मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ६०

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ६०

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

रथी देखोनि रघुनंदना ॥ भरत घाली लोटांगणा ॥ तैसे म्या पाहोनि कृष्णा ॥ साष्टांगपाते वंदिली ॥१॥

घुम घुम होतसे नाद जीचा ॥ लोकपावन प्रवाह तीचा ॥ वेगे चालिला सागराचा ॥ संग करावा म्हणोनि ॥२॥

नाना पापांसि दहन करिते ॥ ती ही कृष्णा मज भेटते ॥ म्हणोनि सागरा येत भरते ॥ प्रगटे वरुण सवेंचि ॥३॥

थक्क होवोनि तो सोहळा ॥ वरूण पाहे आपुले डोळा॥ वरुणतीर्थ तये वेळा ॥ होय तेथे मुनी हो ॥४॥

शार्ङ्ग गदा शंख चक्र ॥ हाती घेवोनिया उपेंद्र ॥ लक्षुमीसह प्रगटे पुत्र ॥ म्हणे कार्तिक मुनीसी ॥५॥

स्त्री जयाचे एक अंकी ॥ दुजी घेतली निजमस्तकी ॥ तोही गणांसह प्रगटे पिनाकी ॥ कृष्णाब्धिसंगम पहाया ॥६॥

सरस्वतीचा कृष्णावेणीचा ॥ संग पहाया संघ मुनीचा ॥ जमला तदा चतुराननाचा ॥ पिता सागरा म्हणतसे ॥७॥

लघु थोरही जियेसि सम ॥ पाहू तियेचा तुज संगम ॥ जी का असे अमृतधाम ॥ ती ही कृष्णा मम तनू ॥८॥

जनार्दनाचे यापरी वचन ॥ ऐकोनि सागर करी नमन ॥ प्रसाद बोलोनि करग्रहण ॥ करी नदीचे तेधवा ॥९॥

कथन करिती एकमेका ॥ लाभ जाहला हाचि निका ॥ कृष्णासागरसंग जो का ॥ डोळा देखिला आजि हो ॥१०॥

आशा आमुची पूर्ण झाली ॥ ऐसी जयजयकार बोली ॥ वाद्ये नानापरी वाजली ॥ तये वेळी मुनी हो ॥११॥

मी स्त्री लाडकी सागराची ॥ मजवीण तुजला भेट कैची ॥ बोली ऐसीच कृष्णेची ॥ ऐके वेणा तेधवा ॥१२॥

भीमरूपा निवृत्ति वेणा ॥ वेगळी प्रवृत्ती होय कृष्णा ॥ द्विमुखी यापरी आलिंगना ॥ करी सागरा मुनी हो ॥१३॥

तदा करिती पुष्पवृष्टि ॥ देव गंधर्व मधुर गाती ॥ अप्सरागण नृत्य करिती ॥ गंगासागरसंगमी ॥१४॥

कृष्णासागरसंगमावरी ॥ स्नान केले एक जरी ॥ कोटि जन्मींचे पाप दूरी ॥ होवोनि सायुज्य मिळतसे ॥१५॥

ऐसा कैलासपर्वती शिव ॥ सांगे स्कंदासि कृष्णानुभव ॥ सनकदिका चमूराव ॥ सांगे तो मी ऐकिला ॥१६॥

तोचि विस्तार करोनिया ॥ कृष्णानुभाव वर्णिला मिया ॥ सह्य पर्वता पासोनिया ॥ समुद्रावधि मुनी हो ॥१७॥

कृष्णेमाजी अनंततीर्थे ॥ किंचित्‍ वर्णिली मी तुम्हांते ॥ स्मरता भक्तीने सदा जयाते ॥ मिळे स्नानफल अहो ॥१८॥

कृष्णा असे उदकमूर्ति ॥ कृष्णा असे विश्वमूर्ती ॥ कृष्णा सर्वत्र तीर्थमूर्ती ॥ भाव चित्ती असावा ॥१९॥

असे इयेला क्षेत्रबळ ॥ किंवा दैवत असे जवळ ॥ म्हणोनिया ही क्षेत्र केवळ ॥ नोहे नोहे असे हो ॥२०॥

जैसा अग्नी आदिअंती ॥ मध्ये स्पर्शिता तृणाप्रती ॥ तैसा कृष्णास्पर्श निगुती ॥ भस्म पाप करीतसे ॥२१॥

जैसा गुळाचा पिंड गोड ॥ सर्वत्र तैसी कृष्णा सुखाड ॥ पुरवी निजभक्त सर्व कोड ॥ संशय नसावा मानसी ॥२२॥

सह्यापासाव सागरावधी ॥ कृष्णेपासाव योजनावधी ॥ उभयतटी क्षेत्र जे मधी ॥ ते ते विमुक्तिद जाणिजे ॥२३॥

अरुणोदयी माघमासी ॥ स्नान करिता कृष्णावेणीसी ॥ त्रिपराक फल तयासी ॥ प्राप्त होते मुनी हो ॥२४॥

कार्तिकेसी करी स्नान ॥ तया फल पराक दोन ॥ पराक म्हणजे द्वादश दिन ॥ व्रत निरशन जाणिजे ॥२५॥

एक वर्ष करी स्नाना ॥ करी तयासी मुक्त कृष्णा ॥ पूर्ण होती वासना नाना ॥ म्हणे नारद मुनींसी ॥२६॥

पुष्य नक्षत्र वैधृति ॥ अमावास्या व्यतीपाती ॥ जन्म ऋक्षी स्नान करिती ॥ दानासि कृष्णेमाजि जो ॥२७॥

दे तया जी अनंत फळ ॥ सौभाग्यदायिनी जी दयाळ ॥ शांतिची जी मूर्ति केवळ ॥ शरण तियेसी रिघा हो ॥२८॥

भरतखंडी पावोनि जनन ॥ कदा न करिती कृष्णेसि नमन ॥ किंवा न करिती कदा स्नान ॥ कृष्णेमाजी जे नर ॥२९॥

धिक तयांचे जाण जन्मा ॥ वानी पराशर जिचा महिमा ॥ देऊ तियेसी काय उपमा ॥ साक्षात विष्णुची मूर्ती ती ॥३०॥

तीन दिवसे सरस्वती ॥ यमुना नदी दिवस साती ॥ करी पवित्र भागीरथी ॥ तात्काल दर्शने नर्मदा ॥३१॥

भीमरथी गोदावरी ॥ सदा जयाचे पवित्र वारी ॥ अगाध कृष्णानदीथोरी ॥ कुंठित विरिंची वर्णिता ॥३२॥

परी कद्रु आपले धन ॥ कळो नेदी गतप्राण ॥ तैसे कृष्णेसि मधुसूदन ॥ टाकोनि माया दाविना ॥३३॥

तदा सकळ तीर्थे विधीसी ॥ येवोनि करिती विनंतीसी ॥ ब्रह्मा तयांसह हरीपासी ॥ करी येवोनि प्रार्थना ॥३४॥

व्रताध्ययनयज्ञरहित ॥ केवळ कृष्णास्नान करीत ॥ तेही होवोत दुःखमुक्त ॥ भक्त वत्सला हे करी ॥३५॥

ऐसे ऐकोनि ब्रह्मवचन ॥ करुणाघन नारायण ॥ कन्येसि असता गुरू जाण ॥ निजमायेसि आवरी ॥३६॥

तदा कृष्णेमाजी सकळ ॥ तीर्थे येवोनि जाहली विमल ॥ पापनाश कराया बळ ॥ आले फिरोनी तयांसी ॥३७॥

यापरी प्रत्येक कन्यागती ॥ गंगादितीर्थे कृष्णेत येती ॥ तदा जे का स्नानादि करिती ॥ ते कृतार्थचि निश्चये ॥३८॥

येथे जे का अविश्वास ॥ करिती तया नरकवास ॥ ऐसे विधीसी जगन्निवास ॥ सांगे प्रसन्न होउनी ॥३९॥

कृष्णातटी आजन्ममरण ॥ राहोनि कृष्णादर्शनस्नान ॥ करिता कृष्णोदकाचमन ॥ होय कृष्णारूपचि तो ॥४०॥

असता कृष्णातटी विरक्ति ॥ सदा करावी अवश्य वस्ती ॥ कृष्णास्नानासि नसे शक्ती ॥ तरी स्मरावे तियेसी ॥४१॥

आणि जोडोनि हस्त दोनी ॥ सायंप्रातर्वेळ दोनी ॥ नमन करावे पडोनि धरणी ॥ मंत्र म्हणोनि यापरी ॥४२॥

मंत्रम्‍ ॥ अज्ञानाद्यदि वा ज्ञानाद्यन्मया दुष्कृतं कृतम्‍ ॥ तत्क्षमस्वाखिलं देवि जगन्मातर्नमोस्तु ते ॥४३॥

कृष्णेमाजी स्नान करिता ॥ बोलावयाचा मंत्र आता ॥ सांगतो ऐका देवोनि चित्ता ॥ म्हणे नारद मुनीसी ॥४४॥

मंत्रम् ॥ सह्यपादोद्भवे देवि श्रीशैलोत्संगगामिनि ॥ कृष्णावेणेति विख्याते सर्वपापप्रणाशिनी ॥ सर्वपापविशुद्ध्यर्थ स्नास्ये देवि तवांभसि ॥४५॥

प्रसीद मे देवि सदाऽमरेज्ये पूर्व तु सृष्टा जगता विमुक्तये ॥ स्नानेन यस्यामवधूतपापः प्राप्नोति विष्णोः पदमेव मर्त्यः ॥४६॥

ब्रह्मामृतानंदरसेन पूर्णा जलेन पूर्णामिति मेनिरे जनाः ॥ तां त्वावगाहामि पिबामि कृष्णां देवानृषींस्तर्पयिष्ये पितृंश्च ॥४७॥

दृष्ट्‌वा जन्मशतं पापं स्पृष्ट्वा जन्मशतत्रयम् ॥ स्नात्वा जन्मसहस्त्राणि हन्ति कृष्णा कलौ युगे ॥४८॥

स्नान करावे कृष्णारसा ॥ माजी म्हणोनि मंत्र ऐसा ॥ भक्ति असता मुक्ति सहसा ॥ माळ घालील तुम्हांसी ॥४९॥

असो लोपमुद्रेसी ऐसे ॥ कृष्णामहिमा नमूनि वरेशे ॥ सांगोनि केले प्रयाण हरुषे ॥ महासेनासि पहाया ॥५०॥

येवोनि शंभुचे सुताजवळी ॥ भृंग जाहला चरणकमळी ॥ सवेंचि कार्तिक तया कवळी ॥ प्रेमे निजहस्तपंक जो ॥५१॥

परम वैराग्य संसारी ॥ असोनि असणे हेचि थोरी ॥ आहेसि तू गा परोपकारी ॥ धन्य धन्य अगस्ते ॥५२॥

जैसी गोडी आणि गूळ ॥ की कापूर परिमळ ॥ तैसी कृष्णा कृष्ण विमळ ॥ एक निश्चळ जाणिजे ॥५३॥

ऐसे सांगोनिया गुप्त ॥ तेथेंचि जाहला अंबिकासुत ॥ अगाध कृष्णापुण्यचरित ॥ आहे यापरी मुनी हो ॥५४॥

ऐसा हा साठ अध्याय ग्रंथ ॥ स्कंद पुराणांतर्गत संस्कृत ॥ वेदव्यास नारायणप्रणीत ॥ प्राकृत जाहला मजकरवी ॥५५॥

आरंभ जिच्या कृपेने झाला ॥ तिनेच कडेस पोचविला ॥ जरी मम हस्ते करविला ॥ तरी कर्ता नसे मी ॥५६॥

शके अठराशे एकोणीस ॥ शुक्लपक्ष आश्विनमास ॥ विजयादशमी पुण्य दिवस ॥ ग्रंथ जाहला समाप्त ॥५७॥

श्रीक्षेत्र वाई पुण्यवान ॥ तेथे गार्ग्यगोत्री गणेशाभिधान ॥ रामकृष्णात्मज दास दीन ॥ प्रारब्धवशे राहत ॥५८॥

मायबापापायी ठेवोनि माथा ॥ प्राकृती आरंभ केला ग्रंथा ॥ पुण्यांशाचा व्यास जनिता ॥ दोष मस्तकी माझिये ॥५९॥

प्राकृत ग्रंथ नीट व्हावा ॥ म्हणोनि फल्टणकर राघवा पुराणीक शास्त्री योग यावा ॥ सुदैव थोर भक्तांचे ॥६०॥

शांताश्रमस्वामी योगवीर ॥ जगदीशनामे अभ्यंकर ॥ याणी सुचविले वारंवार ॥ उपकार मानू किती मी ॥६१॥

म्हणोनि असतील दोष जरी ॥ मी ते वागवीन आपुले शिरी ॥ क्षमा करणे भाविकांवरी ॥ सेवा गोड करोत ते ॥६२॥

कृष्णेचे घेवोनि निर्मळवारी ॥ कृष्णेसि घाली अभिषेकधारी ॥ कृष्णामाहात्म्य भाषांतरी ॥ कृष्णार्पण करी गणपती ॥६३॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ अध्याय साठावा गोड हा ॥६४॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये स्कंदनारदसंवादे उभयतोमुखीकृष्णासमुद्रप्रवेशो नाम षष्टितमोऽध्यायः ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP