एकनाथी भागवत - श्लोक २० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


अयं हि जीवस्त्रिवृदब्जयोनिः अव्यक्त एको वयसा स आद्यः ।

विश्लिष्टशक्तिर्बहुधेव भाति बीजानि योनिं प्रतिपद्य यद्वत् ॥२०॥

जीवाचा जीवू आपण । यालागीं बोलिजे शिवपण ।

जीवशिवरूपें हा भिन्न । जीवत्व जाण या हेतू ॥८४॥

सागरु आपुल्या अंगावरी । वर्तुळ आवर्त करी धरी ।

तेवीं लोकपद्मातें श्रीहरी । करी धरी निजनाभीं ॥८५॥

'त्रिवृदब्ज' म्हणिजे यापरी । त्या नाभिकमळामाझारीं ।

स्वलीला त्रैलोक्यातें धरी । पद्मनाभ श्रीहरी या हेतू ॥८६॥

सुवर्णाच्या सिंहासनीं । सुवर्णमूर्ती बैसवूनी ।

पूजिजे सुवर्णसुमनीं । एकपणें तीन्ही भासती ॥८७॥

तेवीं नाभिपद्मीं त्रैलोक्य धरितां । तिहींतें भासवी अभिन्नता ।

यालागीं पद्मनाभ तत्त्वतां । आलें वाक्पथा श्रुतीचिया ॥८८॥

दृति मार्दवें पिंवळी । एकली भासे चांपेकळी ।

तेचि विकासे जेवीं नाना दळीं । तेवीं मी वनमाळी लोकत्वें ॥८९॥

हें नसतां कार्यकारण । यापूर्वी मी अव्यक्त जाण ।

जो मी प्रमाणांचाही प्रमाण । भेदें जेथ आण वाहिली ॥३९०॥

हेतु मातु दृष्टांत । रिघों न शके ज्याच्या गांवांत ।

अपार अनादि अनंत । आद्य अव्यक्त मी ऐसा ॥९१॥

एवं केवळ जें अभेद । तेथें कैंचे त्रिविध भेद ।

जेथ लाजोनि परतले वेद । स्वरूप शुद्ध तें माझें ॥९२॥

तो न मेळवितां साह्यमेळू । स्वलीलाक्षोभें क्षोभक काळू ।

स्वशक्तीनें झालों सबळू । शक्तिबंबाळू चेतविला ॥९३॥

ते निजशक्तीचे विभाग । म्यांचि विभागिले चांग ।

त्या विभागांचे भाग । ऐक साङ्ग सांगेन ॥९४॥

गुणशक्ति देवताशक्ती । मनःशक्ती इंद्रियशक्ती ।

महाभूतांची भूतशक्ती । एथ क्रियाशक्ती मुख्यत्वें ॥९५॥

जीवापासाव अदृष्टशक्ती । झाली अनिवार त्रिजगतीं ।

हरिहरां नावरे निश्चितीं । अदृष्टशक्ती अनिवार ॥९६॥

जें अदृष्टशक्तीनें जिवातें । बांधोनि केलें आपैतें ।

तिसी आवरावया मातें । सामर्थ्य येथें आथी ना ॥९७॥

जेवीं कां राजाज्ञा जाण । राजा प्रतिपाळी आपण ।

तेवीं अदृष्टशक्तिउल्लंघन । मी सर्वथा जाण करीं ना ॥९८॥

जीभ कापूनि देवासी वाहती । तैसें नासिक न छेदिती ।

तेवीं छेदी कर्मस्थिती । परी अदृष्टगती छेदीं ना ॥९९॥

अथवा विशेषेंसीं निश्चितीं । मीं माया आलिंगिली निजशक्ती ।

तो मी एकूचि त्रिजगतीं । बहुधाव्यक्तीं आभासे ॥४००॥

माझिया साक्षात्कारा आला । जो जीवन्मुक्तत्व पावला ।

तोही अदृष्टें बांधिला । वर्ते उगला देहगेहीं ॥१॥

जनकू राजपदीं नांदे । शुक नागवा प्रारब्धें ।

कळी लाविजे नारदें । अदृष्ट छंदें विनोदी ॥२॥

वसिष्ठ पुरोहितत्व करी । भीष्म पहुडे शरपंजरीं ।

याज्ञवल्क्या दोनी नारी । अदृष्टाकारीं वर्तत ॥३॥

यापरी गा अदृष्टशक्ती । अनिवार वाढली त्रिजगतीं ।

त्या जीव बांधले अदृष्टगतीं । जेवीं गारोडियाहातीं वानर ॥४॥

त्या जीवादृष्टें बहुधा व्यक्ती । मी एक भासें त्रिजगतीं ।

'विश्वतश्चक्षु' या श्रुतीं । बहुधामूर्तीं मी एक ॥५॥

मृत्तिकेचीं गोकुळें केलीं । नाना नामाकारें पूजिलीं ।

परी ते मृत्तिकाचि संचली । तेवीं सृष्टि झाली मद्रूपें ॥६॥

जेवीं एकला आपण । निद्रेसी देतां आलिंगन ।

स्वप्नीं देखे बहुविध आपण । तेवीं मी जाण विश्वात्मा ॥७॥

जेवीं सूक्ष्म वटबीज केवळ । त्यासी मीनल्या भूमिजळ ।

वाढोनियां अतिप्रबळ । वृक्ष विशाळ आभासे ॥८॥

तेथ नाम रूप पुष्प फळ । तें बीजचि आभासे समूळ ।

तेवीं जगदाकारें सकळ । भासे केवळ चिदात्मा ॥९॥

जे कां मूळ बीजाची गोडी । तोचि स्वाद वाढला वाढी ।

कांडोकांडीं स्वादुपरवडी । अविकार गोडी उंसाची ॥४१०॥

तेवीं मूळीं चिदात्माचि कारण । तेथूनि जें जें तत्त्व झालें जाण ।

तें तें निखळ चैतन्यघन । जग संपूर्ण चिद्रूप ॥११॥

ऊंस सर्वांगें बीज सकळ । बीजरूपें ऊंस सफळ ।

तेवीं जगाचें चिन्मात्र मूळ । जाण सकळ तें चिद्रूप ॥१२॥

बीज ऊंस दोनी एकरूप । तैसा प्रपंच जाण चित्स्वरूप ।

येचि अर्थीं अतिसाक्षेप । कृपापूर्वक सांगत ॥१३॥

यस्मिन्निदं प्रोतमशेषमोतं पटो यथा तन्तुवितानसंस्थः ।

यालागीं संसार जो समस्त । माझ्या ठायीं असे ओतप्रोत ।

मजवेगळें कांहीं येथ । नाहीं निश्चित अणुमात्र ॥१४॥

येचि अर्थींचा दृष्टांतू । देवो उद्धवासी सांगतू ।

जेवीं कापुसाचे सूक्ष्मतंतू । कांतोनि निश्चितू पटु केला ॥१५॥

आडवेतिडवे विणले तंतू । त्यांसी वस्त्र नाम हे मृषा मातू ।

तेवीं संसारशब्द हा व्यर्थू । स्फुरें भगवंतू मी तद्रूपें ॥१६॥

पाहतां सूतचि दिसे उघडें । त्यांचें नाम म्हणती लुगडें ।

प्रत्यक्ष चैतन्य स्फुरतां पुढें । त्यासी संसारू वेडे म्हणताती ॥१७॥

सुतावेगळें वस्त्र न दिसे । मजवेगळा प्रपंचु नसे ।

उद्धवा अप्राप्ताचें भाग्य कैसें । मीचि नसें म्हणताती ॥१८॥

यापरी मी सर्वगत । विश्वात्मा विश्वभरित ।

वृक्षदृष्टांतें प्रस्तुत । तुज म्यां येथ सांगीतलें ॥१९॥

मज देखणा ज्याचा निर्धारू । त्यासी मी केवळ सर्वेश्वरू ।

मज अप्राप्त जो नरू । त्यासी संसारू आभासे ॥४२०॥

जो सर्वात्मा सर्वेश्वरू । भ्रांतासी भासे भवतरुवरू ।

त्या भवतरूचा विस्तारू । स्वयें श्रीधरू सांगत ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP