मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय २०

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ।

जय अनंतशायी श्रीहरी । मी याचकपणें तुझें द्वारीं ।

इच्छा धरिली अंतरीं । तें सांगतों अवधारी पांडुरंगा ॥१॥

तुझे निज भक्त रुक्मिणीपती । त्यांची सर्वदा असावी संगती ।

हेचि आशा धरिली चित्तीं । तरी मनोरथ श्रीपती पुरवीं कां ॥२॥

जे पंढरीस जाती वारकरी । मी पशु होईन त्यांच्या घरीं ।

मग पाठीवरी वाहोनि शिदोरी । तुझें द्वारीं आणितील ॥३॥

पंढरी क्षेत्रामाजी जाण । होईना सांडवा पाषाण ।

मग लागतील संतांचें चरण । पवित्रपणें हो काय ॥४॥

जरी मग घालिसी मनुष्य देहीं । तरी पिसेंपण करुनि ठेवीं ।

तेणेंचि निर्विघ्न सर्वदाही । चरण जीवीं आठवीन ॥५॥

नको ज्ञान व्युत्पन्नता । नको लोकीं देऊं मान्यता ।

तुझे ठायीं वाटेल ममता । हें पंढरीनाथा मज द्यावें ॥६॥

अभेद भक्त जे प्रिय तुज । त्यांचीं चरित्रें आवडती मज ।

तरी आठवण देऊनि गरुडध्वज । चित्तीं उमज पाडावा ॥७॥

मागिले अध्यायीं कथा लाघव । अनामिकाचा सप्रेम भाव ।

त्याचें घरीं जेविला देव । परी विप्रांसी मात्र कळेना ॥८॥

एकनाथ लीलावतारी । चरित्रें दाखवीत नानापरी ।

आणि ब्राह्मणीं कुर्तक काढिला अंतरीं । म्हणती मंत्र साबरी शीकला ॥९॥

महाद्भुत प्रसन्न करोनि त्याणे । एका रुपाची दाखविलीं दोन ।

आम्हांसि लटिके पाडिले त्याणें । धरावया ठिकाण एक नाहीं ॥१०॥

यावरी प्रतिष्ठान नगरांत जाण । एक गृहस्थ भाविक पूर्ण ।

स्नानसंध्या शुचिर्भूत जाण । सत्कर्माचरण करीतसे ॥११॥

पूर्व प्रारब्धें करोनि त्यास । सांपडला होता एक परीस ।

तेणें संतोष होऊनि मानस । सर्व संपत्ती भोगीतसे ॥१२॥

सर्व साहित्य अनुकूल सुखी । ऐसा न दिसेचि ये लोकीं ।

एकमेकांचे देखो देखीं । सावह विवेकी होतसे ॥१३॥

कित्येक दिवस लोटतां जाण । तो पुत्र कांता गेलीं मरोन ।

तेणें उदास जाहलें मन । न पडे चैन सर्वथा ॥१४॥

जेथें खावया नसे अन्न । ते स्थळीं बहु संतान ।

एकीं नवस करितां प्रयत्‍न । रोगिष्ट तान्हें मग होय ॥१५॥

कांता सुंदर मिळाली जर । तरी भ्रतार होतसे हिणवर ।

कोणी तरुण पुरुष थोर । तरी पत्‍नी मरे तयाची ॥१६॥

पुत्र कांता संपत्ति धन । तरी शरीरीं रोग वाढे दारुण ।

उदारापासी न मिळे धन । संपत्तिवान कृपण बहू ॥१७॥

शरीर सुंदर लाधले जर । तरी अल्पायुषी असे तो नर ।

स्वधर्मीं राजा तो साचार । दिवस फार वांचेना ॥१८॥

दान द्यावयाची इच्छा मानसीं । तरी सत्पात्र सुशील नाढळेचि त्यासी ।

कर्माची गति विचित्र ऐसी । अनुभव सर्वांसी विदित ॥१९॥

द्वैत प्रारब्धें करोनि निश्चितीं । परीस लाधला गृहस्थाप्रती ।

तो कांता परिवार निमोनि जाती । खेद चित्तीं बहु जाहला ॥२०॥

देखोनि संसार विटंबना । उदास वाटले त्याच्या मना ।

म्हणे आतां जावें तीर्थाटणा । ऐसी वासना धरियेली ॥२१॥

मग चित्तीं विचार करीतसे पाहीं । परीस ठेवावा कवणे ठायीं ।

विश्वासुक कोणी दिसत नाहीं । मग नाथाचें गृहीं तो आला ॥२२॥

एकांतसमय पाहोनि जाण । सद्भावें साष्टांग केलें नमन ।

म्हणे महायात्रेसि जावया कारणें । हेत निज मनीं धरियेला ॥२३॥

अमूल्य वस्तु मजपाशीं । जतन कोण करील तिसीं ।

तुम्ही सद्भक्‍त तपोराशी । एक विश्वासी दिसतसां ॥२४॥

ऐसें वचन ऐकोनि पाहे । श्रीनाथ उत्तर देत काय ।

जे स्थळीं विश्वास तुमचा आहे । तेथेंचि लवलाहें ठेविजे ॥२५॥

ऐसें अभय होतांचि निश्चितीं । गृहस्थें परीस दीधला हातीं ।

देखूनि आश्चर्य वाटलें चित्तीं । मग काय बोलती त्याजलागीं ॥२६॥

हा तरी पाषाण दिसताहे । आणि अमूल्य वस्तु म्हणता हे ।

या माजी सद्गुण असे काय । तरी तो लवलाहें सांगिजे ॥२७॥

गृहस्थें लोखंड घेऊनि हातीं । तत्काळ लाविलें तया प्रती ।

तंव ते कांचन जाहलें सत्वरगती । म्हणे परीस निश्चितीं हा असे ॥२८॥

महायात्रेहूनि आलिया सहज । मागुतीं द्यावा माझा मज ।

तुम्हां प्रसन्न गरुडध्वज । नसेचि काज पैं याचें ॥२९॥

मग सिंहासनाखालीं निश्चित । श्रीनाथें परीस टाकिला हातें ।

मग नमस्कार करुनि निश्चित । गेला त्वरित यात्रेसी ॥३०॥

अमुल्य परीस ठेवावा जतन । हें एकनाथासि नाहीं स्मरण ।

जैसा सागरावरी वर्षला घन । तरी चाड कोण तयासि ॥३१॥

ना तरी सतेज परिपूर्ण गभस्ती । तो दृष्टीस न पाहे दीपकज्योती ।

जयासि अमृत लाधलें हातीं । मग तो वनस्पति न पाहे ॥३२॥

तेवीं प्राप्त पुरुष एकनाथ जाण । तयासि सारिखें सोनें शेण ।

परीस ठेवावा करुनि जतन । चित्तीं स्मरण हें नसे ॥३३॥

एक संवत्सर लोटतां जान । गृहस्थ आला यात्रा करुन ।

आधीं श्रीनाथासि करुनि नमन । निज प्रीतींनें भेटला ॥३४॥

यात्रा जाहली यथास्थित । पुसिला सकळ वृत्तांत ।

न भागता देतील वस्तूतें । ऐसें चित्तांत तयाच्या ॥३५॥

ऐसें संकल्पोनि द्विजवर । निवांत बैसला घटिका चार ।

परी श्रीनाथासि अणुमात्र । स्मरण साचार नसेची ॥३६॥

गृहस्थ म्हणे आपुलें मनीं । प्रथम भेट आजिचे दिनीं ।

यास्तव अनमान केला यांनीं । तरी उदयीक येऊन पाहावें ॥३७॥

ऐसें म्हणोनि त्या अवसरा । ब्राह्मण गेला आपुल्या घरां ।

परी चैन न पडे त्याचिया अंतरां । म्हणे परिणाम बरा दिसेना ॥३८॥

निष्काम वीतरागी देखोनियां । वास्तव वस्तु दीधली तया ।

परतोनि माझी मज द्यावया । अनमान कासया करितसे ॥३९॥

ऐसी कल्पना आणोनि चित्तीं । तळमळ करीत अहोरात्रीं ।

मग उदया येतांचि गभस्ती । प्रातःस्नान निश्चितीं सारिलें ॥४०॥

श्रीनाथ करितां देवतार्चन । येऊनि तयांसि केलें नमन ।

पुसिलें तयासि आद्यंत वर्तमान । तितुकें निवेदन करितसे ॥४१॥

परी परीस द्यावा ऐसी मात । कदापि न करी एकनाथ ।

गृहस्थ निर्भीड होऊनि त्वरित । आठव तयां दीधला ॥४२॥

तेव्हां श्रीनाथासि जाहलें स्मरण । पुसती ठेविला तो ठिकाण ।

सिंहासना खालीं म्हणवून । स्वहस्तें करुन दाखवी ॥४३॥

उभयतां धुंडिती सायासें । परी परिस गोटा तेथें नसे ।

निर्माल्य सांचविती पंधरा दिवस । मग हरिदिनीस टाकिती ॥४४॥

एकनाथ म्हणती ब्राह्मणास । निर्माल्य सारितां गेला परीस ।

ऐकोनि नाथाच्या वचनास । धकधक चित्तांस लागली ॥४५॥

म्हणे परीसाची आशा धरोनि जाण । घरासि मी आलों परतोन ।

दारापुत्र नव्हतें बंधन । व्याकुळ मन होतसे ॥४६॥

तयासवें घेऊनि त्वरित । श्रीनाथ गेले गंगेत ।

परीस पडिला असेल तेथें । चला त्वरित पाहूं आतां ॥४७॥

श्रीनाथ तयासि आश्वासित । म्हणती निर्माल्य टाकिला गंगेंत ।

मग उभे ठाकूनि उदकांत । खडे पांच सात उचलिले ॥४८॥

गृहस्थासि म्हणती ते समयीं । आपुला परीस वोळखूनि घेयी ।

लोहाचे कुटके त्याचे संग्रहीं । ते लावूनि ते समयीं पाहतसे ॥४९॥

तो तितुके गोटे जाहले परीस । विस्मय वाटला मनास ।

इतुकेही असावे आपणास । चित्तीं अभिलाष वरियेला ॥५०॥

श्रीनाथ आज्ञापिती तयास । वोळखून एक घेई परीस ।

वरकड अर्पितों गंगेस । जतन होतसे तया ठायीं ॥५१॥

गृहस्थें एक घेतला त्यांतून । वरकड गंगेंत दीधले टाकून ।

मग नाथें करोनि स्नान । आले परतोन मंदिरां ॥५२॥

श्रीनाथ ऐश्वर्य वाणितां प्रीती । कुंठित होतसे कवीची मती ।

तेथें श्रुति वदल्या नेति नेती । मशक महीपती काय तेथें ॥५३॥

करावयासि विश्वोद्धार । श्रीविष्णूनें घेतला अवतार ।

लोक संग्रहार्थ साचार । सत्कर्म आचरे निजनिष्ठा ॥५४॥

पंचपंच उषःकाळीं उठोनि जाण । शौच विधि मुखमार्जन ।

मग गंगातीरी करोनि स्नान । देत अर्घ्यदान सूर्यासी ॥५५॥

नित्य नेम सारोनि निश्चितीं । अर्चनीं पूजीत पांडुरंग मूर्ती ।

धूपदीप एकारती । मंगळ आरती होतसे ॥५६॥

यावरी पुराण श्रवण । अर्थ अन्वयार्थ बोलणें ।

गंगेंसि जाऊनि पितृतर्पण । निजप्रीतीनें करितसे ॥५७॥

घरीं सदावर्त असे निश्चित । ब्राह्मण पूजनीं अत्यंत प्रीत ।

आवडीनें तीर्थ प्राशन करीत । संतोष चित्तीं मग होय ॥५८॥

ब्राह्मण भोजन झालिया जाण । युक्त आहार सेविती आपण ।

भागवतीं टीका श्रीधरी जाण । चतुर्थ प्रहरीं आपण वाचिती ॥५९॥

अस्तमानासि जाताम गभस्ती । मग गंगेसि जाऊनि संध्या करिती ।

मग येऊनि सदनाप्रती । धूपारती होतसे ॥६०॥

टाळविणे मृदंग सुस्वर । रात्रीं होतसे कीर्तन गजर ।

भाविक लोक येऊनि फार । श्रवणासि सादर बैसती ॥६१॥

रामकृष्णादि चरित्रें अनेक । स्वमुखें वर्णीतसे प्रेमसुख ।

आबालवृद्ध जे कां भाविक । स्वानंद सुखें डोलती ॥६२॥

यथाविधि अर्चन पूजन । रात्रीं होतसे हरि कीर्तन ।

सर्वकाळ नामस्मरण । तेणें जगज्जीवन संतुष्टला ॥६३॥

एकनाथाची देखोनि सेवा । अतिभार पडला देवाधिदेवा ।

म्हणे याचें उत्तीर्ण होई न केव्हां । आवडी केशवा हे बहू ॥६४॥

मग ब्राह्मणाचें रुप धरोनि कृष्ण । सत्वर चालिला द्वारकेहून ।

मग पावले प्रतिष्ठान । केलें स्नान गंगातीरीं ॥६५॥

मग एका जनार्दनाचें घरीं । जाऊनि राहिले उभे हरी ।

सद्भावें तयासि नमस्कारी । म्हणे सेवेसि निर्धारीं मी आलों ॥६६॥

विष्णुअर्चन ब्राह्मणसेवा । तूं करितोसि भक्‍ति वैष्णवा ।

तुझा समागम अखंड व्हावा । आवडी जीवा हे बहुत ॥६७॥

मी संताचें दास्यत्व जन्मापासून । करीत असे निज प्रीतीनें ।

कांहीं न मागेंचि वेतन । पोटभर अन्न इच्छितसें ॥६८॥

घोंगडें वस्त्र उदर प्रवृत्ती । यावीण इच्छा नसे चित्तीं ।

सर्वकाळ असावी सत्संगती । ऐसें श्रीपती बोलिले ॥६९॥

परी ईश्वरीं माया अनिवार । एकनाथ नोळखे इंदिरावर ।

म्हणती तुमचें कोणतें नगर । कुटुंब परिवार काय असे ॥७०॥

कोणती शाखा तुमची जाण । काय देहासि नामाभिधान ।

एकनाथाचा ऐकोनि प्रश्न । जगज्जीवन काय म्हणे ॥७१॥

माझा मीच एकला असें । दारापुत्र नाहींच पाश ।

कृष्ण श्रीखंडयानाम देहास । सर्वत्र देश धुंडितों ॥७२॥

ऋग्वेदी ब्राह्मण मी निश्चिती । चित्त रमलें तेथेंचि वस्ती ।

तुझे सेवेची धरिली आर्ती । रुक्मिणपती म्हणतसे ॥७३॥

यावरी एकनाथ काय बोलत । तुमचे सेवेची नसेचि आर्त ।

अन्नवस्त्र सेवूनि येथ । सुखें परमार्थ साधावा ॥७४॥

ऐकूनि नाथाची अमृतवाणी । काय म्हणतसे कैवल्यदानी ।

कष्टार्जित अन्न सेवूनी । तुमचें सदनीं राहतों ॥७५॥

उगाचि बैसोनि जेविलों जर । तें हें देह नश्वर ।

कांहीं घडावा परोपकार । सार्थक थोर होय तेणें ॥७७॥

ऐसें म्हणोनि लवड सवडी । खांद्यावरी घेतली कावडी ।

गंगोदक भरोनि तांतडी । रांजण वाढी जगदात्मा ॥७८॥

जो कां ब्रह्मादिकांसि पूज्यमान । शिवादिक वंदिती ज्याचे चरण ।

तो लीला नाटकी जगज्जीवन । ब्राह्मण जन झाला कीं ॥७९॥

ज्याची कीर्ति वर्णितां चोखडी । श्रुति पुराणें जाहलीं वेडीं ।

तो ब्राह्मणांचीं उछिष्टें सावडीं । अभिनव गोडी सेवेची ॥८०॥

क्षीरसागरीं प्रभाकर बेट । तेथें शेषशयनी वैकुंठपेठ ।

तो प्रातःकाळ होतांचि उठे । देहासि कष्ट न मानिता ॥८१॥

अष्टांग योग साधूनि जाण । योगी शिणती जया कारणें ।

तों देवपूजेचीं उपकरणें । सोज्ज्वळ उठोन ठेवीतसे ॥८२॥

सांवळा सुकुमार रुक्मिणीकांत । सायुज्य दानी जगविख्यात ।

तो पडलें काम निजांगें करित । आनंदयुक्त ते समयीं ॥८३॥

ज्याच्या चरणापासूनि निश्चिती । प्रगट झाली भागीरथी ।

तो देवपूजेसि अग्रोदक प्रीतीं । भरोनि श्रीपती ठेवितसे ॥८४॥

अठयांयशी सहस्त्र ऋषिजाण । सद्भावें ज्याचें करिती अर्चन ।

तो साहणेवरी उगाळीत चंदन । संपुष्ट भरोन ठेवितसे ॥८५॥

लक्ष्मीसहित अहर्निशी । अष्टसिद्धी ज्याच्या दासी ।

तो हार गुंफोनि ऋषीकेशी । देवपूजेसी ठेवितसे ॥८६॥

चंद्र सूर्य नक्षत्रराज । ज्याच्या योगें तेजःपुंज ।

तो दीपक सरसावी अधोक्षज । परी मनांत न लाजें सर्वथां ॥८७॥

कृष्णा म्हणोनि हाका मारितां । पुढें सादर दिसे अवचितां ।

कोठेंही अंतर न पडे सर्वथा । सावधानता सर्वकाळ ॥८८॥

चंदन देत उगाळून । यास्तव म्हणती श्रीखंडया ब्राह्मण ।

नगरवासी सकळजन । आश्चर्य मनें करिताती ॥८९॥

म्हणती एकनाथाचें घरीं । एक ब्राह्मण करितो चाकरी ।

कांहीं वेतन न घेतां पदरीं । अवघी भराभरी करीतसे ॥९०॥

एकनाथासि न कळत । मंदिरांत जाती द्वारकानाथ ।

कांतेसि धंदा करुं लागत । उल्हासयुक्त निजप्रीतीं ॥९१॥

भक्तिभावें भुलला घननीळ । आपुलें ऐश्वर्य विसरोनि सकळ ।

एकनाथाच्या संमुख जवळ । दीनदयाळ तिष्ठतसे ॥९२॥

ऐशी रीतीं जगन्नाथें । द्वादश वर्षे क्रमिलीं तेथें ।

तो नवल वर्तलें अद्भुत । तें परिसा निजभक्त भाविकहो ॥९३॥

द्वारकेमाजी एक ब्राह्मण । अनुष्ठानीं बैसला निज प्रीतीनें ।

सर्वदा करीत नाम स्मरण । साक्षात दर्शन व्हावया ॥९४॥

द्वादश वर्षें लोटलीं ऐसीं । परी साक्षात्कार नव्हेचि त्यासी ।

मग काय करित एके दिवसीं । निर्वाण उपवासी राहिला ॥९५॥

मग स्वप्नीं येऊनि माता रुक्मिणी । तयासि सांगे वर्तमान ।

तुवां व्रत मांडिलें निर्वाण । परी नसेचि कृष्ण याठायीं ॥९६॥

प्रतिष्ठान नगरांत निश्चित । एकनाथनामें अभेद भक्‍त ।

ते स्थळीं जाऊनि वैकुंठनाथ । सेवा करित तयाची ॥९७॥

कृष्ण श्रीखंडया चक्रपाणी । होऊनि कावडीनें वाहातसे पाणी ।

गंधही देतसे उगाळूनी । ब्राह्मण सेवनीं सादर ॥९८॥

तरी तुवां प्रतिष्ठानासि जावें त्वरित । तेथें भेटेल श्रीकृष्णनाथ ।

ऐसा देखोनि दृष्टांत । ब्राह्मण जागृत जाहला ॥९९॥

चित्तीं विचारोनि आपण । म्हणे रखुमाईनें सांगीतली खूण ।

मग प्रतिष्ठानासि येऊनि त्वरेनें । गंगास्नान पै केलें ॥१००॥

तों कावडी घेऊनि खांद्यावरी । श्रीखंडया पातला गोदातीरीं ।

त्याणें ब्राह्मणासि वोळखिलें सत्वरी । म्हणे हा ऋणकरी कां आला ॥१॥

मी आपणा योग्य योजूनि स्थळ । सुखें कंठीत होतों काळ ।

रुक्मिणीनें बोभाट केला सकळ । यासि तत्काळ पाठविलें ॥२॥

ऐसें म्हणोनि द्वारकापती । परम संकोचलें चित्तीं ।

मग घागरी भरोनि सत्वरगती । सदनाप्रती गेले ॥३॥

जावोनियां देवघरांत । बैसले गंध उगाळित ।

तों ब्राह्मण घर पुसत पुसत । आला वाडियांत नाथाच्या ॥४॥

श्रीनाथें देखोनि द्विजवर । सद्भावें केला नमस्कार ।

आलिंगन देवोनि परस्परें । भेटले साचार ते समयीं ॥५॥

बैसावयासि देऊनि आसन । नाथें पुसिलें वर्तमान ।

कोठूनि जाहलें जी आगमन । उद्योग कोण तो सांगा ॥६॥

ब्राह्मणें नमस्कार करोनि प्रीतीं । वृत्तांत निवेदीत तयाप्रतीं ।

म्हणे मी द्वारकेसि जाऊनि निश्चिती । श्रीकृष्ण मूर्ती आराधिली ॥७॥

साक्षात व्हावें सगुण दर्शन । यास्तव ते स्थळीं केलें अनुष्ठान ।

तों रुक्मिणीनें दाखविलें स्वप्न । कीं गेला श्रीकृष्ण पैठणीं ॥८॥

तेथें एकनाथ प्रेमळ भक्‍त । त्याचें घरीं सेवा करीत ।

ऐसा देखोनि दृष्टांत । आलों त्वरित या ठायीं ॥९॥

त्याचें दर्शन करावें सत्वर । म्हणोनि लोटला चरणावर ।

श्रीनाथाचें विस्मित अंतर । मग काय उत्तर बोलती ॥११०॥

अणुरेणुपर्यंत जाण । सदोदित व्यापक असे कृष्ण ।

रितें स्थळ त्याज वांचोन । असे कोण तें सांग ॥११॥

ब्राह्मण म्हणे एकनाथा । ब्रह्मज्ञान नावडे सर्वथा ।

कृष्ण श्रीखंडया ब्राह्मण तत्वतां । मजला आता दाखवीं ॥१२॥

तुझा प्रेमा भक्त वैष्णवा । जाणोनि अतिभार पडिला देवा ।

बारा वरुषें करितसे सेवा । पार दैवा नसेची ॥१३॥

ऐकोनि ब्राह्मणाचें वचन । एकनाथाचें विस्मित मन ।

मग उद्धवासि म्हणती प्रीतीनें । कृष्ण ब्राह्मणा पाचारी ॥१४॥

हांका मारितां ते अवसरीं । होते देवाघरांत होते श्रीहरी ।

तत्काळ चतुर्भुज रुप धरीं । शंखचक्र करीं मंडित ॥१५॥

दैदीप्यमान मुगुट घातला जाणा । तेजासि भास्कर दिसे उणा ।

सावळा सुंदर वैकुंठराणा । पाहतांचि मना विश्रांतीं ॥१६॥

दिव्य कुंडलें कानीं तळपती । कंठी कौस्तुभ वैजयंती ।

पीतांबराची सतेज दीप्ती । पाहतां झांकती नेत्रपाती ॥१७॥

पायीं नेपुरें वांकी तोडर । गंधानें माखलें असती दोन्हीं कर ।

देवद्वारी उभा जगदीश्वर । देखतांचि द्विजवर धावला ॥१८॥

तत्वर मिठी घालूनि पायीं । प्रेमे भेटला लवलाहीं ।

एकनाथासि अनुताप जीवीं । म्हणे शेषशायीं कष्टविला ॥१९॥

देवासि देऊनि अलिंगन । म्हणे श्रीहरि हें उचित कोण ।

निजांगे होऊनि ब्राह्मण । कष्ट संपूर्ण त्वां केलें ॥१२०॥

तुझा महिमा वर्णितां देवा । निजांगे श्रमला चक्षुःश्रवा ।

ठक पडिले कमळोद्भवा । अमुचा केवा तो किती ॥२१॥

तूं पतितपावन पाही । तोडर बांधिला असे पायीं ।

तें असत्य न व्हावें कल्पांतीही । अनुभव जीवीं मज आला ॥२२॥

ऐसी एकनाथाने करोनि स्तुति । नमस्कारित पुढत पुढती ।

तंव नाथासि म्हणे रुक्मिणीपती । धन्य सद्भक्ती पैं तुझी ॥२३॥

मागे विठ्ठरुप धरोनि निश्चित । द्वादश वर्षे धरिले ध्‍रुपद ।

मग केशवरुपें श्रवण भागवत । केलें समस्त तुझीया मुखें ॥२४॥

ऐसीं चोवीस वर्षे निश्चित । आम्हीं मागे कंठिली येथ ।

परी तें तुजला नव्हते श्रुत । ऐसे बोलत जगदात्मा ॥२५॥

एकनाथ म्हणे जगज्जीवना । विश्वव्यापका भक्तभूषणा ।

तुझें कर्तृत्व मनमोहना । विरंचीसि खुणा न कळती ॥२६॥

इतुका संवाद होतां सत्वरी । अंतर्धान पावले श्रीहरी ।

ब्राह्मण नाथाचे चरण धरी । म्हणे धन्य संसारीं तूं एक ॥२७॥

तों नाथा म्हणती विप्राकारणें । जवळ साक्षात असतां कृष्ण ।

आम्हीं नोळखूं त्याजलागून । आजि साक्षात दर्शन त्वां केलें ॥२८॥

तपस्वी आनंदयुक्त मनें । नाथपंक्तीसि करी भोजन ।

कित्येक दिवस तेथें । श्रीहरि कीर्तन ऐकतसे ॥२९॥

विष्णु अर्चन पुराण श्रवण । नित्य घडतसे गंगास्नान ।

श्रीनाथ साक्षात कृष्ण । सद्भावपूर्ण बाणला ॥१३०॥

आणिक चरित्र रसाळ गहन । सादर ऐका भाविक जन ।

एकदां करितां कीर्तन । श्रोते सज्जन पातले ॥३१॥

बहुत मिळाले नारीनर । वाडियांत दाटी जाहली फार ।

नामस्मरणें करिताति गजर । नादे अंबर कोंदले ॥३२॥

जयजयकारें पिटिली टाळी । आनंदली भक्त मंडळी ।

गुप्तरुपें तये केलीं । सुरवर निराळी पातले ॥३३॥

कृष्णा विष्णु मेघश्यामा । अच्युता अनंता पुरुषोत्तमा ।

बळि बंधना त्रिविक्रमा । विजयी राम रघुपती ॥३४॥

ऐसी नामें प्रेमभरीत । एकनाथ कीर्तनीं उच्चारित ।

वायुरुपीं जडलें चित्त । देहभान किंचित असेना ॥३५॥

ऐशा कीर्तनीं साचार । येउनि बैसले चौघे तस्कर ।

म्हणती मनुष्य उठोंनि गेलियावर । मग आपुला व्यवहार करावा ॥३६॥

ऐसी त्यांची कृत्रिम बुद्धी । कोणासि नकळेचि त्रिशुद्धी ।

कीर्तन समाप्तीची अवधी । तेव्हां दुर्बुद्धी लपालें ॥३७॥

तेव्हां उजळोनि मंगळ आरती । ओवाळिला श्रीरुक्मीणीपती ।

श्रोतयांसि वांटिल्या खिरापती । मग ते जाती स्वगृहा ॥३८॥

भिंतीआड लपोनि तस्कर । उगेचि बैसले घटिका चार ।

उद्धवें आडकोनि महाद्वार । निद्रा सत्वर मग केली ॥३९॥

श्रीनाथ बैसोनि सहजासनीं । हातीं घेतली असे स्मरणी ।

निद्रा आळस नयेचि मनी । स्वानंद जीवनी तृप्त सदा ॥१४०॥

उद्धव आणि गिरिजाबायी । निद्रित जाहलीं ते समयीं ।

तस्कर शिरोनि मजगृही । वस्तु लवलाही विलोकिती ॥४१॥

कौतुक करी पंढरीनाथ । श्रोते परिसोत भाग्यवंत ।

तस्कर आंधळे जाहलें समस्त । नेत्रीं किंचित दिसेना ॥४२॥

दीपक जळतो मंदिरांत । परी तयासि अणुमात्र न दिसे तेथें ।

एकमेकांसि गुजगुज करित । कैसी परी आतां करावी ॥४३॥

द्वार उंबरा न कळे पायरी । खाट आदळती मस्तकावरी ।

म्हणती हे विपरीत जाहली परी । क्षोभ ईश्वरी दिसतसे ॥४४॥

पश्चात्ताप जाहला चित्तांत । म्हणती एकनाथ हा विष्णुभक्त ।

येथें चोरीस आलों निश्चित । यास्तव घात जाहला ॥४५॥

संसार व्यर्थ नेत्राविण । आतां तत्काळ द्यावा प्राण ।

विष्णुदासाचें करिता छळण । रुक्मिणीरमण क्षोभला ॥४६॥

ऐसें बोलोनि परस्परें । वाडियात फिरत असती चोर ।

तों अकस्मात लागले देवघर । नाथासमोर मग आले ॥४७॥

तेव्हांही जाहला चमत्कार । तस्करांचे आले मागुती नेत्र ।

पश्चात्ताप जाहला थोर । सद्भावें नमस्कार घालिती ॥४८॥

श्रीनाथदर्शनाचेनि गुणे । दुर्बुद्धि गेलीं देहांतून ।

मग हात जोडुनि चौघेजण । करिती स्तवन निजप्रीतीं ॥४९॥

तूं साक्षात पांडुरंग मूर्ती । ऐसें नेणोनि आम्ही दुर्मती ।

छळणेसि पातलों सत्वर गती । हा अपराध संगती क्षमा कीजे ॥१५०॥

एकनाथ म्हणती तुम्ही कोण । कशास्तव करितां स्तवन ।

कोणती इच्छा असेल मनें । तेंही कारण सांगिजे ॥५१॥

ते म्हणती आम्ही तस्कर । चोरीस पातलों साचार ।

वस्तु धुंडूनि पाहतां सत्वर । तो नेत्रीं अणुमात्र दिसेना ॥५२॥

वेडे होऊनियां समस्त । फिरलों अवघिया वाडियांत ।

महादोष घडला निश्चित । म्हणोनि प्रचीत हे आली ॥५३॥

ऐशा रीतीं वदतां तस्कर । ऐकोनि शांति दयासागर ।

द्रवलें नाथांचें निज अंतर । म्हणती श्रम थोर तुम्हां झाले ॥५४॥

आशावंत होऊनि मनीं । येथें आलेति आमुचें सदनीं ।

विमुख न जावें ये क्षणीं । म्हणवोनि विनवणी करीतसें ॥५५॥

मग भांडारगृहीं नेऊनियां । सकळ वस्तु दाखविल्या तयां ।

म्हणें जें मानेल चित्तां तुमचिया । तेंचि लवलाह्या नेयिजे ॥५६॥

आपुलें सत्कर्म आचरतां पाहीं । तुम्हांसि दोष सर्वथा नाहीं ।

शांति क्षमा धरोनि जीवीं । हें विहित सर्वही आमुचें ॥५७॥

देखोनि श्रीनाथाची शांती । तस्करांसि बोध ठसावा चित्तीं ।

वस्तूंसि अभिलाष न करिती । प्रसाद इच्छिती उदरार्थ ॥५८॥

मग उद्धव आणि गिरिजाबायी । जागृत केलीं ते समयीं ।

म्हणती पाक निष्पत्ति लवलाहीं । येचि समयीं करा आतां ॥५९॥

आज्ञा करितांचि एकनाथ । स्वयंपाक करिती अति त्वरित ।

तस्करांसि वाढोनि आपुल्या हातें । आवडीं जेववित निजप्रीतीं ॥१६०॥

जैसे संसारिक लोक पाहीं । आदरें पूजिती व्याही जांवयी ।

तैसेंचि तस्कर मानूनि जीवीं । आग्रहें तिहीं जेवविले ॥६१॥

विडे करोनि हातें आपुल्या । तयासि दीधले एकनाथें ।

मग तयांसि बोळविलें त्वरित । सन्मानीत हातें आपुल्या ॥६२॥

चोरी कर्म तैं पासुनी । टाकूनि दीधलें तस्करांनीं ।

परम सद्भाव धरोनि मनीं । श्रीहरि भजनीं लागले ॥६३॥

श्रीनाथाची ऐसी स्थित । विश्वचि मानी आत्मवत ।

शत्रु मित्र समसमान भावित । करणी अद्भुत निरुपम ॥६४॥

जो बालण्यासारिखें चाले नर । तो साक्षात ईश्वरी अवतार ।

त्याचेनि दर्शनें साचार । होय उद्धार जीवासी ॥६५॥

श्रवणीं ऐकतां सत्कीर्ती । महा दोष विलया जाती ।

तयासि होय सायुज्य मुक्ती । पुनरावृत्ती असेना ॥६६॥

धन्य प्रतिष्ठान क्षेत्र निश्चित । जे स्थळीं अवतार घेतला एकनाथें ।

सभाग्य लोक तेथ निश्चित । चरित्रें पाहतीं दृष्टीसी ॥६७॥

कोणीएक अत्यंज निर्द्धारी । उदरार्थ करीत होता चोरी ।

बहुत दिवस लोटलियावरी । एक्या अवसरीं धरियेला ॥६८॥

घरधणीयानें वोडूनि त्वरित । तयासि नेलें दिवाणात ।

मारहाण करोनि बहुत । मग तो खोडयांत घातला ॥६९॥

द्रव्य देऊनि नागवण । तयासि सोडविता नसे आन ।

कित्येक दिवस लोटले जाण । खावयासि अन्न मिळेना ॥१७०॥

यास्तव शरीर जाहलें क्षीण । काष्ठवत दिसे लोकांकारणें ।

दों चौ दिवसा जाईल प्राण । यास्तव बंदिवान सोडिला ॥७१॥

खीळ काढूनि सुतारा हातीं । तयासि मुक्त केलें निश्चिती ।

पळोनि जावया नाहीं शक्ती । कोणी न रक्षिती यास्तव ॥७२॥

तंव रात्रि समयाच्या अवसरीं । अनामिक चित्तीं विचार करी ।

खोडा तुटला आहे जोंवरीं । तों जावें लवकरी येथूनियां ॥७३॥

शरीरी चालावया शक्‍ती नाहीं । कैसें पळावें ये समयीं ।

देवाचें स्मरण आठविलें जीवीं । म्हणे येथूनि सोडवी दयाळा ॥७४॥

मी अनाथ अपराधी केवळ । बंदी पडिलों बहुतकाळ ।

तूं आपले कृपेनें घननीळ । काढीं तत्काळ येथूनियां ॥७५॥

ऐसेंचि चिंतन करितां मनीं । तो कीर्तन गजराची ऐकिली ध्वनी ।

मग खुरडत चालिला तये क्षणीं । भय वागवोनि जीवाचें ॥७६॥

हरि कीर्तनाचा ऐकोनि गजर । लोटत जातसे त्या सुमारें ।

तों एकनाथाचें मुक्‍तद्वार । देखिलें साचार दृष्टीसीं ॥७७॥

मग वाडियांत प्रवेशोनि तेव्हां । निवांत बैसला एकेसवा ।

कीर्तन घोष ऐकूनि बरवा । समाधान जीवा वाटलें ॥७८॥

वक्‍तृत्व ऐकतां नाथाचें । तनु मन वेधलें श्रोतयांचें ।

धन्य धन्य म्हणती अवघे वाचे । विश्रांतिचें स्थळ हेंची ॥७९॥

दोन प्रहर लोटतां राती । मग उजळली मंगळ आरती ।

जयजयकारें भक्‍त गर्जती । नमस्कार करिती श्रीनाथा ॥१८०॥

प्रसाद घेऊनि खिरापत । लोक घरासि गेले समस्त ।

उद्धवें दारवटा आडकिला हातें । अनामिकातें न देखतां ॥८१॥

सच्छिष्य साधक गिरिजाबायी । निद्रित जाहली ते समयीं ।

नाथ आसनीं बैसोनि पाहीं । सहज ते ठायीं विलोकिती ॥८२॥

सन्निध येऊनि जंव पाहत । तों प्रेतवत प्राणी परी जिवंत ।

शरीरीं किंचित नसेचि शक्‍त । ऐसा अंगणांत देखिला ॥८३॥

दयेनें द्रवला करुणाकर । तयासि पुसतां न बोले उत्तर ।

मग हात नेऊनि मुखावर । खुणेनें सत्वर सांगीतलें ॥८४॥

श्रीनाथासि कळलें अंतर । म्हणे हा प्राणी क्षुधातुर ।

घरांत जावोनि सत्वर। पत्‍नीसि साचार उठविलें ॥८५॥

गिरिजाबायी ते समयीं । सद्भावें मस्तक ठेवी पायीं ।

म्हणे काय आज्ञा ते सांगावी । ऐकोनि विदेही काय म्हणे ॥८६॥

व्याधिस्थ प्राणी क्षुधातुर एक । आपुले अंगणीं बैसला देख ।

तरी पदार्थ होईल तत्काळिक । तोचि सम्यक करी आतां ॥८७॥

आज्ञा होतांचि ते समयीं । चूल पेटविली लवलाहीं ।

बोटवे गहुले होते कांहीं । सिद्ध ते ठायी मग केले ॥८८॥

दूध साकर तयांत । कालवोनि आली अंगणांत ।

श्रीनाथे तेव्हां आपुल्या हातें । पात्रीं तयातें वाढिलें ॥८९॥

बहुत दिवसांचा क्षुधित जाण । बहुत भक्षितां पावेल मरण ।

यास्तव परिमित घातले भोजन । निज प्रीतीनें आपल्या ॥१९०॥

मृत्तीका पात्री देऊनि जीवन । तयासि करवी प्राशन ।

अन्नमय त्याचे परतले प्राण । मग तो बंदिवान काय म्हणे ॥९१॥

दीनदयाळा अनाथ सखया । धन्य धन्य देखिली तुझी सत्क्रीया ।

मज अनाथासि आपंगोनिया । श्रम लवलाह्या हरिला की ॥९२॥

मी अत्यंज यातीचा महार । पोटा निमित जाहलों तस्कर ।

मग दिवाणांत कळतां साचार । दीधला मार बहु तेव्हां ॥९३॥

शरीर बहुत जाहलें क्षीण । मग त्यांणी काढिलें खोडयातून ।

तुझें ऐकतां हरिकीर्तन । आलों पळोन या ठाया ॥९४॥

ऐकोनि अनामिकाचें उत्तर । श्रीनाथ अश्वासित सत्वर ।

शरींरी शक्‍ति येईल जोंवर । येथें तोंवर असावें ॥९५॥

मग तयालागीं वस्त्रें देऊनी । निद्रा करविली असे गोठणीं ।

श्रीनाथ जावोनि आपुलें सदनीं । नामस्मरणा बैसले ॥९६॥

निद्रेसि मान देऊनि किंचित । प्रातःकाळीं जाहले जागृत ।

गंगेसि स्नान करोनि येत । नित्य नेम समस्त सारिला ॥९७॥

ग्रामाधिकारीयासि सत्वरी । सांगोनि पाठविलें ते अवसरीं ।

कीं तुमचा बंदिवान आमुचें घरीं । आलासे रात्रीं आजिच्या ॥९८॥

अधिकारी देतसे प्रतिवचन । समयें अंगिकार केलिया जाण ।

आम्हांसि न करवें त्याचें दंडण । इतुकें सांगोन पाठवित ॥९९॥

ब्राह्मण भोजन जाहलिया निश्चित । श्रीनाथ तयासि वाढोनि देती ।

रात्रीं कीर्तन ऐकतसे प्रीतीं । शरीरीं शक्ती बहुत आली ॥२००॥

श्रीनाथाचें भक्षिलें अन्न । दुर्बुद्धि गेली देहांतून ।

करुं लागला श्रीहरि भजन । निज प्रीतीनें आपुल्या ॥१॥

पुढिलें अध्यायी कथा सुंदर । वदविता श्रीरुक्मिणीवर ।

महीपति त्याचा अभयकर । प्रसाद उत्तर लिहिलें ग्रंथीं ॥२॥

स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविक भक्त । विंशतितम अध्याय रसाळ हा ॥२०३॥अ०॥२०॥ओ० २०३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP