मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|
महिपतिबोवा चरित्र व प्रस्तावना

भक्त लीलामृत - महिपतिबोवा चरित्र व प्रस्तावना

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥

॥ श्रीगुरुवे नमः ॥

भक्तिभावाने ओथंबलेल्या सुमारे चाळीस हजार ओव्या लिहुन 'संत चरित्रकार' कविवर्य महिपतिबोवा ताहराबादकर यांनी मराठी भाषेत खरोखरच एक अमोल कामगिरी केली आहे. त्यांचे 'श्रीभक्तविजय' 'श्रीसंतलीलामृत' 'श्रीभक्तलीलामृत' यासारखे रसाळ ग्रंथ मराठी भाषेचे अमोल लेणे ठरले आहेत. आपल्या काव्य गंगेने त्यांनी लक्षावधी मराठी वाचकांना खरोखरच पावन करून टाकले आहे !

ईश्वरी प्रसादाने जन्म

महिपती बोवांचा जन्म इ. स. १७१५ (शके १६३७) मधला. मोगलाईतील ताहराबाद हे त्यांचे जन्मस्थान. त्यांचे संपूर्ण नाव महिपती दादोपंत कांबळे. हे ऋग्वेदी वसिष्ठ गोत्री ब्राह्मण.

त्यांचे वडिल दादोपंत हे ताहराबाद येथे स्नानसंध्या, देवतार्चन आणि ध्यानधारणा करून मोठ्या आनंदाने कालक्रमण करीत असत. पंढरीचा पांडुरंग हेच सर्वस्व मानून त्यांनी तनमनधनाने त्याचीच उपासना केली. दर महिन्याच्या शुध्द एकादशीची त्यांची पंढरपुरची वारी चोवीस वर्षात कधी चुकली नाही.

परंतु पुढे वयाची साठ वर्षे झाली. शरीरयंत्र थकुन गेले. त्यामुळे दर शुध्द एकादशीला पंढरीस जाऊन पांडुरंगाच्या सावळ्या, गोजिर्‍या मूर्तीचे दर्शन घेणें त्यांना अवघड वाटु लागले.

तरीही एकदा ते पंढरीस गेले. शरीरास थकवा जाणवतच होता. लाडक्या पांडुरंगाची साजिरी मूर्ती डोळ्यात साठवून घेऊन ते भरल्या डोळ्यांनी म्हणाले, ' हे देवाधिदेवा, कदाचित् ..... हेच तुझे अखेरचे दर्श्न असेल. विठ्ठला मायबापाऽ आता शरीर साथ देत नाही. इतक्या दुर तुझ्या दर्शनासाठी आता नाही रे येववत ! सावळ्या पांडुरंगा, मनीमानसी एकच इच्छा होती ..... ही पंढरीची वारी पुढच्याही पिढीत अशीच चालू रहावी. परंतु ..... माझ्या सारख्या निपुत्रिकाची ही इच्छा कशी पुर्ण होणार ..... ?

..... दादोपंतांच्या तोडून शब्द फुटत नव्हता. त्यांचा गळा दाटुन आला होता..... पंढरीनाथाला त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि रात्रीच्या वेळी ते बाहेरच्या ओवरीत येऊन झोपले.

-आणि त्याच रात्री एक नवल घडले !

स्वप्नात साक्षात पांडुरंगाने दर्शन देऊन एक पेढा त्यांच्या हातावर ठेवला आणि प्रसन्न हास्य करीत ते म्हणाले, 'वत्सा, दुःख करु नकोस. हा पेढा तुझ्या पत्नीला खावयास दे, म्हणजे तुझी इच्छा पुर्ण होईल.'

त्या विलक्षण स्वप्नामुळे दादोपंत खडबडुन जागे झाले. त्या स्वप्नात्या आठवणीमुळे त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. विलक्षण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पांडुरंगाने स्वप्नात दिलेला पेढा प्रत्यक्षच त्यांच्या हातात होता ..... ! !

-ताहराबादेस आल्यावर त्यांनी तो अमूल्य प्रसाद आपल्या पत्नीस खावयास दिला.आणि लवकरच तिला गर्भ राहिला अन् नवमास पूर्ण होताच तिने एका तेजस्वी गोंडस पुत्ररत्नाला जन्म दिला.

हेच आमचे चरित्रनायक कविवर्य महिपतीबोवा !

पांडुरंगाचा एकनिष्ठ भक्त

अशा प्रकारे बोवांचा जन्म ईश्वरी कृपाप्रसादाने झालेला असल्याने बालपणापासूनच त्यांच्या ठायी पांडुरंगाच्या भजनपुजनाची आवड निर्माण झाली घरापासून दूर एकांतस्थळी जावे आणि दगडांच्या चिपळ्या करून भक्तिभावाने पांडुरंगाचे भजन करावे, त्या भजनात देहभान विसरून जावे, असा त्यांचा नित्यक्रम सुरु झाला. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी पंढरीच्या वारीस जाण्याचा हट्ट वडिलांजवळ धरला आणि वडिलांनीही तो मोठ्या प्रेमाने पूर्ण केला. अशा प्रकारे दरमहा पंढरीची वारी करण्याचा दादोपंतांचा क्रम त्यांच्या पुढच्या पिढीतही चालू राहिला !

नोकरी न करण्याची शपथ

बोवा लहानपणापासूनच ज्ञानोपासक होते. त्यांची बुध्दि अतिशय तल्लख होती. संस्कृत, मराठी, गुजराती, कानडी अशा चार भाषा त्यांना उत्तम प्रकारे अवगत होत्या. ज्ञानेश्वरी व तुकोबाची गाथा या ग्रंथांचा त्यांनी फार बारकाईने अभ्यास केला होता.

वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच ते वंश परंपरेने चालत आलेले ताहराबादचे कुळकर्णपद व जोसपण सांभाळू लागले. परंतु त्यांचे चित्त मात्र सदैव भगवंताकडेच लागलेले असे. यम नियमांची जपणूक करून ईश्वरार्चन करण्यातच त्यांचा काल व्यतीत होत असे.

नोकरीला रामराम !

पुढे थोड्याच दिवसात त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा एक विलक्षण प्रसंग घडून आला.

ताहराबादचा जहागीरदार एक मुसलमान गृहस्थ होता. आपल्या कुळकर्णपणाच्या कामानिमित्त बोवांना त्या मुसलमानाच्या कचेरीत नेहमीच जाव लागे.

एकदा बोवा स्नान संध्या वगैरे उरकुन नेहमीप्रमाणे पांडुरंगाच्या पुजेत मग्न होते. तेवढ्यात जहागिरदाराचा एक यवन शिपाई बोवांना कचेरीत बोलावण्यास आला. परंतु बोवांचे चित्त पांडुरंगाच्या पूजेत रंगुन गेले होते. एका पांडुरंगाशिवाय त्यांच्या मनात दुसरा कसलाच विचार नव्हता. त्यामुळे शिपायाकडे न पहाता ते म्हणाले, पुजा आटोपल्यावर येऊ. ते ऎकून यवन शिपाई चरफडत परत गेला. परंतु जहागीरदाराने त्याला तोच निरोप देऊन पुन्हा पाठविले. असे दोन वेळा झाले. परंतु बोवांची पूजा अजून संपली नव्हती. ते आपल्याच तंद्रीत ब्रह्मरस चाखीत होते ! परंतु शिपायाला त्याचे काय ! तो बोवांना उद्देशून अधिक उणे बोलू लागला. ते ऎकून बोवा भानावर आले एका यःकश्चित शिपायाने असे उपमर्दकारक भाषण आपल्याला उद्देशून करावे याचे त्यांना विलक्षण दुःख झाले. त्यानंतर पूजा आटोपून ते लगबगीने कचेरीत गेले व तेथले काम आटोपुन घरी परत आले आणि त्याच क्षणी त्यांनी कानावरची लेखणी पांडुरंगाच्या पायावर ठेवून शपथ घेतली की, आजपासून गावकामासाठी लेखणी हातात धरणार नाही .....'

अशाप्रकारे बोवा नोकरीतून मुक्त झाले. तरीपण त्यांना, 'आता पुढे काय ?' असा प्रश्न पडण्याचे कारण नव्हते. कारण हरिभजनात त्यांचा काल उत्तम प्रकारे व्यतीत होऊन सार्थकी लागत होता !

तुकोबांचा स्वप्नदृष्टांत

अशा प्रकारे पांडुरंगाची निस्सीम सेवा करीत असताना त्यांना एके दिवशी रात्री प्रत्यक्ष तुकोबांनी स्वप्नात दृष्टांत दिला. आपला वरदहस्त बोवांच्या मस्तकावर ठेवून ते म्हणाले, 'बोवा, नामदेवांच्या शतकोटी अभंगांचा संकल्प पांडुरंगाच्या कृपेने माझ्या हातून पूर्ण झाला आता संत चरित्राचे कार्य तुमच्या हातुन व्हावे.'

एवढे सांगून तुकोबा स्वप्नात अंतर्धान पावले आणि त्याच दिवसापासून बोवांना सुंदर काव्य स्फुरू लागले आणि बोवा तुकोबांनाच आपले परमार्थ गुरु मानु लागले.

या संदर्भात त्यांच्या ग्रंथातुन अनेक ओव्या आढळून येतात. उदारणार्थ -

जो भक्तिज्ञान वैराग्य पुतळा । ज्याचे अंगी अनंत कळा ।

तो सद्गुरु तुकाराम आम्हासी जोडला । स्वप्नीं दिधला उपदेश ॥

किंवा

बाळपणी मरे माता । मग प्रतिपाळी पिता ॥१॥

तैशापरी सांभाळिले । ब्रीद आपुलें साच केलें ॥२॥

यात्रा नेली पंढरीसी । ध्यान ठेविलें पायांसी ॥३॥

हृदयीं प्रकटोनी बुध्दि । भक्तविजय नेला सिध्दी ॥४॥

स्वप्नीं येऊनि तुकाराम । आपुलें सांगितले नाम ॥५॥ इ.

महिपतीबोवांचे समकालीन कविश्रेष्ठ मोरोपंत यांनीही आपल्या 'महिपती स्तुती' मध्ये पुढीलप्रमाणे वर्णन केलेले आढळते-

'सत्य तुकारामाचा, या महिपतिवरि वरप्रसाद असे ।

सद् नुग्रहाविणॆं हें निघतिल उद् गार सार काय असे ॥'

असो. बोवांचा जन्म झाला त्यावेळी श्रीतुकाराम महाराजांचे महानिर्वाण होऊन अर्धशतकाचा काळ लोटला होता. याचाच अर्थ, बोवांना संत तुकाराममहाराजांचा उपदेश होणे शक्य नव्हते. परंतु महिपतबोवांकडून प्रत्यक्ष पांडुरंगालाच भक्त चरित्र लेखनाचे महत्कार्य करवून घ्यावयाचे होते नि म्हणूनच भगवंतानेच ही लीला रचिली होती असेच म्हटले पाहिजे !

तथापि एवढी मोठी कृपा होऊनही बोवा मुळातच अतिशय नम्र असल्यामुळे या घटनेविषयी आपल्या 'भक्तलीलामृत' ग्रंथात ते लिहितात-

'मी तरी सर्वांविषयी हीन । ऎसे साक्ष देतसे मन ।

परी कृपा केली कवण्यागुणे । त्याचे कारण तो जाणे' ॥१-२१

संताचीच चरित्रे का लिहिली ?

बोवांनी आपल्या ग्रंथातून संतांचीच चरित्रे प्रामुख्याने का लिहिली याचे आणखी एक कारण म्हणजे बोवा स्वतः महान ईश्वरभक्त होते आणि संतांविषयी त्यांच्या मनात अपार भक्तिभाव होता. संत ही प्रत्यक्ष ईश्वराचीच चालती बोलती 'रूपडी' आहेत असें ते समजत.

ते एके ठिकाणी म्हणतात-

तुम्ही संतमूर्ती । ऎसा निश्चय दृढ चित्तीं ।

म्हणोनिया महिपती । नमन करी सद्भावे ॥

संतांविषयी हाच आदरभाव बाळगून त्या काळाच्या बहुतेक कवींनी आपल्या काव्यातून संत चरित्रांचे गायन केले आहे. कारण त्या काळात काव्य हे उपजीविकेचे साधन नव्हते तर श्रीहरीशी व संतांशी नाते जोडण्याचा तो एक उत्तम मार्ग होता !

माउलींनी देखील भावार्थ दीपिकेच्या अठराव्या अध्यायात असेच म्हटले आहे की-

हारपले आपण पावे । ते संताते पाहता गिवसावे ।

म्हणोनि वानावे ऎकावे । तेचि सदा ॥ (ज्ञाने. १८ । ३९ ३९७)

बोवांनी यासाठीच आपल्या चाळीस हजाराहून अधिक ओव्यात महाराष्ट्रातील १६८ व महाराष्ट्राबाहेरील ११६ संत पुरुषांची चरित्रे लिहून एक अभूतपूर्व विक्रमच जणू केला आहे ! बोवांचा हा प्रचण्ड व्याप पाहून त्यांच्या समोर आपले मस्तक आदराने लवल्याशिवाय राहत नाही !

बोवांचि ग्रंथ संपत्ति

बोवांनी निर्माण केलेल्या काव्य संपत्तीचा तपशीलच सांगावयाचा तर तो पुढीलप्रमाणे सांगता येईल -

ग्रंथाचे नाव अध्याय ओव्या रचना शक

१) श्रीभक्तविजय ५७ ९९१६ १६८४

२) श्रीकथासरामृत १२ ७२०० १६८७

३) श्रीसंतलीलामृत ३५ ५२५९ १६८९

४) श्रीभक्तलीलामृत ५१ १०७९४ १६९६

५) श्रीसंतविजय २६ (अपूर्ण) ४६२८ १६९६

६) श्रीपंढरी म्हात्म्य १२ - -

७) श्रीअनंत व्रतकथा - १८६ -

८) श्रीदत्तात्रेय जन्म - ११२ -

९) श्रीतुलसी महात्म्य ५ ७६३ -

१०) श्रीगणेशपुराण (अपूर्ण) ४ ३०४ -

११) श्रीपांडुरंग स्तोत्र - १०८ -

१२) श्रीमुक्ताभरणव्रत - १०१ -

१३) श्रीऋषीपंचमी व्रत - १४२ -

१४) अपराध निवेदन स्तोत्र - १०१ -

१५) स्फुट अभंग व पदे - - -

या एकंदर ग्रंथाची ओवीं संख्या चाळीस हजाराचे आसपास आहे.

याशिवाय 'महाराष्ट्र कवि चरित्रकार' श्री. ज. र. आजगावकर यांनी लिहिल्याप्रमाणे बोवांनी काही नामांकित संतांची चरित्रे अभंगवृत्तातही गाइली आहेत. ती पुढीलप्रमाणे -

श्री नामदेव चरित्र अभंग ६२

श्री हरिपाळ चरित्र अभंग ५८

श्री कमाल चरित्र अभंग ६७

श्री नरसी मेहता चरित्र अभंग ५२

श्री राका कुंभार चरित्र अभंग ४७

श्री जगमित्र नागा चरित्र अभंग ६३

श्री माणकोजे बोधले चरित्र अभंग ६७

श्री संतोबा पवार चरित्र अभंग १०२

श्री चोखामेळा चरित्र अभंग ४७

एकदा ओवी वृत्तात विस्ताराने वर्णिलेली काही संत चरित्रे त्यांनी पुन्हा अभंग वृत्तातही वर्णिली आहेत, यावरूनच बोवांचे संत विषयक प्रेम उत्तम रितीने व्यक्त होते.

बोवांचा श्रीभक्तलीलामृत

ओवी संख्येचा विचार करता 'श्री भक्तलीलामृत' हा बोवांचा सर्वात मोठा ग्रंथ. या ग्रंथात असून ओवीं संख्या १०७९४ एवढी मोठी आहे.

प्रस्तुतच्या अवीट गोडीच्या ग्रंथलेखनाचे कार्य बोवांनी जयनाम सवत्सरी शके सोळाशे शहाण्णवमध्ये फाल्गुन कृष्ण चरुर्थीस (म्हणजे इ. स. १७७४ मध्ये)

ताहराबाद मुक्कामी पूर्ण केले. या ग्रंथात श्रीचांगदेव, श्रीज्ञानेश्वर, श्रीनरसिंह सरस्वती, श्रीतुकाराम, श्रीएकनाथ, श्रीभानुदास, संतोबा पवार, विठ्ठल पुरंदर, माणकोजी बोधला, इत्यादी संत सत्पुरुषांची चरित्रे बोवांनी आपल्या प्रासादिक भाषेत वाचकांच्या डोळ्यासमोर साकार केले आहेत. ते वाचल्यावर या संत पुरुषांच्या जीवनातील कित्येक नव्या हकिकती वाचकाला समजतात व त्याचे औत्सुक्य कायम राहते नि हे वाचता वाचताच त्याला भक्तिमार्गाची न कळत गोडी लागून भगवंताच्या प्राप्तीचे रहस्यही समजून जाते.

प्रस्तुतचा अवीट गोडीचा ग्रंथ बोवांनी आपल्या वयाच्या एकूणसाठाव्या वर्षी ताहराबाद या ठिकाणी लिहून पूर्ण केला. बोवांचा जन्मच जणू संत चरित्रे लिहिण्यासाठीच झाला होता.

आपल्या ग्रंथलेखनाच्या अखेरच्या ओव्यातही त्यांनी संत चरित्र लिहिण्याची इच्छाच श्रीहरीजवळ प्रगट केली आहे.

ते लिहितात -

न लगे भुक्ति न लगे मुक्ती ।

मागत नाही धनसंपत्ती ।

तुझ्या दासांची वर्णीत कीर्ति ।

ऎसे श्रीपती करावे ॥ ५१-२२७

ते पुढे असेही लिहितात -

नावडेचि तुझे ब्रह्मज्ञान ।

न लगे तुझे योगसाधन ।

रूप दृष्टीसी पाहीण सगुण ।

यावीण मागणे आन नसे ॥५१-३३०

अशा प्रकारे संतांशी आणि संत चरित्रांशी बोवा पूर्णपणे एकरूप झाले होते व 'आपणा सारिखे करिती तात्काळ । नाही काळ वेळ तया लागी' असा संतांचा स्वभाव असल्याने त्यांच्याशी एकरूप झालेल्याला ते आपल्यासारखेच करून टाकतात ! अशा प्रकारे बोवाही संत संगतीने स्वतः संत बनले !

बोवांची भाषा, अमृताहुनि गोड आहे. त्यांनी वर्णन केलेले प्रसंग हृदयाला स्पर्शून जाणारे नि म्हणूनच जिवंत आहेत. उदाहरणार्थ, त्यांनी लिहिलेले तुकोबांचे चरित्र पहा. सर्व चरित्रांत या तुकोबांचे चरित्रात बोवा जास्त रंगून गेले आहेत असे वाटते.

त्यांच्या सर्वच ग्रंथात दृष्टांत, उपमा यांचा वापर जागोजाग आढळतो. सुभाषितवजा वाक्ये तर किती दाखवावीत ?

परंतु या ग्रंथाचे खरे यश त्याच्या वाचकावर होणार्‍या परिणामात आहे. बोवांनी हा ग्रंथ वाचकांचे ईश्वरावरीक, संतांवरीक प्रेम वाढीस लागावे व ते सन्मार्गाला लागावेत, आपल्या मनुष्य जन्माचा हेतू कोणता याचा बोध त्यांना व्हावा यासाठी लिहिला आहे आणि हा ग्रंथ वाचल्यावर हा परिणाम वाचकांच्या मनावर निश्चित होतो यात तिळमात्र शंका नाही !

हा परिणाम साधण्याचे महत्त्वाचे कारण आम्हाला, असे वाटते की, 'आधी केले मग सांगितले' या म्हणीनुसार बोवांनी स्वतः अनेक सद् गुण अंगी बाणविले होते. अहिंसा, भूतदया, वसुधैव कुटुंबकत्व इ. दैवी गुण त्यांच्या ठायी पूर्णत्वाने वास करीत होते.

या संदर्भात एकच उदाहरण पुरेसे आहे.

असे सांगतात की, बोवांच्या काळी महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला. त्यालाच 'करंड्याचे साल' असे म्हणतात. त्यावेळी हजारो लोक क्षुधा तृषेने व्याकुळ झाले . त्यांची ती स्थिती पाहून 'आत्मवत् सर्वभूतेषु' अशा वृत्तीच्या बोवांचे हृदय द्रवले. आणि त्यांनी आपले संपूर्ण घर गरिबांकडून लुटविले ! ही विलक्षण हकिकत गावच्या जहागीरदारास कळताच त्याने गाडीभार सामान, धान्य वगैरे वस्तू बोवांकडे पाठविल्या. परंतु बोवांनी तुकोबांप्रमाणेच त्या आभारपुर्वक परत पाठविले व चरितार्थ भिक्षेवर चालविला.

अशाप्रकारे बोवा हे खरोखरच संतपदविला प्राप्त झाले होते. त्यांच्यावर ईश्वराची पूर्ण कृपा होती ही गोष्ट त्यांच्या हातून सहज घडलेला चमत्कारांवरूनही सिध्द होते.

बोवांचा संसार व समाधि

बोवांचा विवाह झाला होता. पत्नीचे नाव सरस्वतीबाई. तिच्यापासून त्यांना विठ्ठल व नारायण असे दोघे पुत्र झाले. बोवांनी अखेरपर्यंत पांडुरंगाची सेवा केली व श्रावण वद्य १२ शके १७१२ (इ. स. १७९०) मध्ये वयाच्या ७५ व्या वर्षी ते पांडुरंग चरणी विलीन झाले. ताहराबाद येथे बोवांचे राहते घर अजुन उभे आहे. तेथेच त्यांचे विठ्ठल मंदिरही आहे. तेथुन जवळच त्यांच्या समाधीचे वृंदावनही आहे.

बोवांच्या वंशजांकडे केशव नायक शिष्याने काढलेले बोवांचे चित्र आहे. (प्रस्तुत चित्र पोथीवर मुद्दाम प्रकाशित केले आहे.) बोवांच्या पादुका, त्यांचा चौरंग आणि लाकडी फ्रेममधे बनविलेला चष्मा या वस्तुही त्यांच्या वंशजांकडे काळजीपूर्वक जतन करून ठेवलेल्या आढळतात.

फलश्रुती

प्रत्येक कवि आपल्या ग्रंथाच्या वाचनाची फलश्रुती ग्रंथाअखेर लिहित असतो. कवि परमार्थ मार्गात अधिकार संपन्न असेल तर वाचकाला त्या फलश्रुतीनुसार फलेही प्राप्त होताना दिसून येते. 'श्रीभक्तलीलामृत' या प्रस्तुतच्या ग्रंथातही महिपती बोवांनी ग्रंथ वाचनाची फलश्रुती पुढीलप्रमाणे दिलेली आढळते. ते लिहितात -

या ग्रंथामाजी इतुकाचि अर्थ । की भक्तासि पावला भगवंत । श्रोतयां वक्त्यांचे मनोरथ । रुक्मिणीकांत पुरवील ॥ ग्रंथ संग्रह करिता घरी । तरी त्याची विघ्ने पळती दुरी । सुदर्शन घरटी करी । निश्चय अंतरी असों द्या ॥ संत चरित्रें वाचिता आधी । तत्काळ होईल चित्तशुध्दी । कदापि न राहे द्वेषबुध्दी । तेणेंचि भवाब्धी पार होय ॥ ५१-२१७-१९

बोवा हे परमार्थ मार्गात फार उच्च श्रेणीस पोचलेले होते. त्यामुळे त्यांच्या वाचेला सिध्दी होती. नि म्हणूनच हा ग्रंथ जो भक्ति व एकाग्रतेने वाचील त्याला या फलश्रुतीचा अनुभव आल्याशिवाय खचित राहणार नाही.

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP