ होईल मेघवृष्टी ।

तरी जनाची दया धरोनि पोटीं । आमुची गोष्टी ऎकावी ॥१८॥

ऎशारितीं विनवित उत्तर । बोलोनि सद्भावें जोडिती कर ।

निरभिमान होऊनि सत्वर । साष्टांग नमस्कार घातला ॥१९॥

शरण येतांचि अधिकारिया । चित्तीं अनुताप जाहला तया ।

सुहागशा म्हणे देवराया । हे उपाधि कासया वाढली ॥१२०॥

सर्व जीवांत कुलक्षण । तो मी जातीचा असे हीन ।

कृपा करशील कवण्या गुणें । हे मजकारणें नेणवे ॥२१॥

ऎसें म्हणवोनि चित्तांत । मग तो उतरला अंगणांत ।

वरतें मुख करोनि पाहत । परी मेघ निश्चित वर्षेना ॥२२॥

मग लावोनियां नेत्रपातीं । हृदयीं चिंतली श्रीविष्णुमूर्ती ।

जयजय करुणासागर वैकुंठपती । व्यापक त्रिजगती तूं एक ॥२३॥

जयजयाजी करुणाकरा । भक्तवत्सला कृपासागरा ।

अनाथबंधू दिनोध्दारा । सर्वेश्वरा आदिपुरुषा ॥२४॥

तुवां अधिकारियासि दृष्टांत देऊनियां । माझी उपाधी वाढविली कासया ।

आतां कां न पावसी देवराया । सांग लवलाह्या ये समयीं ॥२५॥

ऎशा परी केली स्तुत । परी न पावेचि वैकुंठनाथ ।

मग राग धरोनि चित्तांत । काय बोलत देवासि ॥२६॥

म्हणे आजपासोनि तुझी प्रीत । मी न करीच सर्वथा जाण निश्चित ।

नाकींची काढोनि घेतली नथ । आणि फोडूं पहात कांकणें ॥२७॥

ऎसा देखोनि तयाचा निकर । तत्काळ पावले जगदुध्दार ।

मेघ वर्षो लागला थोर । जयजयकार लोक करिती ॥२८॥

बहुत दिवसांचे अवर्षण । घातलें पृथ्वीसि पालाण ।

चौदा दिवसपर्यंत जाण । अहोरात्र घन वर्षला ॥२९॥

देशाधिकारी येऊनि पुढती । सुहागशासि स्वमुखें करिती विनंती ।

कांहीं मागावें मजप्रती । म्हणवोनि ग्लांती करीतसे ॥१३०॥

ऎकोनि म्हणे विष्णुभक्त । कांहीं इच्छा नसेचि मनांत ।

सोनें आणि माती निश्चित । सारिखी भासत मजलागी ॥३१॥

श्रीहरि चिंतन करीतसें मानसीं । सकळ सिध्दि आंदण्या दासी ।

मानवियानें काय द्यावें मजसी । उत्तर तयासि दीधले ॥३२॥

तुजसी दृष्टांत होऊनियां । जनांत उपाधि वाढविली वायां ।

तरी आतां समाधि घेऊनियां । नाशवंत काया सांडावी ॥३३॥

अधिकारियासि आज्ञा करितां पाहीं । गर्ता खणविली ते समयीं ।

हृदयीं चिंतोनि शेषशायी । करीतसे कायीं तें ऎका ॥३४॥

गर्तेमाजी उभा राहोनि प्रीती । हृदयीं चिंतिलीं श्रीविष्णुमुर्ती ।

सांवळा चतुर्भुज श्रीपती । येऊनी त्याप्रती भेटत ॥३५॥

सुहागशहा समाधिस्थ होत । नगरामाजी प्रगटली मात ।

सुमनें बुका आणुनि उधळित । लोक बहुत मिळाले ॥३६॥

टाळ विणे मृदंग घेऊन । वैष्णव गाती भगवद्गुण ।

तों सुहागशाहा लोकांसि म्हणे । माझें वचन अवधारा ॥३७॥

माझें दीक्षेसि अंगीकार करितां । तेणें नासेल भवव्यथा ।

ऎसें सांगे लोकां समस्ता । परी कोणाच्या चित्तां न ये कीं ॥३८॥

निंद्य वेष भासतसे जनी । म्हणवोनि तयासि न घेती कोणी ।

तों एक अनाथ दुर्बळ ते क्षणी । येऊनि चरणी लागला ॥३९॥

तो म्हणे कृपा करोनि मजवर । निरसावा दुस्तर संसार ।

जाणोनि तयाचें अंतर । उपासना मंत्र सांगितला ॥१४०॥

मग कांकणे काढोनि त्वरित । घातलीं तयाच्या हातांत ।

नाक टोचोनि नथ घालित । संप्रदाय चालत अद्यपि तो ॥४१॥

श्रीहरीचेम रूप आणोनि ध्यानीं । समाधिस्थ जाहला ते क्षणीं ।

आपल्या दासाची चक्रपाणी । सत्कीर्ती जनी वाढवित ॥४२॥

तो जगद्गुरु दीनदयाळ । न पाहेचि याती कुळ ।

न विचारी काळ वेळ । पावे तत्काळ भक्तासि ॥४३॥

आणिक चरित्र रसाळ बहुत । सादर ऎका भाविक भक्त ।

गुर्जर देशात जाहला संत । पन्हाजी रजपूत नाम त्याचें ॥४४॥

डोंगरपूर वासावडे जाण । तेथील असे नृपनंदन ।

खुमानसिंग असे त्याचें नामाभिधान । चमत्कार तेणें देखिला ॥४५॥

पन्हाजी रजपुत तयापासि । होता आवडता विश्वासी ।

नित्य रायाचे शेजेपाशी । दिवसनिशी वसतसे ॥४६॥

कुटुंब रक्षणार्थ संसारीं । विश्वासें रायाची सेवा करी ।

द्वारकेचीं मूर्ती पाहोनि बरी । ते ध्यान अंतरीं आठवितसे ॥४७॥

सर्वकाळ नामस्मरण । असत्य सर्वदा न बोले वचन ।

ऎसें लोटतां बहुत दिन । साक्षात्कार तेणें पाहिला ॥४८॥

तों दिपवाळीचे अमावस्येसि जाण । दीपोत्सव करितसे नृपनंदन ।

अर्धरात्र लोटतांचि जाण । निद्रे कारणें गृहा येत ॥४९॥

सन्निध देखोनि भूपती । तों पन्हाजी उठे सत्वर गती ।

आंगड्याची दावण धरोनि हातीं । सत्वर गती चोळितसे ॥१५०॥

ऎसें विपरीत देखोनि तेथ । पन्हाजीस पुसे नृपनाथ ।

दावण चोळिला त्वां किमर्थ । सत्य वृत्तांत सांगावा ॥५१॥

ऎकोनि म्हणे वैष्णवभक्त । द्वारकेसि दीपोत्सव होत ।

तों अरिष्ट जाहले असे अद्भुत । तोही वृत्तांत अवधारा ॥५२॥

श्रीकृष्ण मूर्तीसि पुजारियाणें । बहुत घातलीं वस्त्रें भूषणें ।

तों देवाच्या आंगड्या कारणें । कापुराचा अग्न लागला ॥५३॥

तें येथून दृष्टीसि देखिलें आतां । म्हणवोनि स्वहस्ते विझविला नृपनाथा ।

ऎशी ऎकोनियां वार्ता । विस्मित चित्तां होतसे ॥५४॥

मग पन्हाजीसि पुसतसे भूपती । देवांचीं वस्त्रें कैशा रीतीं ।

हें सत्वर सांगावें मजप्रती । आणवूं प्रचीती उदईक ॥५५॥

म्हणे हिरवा साज ये अवसरीं । घातला आहे देवावरी ।

माझे दृष्टीसि मूर्ति साजिरी । ऎशा परी दिसतसे ॥५६॥

तों राबड्याचा नृपवर । साडू त्याचा परम मित्र ।

त्यासि खुमानसिंगें लिहिलें पत्र । आपुल्या निजकरें तेधवां ॥५७॥

म्हणे दिपवाळीचे रात्रीं द्वारकेसि पाहे । विष्णु मंदिरीं वर्तलें काय ।

कोणतें अरिष्ट जाहलें आहे । तो धाडिजे प्रत्यय आम्हांसी ॥५८॥

पुजारीयांणीं कैसी केली सेवा । कोणत्या रंगाचीं वस्त्रें देवा ।

साकल्य वृत्तांत बरवा । लेहोनि पाठवा आम्हांसी ॥५९॥

ऎशारितीं तीं लेहोनि पत्र । खुमानसिंग पाठवी वार्तिकार ।

राबड्याचा राजा ऎकोनि सत्वर । लिहितसे उत्तर काय त्यासी ॥१६०॥

दिपवाळीचे दिवसीं निश्चिती । दीप उत्सव नानारीतीं ।

करितां लोटली अर्ध रात्रीं । मग कापुर आरती उजळली ॥६१॥

हिरवा साज देवावर । वस्त्रें होती अतिसपूर ।

खालीं आंगड्याचा होता फेर । तयासि कापुर लागला ॥६२॥

पन्हाजी रजपूत तये वेळीं । सन्निध होता देवा जवळी ।

तो आपुल्या हस्तें करोनि चोळी । अग्नि तत्काळीं विझवला ॥६३॥

ऎसें येतां पत्राचें उत्तर । रायें मानिला चमत्कार ।

मग पन्हाजी पासीं येऊनि सत्वर । करितसे नमस्कार सद्भावें ॥६४॥

म्हणे तूं साक्षात्कारी विष्णुभक्त । ऎसी अनुभवें आली प्रचीत ।

आमुचे सेवेसि असावें नित्य । तरी हें अनुचित दिसतसे ॥६५॥

सच्चिदानंद द्वारकावासी । तुम्हीं सर्व भावें भजावें त्यासी ।

दोन गांव घरखर्चासी । दीधले त्यासी नृपनाथें ॥६६॥

पन्हाजी भक्त निरंतर । अनन्यभावें भजन करी ।

सांडोनि रायाची चाकरी । द्वारकापुरीं राहतसे ॥६७॥

आणिक जयमल्ल नामें नृपवर । मेडत्यांत होता वै्ष्णववीर ।

त्यासि विष्णुअर्चनीं आर्त थोर । सर्वोपचारें पूजितसे ॥६८॥

एक प्रहरपर्यंत जाण । एकांतीं बैसे नृपनंदन ।

आज्ञा केली सकळांकारण । विक्षेप कोणी न करावा ॥६९॥

रायाच्या भयें निर्धारीं । कोणी न जाती देवघरीं ।

मूर्ति पूजोनि सर्वोपचारीं । मग बाहेरी येतसे ॥१७०॥

मुखीं नामाचा उच्चार । सांवळा म्हणे वारंवार ।

रायाचा धाकटा सहोदर । तो वांटा बरोबर घेईन म्हणे ॥७१॥

एकवट न राहे साचार । रुसोनि गेला असे दूर ।

तेथें सैन्य ठेऊनियां फार । मेडत्यावर तो आला ॥७२॥

विष्णुअर्चनाची जाणुनियां वेळ । झुंजावयासि तो पातला खळ ।

जयमल्लाच्या प्रधानें प्रबळ । धरोनि तुंबळ युध्द केलें ॥७३॥

परी तो सर्वथा नाटोपेचि जाण । प्रधानें केलें पलायन ।

रायाच्या मातेपासीं येऊन । वर्तमान सांगीतलें ॥७४॥

म्हणे वैरियाचें बळ बहुत । आतां कैसी करावी युक्त ।

रायासि सांगताम वृत्तांत । तरी अर्चन करीत विष्णुचे ॥७५॥

ऎसें प्रधानें सांगतां । मग देवघरांत गेली माता ।

जयमल्लासि सांगितली वार्ता । म्हणे कैसें आतां करावे ॥७६॥

श्रीहरीचें करितां अर्चन । उत्तर नेदीच माते कारण ।

सांवळा म्हणोनि बोलिला वचन । तो जगज्जीवन काय करी ॥७७॥

म्हणे हा लागला माझें ध्यानीं । तरी आपण यावें कार्य साधुनी ।

मग सगुणरूप धरोनि चक्रपाणी । अश्वारूढ होऊनि चालले ॥७८॥

नगरद्वार उघडोनि सत्वर । बाहेर गेले सारंगधर ।

युध्द केलें घोरांदर । तेणें सैन्य समग्र पळालें ॥७९॥

गांवकुसावरूनि जाण । पाहती नगरवासी जन ।

म्हणती हा तरी असे कोण । शत्रु संपूर्ण पळविले ॥१८०॥

जयमल्लाच्या शत्रिसी बांधूनी । पागेंत आणि चक्रपाणी ।

मग आपण अदृश्य तेच क्षणीं । कैवल्यदानी होतसे ॥८१॥

विष्णुअर्चन करोनि सांग । जयमल्ल येतसे मग ।

प्रधान साकल्य वृत्तांत सांगे । म्हणे पुरुष निजांगें एक आला ॥८२॥

त्याणें युध्द करोनि थोर । सैन्य पळविलें समग्र ।

तुमच्या बंधूसि सत्वर । बांधोनि साचार आणिलें ॥८३॥

राजा विस्मित जाहला मनीं । म्हणे हे तों सावळ्याची करणी ।

मज निमित्त आजिचें दिनीं । चक्रपाणी शिणलासे ॥८४॥

स्वमुखें स्तविला जगज्जीवन । म्हणे त्वां बंधूसि साक्षात दीधलें दर्शन ।

माझा अपराध काय म्हणोन । मग उपोषण पांच करी ॥८५॥

निश्चय देखोनि वैकुंठनाथ । सगुण साक्षात भेटले त्यासी ।

पश्चाताप जाहला बंधूसी । म्हणे वैर तुम्हांसी व्यर्थ केलें ॥८६॥

जयमल्लें सोडिलें बंधूसी । वस्त्रें देऊन गौरवी त्यासी ।

म्हणे तुज भेटला हृषीकेशी । पार भाग्यासी असेना ॥८७॥

त्याणें वैरभाव टाकोनि सर्वही । विष्णुभक्तासि लागला पाही ।

आंच बैसल्यावीण कांहीं । अनुताप नाहीं जीवासी ॥८८॥

संतचरित्र रसाळ आणिक । सादर ऎका भक्त भाविक ।

श्रीधरपंत ब्राह्मण एक । परम विश्वासिक मानसीं ॥८९॥

भोळा भाविक असे प्रेमळ । भजन करीत सर्वकाळ ।

कांतेचेंही चित्त निर्मळ । तयासि घननीळ पावला ॥१९०॥

विनोदें हास्य करीतसे कोणी । तरी सत्यचि भासे तयालागुनी ।

एकदा कांतेसि सवें घेउनी । यात्रेलगुनी चालिला ॥९१॥

स्त्रीसि बैसवोनि अश्वावरी । आपण हांकितसे सत्वरी ।

वस्तभाव खर्ची असे पदरीं । तों अरण्य भारी लागलें ॥९२॥

तंव सवेचि चोरें गाठिलें तये ठायीं । बरोबरी चालती लवलाहीं ।

परम भय वातलें जीवीं । मग कांता कायी बोलतसे ॥९३॥

अस्तमानासि चालिला तमारीं । आणि वोसाड अरण्य लागलें तरी ।

मजला भय वाटलें भारी । परतोनि माघारीं जाऊं आता ॥९४॥

तस्कारासि मैंदाचा वेष । काय बोलती श्रीधरास ।

आमुची संगत असतां तुम्हांस । भय कां चित्तास वाटतें ॥९५॥

येरू म्हणे विश्वास नाहीं । कांहीं प्रमाण करा ये समयीं ।

तरीच भय निरसेल सर्वही । मग तस्कर कायी बोलती ॥९६॥

तुम्हां आम्हांमाजी परम । मध्यस्थ असे आत्माराम ।

तो देवाधिदेव पुरुषोत्तम । हरितसे श्रम भक्ताचे ॥९७॥

ऎसी क्रिया करितांचि त्यांणीं । स्त्रीपुरुषें विश्वासलीं मनीं ।

मार्ग क्रमितां ते ठिकाणी । तों दुर्बुध्दीनीं काय केलें ॥९८॥

परमार्थ गोष्टी बोलोनि त्यांणीं । श्रीधरासि घातली मोहनी ।

मग प्राण घेतले तये क्षणीं । शिरच्छेद करोनी तयाचा ॥९९॥

वस्तभाव कांतेसहित । दुर्बुध्दीते हिरोनि नेत ।

तिजला समजला वृत्तांत । मग मागें पाहत क्षणक्षणां ॥२००॥

तस्कर म्हणती तुझा भ्रतार । आम्हीं मारिला साचार ।

आतां काय पाहतेसि माघारें । सांग सत्वर आम्हांसी ॥२०१॥

ऎसे बोलतांचि ते दुर्मती । काय उत्तर देतसे सती ।

तुम्हा आम्हांमध्यें निश्चिती । अयोध्यापती राम होता ॥२॥

ज्याचा विश्वास धरितांचि मनें । पति पावला मृत्युसदन ।

तो राम आला कीं नाहीं म्हणोन । मागें परतोन पाहतसें ॥३॥

जो अंतरसाक्ष चैतन्यमूर्ती । व्यापक असें सर्वांभूतीं ।

तों आयोध्याधीश जानकीपती । त्याची वाट निश्चिती पाहतसें ॥४॥

ज्याणें दशाननासि निवटूनी । देव सोडविले बंदीहूनी ।

तो भक्तकैवारी कैवल्यदानी । येईल म्हणोनि पाहतसें ॥५॥

ज्याणें निजभक्तांच्या कैवारें । घेतले नाना अवतार ।

तो कोठें गुंतला रघुवीर । पडिला विसर कां माझा ॥६॥

ऎसें बोलतांचि ते भामिनी । श्रीराम प्रगटला ते ठिकाणीं ।

धनुष्यबाण हातीं घेऊनी । तस्कर मारूनी टाकिले ॥७॥

तिच्या भ्रताराचें पडिलें प्रेत । ते स्थळीं जातसे रघुनाथ ।

अमृतदृष्टीं विलोकूनि त्यात । स्वहस्तें उठवीत जगदात्मा ॥८॥

सुगम मार्ग लागे जोंवर । जातसे त्यांच्या बरोबर ।

सुसंगत लागतां वाटेवर । अदृश्य रघुवीर मग झाला ॥९॥

निज भक्ताच्या कैवारें । धरितसे नाना अवतार ।

करावया दुष्टांचा संहार । गदा चक्र वागवित ॥२१०॥

जो अच्युतानंत श्रीहरी । चरित्रें दाखवीत नानापरी ।

महीपती त्याच्या अभयवरीं । सत्कीर्ति पत्रीं लिहीतसे ॥११॥

स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविक भक्त । त्रेचाळिसावा अध्याय गोड हा ॥२१२॥ ॥अ०४३॥ ॥ओव्या २१२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP