एकनाथी भागवत - श्लोक ५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


यमानभीक्ष्णं सेवेत नियमान्मत्परः क्वचित् ।

मदभिज्ञं गुरुं शांतमुपासीत मदात्मकम् ॥५॥

होआवया वृत्तीचा उपरम । अहिंसासत्यादि धर्म ।

आचरावे अविश्रम । बाह्य नेम अविरोधें ॥५॥

आचरतां अहिंसासत्यादिकांसी । तंव तंव दशा उजळे कैसी ।

अतिप्रीति गुरुभक्तीसी । अहर्निशीं गुरु चिंती ॥६॥

सद्‍गुरूवीण ब्रह्मज्ञान । सर्वथा नव्हे नव्हे जाण ।

हें उपनिषदर्थें प्रमाण । परम निर्वाण सांगीतलें ॥७॥

डोळा देखणाचि आहे । त्यासी सूर्य नव्हतां साह्ये ।

सिद्ध पदार्थ देखों न लाहे । स्तब्ध राहे अंधारीं ॥८॥

नाव तारी हे साचार । माजीं बैसले थोर थोर ।

परी तारकेंवीण परपार । समर्थ नर न पावती ॥९॥

पर्जन्यें भूमी मार्दवा आली । बीजें कणिंग असे भरली ।

परी ज्ञातेन पेरणी नाहीं केली । तंव पिकाची बोली पोचट ॥११०॥

रत्‍न सांपडलें अवचित ते । परी खरें खोटें संशय तेथें ।

रत्‍नपारखी करी मोलातें । अतियत्‍न त्यातें मग करिती ॥११॥

तैसें निजस्वरूप आइतें । श्रद्धा सद्‍गुरूचेनि हातें ।

खरें करूनियां ज्ञाते । निजसुखातें पावले ॥१२॥

साधावया निजज्ञान । करितां सद्‍गुरूचें सेवन ।

निवाले संत सज्जन । आनंदघन सद्‍गुरु ॥१३॥

म्हणसी साधनें केलीं अनेक । तैसें सद्‍गुरू केला तो साधन एक ।

म्हणतां मुमुक्षु झाला मूर्ख । निजात्मसुख बुडालें ॥१४॥

सद्‍गुरु केला तो साधन । त्याहूनि परतें साध्य आन ।

म्हणतां आली नागवण । नागवला जाण सर्वस्वें ॥१५॥

जो चित्सुखें सदा संपन्न । चिद्रूपें ज्यासी समाधान ।

तो चिन्मात्राहोनि भिन्न । नव्हे जाण सर्वथा ॥१६॥

लवण सागरीं रिघालें । तेव्हांचि तें समुद्र झालें ।

दीपें वणवया आलिंगिलें । वणवाचि झालें तें तेज ॥१७॥

एवं चिद्रूपाचें ज्यासी ज्ञान । तो चिद्रूपचि सत्य संपूर्ण ।

गुरु ब्रह्म अभिन्न जाण । ये अर्थीं प्रमाण उपनिषद ॥१८॥

हो कां घृताची पुतळी । नव्हतां घृतपणावेगळी ।

घृतरूपें रूपा आली । तैसी मूर्ती झाली सद्‍गुरूची ॥१९॥

तो चित्सुखाचा पुतळा । कीं सच्चिदानंदाचा सोहळा ।

प्रत्यक्ष देखावया डोळां । धरी लीलाविग्रहो ॥१२०॥

त्याची होआवया भेटी । पाहिजेति भाग्याचिया कोटी ।

हळणेंवरी दिसे दिठी । तैसी गोठी ते नाहीं ॥२१॥

सद्‍गुरु जेउती वास पाहे । तेउती सुखाची सृष्टी होये ।

तो म्हणे तेथ लवलाहें । महाबोधु राहे स्वानंदें ॥२२॥

त्या सद्‍गुरूचे देखिल्या पाये । तहानभूक तत्काळ जाये ।

कल्पना उठोंचि न लाहे । निजसुख आहे गुरुचरणीं ॥२३॥

त्या सद्‍गुरूचें लक्षण । सांगतां शब्दुं थोंटावे जाण ।

जो सनातन ब्रह्म पूर्ण । ऊणखूण त्या नाहीं ॥२४॥

तर्‍ही स्फुरली एकी स्फूर्ती । त्यासी सर्वार्थी दिसे शांती ।

शांतीवेगळी उपपत्ती । प्रमाण निश्चिती रिघेना ॥२५॥

शांति तेचि समाधान । शांति तेचि ब्रह्मज्ञान ।

शांती तेचि ब्रह्म पूर्ण । सत्य जाण उद्धवा ॥२६॥

ऐसी सद्‍गुरूची स्थिती । ऐकोनि शिष्याच्या चित्तीं ।

वाढली अतिप्रीती । गुरुभक्तीलागोनी ॥२७॥

यालागीं गुरुगवेषणा । उसंतु घेवों नेदी अंतःकरणा ।

अष्टौ प्रहर विचक्षणा । गुरुलक्षणा लक्षितू ॥२८॥

कैं तो स्वामी देखेन ऐसा । कैं हा माझा फिटेल फांसा ।

कैं उपरमु होईल मानसा । सद्‍गुरुपिसा तो झाला ॥२९॥

आयुष्य वेंचतें उठाउठी । अझूनि नव्हे सद्‍गुरूसी भेटी ।

झाल्या मनुष्यदेहासी तुटी । सर्वस्व शेवटीं बुडेल ॥१३०॥

ऐकतां गुरूचें नांव । मनापुढें घेत धांव ।

ते गोठीसीच देत खेंव । येवढी हांव जयाची ॥३१॥

सद्‍गुरु प्रत्यक्ष न भेटतां । मनेंचि पूजी गुरुनाथा ।

परमादरें पूजा करितां । प्रेम तत्त्वतां न संडे ॥३२॥

सद्‍गुरु भेटावयाकारणें । हिंडे तीर्थें तपोवनें ।

गुरु न विसंबे मनें । नित्यविधीनें आचरतां ॥३३॥

सद्‍गुरुप्राप्तीचिया काजा । लहानथोरांची करी पूजा ।

अत्यादरें मानी द्विजा । गुरु मज माझा भेटावा ॥३४॥

आस्वलाचिया परी । गुरुनामाचा जप करी ।

गुरुवांचोनि निरंतरीं । चिंता न करी आनाची ॥३५॥

आसनीं भोजनीं शयनीं । गुरुतें न विसंबे मनीं ।

जागृतीं आणि स्वप्नीं । निदिध्यासनीं गुरु केला ॥३६॥

गुरुस्मरण करितां देख । स्मरणें विसरे तहानभूक ।

विसरला देहगेहसुख । सदा संमुख परमार्था ॥३७॥

ऐसी सद्‍गुरूची आवडी । ज्याची आस्था चढोवढी ।

त्यासी गुरुरूपें तांतडी । भेटी रोकडी मी देतों ॥३८॥

जंव जंव आस्था अधिक । तंव तंव भेटीची जवळिक ।

साधनांमाजीं हें साधन मुख्य । आस्थाचि एक विशेष ॥३९॥

करितां वरिष्ठसाधनकोडी । बोधाची जोडेना कवडी ।

सद्‍गुरुभजनाची अर्ध घडी । जोडी कोडी बोधाच्या ॥१४०॥

सद्‍गुरुभजनीं लागवेगें । मोक्ष येऊनि पायां लागे ।

गुरुभक्त तोही नेघे । चरणरंगें रंगला ॥४१॥

श्रीगुरुचरणाची गोडी । विसरली मोक्षसुखाच्या कोडी ।

गुरुभजनीं जयां अनावडी । ते संसार बांदवडीं पडियेले ॥४२॥

छेदावया संसारबंधन । करावें सद्‍गुरुसेवन ।

सद्‍गुरुसेवा तें माझें भजन । गुरु-आम्हां भिन्नभावो नाहीं ॥४३॥

गुरुभक्तांची श्रद्धा गाढी । आणि गुरुभजनाची गोडी ।

ते सांगितली आवडीं । प्रत्यक्ष उघडी करूनि ॥४४॥

सहज प्रसंगें येणें । शिष्यांचींही लक्षणें ।

सांगेन तुजकारणें । कृष्ण म्हणे उद्धवा ॥४५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP