मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|

संत तुकडोजी महाराज - भजन ७६ ते ८०

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन - ७६

गुरु येउनी मज भेटला, नि 'भक्ति कर' म्हणे ।

'विसरूच नको श्रीहरी, अति प्रेम धर' म्हणे ॥धृ॥

'अति लीन वाग लोकि या, परलोक साधण्या ।

जे दुष्ट लोक त्यांची, संगतीच हर' म्हणे ॥१॥

'नच एक क्षणही खोवी, निंदनी कुणाचिया ।

मन शुध्द करी, द्रोह-कपट सर्व हर' म्हणे ॥२॥

'दिसताति सर्व जीव, प्रेम भरुनि पाहि त्या ।

प्रभुची सखा जनी-वनी हा, भाव धर' म्हणे ॥३॥

'नीती नि न्याय ठेवुनी, संसारि वाग तू' ।

तुकड्यास सदा 'सत्यप्राप्ति, हाचि वर' म्हणे ॥४॥

भजन - ७७

कुणि येउनि मज वेड तुझे, लाविले हरी ! ।

नव्हतीच अशी मोहनी, तुझी मनावरी ॥धृ॥

काम-धाम नाठवते, मार्गि चालता ।

पाहु कुठे तुजसि ? गमे, अंतरी वरी ॥१॥

बोलता कुणाशि याद ये, तुझी झणीं ।

वेडियापरीच पाहती, मला तरी ॥२॥

झोप नाहि नेत्रि, जाग नाहि जागता ।

कार्य साधता न कार्य, वाटते करी ॥३॥

रंग एकसा, निशेपरीच वाटतो ।

तुकड्याची वेळ ही, अशीच राखजो तरी ॥४॥

भजन - ७८

मज वेडिया पहाताच, तुम्हा वेड लागु द्या ।

बिघडा असेच भक्तिसी नि वृत्ति जागु द्या ॥धृ॥

हे ऎकता जसे मनी तसेच राहु द्या ।

मग वागुनी जनी, वनी, जिवासि रंगु द्या ॥१॥

मजहुनि अधीक थोर थोर, जन्म पावु द्या ।

जरि आज भासती तरी, अधीक वाढु द्या ॥२॥

हरिभक्त होउ द्या नि पाप-मुक्त होउ द्या ।

मज लोपवोनि अधिक तेज, लोकि सेवु द्या ॥३॥

तुकड्याचि आस येवढीच पूर्ण होउ द्या ।

मिटवोनि द्रोह-बुध्दि, लोकि प्रेम वाहु द्या ॥४॥

भजन - ७९

नवल वानु मी किती गुरुचे ? नवल वानु० ॥धृ॥

दुःसंगाने भ्रमलो आम्ही, त्यांनी दिली सुमती ॥१॥

अंधाराते दावुनि बोधे, लावि प्रकाशा-पथी ॥२॥

जग हे भ्रमबाजारी भुलले, विसले तव निश्चिती ॥३॥

तुकड्यादास म्हणे निज ओळख, दावित सत्संगती ॥४॥

भजन - ८०

कर आपुला गुरु सगा, गड्या रे ! कर अपुला० ॥धृ॥

सद्गुरुज्ञानाविण सुख नाही, का भ्रमलासी उगा ? ॥१॥

चलतीचे जगि सगे-सोयरे, शेवटि देतिल दगा ॥२॥

गुरु-भजनाचे अंजन घालुनि, दुर कर माया-ढगा ॥३॥

तुकड्यादास म्हणे नित नेमे, विसरु नको लक्ष्य गा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP