एकनाथी भागवत - श्लोक १७ व १८ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


एक एवाद्वितीयोऽभूदात्माधारोऽखिलाश्रयः ।

कालेनात्मानुभावेन साम्यं नीतासु शक्तिषु ।

सत्त्वादिष्वादिपुरुषः प्रधानपुरुषेश्वरः ॥१७॥

परावराणां परम आस्ते कैवल्यसंज्ञितः ।

केवलानुभवानन्दसन्दोहो निरुपाधिकः ॥१८॥

एवं संहारोनि कार्यकारण । एक अद्वितीय नारायण ।

एकापणें परिपूर्ण । गुणागुण निरसोनि ॥१९०॥

एकला एकू नारायण । हेंही तेथ म्हणे कोण ।

हें अद्वितीयलक्षण । भेदशून्य अवस्था ॥९१॥

'विजातीय भेद' ते ठायीं । नसे 'सजातीय भेदू' कांहीं ।

'स्वगतभेदू' तोही नाहीं । भेदशून्य पाहीं ये रीतीं ॥९२॥

ऐसा अभेदू जो साचारु । तोचि प्रकृतिपुरुषांचा ईश्वरु ।

नियंता तो परावरु । तोही निर्धारु परियेसीं ॥९३॥

प्रकृति पुरुष हे दोन्ही । कल्पिलीं जेणें अमनमनीं ।

तो ईश्वर होय भरंवसेनी । त्याचे सामर्थ्येंकरूनि वर्तती ॥९४॥

प्रकृतीतें चेतवी सत्ता । तेचि याची पुरुषता ।

यालागीं प्रकृतीचा भर्ता । होय सर्वथा हाचि एकु ॥९५॥

'पर' जे अज-प्रमुख । 'अवर' मनुमुख्य स्थावरांतक ।

यांचा नियंता तो देख । सर्वचाळक सर्वांचा ॥९६॥

ज्याचे आज्ञेवरी पाहें । सैरा वायु जाऊं न लाहे ।

समुद्र वेळेमाजीं राहे । सूर्य वाहे दिनमान ॥९७॥

ज्याची आज्ञा करूनि प्रमाण । बारा अंगुळें विचरे प्राण ।

परता जाऊं न शके जाण । आज्ञेभेण सर्वथा ॥९८॥

आज्ञा जाणोनि धडफुडी । मेरु बैसका न सोडी ।

चेतना आज्ञा करी गाढी । अचेतन कुडी चेतवी ॥९९॥

तो स्वयें तंव निराधार । परी झाला विश्वासी आधार ।

जेवीं सर्पाभासा दोर । दिसे साचार आश्रयो ॥२००॥

सत्त्वादिकां ज्या गुणशक्ती । आवरूनि निजकाळगती ।

समत्वा आणिल्या स्थिती । निजप्रकृतीमाझारीं ॥१॥

तेहि प्रकृती उपरमोनी । राहिलो असे निर्गुणस्थानीं ।

जेवीं वट बीजीं सामावोनि । केवळपणीं राहिला ॥२॥

तैसा उपाधि गिळून सकळ । निरुपाधिक केवळ ।

जेवीं काढिलिया मंदराचळ । राहे निश्चळ क्षीराब्धी ॥३॥

नाना अंलकार ठसे । घातलिया जेवीं मुसे ।

पूर्वरूप सोनें जैसें । होय तैसें केवळ ॥४॥

नाना नक्षत्रावलोकू । निजतेजें लोपी अर्कू ।

तैसा उपाधि गिळूनि एकू । निरुपाधिकू उरलासे ॥५॥

हो कां ग्रीष्माच्या अंतीं । बीजें लीन होतीं क्षितीं ।

तैशी लीन होऊनि प्रकृति । केवळ सुखमूर्ती उरलासे ॥६॥

ऐसा निरुपाधिक केवळ । सुखस्वरूपानंदकल्लोळ ।

चिन्मात्रतेजें बहळ । नित्यनिर्मळ सदंशें ॥७॥

तेणें ज्ञानस्वरूपें अनंतें । सृजनकाळ अवस्थेतें ।

स्रजिता झाला सृष्टीतें । तेंही निरुतें अवधारीं ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP