श्री परशुराम माहात्म्य - अध्याय १२

श्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसमुद्रमद हारकाय नमः ॥

ओरंमग्यात्मकं ध्यायेत् श्रीरामं सर्व सित्धि दे ॥ माला कमंडलु धरंन्यस्त परशु चिदव्ययं ॥१॥

जय जया सर्वोत्तमा श्रीहरे आनंदधामा भक्तवत्सला आत्मारामा लक्ष्मीपते तुज नमो ॥१॥

शौनक ऋषीस सूत श्रीहरी नमोनि बोलत आतां काय सांगू तुह्मा प्रत अनंत चरित्र असे ॥२॥

चरित्र श्रीईश्‍वरचें वक्तापृच्छक श्रोत्याचें पापनाश करी साचें श्रोत्यासि नित्य नूतन ॥३॥

हरिनाम संकीर्तन अपूर्व यशाचें वर्णन वेदाचे सारांश कथन हेंचि मुख्य असे पैं ॥४॥

हरी हरी जे वदती श्रीराम कृष्ण ह्मणती नारायण उच्चारिती मर्त्यलोकीं तेचि धन्य ॥५॥

हरी हरी ह्मणतां पापें हरती कृष्ण नामें मनोरथ पुरती नारायणें मोक्षप्राप्ती सत्य सत्य बोल हे ॥६॥

नाम संकीर्तन वेदासी आद्युच्चारन ज्यापासून वेद उत्पन्न प्रणवाचा ऋषीतो ॥७॥

सत्यज्ञान परब्रह्म विचार करिती पूर्ण काम जयापासून चतुर्मुख ब्रह्म तें तुह्मासीं वर्णिलें ॥८॥

वर्णनीय एक भार्गवराम पूर्ण आवतार परब्रह्म विचारितां सत्कथन आणीक काय ऋषीहो ॥९॥

ऋषी ह्मणती धन्य धन्य तूं तारक ईशमान्य तुजवांचूनि नसे अन्य कथांमृत पाजिशी ॥१०॥

अज्ञानांध हे लोक भवसमुद्रीं बुडती सकळिक तयांसी तुह्मीं नाविक तारावया आलांसी ॥११॥

पाजोनि हरिकथा मृतसार वैकुंठीं पाठवोनि अमर करिसी दुःख सागरीचे नर तरी प्रश्न आणीक करितों ॥१२॥

हरिभक्तीचें लक्षण ईशविभूतीचें कथन नित्य पूजेचें विधान वर्णाश्रम धर्म सांगावे ॥१३॥

श्रीहरी वार्ते वांचूनि ज्याची जाय क्षण अहनी तयाचेनी आयुर्हरणीं उदयास्त सूर्याचा ॥१४॥

तरु काय जीवंत नाहीं राहत भातेश्‍वासही टाकितात प‍श्‍वादिक खातात पितात परीहरीकथे वीण ते व्यर्थ ॥१५॥

कोल्हे कुत्रे खर उष्ट्र तयापरी ते पुरुष भगवत्‌ ज्ञानावीण महिष पुष्टतो इहलोकीं ॥१६॥

हरी गुणावीण कर्ण तीं बिळें ह्मणावीं विस्तीर्ण बेडुकाची जिव्हा जाण नारायण बोलती ॥१७॥

उत्तम अंग नानापरी किरीट कुंडलें घातलीं शिरीं मुकुंदासी न नमे जरी तरी भारचि तो ॥१८॥

हस्तीं घालोनि आभरण न पूजित्ती एक नारायण ते शव कर दारुण सत्य सत्य पैं ॥१९॥

जे विष्णुमूर्ती नावलोकिती ते नरनेत्र नव्हेती मयूरपिसाचे नेत्र ह्मणती साधूजन ॥२०॥

पुण्य तीर्थ क्षेत्रासी पाय न जाती यात्रेसी ते निवडुंगा पर्येसी चरण जाणा ॥२१॥

श्रीकृष्ण चरण रेणू आंगीं कधीं न करी मार्जन ते जीवंत असतां मढें ह्मणूं तया नरा ॥२२॥

श्रीविष्णुपदीं तुलसी तिचा गंध न घेई श्‍वासीं तरी शव श्‍वास ते भरवसीं सत्य जाणा ॥२३॥

त्‍हृदयीं हरिनामाचें शोधन नसे अर्थाचे तें त्‍हृदय दगडाचें समजावें सज्जनीं ॥२४॥

मुखीं हरिनाम क्षण क्षण नसे तयासी जन्ममरण वदे ईश कीर्ती हर्षायमान तोचि धन्य ॥२५॥

नारायणाच्या सुकीर्ती वर्णाव्यात अतिप्रीती जेणें पूर्ण योगभक्ती अखंड उपजेल ॥२६॥

अती आनंद सूत शौनका ह्मणे मुनी हो कारणिका भगद्वीर्य दर्शनिका तुमचा प्रश्न होय ॥२७॥

सत्य सांगतों तुह्मातें परशुराम महेंद्रातें आश्रमीं बैसले तपातें शिष्यांसहित जामदग्नी ॥२८॥

भार्ववाचे शिष्य अपार ब्राह्मण क्षत्रियांचे परिकर जेव्हां असे युग द्वापार तेव्हां कृत विद्य जाहले ॥२९॥

तयांमध्यें शिष्य एक तो क्षत्रिय भीष्म नामक सेवन करोनि अलौकिक कीर्तीतें तो पावला ॥३०॥

धनुर्वेदीं अतिशयीत जाहला असे प्रख्यात स्वयें परशुराम युद्ध करीत पाहावया परिक्षा ॥३१॥

युत्धीं संतुष्ट परशुराम वर देती तयालागून तूंचि मुख्य शिष्य ह्मणून पूर्ण प्रसाद करियेला ॥३२॥

इच्छित मागावें माझे पासोनी न धरावा संशय मनीं तूंचि माझा भक्तगुणी ह्मणोनि प्रसन्न जाहलों ॥३३॥

भीष्में ऐकोनि तें वचन ईश्‍वर ऐसें ओळखोन येऊ निघाली लोटांगण चरणांवरी अतिहर्षें ॥३४॥

नमस्ते नमस्तें नारायणा अपराध करावे क्षमा बाण मारिले पद्मवदना न जाणूनि तुह्माप्रती ॥३५॥

तुह्मीं अदात्द्य अच्छेद्या सच्चिदानंदा वेद वेद्या सर्गादि कर्ते एका अद्या मायातीता तुज नमो ॥३६॥

प्रसन्न जाहले परब्रह्महरी काय मागावे तयासी भारी श्रीचरण सेवन मागों जरी तरीच सार्थक होइजे ॥३७॥

जरी प्रसन्न वारंवार नित्य भक्तीनें श्रीधर तया काय उणें इहपर मुक्ती ही दासी तयाची ॥३८॥

आर्या ॥ अव्यभिचारिणी भक्ती ॥ सुप्रिय करुनी नवविधा मातें ॥ साधू वैष्णव तेचि ॥ अंतीं जातील परम धामातें ॥१॥

ऐसी ईश इच्छा चिंतोनि भीष्म बोले हे वरद राजा परशुराम द्यावा आपणासी निष्काम अखंड वर तव भक्तीचा ॥४०॥

तुमचें श्रवण कीर्तन ध्यान आणीक स्मरण पाद सेवन दास्य वंदन अर्चन आत्मनिवेदन असो मज ॥४१॥

ऐकोनि एवं भार्गव हरी प्रसाद हस्त मस्तकावरी ठेवूनि ह्मणती कृपा तुजवरी पूर्ण जाहली सर्वदा ॥४२॥

नारायणाच्या भक्तांचें अपार महात्म्य होय साचें काय वर्णूं आपुले वाचे मी ही वश्‍य तयासी ॥४३॥

जे जे मागशील वर ते ते दिले अत्यादर वदूनि ऐसें परशुधर स्वाश्रमासी आलेते ॥४४॥

येऊनि आश्रमीं भीष्में वंदन करोनि परशुरामातें न ह्मणे प्रसन्न मानस तरी सांगा ज्ञान गुरुवरा मातें ॥४५॥

सूत ह्मणे शौनकातें तुह्मीं कैसें विचारिलें मातें तैसे परशुराम भीष्मातें सांगते जाहले तये वेळीं ॥४६॥

महापावन संवाद ऐका सुचित्तें साधु बोध ह्मणती राम अगाध बोध श्रवण करी शिष्योत्तमा ॥४७॥

स्वस्थ मन होण्यासी युक्ती स्वधर्मा चरणें ध्यान भक्ती तेणेंचि स्वरुपता मुक्ती साधनपूर्ण जालिया ॥४८॥

आदौ स्नान पुण्यतीर्थीं शुची बैसावें एकांतीं दृष्टी देवोनि नासिके वरतीं सम काय करावें ॥४९॥

मनातें अभ्यास तप्तर शुद्धत्रि वृद्ब्रह्माक्षर ब्रह्मबीज अनुस्मर जित‍श्‍वास होऊनि ॥५०॥

दशविध इंद्रियांचेनी विषय मार्गापासोनी बुद्धीनें मन अश्‍व आकर्षोनी शुभार्थेंते योजावे ॥५१॥

तेथें अखंडित चित्तानें ऐकावयव पाहा वेध्यानें तत्र निर्विषय मनें रुपादन्य स्मरावे ॥५२॥

रुप ह्मणजे आनंदघन सच्चै तन्य नारायण तेथें प्रसन्न जालियामन तें विष्णूचें परमपद ॥५३॥

रजतमानें अक्षिप्त मन ह्मणोनि अती मूढ जाण तें ध्यान धारणें करुन निर्मल होय ॥५४॥

जे ध्यान धारणानें ॥ लाभती योग भक्ती लक्षणें ह्मणोनि परशुराम ह्मणे ध्यावें आदौ स्थूलरुप ॥५५॥

रुप मोठया पेक्षां मोठें परीध्यात्याचे त्‍हृदयीं साठे तेंचि पाहावें अविटे विचारपूर्वक हळुहळू ॥५६॥

जेथें विश्‍वसता सत दिसे होणार होतें भूत पंचाहंमहतें वेष्टित असे ब्रह्मांड रुप हरीचें ॥५७॥

जें होय विराट ब्रह्मांड जेथें जीवराशी उदंड तेथें पुरुषावतार प्रचंड आदौस्तुत्य वेदांनीं ॥५८॥

पाताळ केशवाचें पादमूळ नारायणाची ढाचती रसातल माधवाचे घोंटे ते महातळ तळातळ जंघा गोविंदाचा ॥५९॥

विष्णूचे दोन गुडघे ते सुतल मधुसुदनाच्या मांडया त्या वितळ त्रिविक्रमाची कटी तें महीतळ नभस्थळ नाभी वामनाची ॥६०॥

स्वर्ग श्रीधराचें ऊर त्‍हृषीकेशग्रीवातो महर ॥ जनोलोक पद्मनाभाचें मुखर ललाटाशी तप दामोदराचे ॥६१॥

सत्य संकर्षणाचें शिर वासुदेवाचे बाहुवर इंद्रादिक लोकपाल दिशा कर्ण प्रद्युम्नाचे ॥६२॥

शब्द अनिरुद्धाचे श्रोत्र पुरुषोत्तमाचे दंत नक्षत्र अधोक्षजाचे वृषण मित्र नृसिंव्ह नासिका अश्‍विनी देव ॥६३॥

गंधाख्य अच्युताचें घ्राण जनार्दन मुख अग्नीजाण द्यौ उपेंद्राचे अक्षिण हरीचे चक्षू हा सूर्य ॥६४॥

कृष्णाच्या पापण्या दोन कोणच्या रात्र आणि दीन विरिंची रुप भोंवया जाण अनंत देवाच्या ॥६५॥

भगवंताची ताल उदक रसगोडी ती जिव्हा देख वेद ईशाची वाणी ऐक यमकाळ त्द्या दाढा ॥६६॥

उन्माद करी जी माया हास्य तें शिष्यराया ईशावलोकन जें विश्‍वींया तोचि दुरंत सर्ग ॥६७॥

लज्जा ओष्ठ वरला खालच्यासी लोभबोला धर्मह्मणा पुरोभागाला पृष्ठापासून अधर्म असे ॥६८॥

दक्षादि होती शिरुन ज्याच्या कुशी अब्धी जाण गिरी होत अस्थी लहान श्रीनारायणाच्या ॥६९॥

नद्या नाडया ज्या हरीच्या वृक्षादिक रोमापासून जयाच्या अन्न हें वीर्यवायू श्‍वाससाचा गतीवयास ह्मणावें ॥७०॥

कर्म ह्मणावें गुण प्रवाहास मेघ मस्तकाचे केश दोन संध्या ईशाचे वास आकाश हें त्‍हृदय ॥७१॥

विज्ञान शक्ती जी मती ज्यापासून अहंकार तो रुद्र ह्मणती नखें अश्‍वादिक होती कंबरेपासूनि पशू ॥७२॥

अष्ट व्याकर्णें वाणी राहण्याची जागा हे प्राणी गंधर्वादिक स्वर बोलणीं निषादादिक ॥७३॥

विष्णूचें मुख ब्राह्मण क्षत्रिय हे भुजा जाण वैश्य होत ऊरु गुण पायां विषयीं शूद्र ह्मणा ॥७४॥

वीर्य गुणोत्पन्न अन्न तेणें स्वाहा स्वधा यज्ञ वितान तोह व्यात्मक मध्य देह जाण ॥ यज्ञजेत्यांचा ॥७५॥

हा सर्व तो ईश्‍वराचा सन्निवेश विग्रहाचा हे भीष्मा सांगीतला वेचा धारण केलिया फळ सांगतों ॥७६॥

होतें मन निर्मळ निःसंशय हाचि तें प्रसन्न व्हावया उपाय अविद्योपाधी विरोनि जाय धारणा योगानें ॥७७॥

भगवद्भक्तीचें साधन जितेंद्रियजित श्‍वास होऊन स्थूळ सूक्ष्म रुप ध्यान करुनि मुक्ती पाविजे ॥७८॥

हें तत्त्वोत्पत्तीचें लक्षण कैसे लीन पावती गुण याचें ही करावें मनन ॥ पंचभेद जाणावा ॥७९॥

एक हरी सर्व भूतें उत्पत्ती स्थिती लयातें सर्वत्र व्यापूनि माया तें आलिप्तपणें विस्तारी ॥८०॥

द्रव्य कर्म त्रिगुणकाल त्रिविध जीव सकळ वासुदेवा वांचूनि पर समही नसे पैं ॥८१॥

सत्यज्ञानानंत ब्रह्म प्रकृती पुरुष नारायण तयापासूनि सत्व रज तम इच्छामात्रें प्रगट होती ॥८२॥

स्थिती सर्ग निरोधन त्रिगुणीं अविष्ट होऊन करिती सर्व उत्पन्न तेथें कर्मानु गजीव होती ॥८३॥

मूळ प्रकृतीपासून प्रथम प्रगटतें महान त्यांतून होतो अभिमान मग आकाशादिक होती ॥८४॥

शब्दादिक दशेंद्रिय मनचित्त बुधय दशप्राण विश्‍वकाय ऐसीं तत्वें उत्पादीतसे ॥८५॥

तीं भगवत् शक्तीनें प्रेरित ॥ परस्पर होती संहत ॥ घेऊनि सत असत ॥ आणि ब्रह्मांड निर्मिलें ॥८६॥

उदक स्थित ब्रह्मांड जीव घेऊनि उदंड पुरुश उद्भवे प्रचंड अंड फोडूनियां ॥८७॥

अंघ्नीबाहू अक्षी सहस्त्र अवयव सहस्त्राचे सहस्त्र कोणा न वर्णवे ते अजस्त्र वेद ह्मणती नेती नेती ॥८८॥

जी विद्या अविद्या पुरुषाचे आश्रया त्याचे प्रसाद तया सकळ होती ॥८९॥

सूर्य जैसा तपोनी तेज टाकी निर्लिप्तपणीं तैसा तो व्यापूनी जीवीत्व देयी ॥९०॥

तो हा भगवान पद्मनाभ स्वलक्षीत गतिब्रह्म आनंदा द्वितीय पूर्णकाम अज सर्वेश्‍वर अनादी ॥९१॥

तयाचे नाभि पद्मापासून जाला ब्रह्मा आपण तो चहूं कडे पाहून चतुर्मुख जाहला ॥९२॥

चिंता करी आपले मानसीं कोण निर्मिता आपणासीं एवं चिंतिता तपासी आज्ञा जाहली अकस्मात ॥९३॥

तात्काल जितासन सुमनी दिव्य सहस्त्र वर्षेनि तप करितां घोरपणी प्रत्यक्ष श्रीहरी प्रसन्नले ॥९४॥

ई‍श्‍वरें दाऊनी तेव्हां अखंडानंद वैभवा प्रसन्न वदनें ब्रह्मदेवा वरंवरय ह्मणती ते ॥९५॥

पूर्वीं बोलिलों तववाणी ती घेऊनि निर्धारपणीं प्रसन्न केलें आराधनीं तूंचि पूर्णत्वें ॥९६॥

हें बोलतां नारायणें अतिहर्षें नम्रपणें दास्यत्व द्यावें ब्रह्मा ह्मणे चरणीं तुमचिया ॥९७॥

मनस्थित जाणता सहज अखंड भक्ती द्यावी मज तुमचे दुर्जय मायामोह मज न लागो ताप आपणासीं ॥९८॥

तुह्मींजी आज्ञा कराल तें करी न मी सकळ परी असावी स्मृती प्रबळ सर्वोत्तमा श्रीविष्णू ॥९९॥

स्मीत करोनि ई‍श्‍वर वि‍श्‍वोप्तादकें दिधले वर सृष्टींत घेईन अवतार तुझिया स्मृती विषयीं ॥१००॥

ऐसे वर देवोन पाहात असतां अंतर्धान जाला ब्रह्मा अश्वर्यमान भीष्मासीं परशुराम ह्मणें ॥१॥

मग तो ब्रह्मा आपण करिता जाला जग निर्माण तेथें अवतार नारायण धरिती स्वइच्छे ॥२॥

ज्याचें यश विस्तृत भुवनीं श्रवणीय कथामृत कानीं देवऋषी सेविती सुमनीं मायामोहतराया ॥३॥

राम ह्मणती भीष्मासीं प्राप्त जालिया तनू मानुषी न केलें साधन हरी प्राप्तीसी तरी इहजन्माचें फळ काय ॥४॥

मोक्षेश एक श्रीकृष्ण तयाची नसे भक्तीपूर्ण आणि त्रिवृद्विद्या सद्वर्ण काय तरी ते ॥५॥

अधर्मं स्थित सर्व संग परित्यागुनी तनुमनादि हरीसी अर्पूनी एकत्र मन स्थीर करुनी निर्विकल्प व्हावें ॥६॥

नारायणा विषयीं जे धर्म ते दृढ भक्तीचे मुख्य वर्म तया लक्षूनियां केलिया कर्म मुक्तिपद पाविजे ॥७॥

निःसंगें त्‍हृषीकेश भक्ती हटयोगें केलिया ध्यानसक्ती मासादवीक तयासी प्राप्ती ईश दर्शनाची ॥८॥

ध्रुवनारद वाल्मीक पाराशर वि‍श्‍वामित्रादिक हटयोगें उद्धरिले देख ध्यान स्मरणें करुनी ॥९॥

सूत ह्मणती शौनकासीं एवं बोलतां भीष्मासीं गांगेय नमीतो चरणासीं पुनः पुनः श्रीगुरूच्या ॥१०॥

पुढें कथा होय अपूर्व वर्णना नसती शक्ती सर्व जेथें सुधेचे हरले गर्व कथामृत गोडीनें ॥१११॥

स्वस्ती श्री परशुराम विजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु द्वादशोध्याय गोड हा ॥१२॥

श्रीकृष्णार्पणमस्तु॥

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP