मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय तिसरा|
आरंभ

एकनाथी भागवत - आरंभ

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ।

ॐ नमो जी श्रीगुरुराया । म्हणोनि सद्भावें लागें पायां ।

तंव मीपण गेलें वायां । घेऊनियां तूंपणा ॥१॥

नवल पायांचें कठिणपण । वज्रें न तुटे लिंगदेह जाण ।

त्याचेंही केलें चूर्ण । अवलीळा चरण लागतां ॥२॥

पायीं लागतांचि बळी । तो त्वां घातला पाताळीं ।

पायीं लवणासुरा खंदळी । अतुर्बळी निर्दाळितां ॥३॥

पाय अतिशयेंसीं तिख । काळियासी लागतां देख ।

त्याचें शोषोनियां विख । केला निर्विख निःशेष ॥४॥

पाय अतिशय दारुण । शकटासी लागतां जाण ।

त्याचें तुटलें गुणबंधन । गमनागमन खुंटलें ॥५॥

पायांचा धाक सबळां । पायें उद्धरिली अहल्या शिळा ।

पाय नृगें देखतां डोळां । थित्या मुकला संसारा ॥६॥

आवडी पाय चिंतिती दास । त्यांच्या मनुष्यधर्मा होय नाश ।

पायें यमलोक पाडिला वोस । पायें जीवास जीवघात ॥७॥

पायवणी शिरीं धरिलें शिवें । तो जगातें घेतु उठिला जीवें ।

त्यासी राख लाविली जीवेंभावें । शेखीं नागवा भंवे श्मशानीं ॥८॥

ऐसें पायांचें करणें । शिवासी उरों नेदी शिवपणें ।

मा जीवांसी कैंचें जीवें जिणें । हें मानितें मानणें उरों नेदी ॥९॥

ऐसा जाणोनियां भावो । एका एकपणीं ठेला ठावो ।

तेथेंही पायांचा नवलावो । केला एकपणा वावो वंदनमात्रें ॥१०॥

तेथें कवणें कवणासी वानणें । कवणें कवणासी विनविणें ।

कवणें कवणासी देणें घेणें । मीतूंचें जिणें जीवें गेलें ॥११॥

तेव्हां देव आणि भक्तु । जाहलासी मा तूंचि तूं ।

तेथें मीपणाची मातु । कोणें कोणांतु मिरवावी ॥१२॥

ऐशिया पदीं वाऊनि तत्त्वतां । करवितोसी ग्रंथकथा ।

तेव्हां माझेनि नांवें कवि कर्ता । तूंचि वस्तुतां सद्गुरुराया ॥१३॥

माझें नामरुप आघवें एक । तेंही जनार्दनु झाला देख ।

ऐसें एकपणाचें कौतुक । आत्यंतिक श्रीजनार्दना ॥१४॥

तेणें कौतुकेंचि आतां । माझेनि नांवें कवि कर्ता ।

होऊनि स्वयें रची ग्रंथा । यथार्थता निजबोधें ॥१५॥

तेथें द्वितीयाध्यायाचे अंतीं । दुस्तर माया उत्तम-भक्तीं ।

निरसोनियां भजनस्थिती । भगवत्प्राप्ती पावले ॥१६॥

कैशी दुस्तर हरीची माया । पुसावया सादरता झाली राया ।

अत्यादरेंकरोनियां । म्हणे मुनिवर्या अवधारीं ॥१७॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP